27 February 2021

News Flash

अर्थविचारांचे भारतीय सूत्र

संस्कृत भाषेतील प्राचीन भारतीय नोंदी आणि त्यात अंतर्भूत आर्थिक विचार असा अनोखा मेळ या ग्रंथात साधला आहे.

देवयानी देशपांडे ddevyani31090@gmail.com

आर्थिक विचारांना प्राचीन भारतीय लेखनाची पूर्वपीठिका आहे, हे सांगणाऱ्या या पुस्तकाचा हेतू भारतीय अर्थव्यवस्थेचा इतिहास मांडणे हा नाही. मात्र प्राचीन भारतीय उपखंडातील लेखनात आर्थिक विचारांचे सूत्र शोधण्याचा प्रयत्न हे पुस्तक तपशीलवार करते..

रूढार्थाने अर्थशास्त्र हा अनेकांना रूक्ष वाटणारा विषय. मात्र प्राचीन भारतीय साहित्यातील आर्थिक विचारांचा वेध घेणाऱ्या ‘इकॉनॉमिक सूत्र : एन्शियन्ट इंडियन अ‍ॅन्टिसिडन्ट्स टु इकॉनॉमिक थॉट’ या ग्रंथामुळे भारतीय परंपरेबाबत कुतूहल आणि जोडलेपण जाणवते अशा सर्वाना हा विषय वाचनीय वाटेल. आयआयएम अहमदाबाद येथील अर्थशास्त्राचे प्राध्यापक सतीश देवधर लिखित हा संस्कृत, अर्थशास्त्र आणि इतिहासाची सुलभ सांगड घालणारा ग्रंथ सर्व विषयांच्या अभ्यासकांनी, जिज्ञासूंनी आणि भारतीय संस्कृतीविषयी आस्था बाळगणाऱ्यांनी हाती घ्यावा आणि कथात्मरूपाने वाचत जावा असा आहे. प्रस्तुत ग्रंथ कोणासाठीही वर्ज्य नाही. वाचकाचे बोट धरून इतिहासप्रवेश आणि त्यानंतर त्याला आधुनिक काळात घेऊन येण्याचे काम लेखकाने खुबीने केले आहे. भारतीय वर्णव्यवस्थेची पाळेमुळे, उपनयन संस्काराचा गर्भितार्थ, अध्यात्मातील गूढ यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे वाचकाला या ग्रंथात गवसतील. संस्कृत भाषेतील प्राचीन भारतीय नोंदी आणि त्यात अंतर्भूत आर्थिक विचार असा अनोखा मेळ या ग्रंथात साधला आहे.

लेखकाने असा विषय निवडण्यामागचे कारण ग्रंथाच्या ऋणनिर्देशात गवसते. विषयनिवडीमध्ये शालेय जीवनातील शिक्षकांचा वाटा मोलाचा असल्याचे लेखकाने आवर्जून नमूद केले आहे. शालेय जीवनात विचारांना लागणारी शिस्त, अभ्यासाची गोडी, आकलनक्षमतेचे दृढीकरण या सर्व बाबींचे महत्त्व त्यानिमित्ताने अधोरेखित होते. शालेय जीवनात पक्का होणारा पाया यावर आजघडीला आवर्जून विचार व्हावयास हवा.

या ग्रंथाला प्रसिद्ध शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांची प्रस्तावना लाभली आहे. प्रस्तुत लेखनामध्ये लेखकाने केवळ दुय्यम स्रोतांचा आधार घेतला नसून अनेक मूळ स्रोत आणि त्यांच्या इंग्रजी अनुवादाचाही आधार घेतला आहे. प्राचीन भारतीय लेखनामध्ये आर्थिक कल्याणाचा भाग समाविष्ट होता, हे दाखवून देताना देवधर यांनी ग्रंथाच्या सुरुवातीला प्राचीन भारतीय नोंदींची तोंडओळख करून दिली आहे. त्यानंतर, आर्थिक विचार अंतर्भूत असलेल्या नोंदींचा परिचय करून दिला आहे.

