हे पाच वर्षांपूर्वीचं पुस्तक, बॉब डिलनच्या आत्मचरित्रातल्या वा त्याआधीच्या चरित्रांतल्या तपशिलांची शहानिशा करणारं आहे..

‘डाउन द हायवे : द लाइफ ऑफ बॉब डिलन’ हे पुस्तक २०११ प्रसिद्ध झाले, त्याआधी खुद्द डिलनचे ‘क्रॉनिकल्स’ (२००५) हे आत्मचरित्रपर पुस्तक प्रकाशित झाले होते. त्याहीआधी बाजारात बॉब डिलनची अनेक चरित्रे उपलब्ध होती : ‘बॉब डिलन अ‍ॅन इंटिमेट बायोग्राफी’ (लेखक अँथनी स्कॅडूटो, प्रकाशनवर्ष १९७१), ‘नो डायरेक्शन होम’ (रॉबर्ट शिल्टन, १९८६), ‘डिलन’ (बॉब स्पीड, १९८९) आणि क्िंलटन हेलिन यांचे ‘बॉब डिलन बिहाइंड द शेड्स’ (क्लिंटन हेलिन, १९९१; सुधारित आवृत्ती: २००१) एवढी चरित्रे असूनही ‘डाउन द हायवे’ हे पुस्तक वेगळे ठरते; याचे कारण बॉब डिलनच्या सहवासात आलेल्या जवळपास अडीचशे व्यक्तींच्या मुलाखती हॉवर्ड सौन्स या लेखकाने घेतल्या. त्यातून आधीच्या आत्मचरित्र/चरित्रातल्या काही गोष्टी पक्क्या झाल्या, तर बऱ्याच तिखटमीठ लावलेल्या मसालेदारी बाबी साधेपणाने समोर आल्या.

वूडी गुथ्रीचा प्रभाव बॉब डिलनवर होता हे माहिती असलेल्या वाचकाला, एल्व्हिस प्रिस्लेचे गाणे पहिल्यांदा ऐकल्यावर बॉब डिलन याला काय वाटले हेही सांगणारे हे पुस्तक आहे. पहिला जाहीर कार्यक्रम (१९६१ मध्ये) होण्याआधीच्या- १९४१ ते ६१ या वीस वर्षांत बॉब डिलनवर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती कोण? त्याच्या सांगीतिक विश्वाचा भाग बनलेले गायक/संगीतकार कोण? त्याने कोणते साहित्य वाचले? याचा काय आणि कसा परिणाम त्याच्या व्यक्तिमत्त्वावर झाला? आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्याचे संगीताकडे नेणारे आणि संगीताने झपाटलेले त्याचे मित्र-मैत्रिणी कोण? आणि त्यांचा त्याच्या आयुष्यावर काय प्रभाव पडला, अशा किती तरी गोष्टी या पुस्तकातून उलगडतात.

डिलुथ या मिनेसोटातील गावी १९४१ मध्ये रॉबर्ट झिमरमन जन्मला, ज्याने पुढे संगीतात करिअर करण्यासाठी ‘बॉब डिलन’ हे नाव घेतले. बॉब डिलन १९६३ साली प्रसिद्ध झाला, तोवर त्याच्याबद्दल बरीचशी मिथके होती.. ‘तो आई-वडिलांनी टाकून दिलेला अनाथ मुलगा आहे’ हे त्यातले एक! पण बॉब डिलन विशीच्या उंबरठय़ाला येईपर्यंत मध्यमवर्गीय, खाऊन-पिऊन सुखी घरातच वाढला. लहानपणीच त्याच्या घरी पियानो होता. गिटार त्याने स्वत: विकत घेतली. वडिलांची ब्यूक गाडी होती; अठरा वर्षांचा होईतो त्याला वडिलांनी बाइक घेऊन दिली. तरीही बॉबला संगीताचा चस्का लागला तो एल्व्हिस प्रिस्ले, लिटिल रिचर्ड, चक बेरी, हॅक विल्यम आणि मडी वॉटर यांचे ऐकून. यातील हॅक विल्यमचा मृत्यू फारच अकाली झाला. बॉबच्या आयुष्यावर प्रभाव टाकणारी मंडळी होती, ती त्यातील काही अकाली मरण पावली आहेत : त्यापैकी एक डिलन थॉमस, दुसरा हॅक विल्यम.

