28 November 2020

News Flash

स्त्री‘वाद’ नकोच..?

करोडोंची उलाढाल असलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीवर गेली कित्येक वर्षे पुरुषांची मक्तेदारी आहे

रेश्मा राईकवार

भारतीय सिनेमांतील स्त्री-भूमिकांची प्रस्थापित चौकट मोडणाऱ्या; स्त्रियांची महत्त्वाकांक्षा, त्यांच्या लैंगिक भावभावना आडपडदा न ठेवता आपल्या चित्रपटांतून मांडणाऱ्या अकरा भारतीय स्त्री-दिग्दर्शकांना स्वत:वर ‘स्त्रीवादी’ असण्याचा शिक्का नको आहे, ते का?

राजस्थानच्या वाळवंटात एका मोठय़ा जाहिरातीचे चित्रीकरण सुरू आहे.. सूर्य मावळतीकडे कलला आहे आणि आता काही क्षणांत भवताल काळोखात बुडून जाण्याआधी चित्रीकरण संपवण्याची घाई दिग्दर्शकापासून स्पॉटबॉयपर्यंत सगळ्यांनाच आहे. कॅमेरा रोल होतो, चित्रीकरण सुरू होते अन् अचानक एक अनोळखी चेहरा कॅमेऱ्यासमोर येतो. ऐन चित्रीकरणात मधेच आलेल्या या अनाहुताला बाजूला कोण, कसे काढणार, हा प्रश्न सतावत असताना अचानक किरकोळ अंगयष्टीची, पण या जाहिरातीची साहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या कामात चोख असणारी एक तरुणी वेगाने येते आणि चक्क त्या माणसाला उचलून सेटच्या बाहेर नेते. एका क्षणात काय घडून गेले याबद्दलचा गोंधळ जसा सेटवरच्या सगळ्यांच्या मनात असतो, तितकाच कल्लोळ त्या माणसाला उचलून बाहेर नेऊन ठेवणाऱ्या त्या तरुणीच्या मनात सुरू होता. मात्र, कामाच्या आड आलेला अडथळा पार करून आपण आपले काम चोख बजावले आहे, अशी स्वत:च्या मनाची समजूत घालून ती मोकळी झालेली असते. सेटवर असलेल्या इतरांच्या मनात मात्र तिची ही अतिआक्रमक प्रतिमा घर करून राहते. ती साहाय्यक दिग्दर्शक म्हणजे रीमा कागती! पुढे ‘हनिमून ट्रॅव्हल्स प्रा. लि.’, ‘तलाश’ यांसारख्या चित्रपटांची दिग्दर्शक म्हणून नावारूपास आलेल्या रीमाच्या बाबतीत तिच्या या आक्रमकपणामुळे तिच्याबरोबर काम करणे अवघड असल्याची तक्रार अनेकजण करत होते. ‘‘मी एक स्त्री आहे म्हणून दिग्दर्शक या नात्यानेही सगळ्यांशी हळुवार, नम्रतेने संवाद साधावा, अशी सगळ्यांची अपेक्षा का असते?’’ असा सवाल रीमाने ‘एफ-रेटेड : बीइंग अ वुमन फिल्ममेकर इन इंडिया’ या पुस्तकाच्या लेखिका नंदिता दत्ता यांना केला.