आर्थिक विचारांना प्राचीन भारतीय लेखनाची पूर्वपीठिका आहे, हे दर्शवताना लेखकाने इतिहासाचा अभ्यास का करावा, यावर मार्मिक विवेचन केले आहे. यावरून प्रस्तुत ग्रंथ म्हणजे केवळ भारतीय अर्थव्यवस्थेचा इतिहास आहे का, असा साहजिक प्रश्न कोणाला पडेलही. मात्र, ‘प्राचीन भारतीय उपखंडातील लेखनात आर्थिक विचारांचे सूत्र शोधण्याचा प्रयत्न’ असे त्याचे उत्तर होय. असे करताना, ख्रिस्तपूर्व २५०० वर्षांपूर्वीच्या सरस्वती-सिंधू संस्कृतीपासून मध्ययुगीन कालखंडाच्या पूर्वार्धापर्यंतचा कालखंड लेखकाने निवडला आहे.

प्रस्तुत ग्रंथाच्या शीर्षकामध्ये ‘सूत्र’ हा मूळचा संस्कृत शब्द वापरण्यामागे तर्क आहे. सूत्र म्हणजे ज्यामध्ये रत्ने ओवली आहेत असा धागा होय. तसेच प्राचीन भारतामध्ये तात्त्विक विचार भूर्जपत्रांवर लिहिले जात. अलंकारिक भाषेतील या लेखनाला ‘सूत्र’ असे संबोधले जाई. त्याचप्रमाणे, प्राचीन भारतीय आर्थिक विचारघटक एकत्र गुंफण्याचा अभ्यासपूर्ण प्रयत्न म्हणजे हा ग्रंथ होय!

ग्रंथाच्या पहिल्या भागामध्ये प्राचीन भारतीय संहितांची तोंडओळख करून दिली आहे. त्यानंतर प्रारंभीचे आर्थिक विचार नमूद केले आहेत. यामध्ये महत्त्वाकांक्षा, संपत्ती, मूल्य, कर, दानधर्म, शासकीय धोरणे, व्यापारी संघ, शासनाचा संपत्तीचा अधिकार, श्रमविभाजन, वर्ण आणि जाती यांबाबत विवेचन केले आहे. दुसऱ्या भागामध्ये पाचव्या आणि सहाव्या प्रकरणाचा समावेश होतो. ग्रंथाच्या शेवटी लेखकाने निष्कर्षांत्मक निरीक्षणे नोंदवली आहेत.

लेखकाच्या मते, आर्थिक विचारांमध्ये प्राचीन भारतीय साहित्याचे मोठे योगदान आहे; त्या योगदानाची अमीट स्मृती निर्माण करणे हा या ग्रंथाचा हेतू आहे. म्हणून अनेक सहस्रकांपूर्वी प्राचीन भारतीय साहित्यात आर्थिक बाबींवर झालेली चर्चा संपूर्ण ग्रंथात लेखकाने निदर्शनास आणून दिली आहे.

प्राचीन भारतीय साहित्यातील वेद, ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ ही महाकाव्ये, ‘मनुस्मृती’, ‘अन्विक्षिकी’, भरतमुनींचे ‘नाटय़शास्त्र’, पाणिनी यांच्या व्याकरणसंहिता, कौटिल्याचे ‘अर्थशास्त्र’, इत्यादींचा उल्लेख या ग्रंथात आहे. आधुनिक आर्थिक सिद्धान्त ऐहिक संपत्तीचा पुरस्कार करते, सुख हे अंतिम ध्येय मानते. मात्र, भारतीय संहितांमध्ये आर्थिक कल्याणाला चार पुरुषार्थापैकी एक मानले आहे. या अनुषंगाने, लेखकाने चार पुरुषार्थावर चर्चा केली आहे.

