आरती कदम

समाजातली स्त्री-पुरुष असमानता आजही कायम असली आणि त्याविरुद्धचा संघर्ष सुरू असला, तरी स्त्रीने स्वत:चे दुय्यमत्व नाकारण्यासही सुरुवात केली आहे. स्वत:ला सिद्ध करण्याचे तिचे कळत-नकळत प्रयत्न एका मोठय़ा परिवर्तनाला साद घालत आहेत. हे पुस्तक याच प्रवासाची माहिती उदाहरणांसह देत, त्यातले तथ्य उलगडून सांगते..

समाजव्यवस्थेच्या विविध टप्प्यांवर माणसाने जे जे निर्णय घेतले, ज्या क्रिया-प्रतिक्रिया घडल्या, त्यातून माणूस घडत गेला. आज आपल्या समाजातला पुरुष प्रथम स्थानावर आणि स्त्री दुय्यम स्थानावर आहे, हे असमानतेचे समाजसत्य याच निर्णयांचा परिपाक आहे. ‘फेमिनिझम इज..’ हे पुस्तक याच निर्णयांमागची कारणे शोधते आणि स्त्रीवादाचा जळजळीत प्रवास आपल्या नजरेसमोर साकार होत जातो.

कोणत्याही मोहिमा, चळवळी, आंदोलने ही वैचारिक द्वंद्वातूनच होत असतात. पुरुषप्रधान संस्कृती स्वीकारून जगणाऱ्यांपैकी काहींना जेव्हा समाजभान आले, तेव्हा त्यांनी समाजव्यवस्थेला प्रश्न विचारायला सुरुवात केली. स्त्री-पुरुष असमानता का? बाई दुय्यम का? स्त्रीने ती स्त्री आहे म्हणून अन्याय, अत्याचार का सहन करायचा? या प्रश्नांच्या विचारमंथनातून जगभरातच ‘स्त्रीवाद’ आकाराला आला. मर्यादित का होईना, पण असे प्रश्न आधी स्वत:ला विचारून मग समाजाला विचारणारे पुरुषही होते. परंतु खऱ्या अर्थाने सर्वच क्षेत्रांतील पुरुषांची मक्तेदारी मोडून काढण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न अनेक स्त्री आंदोलक, कार्यकर्ता, लेखकांनी केले. सोजॉर्नर ट्रथ, एम्मेलिन पँखर्स्ट, ग्लोरिया स्टायनम, सिमॉन द बोव्हा, चिमामँडा अदिची.. या त्यातल्या काही जणी. त्यांच्या संघर्षांची स्फूर्तीदायक माहिती या पुस्तकात वाचायला मिळतेच; पण स्त्रीचळवळीचा प्रवासही उलगडत जातो. अशा असंख्य स्त्रियांच्या प्रयत्नांमुळे गेल्या शतकभरात ही परिस्थिती काही अंशी नक्कीच बदलली. स्त्रीचा, मुख्य म्हणजे तिच्या स्त्रीत्वाचा, तिच्या अधिकारांचा, तिच्यावर अपरिहार्यपणे लादल्या गेलेल्या बंधनांचा संवेदनशीलपणे विचार होऊ  लागला. आजही समाजातली स्त्री-पुरुष असमानता कायम असली आणि त्याविरुद्धचा संघर्ष सुरू असला, तरी स्त्रीने स्वत:चे दुय्यमत्व नाकारले आहे, स्वत:ला सिद्ध करण्याचे तिचे कळत-नकळत प्रयत्न एका मोठय़ा परिवर्तनाला साद घालत आहेत. हे पुस्तक याच प्रवासाची माहिती उदाहरणासह देत त्यातले तथ्य उलगडून दाखवते.

जन्मापासूनच भेदभावाला सुरुवात होते. मुलगा आणि मुलगी यांचे कपडे वेगळे असतातच, पण रंगही वेगळेच असतात. मुली गुलाबी रंगात, तर मुलगे निळ्या रंगात रंगतात. (या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर ‘फेमिनिझम’ हा शब्द गुलाबी रंगातच रंगवून हा विरोधाभास अधोरेखित केला आहे!) मुलाने मुलीसारखे असूच नये, अशी घट्ट सीमारेषा आपल्या मनावर समाजपुरुषाने आखलेली आहे. हीच रेषा पुढे शाळेत गेल्यावर अधिक गडद होते. मुलीने हे करायचे नाही, ते करायचे नाही, अशी अनेक बंधने घालत समाजाने बाईला ‘नाही रे’ वर्गात लोटून दिले. ज्यातून बाहेर येण्याची धडपड आजही अनेक जणींसाठी क्लेषकारक ठरते आहे.

