महाराष्ट्र-अभ्यासाचा आढावा घेणाऱ्या मालिकेतील हा तिसरा लेख.. स्वातंत्र्यपूर्व काळातील मराठी मनोरंजन विश्वाचा लिंगभावी दृष्टीनं ऐतिहासिक वेध घेणाऱ्या विदुषी डॉ. मीरा कोसंबी लिखित पुस्तकाची ओळख करून देणारा..

महाराष्ट्राच्या वैचारिक इतिहासात कोसंबी घराण्याचं योगदान अतिशय लक्षणीय असूनही तुलनेनं दुर्लक्षित राहिलंय. महाराष्ट्रातल्या आंबेडकरपूर्व बौद्धधर्माच्या उत्थानाला आणि पालीभाषेच्या अभ्यासाला चालना देणारे आणि त्यासाठी अख्खं भारतीय उपखंड पालथं घालणारे धर्मानंद दामोदर कोसंबी. नाणकशास्त्र, गणित, सांख्यिकी आणि प्राचीन इतिहास अशा अनेक विषयांत मूलभूत संशोधन करणारे त्यांचे जगद्विख्यात पुत्र डी. डी. ऊर्फ दामोदर धर्मानंद कोसंबी. आणि तिसऱ्या पिढीतल्या, डीडींची धाकटी कन्या सुप्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ मीरा कोसंबी. १८७६ साली जन्मलेले धर्मानंद ते २०१५ साली निवर्तलेल्या मीराबाई अशा सुमारे सव्वाशे वर्षांच्या कोसंबी घराण्याच्या इतिहासाचा, पत्रव्यवहारांचा, विविध क्षेत्रांतल्या त्यांच्या वैचारिक योगदानांचा तपशीलवार शोध घेतला, तर महाराष्ट्राच्या वैचारिक इतिहासावर आणि महाराष्ट्र-गोवा अनुबंधावर निश्चितच नवीन प्रकाश पडेल. (कर्वे घराण्यासंदर्भात असं काहीसं काम ‘महर्षी ते गौरी’ या पुस्तकातून मंगला आठलेकरांनी केलेलं आहे.)

Understanding the scope and depth of Creative Design and how to pursue a career in it
डिझाईन रंग-अंतरं:ग ‘डिझाईन’ कसं बदलतंय तुमचं जग..!
shree ram mandir
१२वीच्या पुस्तकातून बाबरी पतनाचा उल्लेख गायब…
talathi bharti
तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन

मीराबाईंनी महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासावर अनेक पुस्तकं लिहिली. पंडिता रमाबाईंवरची तीन पुस्तकं; धर्मानंद कोसंबींच्या निवडक साहित्याचा इंग्रजी अनुवाद; ‘क्रॉसिंग थ्रेश्होल्ड्स’ या नावाचं स्त्रीवादी दृष्टीनं लिहिलेल्या महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासावरच्या लेखांचं पुस्तक; सहा महत्त्वाच्या मराठी स्त्रीलेखिकांच्या निवडक साहित्याचा अनुवाद आणि त्यावरचं दीर्घ भाष्य असणारं पुस्तक; महात्मा गांधी आणि प्रेमा कंटक यांच्यातला पत्रव्यवहार आणि कंटकांचं एकूण वाङ्मयीन आणि वैचारिक साहित्य याविषयीचं एक पुस्तक- असा मीराबाईंच्या कामाचा मोठा परीघ दिसतो. आपण आजच्या लेखात ज्या पुस्तकाची ओळख करून घेऊ  ते त्यांच्या शेवटच्या काही पुस्तकांपैकी एक. हे पुस्तक स्वातंत्र्यपूर्व काळातल्या मराठी नाटक आणि सिनेमाचा सामाजिक इतिहासाच्या अंगाने वेध घेतं आणि लिंगभावी दृष्टीनं कलाविष्कार आणि मराठी संस्कृतीतल्या सत्तासंबंधांची चिकित्सा करतं. ते पुस्तक आहे- ‘जेन्डर, कल्चर अ‍ॅण्ड परफॉर्मन्स : मराठी थिएटर अ‍ॅण्ड सिनेमा बीफोर इंडिपेंडन्स’.

