|| सुधीर आपटे

२००८ सालच्या आर्थिक अरिष्टानंतर अमेरिकेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या निवृत्त मध्यमवर्गीयांच्या, विशेषत: त्यातील स्त्रियांच्या वाट्याला आलेल्या देशोधडी जगण्याच्या कथा-व्यथा मांडणाऱ्या पुस्तकाविषयी…

‘नोमॅडलॅण्ड : सव्र्हायव्हिंग अमेरिका इन द ट्वेंटी-फस्र्ट सेंच्युरी’ हे अमेरिकी पत्रकार जेसिका ब्रूडर हिचे पुस्तक तीन वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाले, पण त्यावर आधारित ‘नोमॅडलॅण्ड’ हा सिनेमा गतवर्षी प्रदर्शित झाला आणि त्यास ऑस्कर पुरस्कारही मिळाले. नोमॅड्स म्हणजे भटके लोक, हा अर्थ आपणास ठाऊक असतो. पण हे पुस्तक अमेरिकेतील बहुतांशी आर्थिकदृष्ट्या अगदीच दुर्बल असलेल्या निवृत्त मध्यमवर्गीयांबद्दल आणि त्यातल्या त्यात अशा स्त्रियांबद्दल आहे. अमेरिकी मध्यमवर्गीय भटके किंवा नोमॅड्स असावेत, ही कल्पनाच अशक्य वाटते, पण ती खरी आहे. अमेरिकेत अतिश्रीमंत आणि गरीब यांतील दरी फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आपल्याकडे तर ती आहेच, पण या वास्तवाची आपल्याला जाणीव आहे. मात्र अमेरिकेतही असे घडत आहे हे वाचून भारतीय वाचकास धक्का बसतो.

अमेरिकेत हे असे होण्याची अनेक कारणे आहेत, पण त्यांतील महत्त्वाची दोन. श्रीमंतांचा संपत्तीप्रति लोभ किंवा अधिक संपत्तीची हाव यास काही मर्यादा राहिलेली नाही आणि मध्यमवर्गीयांच्या उत्पन्नात मात्र वाढ होत नाहीये. २००९ ते २०१२ या काळात उच्चतम एक टक्के लोकांचे उत्पन्न ३१ टक्क्यांनी वाढले, तर याच काळात मध्यमवर्गाचे उत्पन्न अर्ध्या टक्क्यापेक्षाही कमी वाढले; म्हणजे आधीच असलेली दरी अधिकच वाढली. २००८ मधील ‘सबप्राइम’ अर्थसंकट तर या वर्गासाठी भेसूर ठरले. बँकांनी तेवढी पत नसलेल्या अनेक कर्जदारांना त्यांच्या घरावर किंवा घर घेण्यासाठी भरमसाठ कर्जे दिली गेली. बँका आणि कर्जदारांना असा भ्रम होता की, आत्तापर्यंत घरांच्या किमती जशा वाढत होत्या तशाच त्या वाढत राहतील. त्यामुळे बँकांना ही कर्जे सुरक्षित वाटली, तर कर्जदारांना कर्ज फेडण्याची खात्री होती. पण २००७ च्या अखेरीस ‘सबप्राइम’चा फुगा फुटला. ‘लेहमन ब्रदर्स’सारख्या प्रचंड गुंतवणूक बँकेने दिवाळखोरी जाहीर केली आणि जगातील आर्थिक क्षेत्रात खळबळ माजली. घरांच्या किमती कोसळल्या. तोवर बऱ्याचशा मध्यमवर्गीयांनी ऐपतीपेक्षा अधिक मोठी घरे आणि कर्जे घेतलेली असल्यामुळे या आर्थिक अरिष्टात ते चांगलेच अडचणीत आले. ते कर्ज फेडू शकत नसल्यामुळे बँकांनी त्यांची घरे ताब्यात घेऊन त्यांना घराबाहेर काढले. अशा लोकांमध्ये कित्येक एकट्या राहणाऱ्या महिला आणि काही पुरुष होते. यांतील पुष्कळ जणांना इतर कोणताच आधार नसल्यामुळे अगदी स्वस्तात मिळणारी वापरलेली फिरती घरे विकत घेऊन त्यात आपला संसार थाटून जेथे नोकरी मिळू शकेल आणि त्याच्या जवळपास हे फिरते घर ‘पार्क’ करता येईल अशा तऱ्हेने अमेरिकेच्या निरनिराळ्या राज्यांत हिंडत राहण्याची वेळ आली. अशा लोकांच्या निरनिराळ्या अनुभवांची आणि सुखदु:खांची कहाणी म्हणजे ‘नोमॅडलॅण्ड’ ही सत्यकथा! या लोकांना भाड्याने सदनिका घेऊन राहणे शक्य नव्हते का, असा प्रश्न पडेल. पण या लोकांना चरितार्थासाठी नोकऱ्या करणे आवश्यक होते आणि नोकऱ्या फक्त मोठ्या शहरांत उपलब्ध होत्या. पण मोठ्या शहरांतील सदनिकांचे भाडे न परवडणारे होते.