वाईटातून चांगले घडते असे म्हणतात. जगासाठी विध्वंसक ठरलेल्या पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांनी ही झापडे उखडून टाकायला भाग पाडले. घरकाम किंवा फार फार तर परिचारिका, शिक्षिका इथपर्यंत मर्यादित असणारे स्त्रियांचे विश्व पुरुषमंडळी महायुद्धावर गेल्याने विस्तारले. शस्त्रास्त्रांच्या कारखान्यातले ताकदीचे काम असो, कार्यालयातील बौद्धिक काम असो, की फायटर पायलट बनून करायचे धाडसाचे काम असो; स्त्रियांनी ती सर्व कामे केली, ज्यात आत्तापर्यंत पुरुषांची मक्तेदारी होती. परंतु पहिले महायुद्ध संपले. पुरुष आपापल्या कामावर परतले आणि त्यांच्या बायका पुन्हा एकदा घराच्या चौकटीत बंदिस्त झाल्या; त्या पुन्हा बाहेर पडल्या दुसऱ्या महायुद्धाच्या काळात. या दोन्ही युद्धांनी स्त्रियांना स्वयंरोजगाराची संधी देऊन स्वकमाईची चव चाखायला दिली आणि स्त्रियांच्या प्रगतीतला एक मोठा टप्पा गाठला गेला. आत्मभान जागृत व्हायला हा काळ कसा उपयोगी पडला, याचा ऊहापोह हे पुस्तक करते.

माणसाच्या विकासातला आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे शिक्षण. अठराव्या शतकात स्त्रीशिक्षणाचे महत्त्व लक्षात येऊनही ते प्रत्यक्षात यायला एकोणिसावे शतक उजाडलेच. पण त्याही काळात हा भेदभाव इतका ठसठशीत होता, की पाश्चिमात्य देशांतही बाईला शिवणकाम आणि स्वयंपाकाचेच धडे दिले जात. पुरुष मात्र विज्ञान आणि गणित घेऊन विकासाच्या, प्रगतीच्या आकाशात उंच भरारी घेऊ  लागले. दुर्दैवाने आजही ही असमानता कौटुंबिक पातळीवर सुरूच आहे. अगदी विकसित राष्ट्रांतील मुलींनाही विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या क्षेत्रांत जाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. इतकेच नव्हे, तर एकविसाव्या शतकातही जगभरातल्या एक कोटी ५० लक्ष मुली कधी शाळेतच गेलेल्या नाहीत. मात्र त्याच असमानतेच्या जगात मलाला युसुफजाईसारखी मुलगी जन्म घेते. मुलींच्या शिक्षणाच्या अखंडतेसाठी दहशतवाद्यांच्या गोळ्या झेलते, हेही आपण पाहतो आहोतच. या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे, स्त्रीला फक्त शिक्षित करणे हा शिक्षणाचा हेतू नाही, तर तिला तिची ताकद मिळवून देणे हा आहे. ती ताकद मुली मिळवू लागल्या आहेत.

शिक्षणाने अर्थबळ मिळत असल्याने साहजिकच शिक्षित स्त्रिया आर्थिकदृष्टय़ा सक्षम झाल्या आहेत. अमेरिकेत तर दहापैकी चार स्त्रिया कुटुंबाच्या कर्त्यांधर्त्यां आहेत. तरीही नोकरी-व्यवसायांत स्त्रिया मागे राहण्याचे कारण सांगताना, हे पुस्तक स्त्री-पुरुष असमानतेकडेच बोट दाखवते. नोंद करण्यासारखी बाब म्हणजे, या असमानतेचे भान विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच आले होते. स्त्री-पुरुषांना समान वेतन दिले जावे यासाठी १९१२ साली कार्यकर्त्यां एलिझाबेथ गुर्ली फ्लेन यांनी ‘ब्रेड अ‍ॅण्ड रोझेस’ नावाने आंदोलन छेडले होते. मागण्या होत्या : समान वेतन आणि चांगली कार्यसंस्कृती! स्त्रियांसाठी एक एक क्षेत्र उघडू लागल्याची ही चिन्हे होती. अर्थात, त्यातला स्त्री-पुरुष संघर्षही अटळ होता व म्हणूनच स्त्रीवादी चळवळीचा प्रवासही!

