12 December 2017

News Flash

विश्वसाहित्यातील इंग्रजी पेच

तौलनिक साहित्य अभ्यासात ‘विश्वसाहित्य’ ही एक महत्त्वाची संकल्पना समजली जाते

सचिन केतकर | Updated: June 24, 2017 2:59 AM

तौलनिक साहित्य अभ्यासात ‘विश्वसाहित्य’ ही एक महत्त्वाची संकल्पना समजली जाते; परंतु १९९० च्या दशकात जागतिकीकरणाचे वारे मोठय़ा प्रमाणात वाहू लागल्यावर या संकल्पनेची पुनर्माडणी आणि तिच्या सद्धांतिक बाजूची मोठय़ा प्रमाणात चर्चा घडू लागली. यात सर्वात महत्त्वाची आणि प्रचलित मांडणी पास्कल कॅसानोवा, डेविड दमरोश आणि फ्रँको मोरेट्टी या अभ्यासकांनी केली. १८२७ साली थोर जर्मन साहित्यकार गोएथे (Goethe)यांनी एका पत्रात ‘weltliteratur’ किंवा ‘वर्ल्ड  लिटरेचर’ची जी कल्पना मांडली होती, तिची संपूर्णपणे वेगळी आणि समकालीन मांडणी या तीन अभ्यासकांनी केली. त्यानंतर विश्वसाहित्याचे अभ्यासक्रम, विश्वसाहित्याचे संकलन, त्यावरील चर्चासत्रे आणि पुस्तके मोठय़ा प्रमाणात पुढे  येऊ लागली. इतकेच नव्हे, तर विश्वसाहित्य हा तौलनिक साहित्याभ्यासाचा एक विचार नसून संपूर्ण वेगळी अशी विद्याशाखाच (discipline) आहे की काय असा समज होऊ लागला. जगभरात अत्यंत मोठय़ा प्रमाणात साहित्यनिर्मिती होत असल्यामुळे साहित्याचा वैश्विक पातळीवर अभ्यास करण्याकरिता मुळात साहित्याकडेच पाहण्याचे दृष्टिकोन आणि अभ्यासाची रीत – दोघांमध्ये नवीन पद्धतींची गरज आहे, असे हे अभ्यासक दाखवून देतात. अर्थातच या संकल्पनेकडे टीकात्मक व चिकित्सक दृष्टीनेही मोठय़ा प्रमाणात पाहिले गेले. अशा टीकात्मक चच्रेत एमिली अ‍ॅप्टर, फेंग चिएह आणि आमिर मुफ्ती हे महत्त्वाचे समीक्षक समजले जातात.

पास्कल कॅसानोवा आपल्या ‘द वर्ल्ड रिपब्लिक ऑफ लेटर्स’ (१९९९) या गाजलेल्या (मूळ फ्रेंच) पुस्तकात म्हणतात- साहित्याकडे पाहण्याची आपली रीत इतकी प्रादेशिक / राष्ट्रीय झाली आहे, की मागच्या तीनशे-चारशे वर्षांत जो साहित्याचा वैश्विक – आंतरराष्ट्रीय फलक उदयास आला आहे, त्याला केंद्रस्थानी ठेवून साहित्याच्या आंतरराष्ट्रीय परिमाणाची चर्चा आपण फारशी करत नाही. त्यामुळे साहित्याच्या आंतरराष्ट्रीय – वैश्विक अवकाशातून साहित्याच्या वैश्विक गणतंत्राचा world republic of letters)  अभ्यास करण्याकरिता त्या वेगळा दृष्टिकोन सुचवतात. कॅसानोवा यांच्या विचारांची मोठय़ा प्रमाणात चर्चा झाली. त्याविषयीच्या आणखी माहितीसाठी आपण बेनेडिक्ट अँडरसन आणि एमिली अ‍ॅप्टर यांनी संपादित केलेले ‘डीबेटिंग वर्ल्ड लिटरेचर’ (२००४) हे पुस्तक पाहू शकता.