प्राचीन भारतीय संहितांतील आर्थिक विवेचनाचा मागोवा घेताना लेखकाने ‘ऋग्वेदा’तील धनलक्ष्मी स्तुतीचा उल्लेख केला आहे. ‘श्री सूक्ता’मध्ये लक्ष्मीकडे सर्जनशीलता आणि समृद्धीची याचना केली आहे. तसेच अथर्ववेदातील तिसऱ्या मंडलातील बाराव्या श्लोकामध्ये एक गृहस्थ नवी वास्तू, कुटुंबकबिला, रुचकर अन्नपदार्थ आणि गाई-घोडे या रूपात वर मागतो, असाही संदर्भ दिला आहे. महाभारताच्या शांतिपर्वातील अर्जुनाच्या युक्तिवादाचा उल्लेख प्रस्तुत ग्रंथात आहे. यामध्ये ‘संपत्तीतून संपत्तीची पुनप्र्राप्ती होते’ या उक्तीमुळे संपत्तीनिर्मितीचे साधन म्हणून भांडवलाचे महत्त्व अधोरेखित होते, असे लेखक म्हणतो. याशिवाय ‘ईशोपनिषदा’तील गृहस्थाश्रम आणि अध्यात्म यांतील द्वंद्वात्मकतेवरदेखील प्रस्तुत ग्रंथात विवेचन आढळते. शिवाय पुरुषार्थ आणि आश्रम यांतील समन्वयाचा भाग वाचनीय झाला आहे.

यानंतर, राजाचे आर्थिक धोरण कसे असावे, जनपदे आणि व्यापारसंघ यांतील व्यापार, जमीनहक्क, राजाची सार्वभौम सत्ता यांवर विवेचन करतानाही प्राचीन भारतीय संहितांतील नोंदींचा आधार घेतला आहे. त्यानंतर लेखकाने श्रमविभाजन आणि वर्णव्यवस्थेवर केलेले विवेचन समयोचित आहे. वर्ण आणि जात यांवरील विवेचनामुळे समकालीन परिस्थितीत अनेकांगांनी स्पष्टता येईल. वासाहतिक काळातील जातींचे आकलन नेमके कसे होते, याबाबत सविस्तर स्पष्टीकरण या ग्रंथात आले आहे.

ग्रंथाच्या दुसऱ्या भागामध्ये लेखकाने कौटिल्याच्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथावर तपशीलवार विवेचन करत दोन प्रकरणे यासाठी खर्ची घातली आहेत. आर्थिक आणि राजकीय स्थर्य आणि केंद्रीकृत प्रशासनासाठी मार्गदर्शक पुस्तिका हा ‘अर्थशास्त्रा’चा हेतू होता. लेखकाने कौटिल्याच्या पार्श्वभूमीचा आढावा घेतला असून कौटिल्यकृत अर्थशास्त्राच्या व्याख्येवर तपशीलवार विवेचन केले आहे. प्राचीन भारतातील प्रतिसादी न्यायशास्त्र आणि कौटिल्याने भारतात प्रचलित वेठबिगारीच्या पद्धतीवर केलेले विवेचन वाचनीय आणि ज्ञानात भर घालणारे आहे. कौटिल्याचे बालकामगारविरोधी आणि कामगारहक्क संरक्षणाविषयीचे विचार स्थळकालाच्या पल्याडचे आहेत, असे लेखक म्हणतो. कौटिल्य कालबाह्य़ आहे असे मानणाऱ्यांना ही बाब खटकू शकेल.

