30 May 2020

News Flash

माजी संचालकांच्या  नजरेतून ‘द टाटाज्..’

भारतात राजकारणात आणि उद्योगात अशी मंडळी खोऱ्याने सापडतात.

‘‘दुसऱ्यांच्या चुकांवर बोट ठेवणे सोपे असते. पण आपली चूक मान्य करणे हे महाकठीण काम. चुकांची कबुली देऊन आपण आपल्यातील कमतरता, दुर्बलता मान्य करत असतो. एकदा त्या मान्य केल्या की दुर्बलतेवर काम करणे अनिवार्य ठरते. म्हणूनच चुकांचा सामना करणे भल्याभल्यांना कठीण जाते. काही चतुर मंडळींचा चुका झाकण्याकडे कल असतो. भारतात राजकारणात आणि उद्योगात अशी मंडळी खोऱ्याने सापडतात. म्हणूनच सत्तरीला आला तरी भारत विकसनशीलांकडून विकसितांच्या पंक्तीत स्थान मिळवू शकलेला नाही. आपल्या चुका झाकण्याचा हा ढोबळ मार्ग ज्यांना मान्य नाही ते मात्र इतिहास घडवतात. भारतात असा इतिहास घडविणारे औद्योगिक घराणे म्हणजे टाटांचे! नुसेरवानजी टाटांपासून रतन टाटांपर्यंत टाटा समूहाने हे तत्त्व जपले. केवळ ‘बोर्ड मीटिंग’मध्येच नव्हे तर जाहीरपणे आपल्या चुका मान्य केल्या. काही मंडळींच्या लेखी ते मूर्ख ठरले. परंतु, जनतेच्या नजरेत कपटी किंवा लुच्चे ठरण्यापेक्षा टाटांनी चुका स्वीकारण्याचे आणि आपल्यातील दुर्बलतेवर काम करण्याचे आव्हान स्वीकारले. म्हणूनच ११० बिलियन डॉलरचा हा उद्योग समूह १५० वर्षांनीही पाय रोवून उभा आहे.’’

‘टाटा सन्स’चे माजी संचालक आर. गोपालकृष्णन् यांनी मुंबईत अलीकडेच एका कार्यक्रमात टाटा समूहाच्या यशामागचे हे इंगित अधोरेखित केले. ‘द टाटाज – हाऊ अ फॅमिली बिल्ड अ बिझनेस अ‍ॅण्ड अ नेशन’ या पुस्तकाचे औपचारिक अनावरण त्यांच्याहस्ते मुंबईत झाले. संपत्तीनिर्मितीच्या पलीकडे जाऊन टाटा कुटुंबाने देशाच्या जडणघडणीत कसे योगदान दिले, याचा वेध घेणारे ‘टाटायन’ हे मराठी पुस्तक ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी लिहिले, त्याचा ‘द टाटाज..’ हा इंग्रजी अनुवाद विक्रांत पांडे यांनी केला आहे. ‘किताब खाना’मध्ये सोमवारी झालेल्या या अनावरण कार्यक्रमात,  ज्येष्ठ पत्रकार राजऋषी सिंघल तसेच विवेक कौल यांनी कुबेर यांची मुलाखत घेतली आणि १९५२ पासून टाटा समूहाशी जोडल्या गेलेल्या आर. गोपालकृष्णन यांनी टाटांविषयीच्या आपल्या आठवणी जागवल्या!

‘द टाटाज्’मध्ये ‘पहिल्या टाटां’च्या जन्मापासूनचा इतिहास आहे. उद्योगविश्वासोबतच टाटा कुटुंबाची संस्कृती, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही घटनाही या पुस्तकात उलगडल्या आहेत. कापडगिरणी, पोलादनिर्मिती, वीजनिर्मिती, रेशीम उद्योग, हॉटेल व्यवसाय अशा विविध क्षेत्रांत टाटांनी आपला दबदबा निर्माण केला. ‘उद्योग’ काय असतो याची ओळख भारतीयांना करून देतानाच ‘उद्योजक’ कसा असावा याचे आदर्श उदाहरण टाटांनी निर्माण केले. दिवाळीचा मोती साबण, महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीज या संकल्पना टाटांनी महाराष्ट्रात रुजवल्या हे कित्येकांना माहितीच नसते.. याविषयीची चर्चा कार्यक्रमात होत असताना, आर. गोपालकृष्णन् यांनी पुस्तक वाचण्याचा अनुभवही सांगितला- ‘‘मी प्रथमच पुस्तक मागील पानावरून वाचायला सुरुवात केली. कारण शेवटच्या भागाशी मी व्यक्तिश: जोडलो गेलो आहे..  एखाद्या हिंदी सिनेमात दाखवतात तसा फ्लॅशबॅक मी अनुभवला!’’.

गोपालकृष्णन् यांच्याकडून ज्या अनेक गोष्टी या कार्यक्रमात ऐकायला मिळाल्या, त्यांपैकी अनेक या पुस्तकाही नमूद आहेत. ‘‘कॉपरेरेट संस्कृती भारतात आता कुठे रुजते आहे. पण टाटामध्ये त्याकाळीही ही संस्कृती आपण अनुभवली. कोणताही उद्योग सुरू करताना त्यात देशहिताचा विचार प्रथम असायचा. ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस’ची स्थापना करताना हे समाजकार्य असल्याने त्यात आपले नाव टाटांनी येऊ  दिले नाही,’’ अशा शब्दांत टाटा समूहातील आठवणींना उजळा देतानाच आर. गोपालकृष्णन् म्हणाले- ‘‘भारतावर मंदीचे मळभ असताना ‘द टाटाज’सारखे पुस्तक प्रकाशित होणे काळाची गरज आहे.’’

‘सर्व नियम, कायदे पाळून पद्धतशीरपणे संपत्तीनिर्मिती करता येते; हे टाटांनी दाखवून दिले,’ अशा शब्दांत टाटांचे वेगळेपण अधोरेखित करणारे गिरीश कुबेर हेही, गोपालकृष्णन यांच्याशी  सहमत होते!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 9, 2019 2:49 am

Web Title: former director of tata sons r gopalakrishnan akp 94
Next Stories
1 जीवनाकाराचा स्वच्छंद शोध..
2 दक्षिण आशियाचा मित्र!
3 फेसबुकच्या मुखवटय़ामागे..
Just Now!
X