लिंगभाव म्हणजे ‘जेन्डर’. लिंग ही संज्ञा स्त्री किंवा पुरुष या अर्थी निव्वळ शरीरशास्त्रीय ‘सेक्स’ दर्शवते, तर लिंगभाव या संज्ञेतून समाज मुलांना सांस्कृतिक अर्थानं स्त्री किंवा पुरुष म्हणून घडवतो, असं सूचित केलं जातं. स्त्रीनं अमुक वागायचं, अमुक कपडे वापरायचे, पुरुष अमुक असला पाहिजे, वगैरे. थोडक्यात, म्हणजे एखाद्याचं स्त्री किंवा पुरुष असणं ही सामाजिक, सांस्कृतिक निर्मिती असते. गेल्या काही दशकांमध्ये सामाजिक शास्त्रांत स्त्री-अभ्यास वा लिंगभावी दृष्टीनं केल्या जाणाऱ्या अभ्यासाला विशेष महत्त्व आलेलं आहे. मीरा कोसंबींचं पुस्तक मराठी नाटक किंवा सिनेमाचा केवळ कालानुक्रमे मांडलेला इतिहास नसून, व्यापक अशा मनोरंजनाच्या सार्वजनिक रचनांचा आणि त्यातल्या लिंगभावी सत्तासंबंधांचा मराठी स्त्रीजीवनाच्या संदर्भात केलेला अभ्यास आहे.

१८४३ साली विष्णुदास भावेंच्या पौराणिक नाटकांपासून सुरू झालेला मराठी नाटकांचा प्रवाह साधारणपणे १८८० ते १९३० या किर्लोस्कर, देवल आणि खाडिलकरांच्या ‘संगीत रंगभूमी’च्या काळात लोकप्रियतेचं शिखर काबीज करतो. १९३० आणि ४० च्या दशकात आधी ‘नाटय़मन्वंतर’ आणि पुढे ‘नाटय़निकेतन’मुळे वास्तववादी भूमिकेतून नाटकाची पुनर्रचना होऊ  लागते. मात्र हे नाटक १९३० नंतर विभक्त कुटुंबसंस्था आणि स्त्रियांचं नव्यानं सुरू झालेलं अर्थार्जन यांमुळे मध्यमवर्गीय जीवनात आलेल्या नैतिक ताणांना चुकवीत जून्या मूल्यांशी सुसंगत राहण्याच्या प्रयत्नात अधिकच रंजनप्रधान बनू लागतं. १९१३ साली आलेल्या ‘राजा हरिश्चंद्र’ या दादासाहेब फाळकेकृत मूकपटापासून मनोरंजनाचं नवं क्षेत्र खुलं होतं, त्याचाही ‘प्रभात’पर्यंतचा इतिहास कोसंबी मांडतात. हा सामाजिक इतिहास दीर्घ अभ्यासातून सिद्ध झाला आहे, याचे पानोपानी येणारेअफाट संदर्भ साक्ष देतात. चरित्रे, आत्मचरित्रे, नाटके, इतिहास, नाटय़समीक्षा, वर्तमानपत्रे, नियतकालिके अशा बहुविध संदर्भग्रंथांची यादी २५० च्या पुढे जाते.

नाटकाचा एकूण मराठी समाजावरचा परिणाम विलक्षणच होता. दुर्गा खोटे आपल्या आत्मचरित्रात म्हणतात तसं, विसावं शतक उजाडताना सामान्य मराठी माणसाच्या हाडीमासी नाटक आणि रक्तात राजकारण खेळत होतं. या नाटकवेडाची दुसरीही बाजू कोसंबी उजेडात आणतात. ‘इंदुप्रकाश’मध्ये १८८१ साली प्रसिद्ध झालेल्या एका स्फुटात ‘नाटकशत्रू’ नावानं लिहिणाऱ्या एका लेखकानं वैतागून लिहिलं होतं, ‘सध्या पुण्यातली मौजेची गोष्ट म्हणजे ज्याला प्रसिद्ध किंवा संभावित व्हायचंय तो नाटकात शिरताना दिसतो. पुण्यात हल्ली प्रतिष्ठित कोण? तर नट. महान कोण? तर नट. विद्वान कोण? तर नट. ज्यांना आजवर संभावित लोकांनी जवळ उभं केलं नाही ते आज देवच होऊन बसलेत..’ तर, नाटकाची अशी सगळ्या समाजाला झिंग चढली होती आणि त्यातून सामाजिक अभिसरणाच्या जुन्या नियमांना धक्के बसू लागले होते.