आज जो काही मन संगीतकार लोकांना माहीत आहे तो खरा घडला ६०च्या दशकात. न्यूयॉर्कमध्ये ६१ साली आल्यावर विविध मित्रांकडे आणि संगीतकारांकडे आश्रय घेत आणि सोफ्यांवर झोपत, धडपड  करणाऱ्या बॉबचे वेगळेपण काही लोकांनी ओळखले, त्यात ‘कोलंबिया रेकॉर्ड्स’चे जॉन हॅमंड हेही होते. हे वेगळेपण म्हणजे पारंपरिक लोकसंगीतात नवा आणि समकालीन आशय आणण्याचे. त्यामुळेच ज्या ‘प्रोटेस्ट’ संगीतासाठी तो ओळखला जातो त्यातले पहिले गाणे त्याने लिहिले ते मिसिसिपी राज्यातल्या कृष्णवर्णीय मुलाबद्दल. गोऱ्या मुलीवर प्रेम केल्यामुळे या कृष्णवर्णीय मुलाचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. याबद्दल खुनाचा आरोप असलेल्या दोघांनाही ‘पुराव्याअभावी’ सोडण्यात आल्याने जनमानसात चीड होती. हे गाणे होते ‘बॅलाड ऑफ एम्मेट टिल’ जे नंतर डेथ ऑफ एमेट टील म्हणून प्रसिद्ध झाले. तेव्हाची सैराट कथाच त्याने गाण्यातून मांडली.

पहिला अल्बम, पहिली जाहीर मैफल, पहिल्यांदा मीडियाकडून दखल आणि गाणे पहिल्यांदा लोकांच्या ओठावर रुळू लागणे, हे सारे टप्पे बॉब डिलनच्या आयुष्यात  १९६१-६२-६३ या तीन वर्षांतच आले. ‘कोलंबिया रेकॉर्ड्स’शी त्याच्या पहिल्या अल्बमचे कंत्राट १९६१च्या ऑक्टोबरात सहीसकट तयार झाले आणि ६२च्या जानेवारीत अल्बम विक्रीला आला. पण वर्षभरात केवळ पाच हजार प्रती खपल्या. ‘आन्सर माय फ्रेंड इज ब्लोइंग इन द विंड’ हे त्याला ओळख मिळवून देणारे गाणे त्याने चक्क काही मिनिटांत लिहिले. त्याची चाल मात्र ‘नो मोअर ऑक्शन ब्लॉक’ या प्रसिद्ध आफ्रिकन-अमेरिकन लोकगीताशी जुळणारी होती. ते सादर केल्यावर इतर गायक मंडळी लगेच त्याचे विडंबन गंमत म्हणून करू लागली. तेव्हाच बॉबच्या व्यवस्थापकाला- अल्बर्ट ग्रॉसमनला- त्यातली ताकद कळली. ‘फ्री विलिन’या पुढल्याच (१९६३) अल्बममध्ये हे गाणे प्रसिद्ध झाले आणि त्याने जग जिंकले. याच अल्बममध्ये ‘मास्टर्स ऑफ वॉर’ हे युद्ध आणि शांततेवर भाष्य करणारे गाणे होते. अणुयुद्धानंतरच्या संहाराची चाहूल देणारे ‘हार्ड रेन इज गोन्ना फॉल’ हेही गाणे त्यात होते.

हॉवर्ड सौन्सने लिहिलेल्या चरित्राचे वैशिष्टय़ असे की, ‘मोटरसायकल अपघातात जायबंदी होऊन बराच काळ पडद्याआड गेलेल्या’ बॉब डिलनवर सहा आठवडे उपचार करणाऱ्या डॉक्टरलाही तो भेटला. (डिलनने स्वत:च्या ‘क्रॉनिकल्स’मध्ये या अपघाताबद्दल खूप लिहिले आहे) त्यातूनच, सौन्सने असे ध्वनित केले आहे की हा अपघात खरे तर तेवढा तीव्र नव्हता. पण ‘कल्पनाशक्तीच्या आधारावर जगू पाहणाऱ्या कलावंतावर कधी तरी अशी एक वेळ येते की त्याला समाजापासून  दूर जाऊन स्वत:बरोबर राहण्याची निकड भासते. या निकडीने त्याच्यातील सर्जनशील कलावंताला पुनर्जन्म दिला,’ हे सौन्स सांगतो. वेळोवेळी बॉब डिलन कुठल्या तरी गर्दीत गेलेला आहे. स्वत:ची शक्ती त्याने गमावली आहे. आणि पुन्हा तो उभारी घेऊन वर आलेला आहे. हे दोनदा तरी त्याच्या कारकीर्दीत घडले. आणि अलीकडील सुपरस्टारचे चित्रपट पाहिले तर सुपरमॅन बॅटमॅन यांच्या आयुष्यात असा काळ नेहमीच येतो. पण डिलन काही सुपरमॅन नव्हता. खरे तर डिलनचे कुटुंबीय म्हणजे पूर्वेकडचे ज्यू कुटुंब, पण ते दोन पिढय़ांआधी अमेरिकेत येऊन स्थिरावले होते. म्हणजे लहानपणी, युरोपात होता तसा ज्यूपणाचा त्रास बॉबला झाला नाही. तरीही डिलुथ गावच्या क्लबमध्ये ज्यूंना प्रवेश नव्हता! मात्र, त्याला दोन-तीनदा ज्युइश संस्कार केंद्रात ठेवले गेले आणि इथेच त्याला संगीतावर प्रेम करणारे सवंगडी मिळाले, हे सौन्स सांगतात.

