|| अजिंक्य कुलकर्णी
मोरोक्कोतील स्त्रियांच्या वाट्याला आलेल्या लैंगिक स्वातंत्र्याच्या दमनाचे अनेकविध तपशील नोंदवणाऱ्या पुस्तकाचा हा परिचय…

सन २०१९ मध्ये एका प्रसिद्ध मोरोक्कन अभिनेत्रीला अटक होते, कारण काय तर तिच्याच नवऱ्याने तिच्याविरुद्ध व्यभिचाराची तक्रार केली होती म्हणून!… एक सामाजिक कार्यकर्ता स्वत:च्याच बायकोसोबत मोरोक्कोमधील मराकेश या शहरातील एका हॉटेलच्या बेडरूममध्ये होता; तर तिथे पोलिसांनी धाड टाकली. त्या सामाजिक कार्यकत्र्याच्या पत्नीने सरळ हॉटेलच्या खिडकीतून स्वत:ला फेकून देत आत्महत्या केली. पकडलो गेलो म्हटल्यावर पुढे होणाऱ्या तथाकथित ‘बदनामी’पेक्षा त्या स्त्रीला मृत्यू जवळ करावासा वाटला… या सगळ्या घटनांमधला कळस म्हणजे, सप्टेंबर २०१९ मध्ये पत्रकार हजेर रायसोनी यांना एक डॉक्टरसमवेत अटक झाली. रायसोनींचे एका महिलेशी विवाहबाह््य संबंध होते आणि त्या दोघांना या संबंधातून मूल नको होते, म्हणून त्यांनी दवाखान्यात जाऊन गर्भपात करण्याचा ‘गुन्हा’ केला होता. रायसोनी हे मोरोक्कोच्या पत्रकारितेतले एक मोठे प्रस्थ. राजकीय मंडळींमध्ये त्यांची ऊठबस असे. राजकीय विश्लेषक म्हणून त्यांनी सरकारी धोरणांवर वेळोवेळी ताशेरेही ओढले आहेत. त्यांच्यावरील याच खटल्यामुळे मोरोक्कोत इतकी वर्षे दमन केले जात असलेल्या लैंगिक स्वातंत्र्याच्या चळवळीला वाचा फुटली.

याच काळात सोनिया तेराब या दिग्दर्शिकेसह लेखिका लैला स्लिमनी यांनी वर्तमानपत्रांत जाहिरात देऊन मोरोक्कोतील स्त्रियांना आवाहन केले : ‘तुमच्या लैंगिक भावना, गरजा यासंबंधीचे तुमचे स्वत:चे अनुभव मनमोकळेपणाने लिहून आम्हाला पाठवा.’ आणि काय आश्चर्य! अशा अनुभवांची हजारो पत्रे त्यांना मिळाली. त्या अनुभवांची सत्यता तपासण्यासाठी स्लिमनी यांनी अख्खा मोरोक्को पायाखालून घातला. या प्रवासात ठिकठिकाणी भेटलेल्या स्त्रियांनी सांगितलेले त्यांच्या लैंगिक भावनांसंबंधीचे अनुभव स्लिमनी यांनी ‘सेक्स अ‍ॅण्ड लाइज्’ या पुस्तकात कथन केले आहेत.

त्यातून, लैंगिक स्वातंत्र्याचे समाजाकडून नेहमीच दमन कसे केले जात आहे, हे अधोरेखित होते. मोरोक्कोमध्ये विवाहबाह्य संबंध, समलैंगिक संबंध, वेश्याव्यवसाय यांवर कडक बंधने आहेत. त्यांचे उल्लंघन करताना कोणी आढळल्यास त्यास कठोर शासन होते. मोरोक्कोच्या दंडसंहितेतील एका तरतुदीनुसार तेथील स्त्री आणि पुरुष यांनी (म्हणजेच भिन्नलिंगी व्यक्तींनी) विवाह न करता शरीरसंबंध ठेवले, तर त्यांना एक वर्षाची कठोर कारावासाची शिक्षा होते. मोरोक्कोमधील मुस्लीम स्त्रियांची ही परिस्थिती पाहता, आपल्याला कदाचित असे वाटू शकते की, मग तिथल्या निम्म्याहून अधिक तरुण पुरुषांचे कौमार्य भंग झालेले नाहीये की काय? तर तसे अजिबात काही नाही. तेथील प्रशासकीय/ पोलीस अधिकाऱ्यांना हे पक्के ठाऊक आहे की, मोरोक्कोत दररोज शेकडो गर्भपात हे अवैध मार्गाने केले जातात. फक्त हे अधिकारी तसे जाहीरपणे कबूल करत नाहीत. स्लिमनी लिहितात, तेथील राजकीय मंडळी, शिक्षक, पालक यांची एकच धारणा झालेली आहे की, जे काही करायचे असेल ते करा, पण खासगीत करा इतकेच. स्लिमनी मोरोक्कोमधील ज्या ज्या स्त्रियांना भेटल्या त्या त्या स्त्रियांच्या लैंगिक भावना, गरजांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. स्लिमनी यांना भेटलेल्या सर्व स्त्रिया खऱ्या असल्या, तरी पुस्तकात त्यांतील काहींची नावे बदललेली आहेत.

