सचिन दीक्षित

लिंग-भाषा-जात-वंश/रंग-विचार यांतील वैविध्याबद्दलच्या दृश्य/छुप्या पूर्वग्रहांमुळे होणारे नुकसान हा कॉर्पोरेट जगतातील संशोधनाचा विषय. अशा पूर्वग्रहांतूनच पुढे गटबाजी, नेपोटिझम आणि इतर भेद जन्म घेतात. तरीसुद्धा काही व्यक्ती, संस्था, कंपन्या अशा पूर्वग्रहांतून मार्ग काढत यशस्वी होतात ते का, याचा वेध घेणाऱ्या पुस्तकाविषयी..

‘फक्त एवढय़ावरून कुणाला जज करता येत नाही’ हे वाक्य समाजमाध्यमांत बरेचदा वापरले जाते. अल्पशा माहितीवरून झटपट निकाल देऊ नका, हे सांगायची ही नवी रीत. आदिमानवाच्या विकासात या झटपट निकालशक्तीमुळे कित्येक पिढय़ांचे जीव वाचवले असतील. आजच्या अतिसंपर्कात असलेल्या जगात मात्र याच शक्तीच्या मर्यादा ध्यानात येऊ लागल्या आहेत. विशेषत: कॉर्पोरेट जगतात. जागतिक स्तरावर व्यवसाय करताना, गुणवत्तेसाठी का होईना बहुविविधता (डायव्हर्सिटी) जपणे कंपन्यांना क्रमप्राप्त असते.

लिंग-भाषा-जात-वंश/रंग-विचार यांतील वैविध्याबद्दलच्या दृश्य/छुप्या पूर्वग्रहांमुळे (बायस) होणारे नुकसान हा कॉर्पोरेट जगतातील संशोधनाचा विषय आहे. याच पूर्वग्रह समस्येतून पुढे गटबाजी, नेपोटिझम आणि इतर भेद जन्म घेतात. तुम्ही स्टार्टअप किंवा कॉर्पोरेटमध्ये कार्यरत असाल तर याचा प्रत्यय येतोच. भेदभावाचा अंदाज येतो, पण तो अगदीच उघड नसतो. अशा वेळी ‘मी टरफले खाल्ली नाहीत’सारखा शालेय पवित्रा घेणे शक्य नसते. त्याविषयी मुद्दाम बोलून व्यावसायिक डाव उधळेल हा धोकाही असतो. तरीसुद्धा काही व्यक्ती, संस्था, स्टार्टअप अशा पूर्वग्रह समस्येतून मार्ग काढून दणदणीत यशस्वी होतात. ते का, याचा माग ‘एज : टर्निग अ‍ॅडव्हर्सिटी इनटु अ‍ॅडव्हान्टेज’ हे पुस्तक घेते. लेखिका लॉरा हुआंग या अमेरिकेत वाढलेल्या, तैवानी वंशाच्या असल्याने त्यांना याचा वैयक्तिक अनुभव आलेला आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात कर्मचाऱ्यांना बढती देताना वंश साधर्म्य किंवा चांगले (?) दिसणे किंवा स्टार्टअप क्षेत्रात निधी उभारताना जपले जाणारे हितसंबंध, याबद्दल लेखिकेने केलेले संशोधन अशा छुप्या पूर्वग्रहांचे स्वरूप दाखवणारे आहे. परंतु स्वानुभव आणि इतर दाखले देत या सगळ्यावर ‘वेगळे असणे/वाटणे’ ते ‘वेगळेपण ठासून मांडणे’ हा प्रवास करून भेदभावावर मात कशी करायची, याची विचारप्रणाली लेखिका मांडते. हुआंग सध्या हार्वर्ड विद्यापीठात प्राध्यापक आहेत. आंतरिक निर्णय (गट फीलिंग) आणि त्याचा स्टार्टअपमधील गुंतवणुकीवर होणारा परिणाम हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. स्टार्टअपव्यतिरिक्त समाजातील इतर  क्षेत्रांत त्यांना आंतरिक निर्णय-पूर्वग्रह यांचे परिणाम दिसलेले होतेच. या सर्व घटकांना समोर ठेवून त्यांनी आपल्या संशोधनावर आधारित हे पुस्तक लिहिले आहे.