आपल्या पहिल्यावहिल्या रेडिओ मुलाखतीत त्याने आपण न्यू मेक्सिकोमध्ये फोक संगीत शिकलो, शेतात मजूर म्हणून काम केले, कार्निव्हलमध्ये हिंडून गाणी सादर केली, असे अनेक खोटे तपशील दिले. पुस्तकात ती अख्खी खोटी मुलाखतच दिली आहे. पुढेही अनेकदा बॉबने अनेक मुलाखतीत उलटसुलट तपशील दिलेले आढळतात. ‘मात्र टीव्हीवर झळकण्याची पहिली संधी त्याने सेन्सॉरशिप झुगारण्याच्या वृत्तीमुळे नाकारली. सीबीएस वाहिनीवरल्या प्रख्यात ‘एड सलाय्व्हान शो’मध्ये १९६३ सालीच बॉब डिलनची मुलाखत होणार होती. पण कार्यक्रमातून त्याला त्याचे ‘जॉन बिर्च सोसायटी’ या कट्टर अमेरिकत्ववादी उजव्या गटाची खिल्ली उडवणारे ‘टॉकिन् जॉन बिर्च सोसायटी ब्ल्यूज’ हे गाणे वगळायला सांगितले, म्हणून बॉबने मुलाखतच नाकारली’ अशा शब्दांत त्याचा खरेपणाही लेखकाने सांगितला आहे.

‘जॉन स्टाइनबेकवर त्याने १५ पानांचा निबंध शाळेत असताना लिहिला होता’ असे तपशील लेखक सौन्स यांनी साधार दिले आहेत. बॉबच्या घडणीचा १९५०-६० हा काळ आणि नंतरचा प्रसिद्धीला येतानाचा ६३ पर्यंतचा काळ सौन्स यांनी उत्तमच रंगवला आहे. लोकांना कमी माहीत असलेला हाच काळ आहे. कारण १९६१ नंतरचा बॉब डिलन हे साऱ्या जगाला माहीत असलेले एक उघडे पुस्तक आहे. अर्थात अनेक सेलेब्रिटींप्रमाणे बॉब डिलनचे आयुष्य चाहत्यांनी सळो की पळो केले होते. त्यामुळे गुप्तपणे वेगवेगळ्या ठिकाणी राहणे, इतकेच नव्हे तर लग्नही गुप्त ठेवणे हे कसोशीने केले. ‘बीटल्स’च्या जॉन लेननचा खून त्याच्या चाहत्यांनी केल्यानंतर आपल्याभोवतीचे संरक्षक कवच बॉब डिलनने अधिक कडक केले. इतकेच नव्हे तर बुलेटप्रूफ जॅकेट विकत घेतले आणि वापरू लागले. लक्षावधींच्या मैफलींसाठी प्रसिद्ध असलेल्या वूडस्टॉकमध्ये त्याचे घर होते. पण पहिल्या वूडस्टॉकला तो तिथे हजर नव्हता. तर पन्नास हजार डॉलरच्या लंडन टूरवर गेला होता.

चाहत्यांच्या या त्रासाचे उदाहरण म्हणजे वूडस्टॉकमधल्या या घरात चक्कएकदा आपल्या बिछान्यातच डिलन व त्याच्या पत्नीला भलतेच हिप्पी जोडपे दिसले. डिलनने तीन लग्ने केली. त्यापैकी पहिली बायको सारा लॉर्ड फारशी बोलत नाही, पण तिच्याशी झालेल्या घटस्फोटाने बॉबला जबर आर्थिक इजा केली. तिशीचा होईपर्यंत बॉब डिलनला चार मुले होती. शिवाय माना नावाची दत्तक मुलगी. प्रयत्न करूनही डिलनची मुलाखत चरित्रकाराला मिळू शकली नाही. पण वयाच्या सोळाव्या वर्षी बॉब ज्या मुलीच्या प्रेमात पडला होता, त्या एको नावाच्या मुलीचे आणि त्यांच्या नात्याचे बरेच तपशील पुस्तकात आढळतात. त्यातून पुढे येणारे बॉबचे चित्र काही सुखावह नाही. पुस्तकातली खळबळजनक माहिती म्हणजे त्याने जगापासून लपवलेले लग्न. त्याने ४ जून १९८६ रोजी कॅरोलिन डेनिस या गायिकेशी केलेले  लग्न, पुस्तक प्रसिद्ध होईपर्यंत कुणाला माहीत नव्हते. आणखी असे बरेच काही पुस्तकात आहे.

पुस्तकातून दिसतो तो पिकासोसारख्या प्रतिभेचा कलावंत; ज्याला आपल्या आयुष्यातील कुठल्याही घटनेचे, जगण्यातील क्षणांचे रूपांतर कलाकृतीमध्ये करता येते. पुस्तकातील प्रसंग आणि किस्से यांतून वजा करूनही एक महान गायक आणि गीतकार उरतो.. तो तुम्हाला तुमच्या हेडफोन्समध्येही सापडू शकेल.

डाउन हायवे

  • लाइफ ऑफ बॉब डिलन’
  • लेखक : हॉवर्ड सौन्स
  • प्रकाशक : डबलडे
  • पृष्ठे : ५६६, किंमत : ११३५ रु.

shashibooks@gmail.com