नाटकपूर्व मनोरंजनाचे विविध प्रकार – कीर्तन, भारूड, गोंधळ, लळीत, दशावतारी मंडळी, बहुरूपी, शाहिरी, तमाशा, लावणी, लाकडी बाहुल्यांचे खेळ, इत्यादी – नाटकाने काही प्रमाणात सामावून घेतले तरीही इंग्रजी कालखंडात विकसित झालेल्या या कलेवरचा मुख्य प्रभाव संस्कृत आणि इंग्रजी अशा दोन्ही मार्गी प्रवाहांचा होता. एका बाजूला नवमध्यमवर्गाच्या सांस्कृतिक संकल्पनांना घडवत आणि दुसरीकडे त्यांच्या जात-वर्गीय आणि पुरुषसत्ताक मर्यादांच्या चौकटीत स्वत:ला बांधून घेत मराठी नाटक घडत गेलं. मीरा कोसंबी मराठी मनोरंजनाच्या या ब्राह्मणी, मध्यमवर्गीय आणि पुरुषसत्ताक मर्यादा नीटपणे उलगडून दाखवतात.

नाटकाच्या भाषेत सांगायचं तर या पुस्तकात एकूण १४ प्रवेश (प्रकरणं) आणि पाच अंक (भाग) आहेत. पहिल्या अंकात एकूण चार प्रवेशांत विष्णुदास भावेंच्या पौराणिक नाटकांपासून १९३० नंतरच्या वास्तववादी नाटकांपर्यंतचा इतिहास नोंदवला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात राजेरजवाडय़ांच्या मनोरंजनासाठी केलेल्या बांधणीतून मोकळं होऊन नाटक लोकाभिमुख होऊ लागतं. नंतरच्या, म्हणजे संगीत रंगभूमीच्या टप्प्यावर नाटकाने केवळ महाराष्ट्रच काबीज केला नाही तर ज्याला पूर्वी बृहद् महाराष्ट्र म्हणत – म्हणजे मामा वरेरकरांच्या भाषेत ग्वाल्हेरपासून गदगपर्यंतच्या सांस्कृतिक महाराष्ट्रात नाटक पोहोचलं. त्यातून मराठी भाषेचा सांस्कृतिक प्रभावसुद्धा प्रकटला. कन्नड भाषिकांना मराठी आपल्याला गिळंकृत करेल अशी शंकायुक्त भीती वाटावी इतपत मराठीचा सांस्कृतिक प्रभाव या काळात पडला होता आणि त्यात नाटककलेचा फार मोठा वाटा होता. गिरीश कार्नाडांच्या आत्मचरित्रात (‘खेळता खेळता आयुष्य’, अनु.- उमा कुलकर्णी, राजहंस प्रकाशन) किंवा डी. आर. नागराजांच्या लिखाणात मराठीच्या सांस्कृतिक प्रभावाचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. या पुढच्या टप्प्यावर एका बाजूला नाटकाची रचना अधिक बांधेसूद आणि तंत्रशुद्ध झाली, तर दुसऱ्या बाजूला महायुद्धोत्तर काळात संकुचित होत चाललेल्या मध्यमवर्गीय जीवनाच्या नैतिक अवकाशात नाटकाचासुद्धा कमी-अधिक संकोच होत गेला.

पुस्तकाच्या दुसऱ्या अंकात तीन प्रवेशांत या संगीत रंगभूमीवरची निरनिराळी वळणं तपासत देवल, कोल्हटकर, गडकरी आणि खाडिलकर अशा महत्त्वाच्या किर्लोस्करी प्रभावातल्या नाटककारांची आणि यानंतरचे मामा वरेरकर, वामन गोपाळ जोशी आणि वि. दा. सावरकर यांच्या राजकीय नाटकांचीही चर्चा कोसंबी करतात.

