ज्याच्या आगमनाची बातमी चार महिन्यांपासून गाजत होती, ते मेलानिया ट्रम्प यांचे ‘अनधिकृत’ चरित्र अखेर डिसेंबरमध्ये बाजारात आले! मेलानिया या अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी, परंतु अध्यपत्नीने सतत अध्यक्षांसह असण्याचा अलिखित प्रघात मेलानिया पाळत नसल्याने ट्रम्प यांची विवाहित कन्या इव्हान्का अनेकदा अध्यक्षांसह असते. मेलानिया या अमेरिकी नव्हेत. त्यांचे बालपण कम्युनिस्ट अमलाखालील युगोस्लाव्हियात गेले आणि युगोस्लाव्हियात यादवी उफाळल्यानंतर आज त्यांचा मूळ देश स्लोव्हेनिया म्हणून ओळखला जातो. हे तपशील जगजाहीर असल्यामुळे मेलानिया अशा का वागतात, याबद्दल चरित्र-वाचकांमध्ये कुतूहल असणे स्वाभाविक. ते शमवण्याचा जिम्मा चरित्रलेखिका केट बेनेट यांनी पुरेपूर उचलला आहे. मेलानियांना एकटे राहणेच अधिक पसंत आहे, त्यांना समाजकार्याची आवड आहेच पण त्या अतिशय संवेदनशील आहेत, अशी बाजू मांडण्यासाठी अनेक प्रसंगांची, किश्शांची पखरण या २८८ पानी चरित्रपुस्तकात आहे. मेलानिया यांनी व्हाइट हाऊसमध्ये एका नाताळात, तांबडय़ाजर्द नाताळझाडांची सजावट केली होती. नेहमीच्या शोभिवंत ‘ख्रिसमस ट्री’सारखी न दिसता ही नाताळझाडे, कुणी तरी रक्त ओतल्यासारखी दिसत होती. त्यामागे मेलानिया यांचा करुणेचा भाव होता, असा दावा हे पुस्तक करते. एकंदरीत हे पुस्तक मेलानियांची कड घेणारे, त्यांची वकिली करण्याच्या सुरात लिहिलेले असले, तरी लेखिकेने मेलानियांची अजिबात पत्रास ठेवलेली नाही. उदाहरणार्थ, मेलानिया मितभाषी आहेत, माजी अध्यक्षपत्नींसारख्या त्या वारंवार बोलत नाहीत आणि बोलतच नसल्यामुळे वादाचे प्रसंगही आपोआपच टळतात, अशी भलामण करणारी वाक्ये लिहूनसवरून चरित्रलेखिका विचारते, ‘त्या जर बोलत असत्या, तर ती (एकदाच केव्हा तरी मिशेल ओबामांपेक्षा मेलानियांना पसंती देणारी) जनमत चाचणी आपणांस दिसली असती का’? मिशेल ओबामा आणि त्याआधीच्या हिलरी क्लिंटन या दोघीही माजी अध्यक्षपत्नी उच्चशिक्षित होत्या, तशा मेलानिया नाहीत. त्या १९९०च्या दशकात अमेरिकेत येऊन मॉडेलिंग करीत होत्या, याविषयीच्या प्रकरणात ‘त्या वेळची माझी नग्न छायाचित्रे २०१६ सालात (ट्रम्प यांचा प्रचार सुरू असताना) एका सायंदैनिकाने प्रकाशित केली, त्यामागे रॉजर स्टोन (ट्रम्प यांचे तत्कालीन राजकीय सल्लागार) यांचा हात असावा’ असे मेलानिया यांनी म्हटल्याचा उल्लेख सविस्तरपणे आहे. पण ट्रम्प यांनीच स्वत:च्या प्रसिद्धीचा विचित्र मार्ग म्हणून हे केले असावे, हा दावा मेलानिया मान्य करीत नाहीत. पुस्तकातील या अशा तपशिलांची तुलना हिलरी आणि मिशेल यांच्या आत्मचरित्रांशी केल्यास, त्या आत्मचरित्र लिहितात मग या का लिहीत नाहीत, असा प्रश्न मेलानियांबद्दल गैरलागूच ठरेल!