डेव्हिड दमरोश यांनी ‘व्हॉट इज वर्ल्ड लिटरेचर?’ (२००३) या पुस्तकात ‘विश्वसाहित्य’ या संकल्पनेकडे पाहण्याचे तीन प्रमुख प्रकार सांगितले आहेत. जगातल्या सर्व भाषांमधल्या- १) थोर कृतींचा संचय म्हणून, किंवा २) मान्यताप्राप्त प्रस्थापित कृतींचा विकसनशील कॅनन म्हणून, किंवा ३) इतर भाषा, समाज आणि संस्कृतीकडे वैश्विक पातळीवर उघडणाऱ्या खिडक्या म्हणून. हे तीन प्रकार एकमेकांपासून नेहमीच अलिप्त राहतात असेही नाही आणि एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीत गोएथेच्या मांडणीत हे तीनही प्रकार एकत्र दिसतात. मात्र दमरोश या तीनही विचारांहून वेगळी अशी मांडणी करतात. ते म्हणतात, विश्वसाहित्य म्हणजे साहित्यकृतींचा असीम व कधीही पूर्णपणे न गवसणारा संचय म्हणून न पाहता एका भाषेतल्या साहित्यकृतींना इतर दुसऱ्या भाषा व संस्कृतींतून अभिसरणाची पद्धत व त्यांना वाचण्याची रीत म्हणून पाहायला हवं. साहित्यकृती स्वत:च्या भाषिक आणि सांस्कृतिक चौकटीतून निघून अन्य भाषिक परंपरेत जाते तेव्हा ती विश्वसाहित्यात प्रवेश करते.

फ्रँको मोरेट्टी यांनी ‘कॉन्जेंक्चर्स ऑन वर्ल्ड लिटरेचर’ या २००० साली प्रसिद्ध झालेल्या लेखात म्हटले आहे, की जगात साहित्यकृतींचा साठा इतका प्रचंड आहे की एका माणसाला त्या सर्व कृती एका आयुष्यात वाचणं अशक्य आहे. त्यामुळे आपण सध्या साहित्य ज्या प्रकारे वाचतो त्याच प्रचलित प्रकाराने अधिकाधिक वाचणे हा उपाय भागणार नाही. वैश्विक साहित्याचा अभ्यास करण्याकरिता साहित्य वाचण्याची रीतच आमूलाग्रपणे बदलायला हवी. म्हणून विश्वसाहित्य ही अभ्यासाची वस्तू नसून एक समस्या आहे आणि या समस्येला सामोरे जाण्याकरिता साहित्य अभ्यासाच्या नव्या समीक्षात्मक पद्धती तयार करण्याची गरज आहे. इमॅन्युएल वॉलेरस्टाईन यांनी जागतिक भांडवलशाहीची एक वैश्विक प्रणाली (world system)म्हणून सद्धांतिक मांडणी केली आहे. त्याच्याच आधारे, मोरेट्टी हे विश्वसाहित्याकडे एक वैश्विक प्रणाली म्हणून पाहतात, जी एक असूनही त्यात असमानता आहे आणि या प्रणालीत केंद्र आणि परीघ असा प्रमाणबद्धतेचा अभाव आहे, असेही सुचवतात. त्यामुळे मोजक्या साहित्यकृतींचे थेट सूक्ष्म वाचन करण्याऐवजी इतर समीक्षांच्या पाठावर अवलंबून राहून (second hand reading) संपूर्ण वैश्विक प्रणालीचा अभ्यास अप्रत्यक्षपणे ‘लांबून’ करण्याची सूचना फ्रँको मोरेट्टी करतात. या प्रकारचे अप्रत्यक्ष, दुरून वाचन – डिस्टंट रीडिंग – संगणकाद्वारे अधिक सुलभ कशा प्रकारे होते ते दाखवून मोरेट्टी ‘डिजिटल ह्य़ुमॅनिटिज्’मध्ये मोलाचे योगदान देतात. याशिवाय विश्वसाहित्याच्या संकल्पनेबद्दल अधिक विस्तृत सद्धांतिक चर्चा डेव्हिड दमरोश संपादित ‘वर्ल्ड लिटरेचर इन थिअरी’ (२०१३) या पुस्तकात आली आहे.

