डॉ. मनोज पाथरकर

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात प्रसिद्ध ब्रिटिश विनोदी लेखक पी. जी. वुडहाऊसने केलेल्या बर्लिन रेडिओवरील कार्यक्रमांनी मोठाच वादंग निर्माण झाला. पु. ल. देशपांडे यांनी ‘मैत्र’ या त्यांच्या लेखसंग्रहातील एका हृद्य लेखात याबद्दल विस्ताराने लिहिलेले आहे. जॉर्ज ऑर्वेलने आपल्या परखड शैलीत ‘इन डीफेन्स ऑफ पी. जी. वुडहाऊस’ (१९४५) या लेखात उकललेला या प्रचारप्रयोगातील गुंता..

१९४० च्या मे महिन्यात जर्मनांच्या हाती लागल्यावर पी. जी. वुडहाऊस उद्गारला, ‘‘आता मला गंभीर पुस्तक लिहावेच लागेल!’’ सुरुवातीला घरातच आणि नंतर छावणीत स्थानबद्धतेत ठेवलेल्या वुडहाऊसला मैत्रीपूर्ण वागणूक देण्यात आली असावी. वर्षभराने तेथून मुक्त झाल्यावर बर्लिनमधले एक हॉटेल त्याचे तात्पुरते निवासस्थान झाले. त्यानंतर काहीच दिवसांनी त्याने बर्लिन रेडिओवर कार्यक्रम करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. जेमतेम पाच कार्यक्रमांनंतर जर्मनांनी हे प्रक्षेपण गुंडाळले (त्याची भाषणे त्यांच्या पसंतीला उतरली नसावीत!). स्थानबद्धतेतील अनुभवांवर बेतलेल्या या प्रक्षेपणांत राजकीय विधाने अपवादानेच होती : ‘राजकारणात मला कधीच रस नव्हता. एखाद्या देशाबरोबर युद्ध करण्याची भावना मनात येण्याआधीच मला त्या देशाचा एखादा भला माणूस भेटतो आणि युद्ध करण्याची खुमखुमी निघून जाते’, ‘युद्धापूर्वी मला इंग्रज असल्याचा बऱ्यापैकी अभिमान होता; पण जर्मन कैदेतल्या माझ्या देशबांधवांच्या संग्रहालयात राहिल्यानंतर मला ती खात्री राहिलेली नाही’, ‘स्थानबद्धतेचे फायदे असे की, केशकर्तनालयात जाण्याची कटकट नसते आणि वाचायची राहिलेली पुस्तके खुशाल वाचता येतात.’

या प्रक्षेपणांनी इंग्लंडमध्ये खळबळ माजली. पार्लमेंटमध्ये प्रश्न विचारले गेले, संपादकीयांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली आणि वुडहाऊसच्या कृत्याची निर्भर्त्सना करणाऱ्या पत्रांचा ओघ सुरू झाला. बीबीसीवर कुणी तरी त्याच्यावर ‘देश विकला’ असल्याचा आरोप केला. स्थानबद्धतेतून सुटकेच्या बदल्यात वुडहाऊसने जर्मन प्रचारात सहभागी होण्याचा सौदा मान्य केला असा बहुतेकांचा समज झाला. जनमत त्याच्याविरुद्ध तापू लागले. अनेक ग्रंथालयांमधून त्याच्या पुस्तकांवर बंदी आली. अगदी १९४४ पर्यंत त्याच्यावर देशद्रोहाचा खटला भरण्याची मागणी होत होती. एक म्हण आहे- तुम्ही पुरेसा चिखल फेकलात, तर थोडा तरी चिकटतोच! लोक त्याला फॅसिस्ट समर्थकांच्या पंक्तीत बसवून थांबले नाहीत; त्याच्या साहित्यात फॅसिस्ट प्रवृत्ती जागोजागी दडलेल्या असल्याचा दावा केला गेला.

प्रत्यक्षात १९४१ मधल्या या घटनाक्रमातून वुडहाऊसने एकच गुन्हा केल्याचे सिद्ध होते, तो म्हणजे- मूर्खपणा! प्रश्न असा की, हा मूर्खपणा त्याने का केला? बहुधा वाचकांशी संपर्क साधण्याच्या संधीचा त्याला मोह झाला असावा. या सगळ्या प्रकरणात मध्यस्थाची भूमिका निभावणाऱ्या सीबीएसचा अमेरिकी पत्रकार फ्लॅनेरीने पहिल्या भेटीतच ताडले होते, की वुडहाऊसचे राजकारणाचे ज्ञान यथातथाच आहे. फ्लॅनेरीच्या मते, ही प्रक्षेपणे नाझींसाठी मानवी चेहरा असलेली प्रसिद्धीची कसरत (publicity stunt) होती. वुडहाऊसने कैदेतील अनुभवांबद्दल रेडिओवर बोलावे ही दस्तुरखुद्द गोबेल्सचा साहाय्यक प्लॉखची कल्पना होती. आपल्या साहित्यात इंग्रजांची खिल्ली उडवणारा हा लेखक निश्चितच काही तरी टीकात्मक बोलेल अशी त्याला खात्री होती.