करोडोंची उलाढाल असलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीवर गेली कित्येक वर्षे पुरुषांची मक्तेदारी आहे. २०१८ मध्ये एकूण ११६ हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले होते, ज्यात केवळ सात चित्रपट स्त्री-दिग्दर्शकांचे होते. २०१७ मध्ये हेच प्रमाण १२० चित्रपटांपैकी ११ स्त्री-दिग्दर्शकांचे चित्रपट असे होते. हिंदी चित्रपटक्षेत्रात स्त्रियांचे प्रमाण नगण्य आहे का? तर नाही. मात्र तरीही स्त्रियांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांचे प्रमाण हे आजही नगण्यच आहे. इतक्या मोठय़ा चित्रपट उद्योगात दहा टक्केच स्त्री-दिग्दर्शक कार्यरत असतील, तर त्यांच्यासमोरची आव्हाने नेमकी काय आहेत? अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे स्त्री-दिग्दर्शकांचा टक्का हा गेली कित्येक वर्षे तिथल्या तिथेच रेंगाळतो आहे? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या हेतूने ‘एफ-रेटेड : बीइंग अ वुमन फिल्ममेकर इन इंडिया’ या पुस्तकाचा जन्म झाला आहे. ११ स्त्री-दिग्दर्शकांशी बोलून त्यांच्या कारकीर्दीचा, त्यांनी केलेल्या चित्रपटांचा वेध घेत, काळानुसार त्यांच्या दिग्दर्शकीय मांडणीत झालेल्या बदलांमागची वैचारिक-भावनिक जडणघडण समजून घेत ती विश्लेषणात्मक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकात लेखिका नंदिता दत्ता यांनी केला आहे. या मूठभर स्त्री-दिग्दर्शकांनी का होईना, त्यांच्या चित्रपटांमधून या क्षेत्रातील पुरुषी मक्तेदारीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे हे वास्तव नाकारता येत नाही. अपर्णा सेन, मीरा नायर, तनुजा चंद्रा, फराह खान, शोनाली बोस, रीमा कागती, अंजली मेनन, नंदिता दास, मेघना गुलजार, किरण राव आणि अलंक्रिता श्रीवास्तव.. वेगवेगळ्या काळांत दिग्दर्शक म्हणून रुपेरी पटलावर आलेल्या या ‘साऱ्याजणी’ अनवट धाटणीच्या चित्रपटांसाठी ओळखल्या जातात. अपर्णा सेन, मीरा नायर असोत वा मेघना-अलंक्रिता या स्त्री-दिग्दर्शकांमुळे नायिकाप्रधान चित्रपट प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचले. बॉलीवूडमधील स्त्री-भूमिकांची प्रस्थापित चौकट मोडून काढत त्यांनी आपल्या नायिका अधिक वास्तव पद्धतीने रंगवल्या. स्त्रियांची महत्त्वाकांक्षा, त्यांच्या लैंगिक भावभावनाही त्यांनी कोणताही आडपडदा न ठेवता किंवा चकचकीत मुलामा न देता चित्रपटांतून मांडल्या. मात्र तरीही यांपैकी एकाही स्त्री-दिग्दर्शकाला स्वत:स ‘स्त्रीवादी’ (फेमिनिस्ट) म्हणवून घेणे आवडत नाही, ‘स्त्रीवादी दिग्दर्शक’ असा शिक्का त्यांना नको आहे. त्यांची ही भावना लेखिकेला एका क्षणी बुचकळ्यात पाडणारी होती. स्त्रियांचे विषय हिरीरीने मांडणाऱ्या या प्रतिभावंतांना स्त्रीवादाचे वावडे का, याचा माग काढण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला गेला आहे.

या ११ स्त्री-दिग्दर्शकांपैकी एकीनेही स्वत:स ‘दिग्दर्शिका’ म्हणवून घेण्यास साफ नकार दिला आहे, मात्र सेटवर त्यांच्यातील दिग्दर्शक ही पुरुष दिग्दर्शकांपेक्षा वेगळी असते. स्त्री म्हणून असलेल्या त्यांच्या जाणिवा, संवेदना, त्यांचे विचार हे त्यांच्या चित्रपटांना अधिक प्रगल्भ करणारे आहेत, हे त्याही नाकारत नाहीत. किंबहुना, ठोकळेबाज आणि मसालापटांतली, नायिकेला केवळ भोगवस्तू ठरवणारी मांडणीच त्यांना मान्य नाही. १९८० साली सत्यजित रेंच्या दिग्दर्शनाखाली ‘पिकू ’ या लघुपटात नवऱ्याला माहिती असताना आणि घरात सहा वर्षांचा मुलगा, मरणपंथाला टेकलेले सासरे असतानाही आपल्या प्रियकराला बोलवून लैंगिक सुखाची इच्छा पूर्ण करणारी नायिका अपर्णा सेन यांनी रंगवली होती. या चित्रपटात नायिकेला सत्यजित रे यांनी न्याय दिला नाही, असे सांगणाऱ्या अपर्णा यांनी १९८४ साली दिग्दर्शित केलेल्या ‘पारोमा’ या चित्रपटात आपल्या नायिकेचा माणूस म्हणून अधिक विचार केला होता. पत्नी-आई अशा वेगवेगळ्या भूमिकांत गृहीत धरल्या गेलेल्या पारोमाला पहिल्यांदा तिच्या आयुष्यात आलेल्या छायाचित्रकाराकडून तिच्या आवडीनिवडींविषयी विचारणा होते. पारोमा म्हणून तिची स्वतंत्र ओळख तिला त्याच्या सहवासातून परत मिळते आणि कुटुंबाबरोबर राहत असतानाही नव्याने मिळालेले प्रेम, लैंगिक सुख धरून ठेवण्याचा प्रयत्न ती करते. हे मांडत असताना आपल्या नायिकेला कु ठल्याही प्रकारे नैतिकतेच्या कसोटीवर अजमावण्याचा प्रयत्न दिग्दर्शक म्हणून अपर्णा सेन करीत नाहीत. स्त्रियांच्या भावविश्वाचा संवेदनशीलतेने आणि अधिक गहिरेपणाने वेध घेण्याचा हा प्रयत्न या स्त्री-दिग्दर्शकांच्या कलाकृतींमधून ठळकपणे जाणवतो.