या पाश्र्वभूमीवर हार्वर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने प्रकाशित केलेल्या आमिर मुफ्ती लिखित ‘फरगेट इंग्लिश! – ओरिएंटॅलिझम्स अ‍ॅण्ड वर्ल्ड लिटरेचर्स’ या पुस्तकाकडे पाहावे लागते.  कॅलिफोर्निया विद्यापीठात तौलनिक साहित्याचे प्राध्यापक असलेल्या मुफ्ती यांनी या पुस्तकात विश्वसाहित्य या संकल्पनेची काहीशी अपेक्षित व ठरावीक स्वरूपाची चिकित्सा केली आहे.  विश्वसाहित्याचा विचारच मुळात प्राच्यविद्यावादातून (Orientalism) आला आहे. इतकेच नव्हे, तर तौलनिक साहित्याचा विचारही प्राच्यविद्य्ोच्या विचारांतूनच आला आहे आणि याचे भान विश्वसाहित्याच्या समर्थकांनी ठेवायला हवे, असे मत मुफ्ती यांनी या पुस्तकात मांडले आहे. त्याचबरोबर वसाहतवादामुळे आणि जागतिकीकरणामुळे इंग्रजीचे धुरीणत्व (hegemony)व सत्ताकारण प्रचंड प्रमाणात वाढलेय आणि ते विश्वसाहित्य या संकल्पनेच्या केंद्रस्थानी आहे हेही विसरून चालणार नाही. याची मांडणी करण्यासाठी ते उत्तर-वसाहतवादाचा आणि प्रामुख्याने प्रख्यात विचारक एडवर्ड सद यांच्या ‘ओरिएंटॅलिझम्’चा आधार घेतात.

ओरिएंटॅलिझम् किंवा प्राच्यविद्याशाखेची एडवर्ड सद यांनी केलेली मूलभूत अशी मांडणी उत्तर-वसाहतवादात अत्यंत प्रभावी ठरली. त्यात त्यांनी – विख्यात फ्रेंच तत्त्वज्ञ मिशेल फुकोने दाखवल्याप्रमाणे ज्ञान, ज्ञाननिर्मिती करणाऱ्या संस्था आणि सत्ताकारण या भिन्न गोष्टी नसून एकमेकांत गुंतलेल्या आहेत हे गृहीत धरून- प्राच्यविद्याशाखासुद्धा कशी पाश्चिमात्य वसाहतवादी व साम्राज्यवादी सत्ताकारणातून निर्माण झालेली विचारप्रणाली, संभाषित (discourse)व विद्याशाखा आहे, हे दाखवून दिले. सैद यांची ही विचारधारा इतकी प्रभावी ठरली, की वसाहतीतले मूळ निवासीसुद्धा या विचारधारेला स्वीकारू लागले. सैद यांच्या मताला पुष्टी देणारे आपल्या जवळचे उदाहरण म्हणजे, भारतात विल्यम जोन्ससारख्या अठराव्या शतकातल्या प्राच्यविद्यातज्ज्ञाने मांडलेली भारतीय साहित्याची संस्कृतनिष्ठ व्याख्या तत्कालीन भारतीयांनीसुद्धा स्वीकारली.

या पुस्तकात मुफ्ती अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात घडलेल्या ‘ओरिएंटॅलिस्ट विरुद्ध अँग्लिसिस्ट ((Anglicist))’ या वादाची आठवण करून देतात. ओरिएंटॅलिस्ट विद्वान शिक्षणासाठी व ज्ञाननिर्मितीसाठी शास्त्रीय (क्लासिकल) भारतीय भाषांची शिफारस करत होते, तर अँग्लिसिस्ट इंग्रजी भाषा आणि त्यामुळे प्राप्त होणारे पाश्चात्त्य शैलीचे ज्ञान महत्त्वाचे मानत होते. मुफ्ती हा ओरिएंटॅलिस्ट विरुद्ध अँग्लिसिस्ट वाद मुळात वसाहतवादामुळे निर्माण झालेला विरोधाभास म्हणून पाहतात व नंतरच्या काळातही हा वाद वेगवेगळ्या स्वरूपांत आपल्यासमोर येत असल्याचे सांगतात. भारतीय इंग्रजी लेखनाकडे ते अप्रामाणिक व निराधार असल्याचा देशीवादी / राष्ट्रवादी आरोप याच वसाहतवादातून निर्माण झालेल्या ओरिएंटॅलिस्ट तार्किकतेतून येतो; परंतु मुफ्ती सांगतात त्याप्रमाणे, आधुनिक भारतीय भाषांच्या जडणघडणीत इंग्रजी आणि प्राच्यविद्येचा प्रभाव अतिशय महत्त्वाचा आहे. आजच्यागत वेगवेगळ्या स्वरूपांत विश्वसाहित्याचा अभ्यास करताना या इंग्रजीच्या हुकूमशाहीचा आणि वसाहतवादामुळे निर्माण झालेल्या ओरिएंटॅलिस्ट/ अँग्लिसिस्ट तर्काविषयीचे भान बाळगणे आवश्यक आहे, असेही ते सुचवतात. ही टीका मान्य केली तरीही विश्वसाहित्याची किंवा त्याच्या अभ्यासाची कोणतीही नवीन किंवा अधिक प्रगत पद्धत ते सुचवत नाहीत.  किंवा विश्वसाहित्याऐवजी राष्ट्रीय वा प्रादेशिक साहित्याकडे परतावे, असेही ते सुचवत नाहीत. विश्वसाहित्याच्या वर्चस्वाविरोधात राहूनही विश्वसाहित्याच्या संकल्पनेबरोबर काम करण्याचा विरोधाभासी सल्ला ते देतात. यातून अप्रत्यक्षरीत्या ते विश्वसाहित्याची अपरिहार्यताच मान्य करतात.