वुडहाऊसच्या साहित्यातील जग माझ्या चांगलेच परिचयाचे आहे. १९२५ पूर्वीच आकाराला आलेले हे जग त्याच पातळीवर स्थिरावले. शालेय कथांमधून १९०९ ला ‘स्मिथ’ या पात्राचा जन्म झाला, ‘बॅक्सटर’ आणि ‘अर्ल ऑफ एम्सवर्थ’ आले १९१५ ला, तर ‘जीव्हज्-वुस्टर’ १९१९ ला! वुडहाऊसच्या आतापर्यंतच्या कारकीर्दीचे तीन कालखंड आहेत- पहिला शालेय कथांचा, दुसरा अमेरिकी कथांचा, तर तिसरा वाडा-संस्कृतीचा! त्याचे उत्पन्न वाढले तसा त्याच्या पात्रांचा सामाजिक स्तरही वाढत गेला. शाळेची जागा वाडे आणि आलिशान सदनिकांनी, तर क्रिकेटची जागा गोल्फने घेतली. वुडहाऊसच्या लेखनाचे लक्षणीय वैशिष्टय़ म्हणजे त्याचा ठरून गेलेला साचा. बँकेत नोकरी आणि पत्रकारितेत उमेदवारी करताना भोवतालच्या निम्न मध्यमवर्गीय वातावरणाचा त्याला तिटकारा आला. मनाने शाळेतच वावरताना लिहिलेल्या त्याच्या सुरुवातीच्या कथांमध्ये पब्लिक स्कूलमधील सामने आणि चहापाटर्य़ा बरीच जागा व्यापतात. ‘स्मिथ इन द सिटी’ त्याच्या मनोव्यापारांचे उत्तम दर्शन घडविते, तर ‘स्मिथ जर्नलिस्ट’ त्याच्या राजकीय जाणिवांकडे निर्देश करते. नंतरच्या कादंबऱ्यांमध्ये मात्र खेळणे आणि ‘फिट’ राहणे एवढाच उद्योग असलेले तरुण दिसतात. मात्र शेवटपर्यंत वुडहाऊस पब्लिक स्कूलच्या अलिखित संकेतांचा मान ठेवताना दिसतो. ‘बर्टी वुस्टर’च्या उच्चवर्गीय अभिनिवेशाला उतारा म्हणून जन्मलेले ‘जीव्हज्’ हे त्याचे सर्वात न-नैतिक पात्र!

उमराव वर्गातील मूर्ख ‘बॅरन्स’, ‘अर्ल’ इत्यादींच्या अखंड मालिकेमुळे इंग्लंडबाहेर वुडहाऊसला लोक इंग्रजी समाजाचा उपहासात्मक टीकाकार समजू लागले. जर्मन, अमेरिकी किंवा भारतीय वाचकांचा असा समज झाला, की ब्रिटिश उमराव वर्गाला जगासमोर उघडे पाडण्याचा त्याचा हेतू आहे. साहित्य, विशेषत: विनोदी साहित्य, परकीय वाचकांपर्यंत पोहोचताना महत्त्वाच्या अर्थछटा गमावून बसते याचा हा मोठाच पुरावा म्हणायला हवा. प्रत्यक्षात वुडहाऊस ना ब्रिटिशांचा टीकाकार होता, ना उच्चवर्गाचा. उलट एक निरुपद्रवी वर्गीय दांभिकता त्याच्या लेखनात सर्वत्र आढळते. इंग्रज वाचक लगेच ओळखतो, की वुडहाऊसचा उद्देश समाजाच्या वर्गीय उतरंडीवर टीका करण्याचा नाही. विशिष्ट प्रश्नांना बगल देणाऱ्या त्याच्या साहित्यात निगर्वी, मनमिळाऊ आणि कसलीही हाव नसलेले श्रीमंत तरुण जागोजागी दिसतात. पहिल्या महायुद्धापूर्वी मनात तयार झालेले इंग्रजी समाजाचे निष्पाप, पारंपरिक आणि कौतुकास्पद चित्र वुडहाऊस पुन्हा पुन्हा रंगवीत राहतो.

असे असताना, त्याने जाणीवपूर्वक नाझी प्रचाराला हातभार लावला हे पटत नाही. लवकरच साठी गाठणार असल्याने नियमानुसार तो आपोआपच मुक्त होणार होता. त्यामुळे सुटकेचे आश्वासन फारसे महत्त्वाचे नव्हते. पब्लिक स्कूलच्या संकेतांप्रमाणे अक्षम्य पाप असणारा युद्धकाळातील द्रोह त्याने जाणूनबुजून केला असणे कठीण वाटते. परंतु आपण जे करतोय त्याचा ब्रिटनच्या हितावर विपरीत परिणाम होऊ  शकतो, हे त्याच्या का लक्षात आले नाही? जर्मनांच्या प्रचारयुद्धाचा आपणही भाग होतोय, हे त्याला का उमजले नाही?