बाजारपेठा, किमती आणि वेतनावरील कौटिल्याचे विवेचनही येथे आढळते. त्या काळी शेती, म्हणजेच शेतजमीन हा बाजारपेठ पुरवठय़ाचा सर्वाधिक महत्त्वाचा स्रोत होता. बदलते पाऊसमान, जमिनीची सुपीकता, लोकसंख्येची घनता यांवर जमिनीची परिवर्तनशीलता अवलंबून असते, याची कौटिल्याला जाण होती हे अधोरेखित होते. तसेच शेजारच्या राज्याचा हल्ला किंवा पशूंच्या दहशतीमुळे जमिनीच्या उत्पादकतेवर परिणाम होतो हे कौटिल्याला ठाऊक होते. त्यामुळे कौटिल्याने नवी खेडी किंवा बाजारपेठांची शहरे वसवण्यासाठी राजाने रस्ते, पाण्याचे तलाव आणि इतर पायाभूत सुविधांसाठी सुरक्षित स्थाने निवडावीत असा उपदेश केला. आजच्या नगरनियोजनाच्या संदर्भात हा विचार मार्गदर्शक ठरेल.

ग्रंथाच्या सरतेशेवटी लेखकाने प्रांजळ भूमिका घेत, निष्कर्षांत्मक निरीक्षणे नोंदवताना प्रारंभी ‘सुजाण प्रेक्षकांकडून पारख होत नाही तोवर माझ्या नाटकाचा हेतू साध्य होणार नाही’ या कालिदासाच्या वचनाचा उल्लेख केला आहे. यामध्ये संपूर्ण ग्रंथाचा आढावा घेत लेखकाने ‘अडगळीच्या खोलीला भेट दिल्याने आपल्याला फायदा होऊ शकेल, मात्र आपण दीर्घकाळ तिथेच व्यतीत करणे योग्य नाही’ हे शुम्पिटर यांचे प्रभावी विधान नमूद केले आहे. अडगळीच्या खोलीतून बाहेर पडण्यापूर्वीचा दीर्घ विराम म्हणजे प्रस्तुत ग्रंथ होय, असे लेखक म्हणतो. या विरामाचा हेतू साध्य झाला की नाही, हे मात्र जाणकार वाचकांवर अवलंबून आहे. ग्रंथ मिटण्यापूर्वी अखेरीस दिलेले नवोन्मेषी शब्दकोडे वाचकांनी आवर्जून सोडवावे अशी विनंती लेखकाने केली आहे.

ग्रंथाचा कोणताही ठाम निष्कर्ष आहे असे म्हणता येणार नाही. अनेक विषयांचा आढावा घेणारा, प्रसंगी तपशीलवार भाष्य करणारा हा एक अभ्यासप्रपंच आहे, असे म्हणणे अधिक योग्य ठरेल. मात्र, आजच्या काळात या अभ्यासप्रपंचाचे उपयोजन कसे करता येईल, याबाबत प्रस्तुत लेखन मार्गदर्शक ठरत नाही किंवा त्यावर दूरदर्शी असा स्वतंत्र लेखनप्रपंच हाती घेणे प्राप्त आहे.

कौटिल्याच्या ‘अर्थशास्त्रा’ची ही अनुवादित प्रत बंगळुरूच्या गव्हर्नमेंट प्रेसने १९१५ साली प्रसिद्ध केली. कौटिल्याच्या ‘अर्थशास्त्रा’तील विविध तपशील ‘इकॉनॉमिक सूत्र : एन्शियन्ट इंडियन अ‍ॅन्टिसिडन्ट्स टु इकॉनॉमिक थॉट’ या पुस्तकात आले आहेत.

‘इकॉनॉमिक सूत्र : एन्शियन्ट इंडियन अ‍ॅन्टिसिडन्ट्स टु इकॉनॉमिक थॉट’

लेखक : सतीश वाय. देवधर

प्रकाशक : पेंग्विन रॅण्डम हाऊस, इंडिया

पृष्ठे : १९९, किंमत : ३९९ रुपये

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 29, 2020 3:21 am

Web Title: economic sutra ancient indian antecedents to economic thought the kautiliya arthasastra by r shamasastry zws 70
Next Stories
1 बुकबातमी : ब्राऊनीयन बालचित्रवाणी..
2 मुघल गेले, इंग्रज आले; मधे काय झाले?
3 तीन पिढय़ा आणि दोन मार्ग
Just Now!
X