इस्राइलचे एटगर केरेट हे त्यांच्या ‘काफ्काएस्क’ कथांनी जगभरातील ३७ भाषांमध्ये अनुवादित झालेल्या आजच्या आघाडीच्या लेखकांमध्ये एक गणले जातात. (बस ड्रायव्हर हू वॉण्टेड टू बी गॉड, निमरोड फ्लिपआऊट, मिसिंग किसिंजर, गर्ल ऑन द फ्रीज आदी त्यांचे कथासंग्रह आजच्या कथा अभ्यासकांसाठी महत्त्वपूर्ण ठरत आहेत.) हिब्रूमधील त्यांच्या नव्या पुस्तकाचा आता फार्सीमध्ये अनुवाद होणार आहे, ही या आठवडय़ातील बातमी. इंग्रजीत तर त्यांच्या संग्रहांचे अनुवाद झाले आहेत पण त्यांची एखादी कथा मराठीतही वाचायला मिळते. म्हणजे दुसऱ्या भाषेत त्यांच्या पुस्तकाचा अनुवाद होणे यात फारसे नवे नाही. नवे आहे ते त्याचा हा फार्सी अनुवाद थेट इस्रायलला कट्टर शत्रू मानणाऱ्या इराणमध्ये आडमार्गाने पोहोचणार आहे हे!

इस्रायलच्या निर्मितीपासूनच वाकडे घेणाऱ्या आणि या राष्ट्राची मान्यताच नाकारणाऱ्या इराणमध्ये इस्रायलविषयी असलेली कटुता कमी करण्यासाठी हे पुस्तक अतिवाकडय़ा वळणाने इराणमध्ये पोहोचणार आहे. अफगाणिस्तानामधील लेखकाद्वारे काबूलमध्ये या पुस्तकाचे प्रकाशन केले जाणार असून, त्यानंतर अवैधरीत्या पुस्तकाच्या प्रती विक्रीसाठी इराणमध्ये पोहोचविल्या जाणार आहेत. वैचारिक आणि अभिव्यक्तीबाबत सरकारी र्निबधांना तोडण्याचा इराणमधील सर्वात सोपा मार्ग म्हणजे अवैधरीत्या पुस्तक निर्मिती आणि विक्री. इराणमध्ये लेखकांना पुस्तक प्रकाशन करण्यासाठी सरकारी परवानगीची आवश्यकता असते. सरकारने आखून दिलेल्या नियमांच्या आणि भूमिकेच्या विरोधात कुठलेही विचारी पुस्तक प्रकाशित होणे अवघड असते. यावर मार्ग म्हणून लेखक अफगाणिस्तानमध्ये पुस्तक प्रकाशित करून तस्करीने इराणमध्ये आणतात आणि छुप्या यंत्रणेद्वारे त्याचे व्यवस्थित वितरण करतात. इराणी नागरिकांत लहानपणापासूनच इस्रायलविषयी कटुता आणि द्वेष नसेल, तर त्याला ‘सच्चा इराणी’ मानले जातच नाही! (आताशा आपल्याकडेही नाही का असेच काही घडते? ) इस्रायल या राष्ट्राविषयी आणि तेथील माणसांविषयी फार वाईट मते आदल्या पिढीकडून पुढल्या पिढीकडे संक्रमित होतात. केरेट यांच्या ‘द सेव्हन गुड इयर’ या आत्मपर निबंधाच्या पुस्तकाद्वारे इस्रायलविषयीच्या आणि तेथील माणसांविषयीच्या गैरसमजांना काही प्रमाणात तडा जाईल, असे या पुस्तकाचा अनुवाद करणारे लेखक अझीझ हाकीमी यांनी ‘गार्डीयन’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. केरेट यांच्या कथांऐवजी थेट आत्मपर निबंधांचाच अनुवाद केला जात आहे, कारण आपल्या मुलाच्या जन्मानंतरच्या वर्षांमधील बदलते इस्रायल, शेजारी राष्ट्रांमधून वाढता द्वेष, दहशतवाद यांच्याविषयी विवेकी विचारसरणीतून उतरलेले हे लेख आहेत. इस्रायलमध्ये देखील आपल्यासारखीच हाडामांसाची माणसे आहेत, त्यांच्यात प्राणवैरी कट्टरता नाही, याचा उलगडा इराणमधील वाचकांना या पुस्तकातून होऊ शकेल, हा या अनुवादकाराचा शुद्ध हेतू आहे. स्वत: केरेट या पुस्तकाच्या फार्सी तोंडवळ्याबाबत आशावादी आहेत. वैधरीत्या या पुस्तकाच्या अवैध प्रसाराचे इंगित जाहीर केल्यानंतरही इराणच्या सरकारी यंत्रणेला चुकवून काय परिणाम करेल, हे येत्या काही महिन्यांत कळेलच.