‘नोमॅडलॅण्ड’ची सुरुवात लिंडा मे या पासष्टीतील व्यक्तिरेखेच्या भटकंतीने होते. तिच्याकडे स्वमालकीची चारचाकी गाडी आहे, पण राहण्यासाठी त्यास जोडलेला ‘कॅम्पर’ तिने भंगार करण्यासाठी ठेवलेल्या एका वाहनतळामधून अगदी स्वस्तात घेतला आणि त्यात किरकोळ दुरुस्त्या करून तो राहण्यायोग्य केला. त्यातून तिच्या भटकंतीची सुरुवात होते. अमेरिकेत असे नवे किंवा सुस्थितीतील कॅम्पर्स भाड्याने घेऊन मजेच्या वा करमणुकीसाठीच्या भटकंतीला बाहेर पडणे ही प्रथा म्हणून उच्च वर्गातही रूढ आहे. अशा लोकांच्या सोयीसाठी कॅम्पिंग क्षेत्रे असतात. या क्षेत्रात सकाळची आन्हिके, अंघोळ करण्याच्या तसेच धुलाई यंत्रे आदी सोयी असतात. त्याचे अर्थातच भरपूर भाडे असते. अशी क्षेत्रे भटक्या मध्यमवर्गीयांना परवडणारी नसतात. पण अशी क्षेत्रे साफ ठेवण्याच्या नोकऱ्याही त्यांना मिळू शकतात. लिंडाला असे कॅम्पिंग क्षेत्र साफ करण्याची नोकरी मिळते. अशा नोकरीचा दुहेरी फायदा असतो. नोकरीचाही प्रश्न सुटतो आणि कॅम्परही या क्षेत्रात विनाखर्च उभा करता येतो. अर्थात, पगार अगदी कमी म्हणजे किमान वेतनाइतका असतो. हे किमान वेतन तासाला फक्त १० डॉलर्स इतके कमी असते आणि कामही खूप कष्टाचे असते. या कॅम्पमधील सर्व सोयी- यात शौचालयेही आली- साफ ठेवण्याची जबाबदारी हे या नोकरीतील मुख्य काम असते. लिंडासारखी वयस्क आणि मध्यमवर्गीय स्त्री अशी कामे करताना या पुस्तकावर आधारित सिनेमात दाखवली आहे. पण या नोकऱ्यासुद्धा उन्हाळ्यापुरत्याच असतात. त्यानंतर हा ‘सीझन’ संपतो आणि दुसऱ्या नोकरीच्या शोधात पुन्हा भटकंती सुरू होते. अशा तात्पुरत्या, पण अत्यंत कष्टाच्या नोकऱ्या अ‍ॅमेझॉनच्या गोदामांमध्ये उपलब्ध असतात. अ‍ॅमेझॉनसाठी नाताळचा मोसम त्यांच्या विक्रीच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो आणि त्यासाठी गोदामांमध्ये माल भरण्याची सुरुवात सप्टेंबरपासून होते. म्हणजे उन्हाळ्यातील कॅम्पिंग मोसम संपला की अ‍ॅमेझॉनच्या मोसमाची सुरुवात होते. अ‍ॅमेझॉनचे काम डिसेंबरमध्ये कमी होत असल्यामुळे त्यांनाही तात्पुरत्या कामगार समूहाची गरज असते. अ‍ॅमेझॉन अशा लोकांना ‘वर्क कॅम्पर्स’ अशी संज्ञा देते आणि त्यासाठी जाहिराती देते. अ‍ॅमेझॉनच्या नोकरीचे दोन तोटे असतात. काम अतिशय कष्टाचे आणि दिवस १० तासांचा असतो. शिवाय कॅम्पर पार्क करायची सोय नसते. संपूर्ण रात्र कॅम्पर पार्क करायची जागा शोधणे हे एक आव्हानच असते. बेकायदेशीर पार्किंग केले तर पोलीस किंवा वनखात्याचे लोक हरकत घेतात आणि वाहने हलवायला लावतात. काही वेळा दंडही करतात आणि काही वेळा तऱ्हेतऱ्हेच्या तपासण्यांना तोंड द्यावे लागते. कित्येक वेळा कॅम्पर अ‍ॅमेझॉनच्या गोदामापासून १५/२० मैलांवर पार्क करावा लागतो आणि रोज गाडीने किंवा कॅम्परने जायचे-यायचे म्हणजे पेट्रोलचा खर्च वाढतो. पण हा सर्व त्रास सोसून ही मंडळी नोकरी करणे पसंत करतात; कारण पगार थोडा बरा मिळतो आणि थंडीच्या दिवसांत इथेच फक्त नोकरीची खात्री असते. असे काम करणाऱ्या एका वृद्धेने लेखिकेला सांगितले की, मला रोज १५ मैल चालावे लागते, तर सारखी लेबल्स प्रिंट करावी लागणाऱ्या बाईचे मनगटाचे सांधे दुखावले. अशा तऱ्हेची कामे अमेरिकेतल्या ६५ वर्षे वयाच्या वृद्धांना करावी लागणे अमानुष वाटते.