पु. ल. देशपांडे यांनी म्हटले होते तसे, ‘आतले आणि बाहेरचे’ ही आपली उपजत मांडणी असते आणि ती सतत बदलत असते. हुआंग पुस्तकाची सुरुवात अशाच काही कटू सत्यांनी करतात. तुम्ही ‘बाहेरचे’ असाल तर आतल्या गोटात शिरताना खूप श्रम लागतात आणि एकदा का तुम्ही ‘आतले’ झालात की बरीच कामे खूप सोपी होऊन जातात. मात्र, परिश्रम आणि गुणवत्ता यांबरोबरच लोकांचे तुमच्या गुणवत्ता-योग्यतेबद्दलचे अंदाजसुद्धा यश मिळवण्यास साहाय्यभूत ठरतात. या संदर्भात, जपानी वंशाची अमेरिकी खेळाडू मीराइ नागसू हिला योग्यता असूनसुद्धा ऑलिम्पिकसाठी पाठवले न गेल्याचे उदाहरण लेखिका देते. सुप्रसिद्ध व्यक्तींबद्दलच्या अशा घटनांची चर्चा वेळोवेळी माध्यमांत घडलेली आहेच. कृष्णवर्णीय रुग्णांना दवाखान्यात औषध मिळायला उशीर होतो किंवा त्यांना चांगली औषधे दिली जात नाहीत याबद्दलचे संशोधन समोर आल्याने या समस्येची व्यापकता आणि जटिलता लक्षात येते. या सगळ्यास विरोध करायचा की काही राजकारण खेळायचे की आत्मसन्मान बाजूला ठेवून तडजोड करायची, असे प्रश्न कुणाला पडू शकतात. मात्र, लेखिका या प्रश्नांपल्याड जाऊन सन्मानाने आपल्यासाठी स्थान कसे निर्माण करायचे याविषयी सविस्तर मांडणी करते. पूर्वग्रहांना कवेत घेऊन लोकांची विचारदृष्टी बदलायची, तेही त्यांना रुचेल या मार्गाने याबद्दल लेखिका आराखडा देते- ‘ईडीजीई’.. एज!

‘एन्रिच’ (Enrich) : लोक तुमच्याबद्दल अंदाज बांधत असताना, त्यांना समृद्ध करणारे काही तरी तुमच्याकडे आहे हे त्यांच्या लक्षात आणून द्या. म्हणजे ते तुमच्याकडे अधिक खुल्या, मोकळेपणाने पाहायला तयार होतील. याचबरोबर तुमचे मूलभूत वेगळेपण अधोरेखित करा. एखादे काम तुमच्याइतके उत्तम इतर कुणी करेल याची शंका राहू देऊ नका. आपले वेगळेपण कवेत घेऊन उभे राहिलेल्या अ‍ॅपल, हॅथवे, आसूस, पॅम्पर्स अशा अनेक कंपन्यांचे दाखले लेखिका देते. तसेच वेगळेपण मांडताना ते विश्वासार्ह आणि प्रामाणिक नसल्याने किती तरी स्टार्टअप अपयशी ठरल्या हेही दाखवून देते. उदाहरणार्थ ‘ज्युसेरो’ ही कंपनी. इंटरनेटशी (आयओटी) जोडलेले ज्युसर ही कंपनी बनवायची. यंत्राने आपोपाप फळांचे पाकीट उघडावे म्हणून साल काढलेली फळे; शिळी फळे वापरू नये म्हणून क्यूआर कोड अशा सुविधा देऊन कंपनीला १२० मिलियन डॉलर्सचे बीजवित्तसुद्धा मिळाले. या कंपनीची खूप वाहवा झाली. पण साल काढलेले काप हाताने सहज पिळून ज्युस बनतोच अशी बातमी ‘ब्लूमबर्ग’ने दिली आणि कंपनी दिवाळखोरीत निघाली. फक्त गुंतवणूकदारांना प्रभावित करण्यासाठी ताणून आणलेले वेगळेपण उघडे पडते ते असे.

‘डिलाइट’ (Delight) : लोकांनी तुमच्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली की त्यांच्या मनात तुमच्या गुणवत्तेबद्दल प्रशंसा निर्माण करा. प्रशंसानिर्माण हे मस्का मारणे, पुढे पुढे करणे नसून गुणवत्तेवर आधारित असावे. किंबहुना प्रशंसा निर्माण करण्याची प्रक्रिया म्हणजे इतरांच्या मनातील भेदाचा भाव निवळण्याची प्रक्रिया असते. मात्र, यासाठी एखादी बैठक किंवा क्लृप्ती उपयोगी पडत नाही; तो मानवी स्वभावाचाच भाग असावा. लेखिकेने येथे स्टार्टअप जगतातील ‘पीच’ (विक्रीकथन) उदाहरण म्हणून दिले आहे. समजा, तुम्हाला कुणी प्रसिद्ध गुंतवणूकदार लिफ्टमध्ये भेटला तर एका मिनिटात तुम्ही त्याला आपल्या स्टार्टअपबद्दल काय सांगाल? हे झाले ‘एलेव्हेटर पीच’. काही वाक्यांत तुम्ही समोरच्याचे लक्ष आकृष्ट केले की तीच कल्पना तुम्ही जरा विस्ताराने सांगाल. तोवर समोरच्या व्यक्तीची रुची कायम असेल तर मग तुम्ही तपशीलवार माहिती द्याल. विक्रीकथनाचा हा प्रवास प्रशंसा अधिक गहिरी करण्याचासुद्धा प्रवास आहे. प्रत्येक टप्प्यावर वेगळ्या शंका आणि त्यांचे आनंददायी, पण सहज निराकरण झाले की गुंतवणूकदार हे मनाने तुमच्या स्टार्टअपमध्ये सहभागी होतात. हेच ते ‘डिलाइट’!