विश्वसाहित्याची चर्चा करताना मुफ्ती जे उत्तरवसाहतवादी विचार मांडतात ते भारतात इंग्रजीचा अभ्यास करणाऱ्यांसाठी काही नवीन नाहीत, त्यामुळे संपूर्ण पुस्तकात हेच उत्तरवसाहतवादाची पाल्हाळीक पुनरुक्ती कंटाळवाणी वाटते. त्याचबरोबर मोरेट्टी, कॅसानोवा किंवा दमरोश यांनी केलेल्या मांडणीला पूर्णपणे छेद देऊन नवीन मांडणीही करत नाहीत किंवा विश्वसाहित्याचे नवीन ‘मॉडेल’ही समोर ठेवत नाहीत. शिवाय विश्वसाहित्याच्या संकल्पनेत ज्या अडचणी आणि समस्या ते दाखवतात त्या समस्या दमरोश, मोरेट्टी, कॅसानोवा वगरे अभ्यासकांनी त्यांच्या मांडणीत आधीच मान्य केल्या आहेत व त्यांची चर्चाही केली आहे. उदाहरणार्थ, मोरेट्टी साहित्याच्या वैश्विक प्रणालींबद्दल बोलताना केंद्र व परिघाची चर्चा करतातच आणि कॅसानोवासुद्धा ‘डॉमिनन्ट’ आणि ‘डॉमिनेटेड’ साहित्याची चर्चा करतातच; त्यामुळे  विश्वसाहित्याच्या राजकारणाबद्दल हे पुस्तक फार काही नवीन सांगत नाही.

या पुस्तकात विश्वसाहित्याच्या कल्पनेला ‘problematize’ करण्याचा प्रयत्न दिसत असला तरी मोरेट्टींसारख्या अभ्यासकांनी विश्वसाहित्य ही अभ्यासाची वस्तू नसून ‘समस्या’ (problem)आहे अशीच व्याख्या केली आहे; पण या कल्पनेची वसाहतोत्तर भूमिकेतून विस्तृत चर्चा मात्र आपल्याला यात सापडते जी विश्वसाहित्याच्या अभ्यासकाला काही प्रमाणात उपयोगी पडू शकते. शिवाय जरी जागतिकीकरणाच्या काळात इंग्रजीचा प्रभाव आणि वर्चस्व मोठय़ा प्रमाणात वाढत असले तरीही आज भारतीय भाषांमधून इंग्रजीत येणारे साहित्य – उदाहरणार्थ, उदय प्रकाश यांच्या हिंदी कथांचा इंग्रजी अनुवाद – भारतीय भाषांना हीन ठरवण्यासाठी किंवा भारतीय संस्कृतीवर आधिपत्य गाजवण्यासाठी, नव-प्राच्यविद्यावादाच्या उद्देशाने येत आहे, हे म्हणणे काही योग्य वाटत नाही. त्याचबरोबर इंग्रजीचे टीकाकार इंग्रजीसाठीचा व्यवहार्य पर्याय प्रत्यक्षात आपल्या समोर ठेवताना दिसत नाहीत.