मग अशी माणसे आपले सुख कशात शोधतात? तर असेच काम कराव्या लागणाऱ्या काही वृद्धांशी त्यांचे मैत्र जुळते. एकमेकांना मदत करत, एकमेकांशी गप्पा मारत आपल्या आयुष्यात आनंद आणण्याचा प्रयत्न ते करतात. अमेरिकेत बऱ्याच वृद्धांना एकलकोंडे आयुष्य काढावे लागते. त्यामानाने हे सामूहिक जीवन त्यांना बरे वाटते. लेखिकेने सुरुवातीला फोनवरून त्यांच्याशी संपर्क ठेवला होता, पण त्यानंतर स्वत: एक कॅम्पर घेऊन काही महिने ती यानिमित्ताने मैत्रिण झालेल्या लिंडा मे हिच्या चमूबरोबर राहिली आणि या सर्व घटिताचा स्वानुभव घेतला. त्यामुळे हे पुस्तक सत्यकथा झाले आहे. लेखिकेने या लोकांच्या आयुष्याचे वर्णन पूर्ण निराशाग्रस्त किंवा दु:खमय असे केलेले नाही. त्यांच्या आयुष्यातील हलकेफुलके, आनंदाचे प्रसंग वर्णन करून पुस्तकातील स्वारस्य कायम ठेवले आहे. पण यावर बेतलेला सिनेमा मात्र खूपच निराशात्मक आहे. या भटक्या मंडळींना राहाव्या लागणाऱ्या जागा किती वैराण असतात याची सिनेमामुळे अधिक प्रकर्षाने जाणीव होते. पुस्तक वाचताना मात्र मनाला इतका त्रास होणार नाही याची लेखिकेने काळजी घेतली आहे. त्यामुळे ही एक वाचनीय सत्यकथा झाली आहे.

aptesudhir@gmail.com