याची दोन कारणे सांगता येतील- त्याची मर्यादित राजकीय समज आणि त्याच्या अटकेच्या वेळची परिस्थिती. फॅसिस्ट प्रवृतींबाबत वुडहाऊस इतका अनभिज्ञ होता, की नाझींशी कसलाही व्यवहार करणे एक घृणास्पद गोष्ट झाल्याचे त्याच्या गावीही नव्हते. युद्ध निकराच्या परिस्थितीत पोहोचण्याच्या थोडय़ा अगोदरच त्याला अटक झालेली होती. तोपर्यंत युद्धाविषयीच्या भावना फार तीव्र नव्हत्या. शांतीसमझोता करण्याबद्दल मोठमोठे प्रचारकही आग्रही होते. मात्र वुडहाऊसच्या अटकेनंतरच्या काळात परिस्थिती झपाटय़ाने बदलली. मोठय़ा जिकिरीने डंकर्कहून सैन्याची सुटका करण्यात आली, फ्रान्स कोसळला आणि एकटय़ा पडलेल्या ब्रिटनवर नाझींकडून बॉम्बवर्षांव सुरू  झाला. १९४१  च्या मध्यापर्यंत शत्रुत्वाची भावना शिगेला पोहोचलेली होती. परंतु हा वर्षभराचा काळ वुडहाऊस स्थानबद्धतेत होता आणि शत्रुपक्षाकडून त्याला चांगली वागणूक मिळत होती. त्यामुळे युद्धाला मिळालेल्या महत्त्वाच्या वळणाची त्याला कल्पनाच नव्हती.

वुडहाऊसची सुटका जर्मनीच्या रशियावरील हल्ल्याच्या तीन दिवस आधी झाली. जर्मन उच्चाधिकाऱ्यांना या हल्ल्याची पूर्वकल्पना असेलच. ब्रिटन, रशिया आणि अमेरिका यांना एकाच वेळी पराभूत करणे शक्य नसल्याने अमेरिकेला शक्य तेवढा काळ युद्धाबाहेर ठेवणे जर्मनीच्या दृष्टीने अत्यावश्यक होते. रशियाचा झटपट पराभव झाल्यास अमेरिका मध्ये पडण्याची शक्यता कमी होती. पण तोवर अमेरिकी अलिप्ततावाद्यांना बळ देणारे काही तरी घडवणे आवश्यक होते. वुडहाऊसला सोडण्याचा छोटासा डावपेच यासाठी कामी आला असता. जर्मनांच्या समजुतीप्रमाणे वुडहाऊस इंग्रजांबद्दल फारसा आदर नसलेल्या अमेरिकींमध्ये लोकप्रिय होता. त्याला रेडिओवर बोलण्याची संधी दिल्यास तो ब्रिटिशांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणार हे निश्चित होते. शिवाय त्याची सुटका जर्मन लोकांमधील खिलाडूपणाचा पुरावा होती.

मात्र, ब्रिटिश समीकरणे वेगळीच होती. डंकर्कनंतर ब्रिटिश नीतिधैर्य दोन गोष्टींमुळे टिकून होते- लोकशाही वाचविण्यासाठी लढायचे आहे ही भावना आणि सर्वसामान्य माणसाच्या सामर्थ्यांवर जिंकायचे आहे ही जाणीव. हिटलरच्या अनुनयाच्या धोरणामुळे आणि १९४० मधल्या पराभवांमुळे उच्चवर्गीयांचा पोकळपणा सिद्ध झालेला होता. देशभक्ती आणि डावे विचार एकमेकांशी घट्ट जोडले गेले होते. अशा परिस्थितीत वुडहाऊस बळीचा बकरा म्हणून आदर्श पर्याय होता. कारण श्रीमंतांनी युद्धकाळात देशद्रोह केलेला आहे अशीच सर्वसाधारण भावना होती. समाजरचनेला धक्का पोहोचविण्याची कोणतीही जोखीम न पत्करता वुडहाऊसला झिडकारून समर्थ उमरावाला झिडकारण्याचे समाधान मिळणार होते. समाजातील खऱ्या बांडगुळांशी टक्कर घेण्याऐवजी सहजपणे तुटून पडता येईल असे श्रीमंत बांडगुळ वुडहाऊसच्या रूपाने आयतेच हाती सापडले होते. मात्र कितीही श्रीमंत झाला तरीही कादंबरीकार मालकी गाजविणाऱ्या वर्गाचा होत नाही!

त्या वेळच्या निकराच्या परिस्थितीत वुडहाऊसचा राग येणे एक वेळ समजू शकते. परंतु चार वर्षांनंतरही त्याला ‘देशद्रोही’ म्हणून हिणविणे चुकीचे आहे. या छोटे मासे पकडण्याच्या नादात मोठे मासे मोकळे राहत आहेत. व्यावसायिक यशामुळे आणि बराच काळ देशाबाहेर राहिल्यामुळे एडवर्डीयन काळातून (१८९०-१९१४) वुडहाऊस बाहेरच आला नाही. त्यामुळेच बिचारा एका प्रचारप्रयोगाचा बळी ठरला.

manojrm074@gmail.com