हा प्रवास मांडणारे ‘फेमिनिझम इज..’ हे अत्यंत देखणे, कोणत्याही वयोगटाला समजेल अशा भाषेत चित्रांकित केलेले पुस्तक आहे. स्त्रीवादी चळवळीचा प्रवास अत्यंत सोप्या, मोजक्या शब्दांत त्यात मांडला आहे. खूप सारी रेखाचित्रे, छायाचित्रे, मान्यवरांची उद्धृते, महत्त्वाची माहिती देणाऱ्या चौकटी, पुस्तकांची सूची, वेगवेगळी आकडेवारी, सर्वेक्षणे आणि डोळे उघडवणारे त्यांचे निष्कर्ष, स्त्रीवाद्यांच्या कर्तृत्वाची माहिती.. अशी या पुस्तकाची रचना आहे. स्त्रीवादाच्या प्रवासाची माहिती करून घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक संग्राह्य़ आहेच; पण त्याहीपलीकडे जाऊन यातील मुद्दय़ांवर ते वाचकास विचारप्रवृत्त करणारे आहे. अलेक्झांड्रा ब्लॅक, लॉरा ब्युलर, एमिली हॉयल आणि डॉ. मेगन टोड यांनी लिहिलेल्या या पुस्तकाच्या सल्लागार आहेत- डॉ. डेब्रा फेरेडे या अभ्यासक!

स्त्रीवादाच्या नजरेने बदलत्या जगाचा वेध हे पुस्तक घेतेच; पण जगातल्या बदलाचा परिणाम स्त्रीच्या आयुष्यावर, जाणिवांवर कसा झाला, तेही सांगते. विज्ञान-तंत्रज्ञानामधील प्रगतीमुळे आधुनिक साधने स्त्रियांच्या हातात येत गेली. त्यापैकी महत्त्वाचे म्हणजे कुटुंबनियोजनाची साधने आणि शस्त्रक्रिया. आपल्याला हवे तेव्हाच मूल, या शक्यतेमुळे स्त्रीस्वातंत्र्याचा पाया घातला गेला. अर्थात, हा बदल सोपा नव्हताच. कारण वर्षांनुवर्षे तनामनावर दुय्यमत्वाचे ओझे इतके होते, की आपण दुबळ्या आहोत हे स्त्रियांनी जणू स्वीकारलेच होते. किंबहुना यातून आपण बाहेर पडू शकतो, हा विचारही अनेकींच्या मनाला शिवलेला नव्हता, आजही नाही. निसर्गाने स्त्रीला मातृत्व दिले आहे. तिच्यात त्यामुळे ममत्व, प्रेमभावना येते. त्यामुळे तिनेच घर, मुलं सांभाळावीत असा विचार रुजलेला. तर पुरुषात आक्रमकतेची संप्रेरके (हार्मोन्स) असल्यामुळे तो कठोर, भावनांचे प्रदर्शन न करणारा बनला. परंतु हे मानायला नकार देत कोर्डेलिया फाइन हे केवळ मिथक असल्याचे सांगते. इथे ओघात एक गमतीशीर निरीक्षण पुस्तकात नोंदवलेले आहे. ते असे : विवाहित स्त्रीपेक्षा एकटी स्त्री अधिक जगते, तर अविवाहित पुरुषापेक्षा विवाहित पुरुष अधिक जगतो!

पुरुषी मानसिकतेने स्त्रीची जाणीवपूर्वक विशिष्ट प्रतिमा निर्माण करून त्यातच तिला अडकवून ठेवण्याची यशस्वी खेळी खेळली. यावर हे पुस्तक भर देतेच; पण त्यात दिलेले मिरियम ओ’रायली हिच्यासारखीचे उदाहरण दिलासा देणारे ठरते. केवळ वय झाले म्हणून कार्यक्रम नाकारणाऱ्या बीबीसीविरुद्ध ५३ वर्षीय मिरियमने खटला भरला आणि तो जिंकलाही. स्त्रीची सामाजिक प्रस्थापित प्रतिमा ही तरुण, कमनीय, सुंदर अशीच असल्याने दूरचित्रवाणी वाहिनीवरील निवेदिका असो वा इतर माध्यमांतील स्त्रिया; तेथे फक्त ‘स्लिमट्रीम’ तरुणींनाच स्थान असते. ज्यातून अजूनही स्त्रियांची मुक्तता झाल्याचे दिसत नाही.