यास मीरा नायरही अपवाद नाहीत आणि ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’सारखा चित्रपट देणारी अलंक्रिताही थेट या विषयांना भिडते. तरीही ‘स्त्रीवादी’ म्हणून एका वेगळ्या साच्यात आम्हाला बसवू नका, असा त्यांचा आग्रह आहे. प्रस्थापित चौकटीत काम करताना मुळातच स्त्री-दिग्दर्शक म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते. ‘स्त्रीवादी’ असा शिक्का त्यांच्यावर मारत, त्यांना पुन्हा एकदा मुख्य प्रवाहातील सिनेमापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न प्रस्थापितांकडून केला जाईल, हे महत्त्वाचे कारण या नकारामागे असावे, हे लेखिका अधोरेखित करते. पण त्याचबरोबरीने- ‘‘अशा कोणत्याही वादापेक्षा आम्हाला आमची गोष्ट आमच्या पद्धतीने मांडण्याचे स्वातंत्र्य हवे,’’ हा एक कलाकार म्हणून असलेला त्यांचा आग्रह लेखिकेला अधिक महत्त्वाचा वाटतो.

भेदभावाची भक्कम भिंत

एकीकडे स्त्री-दिग्दर्शक म्हणून स्वतंत्र अस्तित्व त्यांना नको आहे, पण गेली कित्येक वर्षे लैंगिक भेदभावातून उभ्या राहिलेल्या त्यांच्यासमोरच्या समस्यांचा पाढा हा जवळपास सारखाच आहे. हॉलीवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून नावलौकिक कमावणारी पहिली भारतीय स्त्री-दिग्दर्शक म्हणून मीरा नायर यांच्याबद्दल सार्वत्रिक आदर असतो, तसाच त्यांच्या कामाबद्दल दराराही आहे. मात्र, वेगवेगळ्या देशांतील उपेक्षितांच्या, शोषितांच्या कथा सांगण्यात रस असणाऱ्या या मीरा नायर यांना आपल्या शैलीतील चित्रपटांसाठी आंतरराष्ट्रीय स्टुडिओच्या अवाजवी अपेक्षा, वर्णद्वेष, लिंगभेद या साऱ्याचा सामना करावा लागला. ‘मिसिसीपी मसाला’ या चित्रपटात गोऱ्या कलाकारांनाच प्राधान्य मिळाले पाहिजे, अशी अट त्यांना घालण्यात आली होती. मात्र स्वत:च्या ध्येयधारणांवर ठाम असलेल्या मीरा नायर यांनीही त्याच निर्विकारपणे ‘‘या चित्रपटात सगळे वेटर्स गोरे कलाकार असतील,’’ असे सांगितले. लेखाच्या सुरुवातीलाच सांगितलेल्या प्रसंगात साहाय्यक दिग्दर्शक स्त्रीच्या हाताखाली काम करण्यास नकार देणाऱ्या पुरुषांची संख्या अधिक आहे हे लक्षात आल्यावर आक्रमक अवतार धारण करण्यावाचून रीमा कागतीकडे पर्याय उरला नाही. मग दिग्दर्शक म्हणून तिच्या कामाची चर्चा होण्याऐवजी तिच्या या आक्रमक, रागीट स्वभावाची खिल्ली जास्त उडवली जाऊ लागली. अनुभवाच्या आणि यशाच्या जोरावर ही समीकरणे बदलण्याचे धाडस अंगी असावे लागते, हेच या साऱ्याजणींच्या बोलण्यातून प्रतीत होते.