मोरोक्कोमधील लैंगिक उत्पीडन हे आता थेट विद्यापीठीय स्तरावर जाऊन पोहोचलेले आहे. विद्यापीठांमध्ये स्त्री शिक्षकांचा पुरुष सहकाऱ्यांकडून कायमच लैंगिक छळ केला जातो. मग तो छळ शारीरिक किंवा शाब्दिक अशा कोणत्याही स्वरूपाचा असू शकतो. विद्यार्थिनींचा आणि स्त्री शिक्षकांचा हा लैंगिक छळ परीक्षांच्या कालावधीत तर खूप वाढतो. याला आणखी एक बाजूदेखील आहे. ती म्हणजे हिजाब घातलेल्या प्रत्येक स्त्रीचे कौमार्य टिकून राहतेच असे नाहीये. हिजाब घातलेल्या स्त्रियाही कधी लग्नाच्या आमिषाच्या आशेवर किंवा शिक्षणाच्या खर्चासाठी पुरुषांशी शय्यासोबत करतात हे वास्तव आहे, असेही स्लिमनी पुस्तकात नोंदवतात. शिक्षणासाठी प्रसंगी वेश्याव्यवसायही करणाऱ्या मुलींबद्दल पुस्तकात वाचायला मिळते. याच मुली मग आठवड्याच्या शेवटी त्यांची घरची मंडळी त्यांना भेटायला येतात तेव्हा अगदी पारंपरिक पोषाख परिधान करतात. स्त्रियांच्या वागण्यातील ही दुहेरी मानके स्लिमनी यांनी अगदी ठसठशीतपणे मांडली आहेत.

मोरोक्कोमध्ये एकटे राहण्याचा निर्णय घेतलेल्या स्त्रीला राहायला भाडेपट्ट्याने घरही मिळत नाही. एखाद्या स्त्रीला एकट्याने राहण्यासाठी घर भाड्याने घ्यायचे असेल, तर घरमालकाला तिच्या आईवडिलांचे संमतीपत्र लागते. एकटी स्त्री मोरोक्कोच्या रस्त्यांवर रात्री नऊनंतर निर्धोकपणे जाऊ शकत नाही. हवे ते कपडे मुली घालू शकत नाहीत. मोरोक्कोच्या रस्त्यांवर अर्ध्या कपड्यातील मुलींचे पोस्टर चालतात, पण प्रत्यक्षात मुलींनी मात्र अंगभर कपडे घालूनच बाहेर गेले पाहिजे असा दंडक आहे. अशा दांभिकपणावर स्लिमनी यांच्यासमोर व्यक्त झालेल्या स्त्रिया कोरडे ओढतात. या स्त्रियांचे म्हणणे आहे की, लोक लैंगिक विषयावर मासिकांमधून लेख लिहितात, रेडिओवरून भाषणे ठोकतात, पण मूळ मुद्द्यावर बोलतच नाहीत. तो मूळ मुद्दा म्हणजे, लैंगिक स्वातंत्र्याबद्दल कायद्याने बदल घडवून आणणे. विचारांना असे कायदेशीर अधिष्ठान देण्यासाठी चळवळ मात्र कुणी उभी करत नाही, अशी या स्त्रियांची खंत आहे.

वेगवेगळ्या स्त्रियांनी जे जे स्वानुभव स्लिमनी यांना सांगितले आहेत, त्यावरून एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले जाते. तो म्हणजे शालेय अभ्यासक्रमात असलेल्या लैंगिक शिक्षणाचा अभाव. याचे दुष्परिणाम विषद करताना स्लिमनी म्हणतात, ‘मोरोक्कोच्या लोकसंख्येतील एक मोठा वर्ग हा पोर्नोग्राफीचा, डेटिंग संकेतस्थळांचा मोठा ग्राहक बनला आहे. या क्षेत्राचा जगातील पाचव्या क्रमांकाचा ग्राहक मोरोक्को आहे.’ लैंगिक शिक्षणाच्या अभावाचे एक उदाहरण स्लिमनी यांनी दिले आहे. त्या एका उच्चशिक्षित व्यक्तीला भेटल्या. त्या व्यक्तीस प्रसूतितज्ज्ञ नावाचा काही प्रकार असतो हे माहीतदेखील नव्हते. त्या व्यक्तीच्या माहितीप्रमाणे एड्स हा रोग सॉफ्ट ड्रिंक्स घेतल्यामुळे पसरतो!