तर तिसऱ्या अंकात दोन प्रवेशांत ‘किर्लोस्कर’, ‘गंधर्व’, ‘बळवंत’, ‘ललितकलादर्श’ अशा निरनिराळ्या नाटक कंपन्या, त्यांची आर्थिक उलाढाल, खासगी आयुष्यातली ओढाताण, त्यांचे टिळक-गांधींशी असलेले राजकीय लागेबांधे आणि मनोरंजनाच्या सतत बदलत्या अस्थिर विश्वाचं चित्र कोसंबी रेखाटतात. नाटय़विश्वाचं अंतरंग या क्षेत्रातल्या मंडळींच्या – चापेकर, बेडेकर, वरेरकर- आत्मचरित्रं किंवा आठवणींच्या आधारे उलगडत जातं. याखेरीज नाटकाला निव्वळ संहितेच्या स्वरूपात न पाहता रंगमंचीय आविष्कार या स्वरूपात पाहण्याचा कोसंबींचा प्रयत्न असल्यामुळे, ही नाटकं जिथे होत असत त्या सांस्कृतिक भूगोलाचाही त्या शोध घेतात. १९११ साली मुंबईत १० आणि बृहन्महाराष्ट्रात ५८ थिएटर्स असल्याचं नमूद करून, मुंबईतल्या संभावित मराठी आणि गुजराती भाषिक वस्त्यांच्या सीमांवर, ग्रांट रोड भागात वेश्यावस्ती आणि थिएटर्स एकत्र नांदत असत त्या अर्थी प्रतिष्ठित समाजानं नाटक आणि वेश्यावस्ती यांच्यासारख्या अनैतिक प्रकारांना एक भौगोलिक कुंपण घालण्याचा हा प्रयत्न केल्याचं, त्या सांगतात. (वेश्यांचा नाटकाशी असलेला अधिक गुंतागुंतीचा संबंध मात्र त्या उलगडत नाहीत. मकरंद साठेंच्या ‘मराठी रंगभूमीच्या तीस रात्री’ (प्रकाशक- पॉप्युलर प्रकाशन) या तीन खंडी इतिहासग्रंथात या संदर्भात बरीच माहिती आहे. विशेषत: बेळगावात एकांबा नावाच्या वेश्येने स्थापन केलेल्या ‘बेळगाव स्त्री संगीत नाटक मंडळी’ची चर्चा अतिशय रोचक आहे. शिवाय नाटकाचे प्रेक्षक म्हणून वेश्यांसाठी निराळा दर आकारण्यात येई.)

पुस्तकातील चौथा अंक हा नाटकात स्त्रियांच्या प्रवेशाने सुरू होतो. हिराबाई पेडणेकर, गिरिजाबाई केळकर, सोनाबाई केरकर, काशीबाई फडके अशा काहीशा बाळबोध नाटय़लेखिका स्त्रीवादी नसूनही त्यांना पुरुष नाटककारांच्या तुलनेनं स्त्रियांची वेदना किती स्वछ दिसत होती, हे कोसंबी दाखवतात. हिराबाई बडोदेकर आणि जोत्स्ना भोळे या अभिनेत्री नाटय़व्यवसायात येऊन स्त्री-पात्रांची भूमिका करू लागल्यावरसुद्धा बालगंधर्वानी निर्माण केलेला स्त्रीसौंदर्याचा आणि आकर्षकतेचा आदर्श पुसायला त्यांना किती प्रयत्न करावे लागले याची खुमासदार चर्चाही त्या करतात. महाराष्ट्रीय मध्यमवर्गातल्या स्त्री-पुरुषांमधला सार्वजनिक अवकाश किती दडपला गेला होता आणि एकूणच भद्र समाज लैंगिकतेबद्दलच्या नैतिक काळजीने किती काळवंडून गेला होता हे या चर्चेतून नीट दिसतं. बालगंधर्वाच्या स्त्री-पात्री भूमिकांमधून कुलीन स्त्रियांना शारीरिक हावभाव आणि नटणं-मुरडणं शिकवण्यापासून ते नव्या विभक्त कौटुंबिकतेत पुरुषप्रधान मानसिकता टिकवण्यासाठीची जुनाट नैतिकता बिंबवण्यापर्यंत प्रेक्षकशरण मराठी नाटक सुखनैव नांदत होतं.