पुस्तकाची जमेची बाजू म्हणजे, सद्धांतिक समीक्षेतल्या काही सरलीकृत व सरधोपट भूमिकेची टीका. उदाहरणार्थ, बिगरइंग्रजी आधुनिक भारतीय भाषांच्या विकासात इंग्रजी व प्राच्यविद्य्ोची महत्त्वाची भूमिका असल्यामुळे भारतीय भाषांचा ‘शुद्ध व अस्सल’पणा व त्यांच्या विश्वासार्हतेबाबतचा जो दावा राष्ट्रवाद व देशीवादातून मांडला जातो आणि तशी गृहीतं वसाहतोत्तर राजकीय विचारांच्या पायाशी आहेत, त्यांच्याबद्दल फेरविचार करण्याची तातडीने गरज असल्याचे मुफ्ती सुचवतात. इतकेच नव्हे, तर विश्वसाहित्यासारख्या कल्पनेच्या केंद्रस्थानी असलेल्या महानगरी विश्वबंधुत्वाविरुद्ध (metropolitan cosmopolitanism), वैश्विक भांडवलशाहीच्या विरुद्ध, इंग्रजीच्या प्रभुत्वासमोर या राष्ट्रवादी / देशीवादी विचारांचा पराजय आधुनिक भारतीय भाषांच्या विकासात (उदाहरणार्थ, आपल्या भाषांमध्ये आधुनिक गद्याचा किंवा कथा-कादंबरीच्या स्वरूपाच्या विकासात) इंग्रजीची कळीची भूमिका असल्यामुळे झाला, असे मुफ्ती सुचवतात. आधुनिक भारतीय भाषांमधली समीक्षासुद्धा, मग ती नवसमीक्षा असो किंवा फ्रेंच-अमेरिकन सिद्धांत असोत, आपल्याकडे इंग्रजीतूनच आले आहेत, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे जागतिक भांडवल व पश्चिमेच्या सांस्कृतिक आधिपत्याची चिकित्सासुद्धा ओरिएंटॅलिस्ट तर्क व गृहीतांचाच उपयोग करताना दिसते. उदाहरण म्हणून मुफ्ती मायकेल हार्ट व अन्तोनिओ नेग्री या मार्क्‍सवादी चिंतकांची समीक्षासुद्धा ओरिएंटॅलिझम्चीच गृहीतं व तर्क वापरताना दिसते, हे दाखवतात. त्यांच्या पुस्तकातले ‘एम्पायर’ व ‘सोव्हरेन्टी’सारखे राजकीय विचारसुद्धा युरोपकेंद्री असल्याचे हार्ट व नेग्री स्वत:च कबूल करतात. त्यामुळे एकीकडे विश्वसाहित्याच्या कल्पनेतील वैश्विक भांडवलशाहीच्या संदर्भाविषयी किंवा वसाहतवादाची टीका करणे जितके गरजेचे आहे, त्याचप्रमाणे या ‘टीकांची टीका’ करण्याचीही गरज असल्याचे मुफ्ती सुचवतात.

विश्वसाहित्याच्या अभ्यासात ‘फरगेट इंग्लिश’ म्हणणे तसे सोपे आहे, पण प्रत्यक्षात तसे करणे अवघडच नव्हे तर अशक्य असल्याचे ते दाखवतात. अर्थात, हे पुस्तकही इंग्रजीतच आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही!

(विश्वसाहित्य व इंग्रजीचे वर्चस्व यांविषयी ‘ओरिएंटॅलिझम’, ‘द वर्ल्ड, द टेक्स्ट अ‍ॅण्ड द क्रिटिक’, ‘कल्चर अ‍ॅण्ड इंपीरिअ‍ॅलिझम’ ही एडवर्ड सैद यांनी  लिहिलेली  पुस्तके, तसेच एमिली अ‍ॅप्टर यांचे ‘अगेन्स्ट वर्ल्ड लिटरेचर’ आणि फेंग चिएह लिखित ‘व्हॉट इज अ वर्ल्ड?’ ही पुस्तकेही मूलभूत व सखोल मांडणी करणारी आहेत.)

  • ‘फरगेट इंग्लिश! – ओरिएंटॅलिझम्स अ‍ॅण्ड वर्ल्ड लिटरेचर्स’
  • लेखक : आमिर आर. मुफ्ती
  • प्रकाशक : हार्वर्ड युनिव्हर्सिटी प्रेस
  • पृष्ठे : २९२, किंमत : ९९५ रुपये

 

सचिन केतकर

sachinketkar@gmail.com

First Published on June 24, 2017 2:56 am

Web Title: forget english orientalisms and world literature