या पुस्तकात व्यक्त झालेल्या सर्वच स्त्रिया गरीब, अशिक्षित आहेत असेही नाही. यातल्या कित्येक स्त्रिया उच्चशिक्षित आहेत. उदाहरणार्थ, मल्लिका (नाव बदललेले आहे) या पेशाने डॉक्टर आहेत. शिक्षण हे वाघिणीचे दूध असते वगैरे म्हटले जाते. मग याच शिक्षणाचा वापर करत आपल्यावरील अन्यायाला या स्त्रिया वाचा का फोडत नाहीत, असा प्रश्न पडतो. मोरोक्कोमध्ये गरीब स्त्रियांना तर विविध स्तरांवर संघर्ष करावा लागतो. पहिला संघर्ष आहे अर्थार्जनासाठीचा. ज्यांनी वेश्याव्यवसाय हे उत्पन्नाचे साधन मानले आहे, त्या स्त्रिया बहुतेकदा त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमावत्या व्यक्ती असतात. दुसरा संघर्ष असतो तो सन्मानजनक वागणूक मिळावी यासाठीचा. त्या शिक्षित, कमावत्या असल्या तरी कुटुंबात, शेजारी, समाजात त्यांना सन्मान मिळतोच असे नाही. आपल्याला माणूस म्हणून तरी किमान सन्मानाने वागवले पाहिजे ही अपेक्षा ठेवणे अजिबात गैर नाही. मोरोक्कोत स्त्रियांच्या कौमार्याला इतके अवास्तव महत्त्व आहे की विचारता सोय नाही. आधी उल्लेखलेल्या डॉ. मल्लिका यांच्याच बाबतीत घडलेला एक प्रसंग अंगावर शहारे आणतो. डॉ. मल्लिका यांनी प्रसूतितज्ज्ञ म्हणून काम करण्यास सुरुवात केली असता, एक दिवस अचानक दोन-तीन व्यक्ती एका नववधूला त्यांच्याकडे घेऊन येतात आणि तिचे कौमार्यभंग तर झालेले नाही ना याची तपासणी करायला सांगतात. असे कौमार्य प्रमाणपत्र मागण्यात त्या मंडळींना काहीच गैर वाटत नाही! येथील शिकलेल्या स्त्रियांना मात्र युरोपातील स्वातंत्र्याचे, खासगीपणाचे प्रचंड आकर्षण आहे. वेळप्रसंगी या स्त्रियांना आपला देशही सोडावासा वाटतो. पण केवळ आर्थिक बाजू लंगडी असल्यामुळे त्या तसे करू शकत नाहीत.

मोरोक्कोत २०१५ साली प्रदर्शित ‘मच लव्ह्ड’ या सिनेमावरून झालेला गदारोळ इतका होता की, सिनेमातल्या अभिनेत्रींना काही काळ देशातून परागंदा व्हावे लागले होते. या सिनेमाच्या दिग्दर्शिकेचे म्हणणे पुस्तकात मुळातूनच वाचलेले बरे! हे पुस्तक ज्या स्त्रियांच्या मुलाखतींवर आधारित आहे, त्यांच्यापैकी एकही अशी सापडत नाही की तिने स्वत:वर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवलेला आहे. पुस्तकात कित्येक सामाजिक संघटना, कार्यकर्त्यांचे उल्लेखही आहेत. ते त्यांचे त्यांचे काम करतही असतील. पण मुळात ज्या स्त्रिया पीडित आहेत, त्यांना या अन्यायाविरुद्ध आवाज उठवावासा वाटतोय का, हा प्रश्न आहे? दुर्दैवाने त्याचे उत्तर ‘नाही’ असे द्यावे लागेल. उठाव, बंड, पोलिसात जाऊन तक्रार करणे किंवा असा अन्याय इतरांवर होऊ नये म्हणून काही प्रयत्न करण्याऐवजी झोरसारखी एक मुलगी -जिच्यावर तीन जणांनी बलात्कार केला आहे- योग्य जोडीदार निवडून लग्न करण्याऐवजी हस्तमैथुन करण्याच्या पर्यायाला प्राधान्य देते? मुस्लीम स्त्रियांचा पेहराव हा त्या मुस्लीम असल्याची ओळख ठसवण्यास भाग पाडतो. वेगवेगळ्या प्रकारची सामाजिक ओझी त्या वाहत असतात. सन्मान, प्रतिमा, सांस्कृतिक शिक्षण, कथित मूल्ये यांचा भार फक्त स्त्रियांच्याच खांद्यावर! धर्मधुरीणांनी काढलेल्या फतव्यांत स्त्रियाच अधिक भरडल्या जातात.

मोरोक्कोतील स्त्रियांच्या वाट्याला आलेल्या या जगण्याचे अनेकविध तपशील स्लिमनी यांनी पुस्तकात नोंदवले आहेत. मात्र, दमनाची अशी विविध रूपे मोरोक्कोतच आहेत असेही नाही. जरा डोळे उघडे ठेवून पाहिले की ती दिसतीलच… कदाचित आपल्या आजूबाजूलाच!

ajjukul007@gmail.com