News Flash

अभिव्यक्तीस्वातंत्र्याची चिनी बनावट

ओशिनिया’तल्या नागरिकांच्या प्रत्येक हालचालीवर सरकारचे लक्ष आहे आणि आपणही लक्ष ठेवून आहोत

‘ओशिनिया’तल्या नागरिकांच्या प्रत्येक हालचालीवर सरकारचे लक्ष आहे आणि आपणही लक्ष ठेवून आहोत, याची सरकारकडून कुठल्याही आडपडद्याविना जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी असलेल्या इलेक्ट्रॉनिक पडद्यांवर ‘बिग ब्रदर इज वॉचिंग यू’ अशा शब्दांतील सज्जड दमवजा माहितीद्वारे नागरिकांना जाणीव करून दिली जात आहे- विसाव्या शतकाचा उत्तरार्ध अर्भकावस्थेत असताना जॉर्ज ऑर्वेलने लिहिलेल्या ‘नाइन्टीन एटीफोर’ या कादंबरीतले ‘बिग ब्रदर’चे पात्र थोडय़ा फार फरकाने जगातील सर्वच दमनकारी शासन यंत्रणांकडून बेमालूमपणे रंगवले जात आहे. चीनदेखील ‘बिग ब्रदर’च्या मुखवटय़ाआड अभिव्यक्तिस्वातंत्र्याची मुस्कटदाबी करीत असल्याच्या शक्यतेने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. ही शक्यता बळकट होण्याचे कारण म्हणजे हाँगकाँगमधील ‘मायटी करंट्स’ या पुस्तक प्रकाशनगृहाच्या पाच कर्मचाऱ्यांचे आकस्मिकरीत्या बेपत्ता होणे. चीनमधील कम्युनिस्ट राजवटीविरोधातील पुस्तके प्रकाशित करणारी ही कंपनी हाँगकाँगमधील वाचकांमध्ये भलतीच प्रिय असली, तरी चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या धुरीणांसाठी मात्र तिची प्रकाशने अमेरिकेने केलेल्या एखाद्या क्षेपणास्त्र हल्ल्याहून कमी नाहीत.
या ‘मायटी करंट्स’ प्रकाशन कंपनीकडून चीनमधील भ्रष्टाचार, नेत्यांचा बाहेरख्यालीपणा, संस्कृतीचा उपमर्द, एकचालकानुवर्तित्वातून माजलेली बजबजपुरी अशा विषयांवर भरपूर मीठमसाला चोपडलेली पुस्तके प्रकाशित होतात. त्यांची बाजारात तडाखेबंद विक्री होते. एरवी चीनमध्ये आपल्याविरोधात कुणीचीही ब्र काढायची टाप नसताना आता देशाचाच एक भाग बनलेल्या हाँगकाँगमध्ये मात्र थेट आपल्या नेसूलाच हात घातला जातो, यामुळे चिनी नेते कमालीचे तडफडत असतात. चिनी जनतेला अप्राप्य असलेले अभिव्यक्तिस्वातंत्र्य हाँगकाँगमधील जनता पुरेपूर भोगते, यापाठीमागील कारण म्हणजे पूर्वी ब्रिटिश वसाहत असलेल्या हाँगकाँगचे चीनकडे हस्तांतर होताना हाँगकाँगची स्वायत्तता जपण्यासाठी चीनने केलेला करार. हाँगकाँगमधील मुक्तवातावरणाला नख लावण्याचा प्रयत्न जरी चिनी सरकारकडून होत असला, तरी आंतरराष्ट्रीय दबावामुळे चीन उघडरीत्या कुठलीही पावले उचलू शकत नाही. त्यामुळेच देशांतर्गत बजबजपुरी वेशीवर टांगणाऱ्या प्रकाशन संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या बेपत्ता होण्यामुळे संशयाचा काटा वळला तो चीनकडे.
‘मायटी करंट्स’ने चीनचे अध्यक्ष शी जिनिपग यांच्या बाहेरख्यालीपणाचा इतिहास मांडणाऱ्या एका पुस्तकाच्या प्रकाशनाची तयारी चालविली आहे. तत्पूर्वीही चिनी राष्ट्राध्यक्षांची कम्युनिस्ट पक्षातली ताकद अस्तंगत झाली असून भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष जियांग झेमिन व हू जिंताओ त्यांना पायउतार करण्याच्या प्रयत्नात आहेत, अशी मांडणी करणाऱ्या एका पुस्तकाची हातोहात विक्री झाली होती. त्या पाश्र्वभूमीवर या प्रकाशन संस्थेचे चार कर्मचारी मागील ऑक्टोबरमध्ये गायब झाले. त्यापकी लु बो, झँग जििपग आणि लिन रोंगजी यांचा अद्यापही ठावठिकाणा लागू शकलेला नाही. तर, चौथा गुई मिन्हाई हा थायलंडमध्ये सुटीचा आनंद लुटत असतानाच गायब झाला. तो या प्रकाशन संस्थेचा मालकही आहे. मागील रविवारी तो चिनी वृत्तवाहिनीवर २००३ मध्ये मद्य प्राशन करून गाडी चालविताना आपल्या हातून घडलेला गुन्हा कबूल करताना लोकांना दिसला. तो थायलंडमधून चीनमध्ये कसा आला, याबाबत तर्क-वितर्क सुरू आहेत. त्याला चिनी पोलिसांनी अटक केली असावी, असा अंदाज आहे. पण, त्याची अद्याप खातरजमा झालेली नाही. त्याच्या कुटुंबीयांना मात्र त्याने असा कुठला गुन्हा केला असावा, याबाबत अविश्वास आहे. त्याच्याकडून दबावापोटी हे सारे वदवून घेण्यात आल्याचे त्याच्या मुलीचे म्हणणे आहे. आणखी एक ली बो नामक पुस्तक विक्रेता डिसेंबरच्या अखेरीस असाच गूढरीत्या बेपत्ता झाला. बंदी असलेली पुस्तके विकण्यासाठी तो प्रसिद्ध होता. तो चीनमध्ये असून त्याने आपल्याशी संपर्क साधल्याचे त्याच्या पत्नीने सांगितले. त्याची शोधाशोध सुरू असतानाच चिनी अधिकाऱ्यांनीही तो चीनमध्येच असल्याचे सांगत तिच्या म्हणण्याला दुजोरा दिला. परंतु, त्याच्याही बाबतीत तो आपणहून चीनमध्ये गेला की चिनी अधिकाऱ्यांनी त्याला तिथे नेले, या संदर्भात संदिग्धता आहे.
