एखादे शांततामय आंदोलन पसरणे आणि चिघळणे यात काही नवे नसेल, पण या आंदोलनाला गालबोट लावणारी एखादीच हिंसक घटना घडावी आणि मग आंदोलनच स्थगित करण्याचा निर्णय नेत्यांनी घ्यावा हे आगळेच. केंद्र सरकार तसेच उत्तर प्रदेश सरकार यांनाही ते असेच आगळे वाटले असणार, म्हणूनच तर ‘चौरी चौरा घटने’च्या शताब्दीवर्षांची सुरुवात नुकतीच पंतप्रधानांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आली! ‘काळा कायदा’ म्हणून कुख्यात असलेल्या १९१९ च्या रौलट अ‍ॅक्टच्या निषेधार्थ देशभर निदर्शने सुरू झाली होती आणि गोरखपूरनजीकच्या चौरी चौरा येथील पोलीस चौकीला जमावाने आग लावून देण्याची, त्यात किमान २२ पोलीस अधिकारी व कर्मचारी जळून मरण पावण्याची हिंसक घटना ४ फेब्रुवारी १९२२ रोजी घडली. याविषयी शालेय इतिहासात एखादा परिच्छेद असतो, पण त्यापलीकडे कुणास काही माहीत नसते.

‘चौरी चौरा घटने’विषयी अपरिचित माहिती अगदी निराळ्याच पद्धतीने शाहिद अमीन यांच्या ‘इव्हेन्ट, मेटॅफर, मेमरी : चौरी चौरा- १९२२’ या पुस्तकात (मूळ प्रकाशक : युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया प्रेस; भारतातील प्रकाशक : पेंग्विन इंडिया; पृष्ठे : ३२०, किंमत : ९९९ रुपये) मिळते. हे पुस्तक १९९५ साली प्रथम प्रकाशित झाले असले (त्याची इंटरनेटवरून विकली जाणारी आवृत्ती २००६ ची आहे), तरी लेखकाने त्यासाठीचा अभ्यास सत्तरच्या दशकाअखेरीस सुरू केला होता.

loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस : श्रमिक ऊर्जा भांडवलाइतकीच महत्त्वाची
Fossils of massive prehistoric snake found in Gujarat
हिंदू पुराणातील ‘वासुकी’ तो हाच का? गुजरातमध्ये सापडले जगातील सर्वात मोठ्या सापाचे जीवाश्म; का आहे हे संशोधन महत्त्वाचे?
world's oldest and first curry was made with brinjal
वांग्याची भाजी… तब्बल चार हजार वर्षे जुनी, ‘इथे’ सापडला पुरावा, संशोधकांचे शिक्कामोर्तब!
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

शाहिद अमीन हे दिल्ली विद्यापीठातून इतिहासाचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले आहेत. गोरखपूर भागातील शेतकरी आंदोलने हा त्यांच्या खास अभ्यासाचा विषय आणि मुख्य म्हणजे, ‘लोकांचा इतिहास’ शोधणे आणि ग्रथित करणे, ही त्यांची अभ्यासपद्धती. महात्मा गांधी यांच्याविषयीही अमीन यांनी अन्यत्र अभ्यासपूर्ण लिखाण केलेले असले, तरी १९९५ सालचे हे पुस्तक चौरी चौरा घटनेतील आरोपींच्या मानसिकतेचा आणि ती मानसिकता घडविण्यास कारणीभूत तत्कालीन राजकीय पर्यावरणाचा वेध घेते (हा वेध गोरखपूर जिल्ह्यापुरता, पण आजच्या उत्तर प्रदेशातील ‘पूर्वाचल’भर व्याप्ती असणारा ठरला आहे). बिन्देश्वरी (साधू) सैंधवार, नझीर अली, सुखदेव पासी तसेच माफीचे साक्षीदार होणारे शिकारी व कोमल डकैत.. अशी अनेकानेक नावे ब्रिटिशांनी गुदरलेल्या आरोपपत्रांतून शोधून काढून, त्यांपैकी काहीजण हयात आहेत का, नसल्यास त्यांचे नातेवाईक / समवयस्क काही सांगू शकतात का, याचा कसून शोध शाहिद अमीन यांनी घेतला. एकंदर २७३ जणांवर ब्रिटिशांनी आरोप लादले होते आणि यांपैकी ५४ जणांना तर कधीही अटक होऊ शकली नाही. त्यामुळे, लेखकाला मौखिक इतिहासातून बरीच प्राथमिक (फर्स्ट हँड या अर्थाने) साधनसामुग्री मिळाली. मदनमोहन मालवीय हे त्या वेळी काँग्रेसमध्ये होते व त्यांच्या मार्गदर्शनाखाली, या साऱ्या आरोपींना सोडवण्याचे प्रयत्न सुरू होते. त्या खटल्याची माहितीही लेखकाने दिली आहे. त्यामध्ये पं. मालवीय यांनी ‘ही घटना कट रचून झालेली नाही, ती पूर्वनियोजित नाही, ही घटना उत्स्फूर्तच आहे’ असा बचाव केला होता, हा तपशील लक्षणीय ठरावा.

मात्र, या माहितीच्या पलीकडे हे पुस्तक जाते. चौरी चौराच्या घटनेवरून ‘बोध’ काय घ्यायचा, हे नेमके हुडकून काढण्याचे काम लेखक करतो. हा बोध, गांधीजींनी कसे लगोलग आंदोलन स्थगितच केले म्हणून ते किती मोठे, एवढा साधाभोळा नाही. गांधीजींनी आणि काँग्रेसने काय केले यापेक्षा, लोक काय करू शकले होते (काय करून बसले होते) आणि तसे त्यांनी केलेच कसे, याचा शोध हे पुस्तक घेते.

या शोधातून जो बोध मिळतो, तो अस्वस्थ करणारा आहे. तो शोध या पुस्तकानंतरही लेखकाने सुरू ठेवला हे महत्त्वाचे आहे. जमीनदारी-सरंजामी काळातील ‘प्रत्यक्ष’ शोषणातून ब्रिटिशांकरवी होणाऱ्या ‘अप्रत्यक्ष’ शोषणाचे हानिधारक  ठरलेल्या मूलत: समाजगटांपर्यंत राष्ट्रवादाची जी परिभाषा अनेक गाण्यांमधून, प्रेरक कथांमधून तोवर पोहोचली होती, ती हिंसेला करारी आणि ठाम विवेकी नकार देणारी नव्हतीच. धर्म कोणताही असला तरी त्या-त्या धर्मातील पूज्य ठरलेल्यांची नीतिमत्ता उजळवणाऱ्या कथा या अनेकदा ‘विजयकथा’ असतात व त्यांतही हिंसा त्याज्य मानलेली नसते. अशा मानसिकतेतून संतापाला जी वाट मिळते ती अहिंसेकडे वळेल, हे कठीण. ते कठीण काम गांधीजींनी करून दाखवले खरे, पण चौरी चौराच्या घटनेनंतर!

पाने जुनी झाली असली तरी वाचावे, असे हे पुस्तक तपशिलासह तत्त्वचर्चेलाही इतिहाससामग्री पुरवणारे, म्हणून महत्त्वाचे आहे.