‘गाइड’ (Guide) : लोकांनी पूर्वग्रह बाजूला ठेवून तुमच्या गुण किंवा प्रस्तावाकडे गांभीर्याने पाहायला सुरुवात केली की, त्यांचे लक्ष तुमच्या योग्यतेकडे वळवा. आपल्या वेगळेपणाची सहज हाताळणी लोकांच्या मनातील ठोकताळे सैल करण्यास मदत करते. तुमचे वेगळे असणे-भासणे आणि तुमची गुणवत्ता यांतील अद्वैत दिसायला लागले, की लोकांचे समज नव्याने घडवायची संधी तुम्हाला मिळते. पूर्वग्रह हे गुंतागुंतीचे आणि वेळेनुसार बदलणारे असल्याने, त्यांना वेळोवेळी नव्याने घडवावे लागते. तुम्ही यशस्वी व्हायला लागलात की त्यांची व्याप्ती वाढते. याचे विविध कंगोरे लेखिकेने विस्ताराने सांगितले आहेत.

‘एफर्ट’ (Effort) : लोकांच्या नजरेत तुमच्या कलेविषयी किंवा स्टार्टअपबद्दल चांगले समज निर्माण होऊ लागले, ते तुमच्याकडे डोळसपणे बघू लागले, की अधिक परिश्रम घेऊन त्यांच्या अंदाज/समज यांचे रूपांतर खात्रीत करा.

लोकांना आपलेसे कसे करावे, हा विषय ‘सेल्फ-हेल्प’ पुस्तकांसाठी नवा नाही. १९३६ साली प्रसिद्ध झालेले डेल कार्नेजी यांचे ‘हाऊ टु विन फ्रेण्ड्स अ‍ॅण्ड इन्फ्लुएन्स पीपल’ हे पुस्तक याबाबतीत अभिजात ठरावे. तिथपासून आताच्या रॉबिन शर्मा आदी लेखकांनीही या विषयावर पुस्तके लिहिली आहेत. त्यात सगळा भर वैयक्तिक चांगुलपणा, मोहकता, प्रामाणिकपणा आणि चातुर्य यांवर असतो. त्याबरोबर ‘पॅशन’ आणि परिश्रम यांविषयीही त्यात लिहिलेले असते. पण प्रत्यक्ष अनुभव वेगळाच असतो. जगात वावरताना लोक अनियमित आणि स्वभावदोषयुक्त असतात हे ‘सेल्फ-हेल्प’ पुस्तकांत मांडले ते मार्क मॅन्सन यांनी. ‘द सटल आर्ट ऑफ..’ या पुस्तकात जगाबद्दलचे आपले भ्रम यावर त्यांनी लिहिले आहे. फक्त ‘पूर्वग्रह’ या विषयाला वाहिलेले माल्कम ग्लॅडवेल यांचे ‘ब्लिंक : द पॉवर ऑफ थिंकिंग विदाउट थिंकिंग’ (२००५) हे पुस्तक आहे. अगदीच ‘सेल्फ-हेल्प’ प्रकारचे नसले तरी मुख्य प्रवाहात ‘पूर्वग्रह’ या विषयावर लिहिले गेलेले अलीकडील हे प्रसिद्ध पुस्तक. त्यानंतर या विषयाला वैचारिक पातळीवर कसे हाताळावे, याविषयी बरीच उत्कृष्ट पुस्तके आली. ‘पूर्वग्रह नसतो’पासून ‘तो असतो’ ते ‘तो नेमका कसा असतो’ एवढा पट या पुस्तकांनी व्यापला. पूर्वग्रह असणारच आणि व्यावहारिक पातळीवर नकारात्मक न होता त्यास आपण कसे हाताळावे, हे लॉरा हुआंग यांचे पुस्तक मांडते. तेच या पुस्तकाचे वैशिष्टय़ आहे.

समज/गैरसमज यांची दिशा किती प्रभावी आणि वेगवेगळ्या प्रकारे घडवता येते त्याचे हे ‘गाइडबुक’ आहे! पण ‘पॅशन, हार्डवर्क, टॅलेंट’ याबद्दलच्या सुविचारप्रचुर समजुती तर हुआंग बऱ्याचदा धुडकावून लावतात. पूर्वग्रह कसा हाताळायचा या विषयावर पुस्तक वाचणाऱ्यांकडून तेवढी वैचारिक तयारी अपेक्षित आहे. (तुम्ही काय आहात हे मानून) लोक तुम्हाला कुठली हाक मारतात यापेक्षा तुम्ही कुठल्या हाकेला उत्तर देता, या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत वाचकास नेणे हे या पुस्तकाचे सार आहे.

mrsachindixit@gmail.com