डॉ. मनोज पाथरकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘जंगलबुक’चा कर्ता म्हणून सर्वज्ञात असलेल्या रुडयार्ड किपलिंगच्या ‘इफ् ’ या कवितेवरून नुकताच बर्मिगहॅम विद्यापीठात मोठा वाद झाला. जगभरातून उलटसुलट प्रतिक्रियांचा धनी ठरलेला किपलिंग ब्रिटनच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या युगाचा भाष्यकार होता. एक कलावंत म्हणून त्याच्या प्रतिभेचा आणि साम्राज्यवादी विचारांमुळे तिच्यावर पडलेल्या मर्यादांचा वेध ऑर्वेल १९४२ साली लिहिलेल्या या निबंधात घेतो..

प्रबुद्ध लेखकांना तिरस्करणीय असला तरी किपलिंग सर्वसामान्य वाचकांच्या आजही लक्षात आहे. मात्र यामागच्या कारणांचा शोध घेण्यापूर्वी काही गोष्टी मान्य करूनच सुरुवात केलेली बरी! किपलिंग सवंग स्वदेशपूजक, नैतिकदृष्टय़ा असंवेदनशील आणि कलात्मकदृष्टय़ा बटबटीत आहे. परंतु त्याला राजकीय बाबतीत फॅसिस्ट म्हणता येत नाही; त्याच्या मर्यादा वेगळ्या होत्या. त्याच्या आत्मविश्वासाचे आणि खळाळत्या जिवंतपणाचे स्रोतही वेगळे होते. बऱ्याचदा लेखकांच्या अवतरणांची संदर्भाशिवाय पोपटपंची करून निष्कर्ष काढले जातात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे किपलिंगची ‘lesser breeds without law’ (रानटी अवस्थेतील हलक्या प्रतीचे वंश) ही ओळ. हे शब्द ब्रिटिश आधिपत्याखालील एत्तद्देशीयांबद्दल नसून जर्मन लोकांबद्दल आहेत, तेही फॅसिझमच्या उदयापूर्वी. १९ व्या शतकातील साम्राज्यवादी दृष्टिकोन आणि काही राष्ट्रांचा आजचा गुन्हेगारी टोळ्यांसारखा दृष्टिकोन यांच्यात खूप अंतर आहे.

ब्रिटिश साम्राज्याच्या विस्तारकाळचा प्रेषित असलेला किपलिंग लष्कराचा अनधिकृत इतिहासकारही होता. आपल्या आयुष्याचा उत्तरार्ध त्याने कुढत काढला, कारण राजकीयदृष्टय़ा तो निराश झालेला होता. का कुणास ठाऊक, ठरलेल्या योजनेनुसार इतिहासाची पावले पडत नव्हती. इतिहासातील सर्वात मोठय़ा विजयानंतर (पहिल्या महायुद्धानंतर) ब्रिटनची वाटचाल दुय्यम दर्जाच्या सत्तेकडे होती. हे स्वच्छ कळण्याइतकी राजकीय समज किपलिंगकडे होती. त्याला आदर्शवत वाटणाऱ्या वर्गाचे सत्त्व नाहीसे झाले होते. तरुण वर्ग एक तर चंगळवादी नाही तर असंतुष्ट होता. जगाचा नकाशा इंग्रजी साम्राज्याच्या रंगात रंगवून टाकण्याचे स्वप्न हवेतच विरले होते. मात्र काय घडते आहे ते पूर्णपणे कळणेही किपलिंगला शक्य नव्हते. कारण साम्राज्यविस्तारामागे असलेल्या आर्थिक कारणांचा – म्हणजे संपत्तीविस्ताराच्या निकडीचा – त्याने कधी शोधच घेतला नव्हता. त्याच्या लेखी साम्राज्यवाद म्हणजे ‘अज्ञ’ लोकांना सक्तीने ‘सन्मार्गाला लावणे’ होते! एतद्देशीयांना बंदुकीच्या जोरावर कायद्याचे राज्य शिकवायचे; त्यांना रस्ते, रेल्वे आणि न्यायालये द्यायची. परंतु ज्या हेतूंनी साम्राज्य उभे राहिले तेच त्याच्या अंताचे कारण ठरतील हे तो समजू शकला नाही. एका अर्थी १९ व्या शतकातील इंग्रजांनाच ते काय करीत आहेत, याची पूर्ण जाणीव नव्हती.