स्त्री म्हणून इतर कोणत्याही क्षेत्राप्रमाणे इथेही आपली कारकीर्द आणि सांसारिक जबाबदाऱ्या यांचा मेळ घालणे ही त्यांच्यासाठीही तारेवरची कसरत ठरते. किरण राव, फराह खान, मीरा नायर किंवा अपर्णा सेन यांच्या चित्रपटांबरोबरच त्यांच्या स्वतंत्र विचारसरणीबद्दलही अनेकांना कुतूहल असते. काहींना त्याचे स्वाभाविक कौतुकही असते, मात्र यांच्यापैकी प्रत्येकीने मुलांना कडेवर घेऊन दिग्दर्शनाची जबाबदारी पार पाडली आहे. अपर्णा सेन यांनी तर ‘एकल माता’ (सिंगल मदर) म्हणून आपल्या दोन्ही मुलींना वाढवले, त्यामुळे एकीकडे दोन वर्षांच्या कोंकणाला जेवण भरवायचे आणि त्याच वेळी सेटवरच्या तंत्रज्ञांना चित्रीकरणाच्या तयारीबद्दल सूचना द्यायच्या. पण हा तोल सांभाळणाऱ्या अपर्णा सेन अनेकांना ठाऊक नसतात. प्रसिद्ध गीतकार गुलजार आणि अभिनेत्री राखी यांची कन्या म्हणून मेघना गुलजार यांना चित्रपटसृष्टीत फार काही संघर्ष करावा लागला नसेल, अशी अटकळ बांधता येईलही. मात्र आपल्या आई-वडिलांच्या पुण्याईवर चित्रपट घ्यायचा नाही, या निर्धारापोटी काही वर्षे छोटय़ा-मोठय़ा कामांवर समाधान मानावे लागलेल्या मेघना यांना चांगली संधी मिळवण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला होता. इतक्या वर्षांनंतर मेघना यांच्याकडे चालून आलेली दिग्दर्शनाची संधी केवळ मुलगा लहान आहे म्हणून हातची जाऊ नये यासाठी सकाळी राखी यांनी त्याला सांभाळायचे आणि संध्याकाळी खुद्द गुलजार यांनी आपल्या या लाडक्या नातवाचा ताबा घ्यायचा, असे ठरले. कुटुंबाच्या अशा पाठिंब्यानंतरही आपण मुलांच्या जबाबदारीत पालक म्हणून कमी पडत नाही ना या अपराधी भावनेचा सामना करायचा, हे वरीलपैकी प्रत्येकीने अनुभवले आहे.

किरण राव यांची दिग्दर्शनाची अनोखी शैली, त्यांची मांडणी याचे पती अभिनेता आमिर खान यांनाही अप्रूप आहे. मात्र ‘धोबीघाट’ हा चित्रपट के ल्यानंतर नुकत्याच जन्मलेल्या मुलगा आझादच्या पालनपोषणात किरण राव रमल्या. ‘‘गेल्या दहा वर्षांत मी एकही चित्रपट के ला नाही, यास सर्वस्वी मीच जबाबदार आहे. संसारात इतकी वर्षे रमल्यानंतर पुन्हा दिग्दर्शनाची सुरुवात करण्यासाठी मला खूप सायास पडणार आहेत,’’ ही किरण राव यांची प्रांजळ कबुली जशी लेखिके ला सहजी पचनी पडत नाही, तसेच ती आपल्यालाही विचार करण्यास भाग पाडते.

चित्रपटसृष्टीतील बदलांचाही वेध

या ११ स्त्री-दिग्दर्शकांची मुलाखत असे मर्यादित स्वरूप न ठेवता, त्या त्या वेळी त्यांनी संबंधित पत्रकार-लेखक यांना दिलेल्या मुलाखती, मांडलेले विचार आणि त्यांची बदलत गेलेली चित्रपटशैली यांचाही परामर्श पुस्तकात घेतला गेला आहे. त्यामुळे या प्रतिभावंत स्त्री-दिग्दर्शकांच्या आयुष्यातील घडामोडी, त्यांचा संघर्ष जसा ज्ञात होत जातो, तसेच चित्रपटसृष्टीतील तत्कालीन घडामोडींचा त्यांच्यावर झालेला परिणाम हा इतिहासपटही यातून सहज उलगडत जातो.