बाईच्या या ‘सुंदर दिसण्याच्या’ गृहीतकाचा या पुस्तकात चांगलाच समाचार घेतला आहे. ५० कोटी डॉलर्सच्या जागतिक कॉस्मेटिक उद्योगाचे, फॅशन इंडस्ट्रीजने रुजवलेला हा विचार असल्याचे सांगत स्त्रीवाद्यांनी यासाठी पुरुषी मानसिकतेबरोबरच स्त्रीच्या मानसिकतेलाही दोष दिला आहे. सुंदर, कमनीय.. ‘सेक्सी’ दिसलेच पाहिजे, याचे ओझे बाईला कसे न्यूनगंडात नेते, यावर पुस्तकात ताशेरे ओढले आहेत. यातला फोलपणा लक्षात घेऊन बाईने आपल्या आत्मविश्वासाचा बळी देऊ  नये, असे सांगताना यात अमेरिकी मॉडेल अ‍ॅशले ग्रॅहमचे ‘प्लस साइज’चे चपखल उदाहरण येते आणि सोबत येते कमनीय बांधा आणि सौंदर्यवती म्हणून अनेकींच्या न्यूनगंडाला कारणीभूत ठरलेली बार्बी! तीसुद्धा नंतर आकार वाढवत चार वेगवेगळ्या रूपांत कशी आणली गेली, याची कथा. पुढच्या टप्प्यात स्त्रियांच्या आंदोलनांचाच भाग म्हणून स्त्रीच्या जाहीरपणे केलेल्या ‘सेक्सी’ चित्रणावर बंधने आणली गेली. तरीही मनोरंजनाच्या, कलेच्या क्षेत्रातही तिला कमनीयच दाखवली गेली. तिच्या नग्नतेत सौंदर्य शोधले गेले. पुरुषाने आपल्याला हवी तशी बाईला ‘घडवली’ आणि त्यामागे पुरुषी मानसिकताच होती, हे विविध उदाहरणांनी हे पुस्तक सिद्ध करते.

एका बाजूला स्त्रीला असे जाणीवपूर्वक तरुण, कमनीय बनवत असताना ती कशी बुद्धू आहे, याचाही जाणीवपूर्वक प्रसार केला गेला. परंतु त्याच मानसिकतेने पुरुषांनाही ‘माचो मॅन’च्या कल्पनेत रमवले. पुरुष हा बलदंड, आत्मविश्वासी आणि कणखर असतो असे तोही मानायला लागला आणि स्वत:च्या प्रतिमेच्या सापळ्यात अडकला. समाजाने बाईवर अन्याय केलाच, पण काही वेळा तो पुरुषांवरही झाला. बाईला दुय्यम ठरवता ठरवता स्वत:ला श्रेष्ठ ठरवण्यात त्याचीही शक्ती नको एवढी खर्च झालीच.

स्त्री-पुरुषांचा संघर्ष हा असा कुणी तरी घडवलेल्या, लादल्या गेलेल्या मानसिकतेमधून आलेला आहे. लिंग, लैंगिकता, वंश, जात यांबाबत वर्षांनुवर्षे समाजाने रुजवलेल्या दुय्यमत्वाच्या गृहीतकांना घट्ट पकडून ठेवण्याची चूक बाईने आणि पर्यायाने समाजानेही केलेली आहे. या पुस्तकातून आलेला स्त्रीवादाचा प्रवास मात्र त्यापलीकडचा आहे, सकारात्मक आहे. दुय्यम असण्यातून बाई खूप पुढे निघाली आहे. अन्यायाविरोधात एकत्र येऊन आवाज उठवते आहे. पुरुषांसाठी, विशेषत: नवऱ्यासाठी जगणारी स्त्री स्वत:साठी जगते आहे. ‘ही फॉर शी’सारखी चळवळ उभारत पुरुषही तिच्या साथीला उभा आहे, हे स्त्रीवादी चळवळीचेच फलित आहे. अर्थात, अजून खूप मोठा प्रवास बाकी आहे.

‘फेमिनिझम इज..’

लेखन : अलेक्झांड्रा ब्लॅक, लॉरा ब्युलर, एमिली हॉयल, मेगन टोड

प्रकाशक : डीके / पेंग्विन रॅण्डम हाऊस

पृष्ठे: १६०, किंमत : ३९९ रुपये

arati.kadam@expressindia.com