अशा पद्धतीने रहस्यमयरीत्या पुस्तक विक्रेत्यांच्या गायब होण्यामुळे हाँगकाँगमधील जनता कमालीची अस्वस्थ आहे. चीनकडून आपल्या स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचे प्रयत्न सुरू झाल्याची भावना त्यांच्या मनात आणखीनच बळकट होऊ लागली आहे. यापूर्वी चीनने हाँगकाँगमध्ये २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुका मुक्त वातावरणात घेण्याचे आश्वासन दिले होते, पण नंतर ते फिरवत ते आपल्याच नियंत्रणाखाली होईल, अशी मेख मारून ठेवली. त्याविरोधात हाँगकाँगच्या जनतेने मोठाच आक्रोश केला, पण त्याकडे चिनी राज्यकर्त्यांनी ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे जात्यात भरडल्या जाणाऱ्या चिनी नागरिकांच्या दुर्दशेकडे पाहत आपण सुपात असल्याच्या भावनेने हाँगकाँगच्या जनतेच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे. हे प्रकरण धसाला लावणाऱ्या पत्रकारांनी राबविलेल्या शोधमोहिमेत संशयाची सुई चिनी शासन यंत्रणेकडे जात असल्याचे समोर आले आहे. पण, चिनी सरकारने या साऱ्या शक्यता फेटाळून लावत आपला चेहरा निर्वकिार ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
इतका की, ‘मी माझ्याच गुन्ह्याची कबुली देण्यासाठी इथे (चीनमध्ये) स्वेच्छेने आलो आहे.. निंग्बो शहरात २३ वर्षांच्या तरुणीचा मृत्यू माझ्या गाडीने उडवल्यामुळे (२००३ च्या डिसेंबरात) झाला होता’ अशी कबुली ‘मायटी करंट मीडिया’ कंपनीचे मालक गुई मिन्हाई देत आहेत, असे चिनी चित्रवाणीवरून गेल्याच रविवारी प्रसारित झाले. यावर त्यांच्या कन्येने हाँगकाँगच्या पत्रकारांशी बोलताना जोरदार आक्षेप घेतला असून माझ्या वडिलांकडून खोटी कबुली वदवून घेतली जात आहे, असे तिचे म्हणणे आहे. त्याच वेळी, अन्य बेपत्ता प्रकाशन-कर्मीदेखील ‘मी माझ्या इच्छेनेच चीनमध्ये आलो’ असे म्हणू लागल्याने संशय वाढलाच आहे.
हाँगकाँगची जनता मात्र आपल्या स्वातंत्र्याचा संकोच होण्याची प्रक्रिया अधिक गतिमान झाल्याचे प्रतीक म्हणून या गूढभारित अपहरणनाटय़ाकडे पाहू लागली आहे. आक्रमक होऊ पाहणाऱ्या हुकूमशाहीचे पहिले नख लागते ते बुद्धिवाद्यांनाच. त्यातूनच पत्रकार-विचारवंत-प्रकाशक-विरोधक हवेत नाहीसे झाल्यासारखे गायब होऊ लागतात. समजा, गायब करणे सोपे नसेल, तर त्यांचे पूर्णत: चारित्र्यहनन करायचे, त्यांच्यावर बलात्कार, खून, क्षुल्लक लोभापायी अपहार यांसारखे अवमानकारक आरोप ठेवायचे, ही पद्धतही हुकूमशाहीचीच. ‘क्रांतीच्या मोठय़ा वावटळीत मानवी जीवनाची किंमत क्षुल्लक आहे,’ असे मानणाऱ्या माओची परंपरा सांगणारे आताचे चिनी राज्यकत्रेदेखील आपल्या वर्चस्वाची पोलादी मांड ढिली होऊ नये, यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. हाँगकाँगची जनताच काय, जगाच्या पाठीवरील कुठल्याही सुसंस्कृत नागरिकाच्या कानात दडून राहिलेले तियानमेन चौकातल्या रणगाडय़ांचे आवाज अद्याप पुसट झालेले नाहीत.
एकापाठोपाठ पाच प्रकाशक- ग्रंथविक्रेते बेपत्ता झाल्यावर, गेल्या अडीच महिन्यांत हाँगकाँगमध्ये निदर्शने अनेकदा झाली; परंतु छायाचित्रकार रिंगो चिउ (झुमा प्रेस/ कॉर्बिस) यांनी टिपलेल्या या छायाचित्रातील फलक इंग्रजीत असल्याने पाश्चात्त्य प्रसारमाध्यमांत ते वापरले गेले

अजित वायकर
ajit.waykar@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2016 3:37 am

Web Title: freedom of expression in china
Next Stories
1 बुकबातमी : हिंसेचा पुनशरेध घेताना..
2 दोषांबद्दल ‘खामोश’
3 बातमीपासून, पुस्तकापर्यंत.. ; पाकिस्तानचे कोडे
Just Now!
X