नव्वदच्या दशकात तनुजा चंद्रा हे नाव ‘दुश्मन’ आणि ‘संघर्ष’ यांसारख्या चित्रपटांमुळे परिचयाचे झाले होते. बहिणीवर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या मनोविकृताला पकडून देणारी नायिका ‘दुश्मन’मध्ये होती. या चित्रपटामुळे काजोलला अनवट भूमिकेत पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली. तो काळ आमिर, शाहरूख, सलमान यांसारख्या ‘स्टार’ नटांच्या चलतीचा. त्यामुळे नायिकाप्रधान चित्रपट असूनही, संजय दत्तसारख्या अभिनेत्याला चित्रपटात घेऊन त्यात प्रेमकथा घुसडण्याची तडजोड तनुजा चंद्रा यांना करावी लागली होती. व्यावसायिक मसालापट आणि ‘स्टार’ नटांचा त्या काळात जोर असल्याने खूप प्रयत्न करूनही नायिकाप्रधान कथा हाताळण्यात दिग्दर्शक म्हणून तनुजा यांना अपयशच स्वीकारावे लागले.

मात्र, त्याच काळात नृत्यदिग्दर्शक म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश के लेल्या फराह खान यांनी आपल्या धडाकेबाज स्वभाव आणि दिग्दर्शनाच्या जोरावर आघाडीच्या कलाकारांची पसंती मिळवली.  रूढार्थाने फराह यांनी नायिकाप्रधान चित्रपट के ले नाहीत, पण बॉलीवूडमधील मोठय़ा कलाकारांना घेऊन शे-दोनशे कोटींची कमाई करणाऱ्या ‘मै हूँ ना’, ‘ओम शांती ओम’, ‘हॅप्पी न्यू इयर’ यांसारखे यशस्वी चित्रपट देणारी दिग्दर्शक म्हणून फराह यांचे स्थान महत्त्वाचे ठरते. ‘‘मला लैंगिक भेदभावाचा सामना कधीही करावा लागला नाही,’’ हे ठणकावून सांगणाऱ्या फराह यांना अपयशाची चवही चाखावी लागली आणि टीकाही त्यांनी झेलली. पण त्यानंतर पुन्हा एकदा यशस्वी झाल्यानंतर त्याची दखल मित्र म्हणवून घेणाऱ्या सहदिग्दर्शकांनीही घेतली नाही, याची खंत व्यक्त करत आपण भेदभावाचे बळी ठरल्याची पुस्ती त्यांनी जोडली आहे.

स्त्री-दिग्दर्शक म्हणून आपल्याला भिन्न, अन्याय्य वागणूक मिळू नये हे जाहीरपणे वारंवार सांगून, दिग्दर्शक म्हणून स्वत:स सिद्ध करूनही चित्र फारसे बदललेले नाही, असे या साऱ्याजणींचे सांगणे आहे. तरीही आव्हानांशी आपापल्या परीने झुंजत आपल्या मनातील गोष्टी चित्रपटातून जिद्दीने सांगणाऱ्या या साऱ्याजणींच्या प्रगल्भ अनुभवांचे दस्तावेजीकरण करणारे हे पुस्तक ‘स्त्रीवादा’कडे पाहण्याचा ठोकळेबाज दृष्टिकोन बदलणारे ठरते.

‘एफ-रेटेड : बीइंग अ वुमन फिल्ममेकर इन इंडिया’

लेखिका : नंदिता दत्ता

प्रकाशक : हार्पर कॉलिन्स

पृष्ठे : २५६, किंमत : ४९९ रुपये

reshma.raikwar@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2020 2:31 am

Web Title: f rated being a woman filmmaker in india book review zws 70
Next Stories
1 भाजपच्या बिहार-विजयाचा अर्थ
2 बुकबातमी : गावातली मैत्रीण अरुणा..
3 पत्रांमधल्या आनंदीबाई..
Just Now!
X