शशी धर्माधिकारी

जाँ-मारी द ब्यूकोर् हे दुसऱ्या महायुद्धातले फ्रेंच सैनिक. त्या युद्धादरम्यान त्यांची भेट मराठी सैनिकांशी झाली. त्यांच्यामुळे शिवइतिहासाचा परिचय झालेल्या जाँ-मारी यांनी अभ्यासपूर्वक शिवाजी महाराजांचे चरित्र लिहिले. या जाँ-मारी यांच्याविषयी..

madhurimaraje chhatrapati
प्रचाराच्या धकाधकीत मधुरिमाराजे छत्रपतींनी क्रिकेटचा घेतला आस्वाद; संभाजीराजेंनी मारली नदीत डुबकी
virendra mandlik criticizes shahu chhatrapati s family
छत्रपती कुटुंबाने राजर्षी शाहू महाराजांच्या नावाला साजेसे काम केले नाही; मंडलिक घराण्याची पुन्हा एकदा टीका
Aurangzeb had changed the name of Pune to 'Muhiabad' after chatrapati shivaji maharaj death
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबानं पुण्याला दिलं होतं ‘हे’ नाव; जाणून घ्या इतिहास
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती

जाँ-मारी द ब्यूकोर् यांनी २००३ साली छत्रपती शिवाजी महाराजांवर फ्रेंच भाषेत एक सुंदर पुस्तक लिहिले आहे. आता वयाच्या नव्वदीत पोहोचलेल्या जाँ-मारी यांना  दिसू कमी लागले असले, तरी त्यांची स्मरणशक्ती अजूनही तल्लख आहे. अलीकडेच त्यांच्याशी गप्पा मारण्याची मला संधी मिळाली.

जाँ-मारी हे दुसऱ्या महायुद्धातले फ्रेंच सैनिक. १९४२ साली बेंगाझी या लिबियामधील गावाजवळ ते युद्धआघाडीवर होते. त्यांच्या तुकडीत ब्रिटनमधील फ्रेंच सैनिक होते. उजव्या बाजूला चार डिव्हिजनची मराठा पलटण होती. दिवसभर सर्वजण लढाईच्या कामात गर्क, विशेषत: मराठी सैनिक शिस्तीमध्ये आपापल्या कार्यात मग्न असायचे आणि संध्याकाळी एकत्र येऊन चटणी-भाकरी एकत्र बसून शांतपणे खात असत. जाँ-मारी आणि या मराठी सैनिकांची मैत्री जमली. त्यांना या सैनिकांकडून शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची माहिती मिळाली. शिवाजी महाराजांचा फक्त इतिहास नव्हे, तर त्यांचे पोवाडेही मराठी सैनिकांनी गाऊन दाखवले. त्या वेळेपासून जीन-मारी यांना शिवाजी महाराजांबद्दल आणि मराठी लोकांबद्दल आदर वाटू लागला.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जाँ-मारी हे महाराष्ट्रात आले आणि त्यांनी शिवाजी महाराजांच्या बहुतेक सर्व गडांना भेट देऊन अभ्यास केला. परतल्यानंतर १०० पेक्षा जास्त ऐतिहासिक पुस्तकांचा अभ्यास करून त्यांनी शिवाजी महाराजांवर हे पुस्तक लिहिले. त्यांची खूप इच्छा होती की, या पुस्तकात शिवाजी महाराजांचा सविस्तर इतिहास लिहावा. परंतु प्रकाशकांनी पुस्तकाची किंमत जास्त वाढू नये म्हणून ४०० पृष्ठांचीच परवानगी दिली. मात्र, या पुस्तकाचे कोणी मराठीत भाषांतर केले तर त्याचा फायदा इतिहासप्रेमी व अभ्यासकांना होऊ शकतो.

जाँ-मारी यांच्या मते, आजवर कोणी फ्रेंच माणसाने शिवरायांवर खोल अभ्यास केलेला नाही. त्या वेळी जे फ्रेंच भारतात आले, त्यांनी फक्त व्यवहारांविषयकच शिवाजी महाराजांबद्दल लिहिले आहे. मी त्यांना म्हटले, ‘‘मला तुमच्या पुस्तकात दोन गोष्टी कमी वाटतात. एक तर तुम्ही शिवाजी महाराजांचे जन्मसाल १६२७ असे लिहिले आहे, पण ते खरे १६३० असे आहे. हे इतिहासकारांनी सिद्ध करून दाखवले आहे. दुसरे म्हणजे, तुमच्या पुस्तकात फक्त एकच गिमे संग्रहामधील चित्र आहे. पण फ्रान्समध्ये शिवकाळातील तीन चित्रे आहेत आणि इतर युरोपीय संग्रहालयांमध्येही बरीचशी चित्रे आहेत.’’

यावर त्यांनी उत्तर दिले की, ‘‘एक तर मी पुस्तक लिहीत असताना बहुतांश इंग्रजी पुस्तकांचा संदर्भ घेतला होता. त्या पुस्तकांत शिवाजी महाराजांचे जन्मसाल १६२७ असे नोंदवले होते. नंतर मला कळाले की, खरे जन्मसाल १६३० हे आहे. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर सोपे आहे. मला त्या वेळी शिवाजी महाराजांच्या चित्रांची जास्त माहिती नव्हती. तुमच्याकडून आज मला कळाले की, त्यांची त्या वेळची चित्रे आज पाहावयास मिळतात.’’

जाँ-मारी हे इतिहासाचा अजूनही अभ्यास करीत आहेत. ते सध्या दुसऱ्या महायुद्धावर पुस्तक लिहीत असून भारतातील मुघल कालखंडावरही एक पुस्तक लिहावे, अशी त्यांची इच्छा आहे.

shashidharma1975@gmail.com