मराठी नाटक आणि सिनेमाने ‘सर्वसामान्य’ स्त्री, ‘आदर्श’ स्त्री आणि ‘आधुनिक’ स्त्री या प्रतिमा निर्माण केल्या. ‘खऱ्या’ स्त्रीच्या वैयक्तिक जगण्याशी या प्रतिमांचा कसा संघर्ष झाला ते पुस्तकातील पाचव्या अंकात कोसंबींनी कमलाबाई गोखले, नलिनी तर्खड, दुर्गा खोटे, हंसा वाडकर, शांता आपटे, शांता हुबळीकर, लीला चिटणीस आणि स्नेहप्रभा प्रधान अशा अनेक अभिनेत्रींच्या आत्मचरित्रांच्या वाचनातून उलगडून दाखवलं आहे. हे वाचन फार त्रोटक स्वरूपाचं झालंय, मात्र तरीही या आत्मनिवेदनांतून मनोरंजन विश्वातल्या स्त्रियांच्या गडद वेदना बोलक्या होतात.

माझ्या दृष्टीनं या अतिशय उत्तम पुस्तकातली मुख्य उणीव म्हणजे जातवास्तवाच्या धगीचा नाटकव्यवहाराशी असलेला संबंध जवळपास संपूर्णपणे दुर्लक्षित राहतो. सत्यशोधकी जलसे, ब्राह्मणी किंवा ब्राह्मणेतर मेळे, आंबेडकरी कवनं किंवा अगदी प्रबोधनकार ठाकरेंचं ‘खरा ब्राह्मण’सारखं नाटक अशा कित्येक आविष्कारांमधून जात आणि लिंगभाव यांचे परस्पर जोडलेले जे पीळ दिसतात आणि त्यातून तत्कालीन महाराष्ट्रीय समाजातली जी खळबळ व्यक्त होते, तिचाही या नाटय़विश्वावर परिणाम झाला. नाटकांचे प्रेक्षक कुठल्या भूमिकांना कसा प्रतिसाद देतात यावरून पाणिनीच्या १.४.१ या सूत्रावर भाष्य करताना पतंजली भारतीय भूगोलाची ‘ब्राह्मणी देश’ (अवृषलको देश:) आणि ‘अब्राह्मणी देश’ (अब्राह्मणको देश:) अशी विभागणी करत असल्याचं कॉ. शरद् पाटलांनी ‘जातीव्यवस्थाक सामंती सेवकत्व’ या पुस्तकात दाखवून दिलंय. एकूणच नाटक व्यवहार – नाटककार, नाटकाचा आशय आणि आकृतिबंध, नट, नटय़ा, नाटकाचा भूगोल आणि त्याचा प्रेक्षक- हा कायमच जातिव्यवस्थेशी जैविकदृष्टय़ा जोडलेला होता. त्यामुळे नाटय़विश्वातल्या वर्ग आणि लिंगभावाची चर्चा जातीय संदर्भ सोडून अपूर्णच राहते. खेरीज, दोन महायुद्धांदरम्यानच्या महाराष्ट्रात काहीशा संकुचित व्यक्तिवादी, स्वच्छंदतावादी आणि सुखवादी मूल्यांचा विकास झाला, ज्याचं बहुमुखी प्रतिबिंब ना. सी. फडकेंच्या गुलछबू कादंबऱ्यांपासून आणि नवमतवादी चर्चापासून ते मालती बेडेकरांच्या ‘बाबांचा संसार माझा कसा होणार?’ या कथेपर्यंत अनेक ठिकाणी दिसतं. त्यातून निर्माण झालेली लैंगिकतेसंदर्भातली नैतिक अस्वस्थतासुद्धा स्पष्ट दिसते. या सगळ्या साहित्यिक व्यवहाराला मनोरंजन विश्वातल्या लैंगिक सत्तासंबंधांशी जोडून पाहिल्यानं कदाचित आपल्याला आधुनिक महाराष्ट्रीय मध्यमवर्गीय रसिकतेच्या अंगभूत मर्यादांचं योग्य आकलन होऊ  शकेल.

मराठी नाटकाच्या इतिहासावर इंग्रजीत शांता गोखल्यांचं एक उत्तम पुस्तक होतंच; त्यात मीरा कोसंबींच्या या अतिशय चिकित्सक आणि तितक्याच रंजक पुस्तकाची भर पडली आहे.

‘जेन्डर, कल्चर अ‍ॅण्ड परफॉर्मन्स : मराठी थिएटर अ‍ॅण्ड सिनेमा बीफोर इंडिपेंडन्स’

लेखिका : मीरा कोसंबी

प्रकाशक :  रूटलेज, नवी दिल्ली

पृष्ठे : ४१२, किंमत : ९९५ रुपये 

राहुल सरवटे rahul.sarwate@gmail.com