कलावंत असला तरी किपलिंगचा दृष्टिकोन उमराववर्गाचा द्वेष करणाऱ्या नोकरशहाचा होता. स्वत:ला अधिकारीवर्गाशी जोडून घेतल्याने प्रबुद्ध लोकांमध्ये क्वचितच सापडणारी जबाबदारीची जाणीव त्याच्यात होती. सत्ता हाती असलेल्यांसमोरचा प्रश्न असतो- ‘एखाद्या विशिष्ट परिस्थितीत काय कृती करावी?’ एकीकडे आपण सगळेच आशियातील कृष्णवर्णीयांना लुटून जगत असतो. तर दुसरीकडे आपल्यातील प्रबुद्धांना वाटते की, वसाहतींना स्वातंत्र्य द्यायला हवे. मात्र त्यांना आपल्या उंचावलेल्या जीवनमानाशी तडजोडही नको असते. हे व्यवस्थित उमजलेले असल्याने किपलिंग त्यांना बिनतोड उत्तर देऊ  शकतो. सभ्य आणि विचारी लोक किपलिंगच्या दृष्टिकोनातून जगाकडे पाहात नसले तरी त्याने मांडलेल्या विषयांचे महत्त्व कमी होत नाही. ‘White man’s burden’ हा शब्दप्रयोग एका खऱ्याखुऱ्या प्रश्नाकडे लक्ष वेधतो. आज आपल्याला त्याचा ‘Black man’s burden’ असाच अर्थ जास्त समर्पक वाटतो. सुसंस्कृत नसला तरी किपलिंग सार्वकालिक प्रश्नांशी झटापट करताना दिसतो. हे करताना इंग्रजीत नव्या वाक्प्रचारांची भर घालणारा अलीकडच्या काळातील तो एकमेव लेखक ठरतो.

भारतात राहणाऱ्या इंग्रजांबद्दल किपलिंगला आदर वाटण्याचे कारण त्यांची काहीतरी करून दाखविण्याची धमक! त्यांनी जे केले ते वाईट असेलही; पण त्यांनी पृथ्वीचा चेहरामोहरा बदलून टाकला. भारताच्या नकाशातील रेल्वेच्या जाळ्यावर नजर टाकताच हे लक्षात येते. या अँग्लो-इंडियनांचे चित्र साहित्यात रेखाटणारा किपलिंग एकमेव लेखक होता. अर्थात, तो स्वत: त्यांच्यासारखा नव्हता आणि त्यांनाही त्याचे विशेष कौतुक नव्हते. त्यांच्या मते, किपलिंग जरा जास्तच उच्चभ्रू होता आणि भारताबद्दल त्याला काहीही ठाऊक नव्हते. खरे तर भारतात जन्मल्याचा आणि लवकर शिक्षण सोडल्याचा त्याच्या जडणघडणीवर विपरीत परिणाम झाला. थोडी वेगळी पाश्र्वभूमी लाभली असती, तर तो एक उत्तम कादंबरीकार झाला असता. प्रत्यक्षात तो सेसिल ऱ्होड्ससारख्या साम्राज्यवाद्याचा प्रसिद्धिप्रमुख शोभावा असा झेंडे मिरविणारा झाला! मात्र त्याने कधीही संधिसाधूपणा केला नाही.

किपलिंगच्या संदेशाची गरज नसलेल्या जनतेने त्याला स्वीकारण्याचा प्रश्नच नव्हता. १८९० च्या सुमारास बहुसंख्य जनता लष्करीकरणाच्या विरुद्ध आणि साम्राज्यवादाविषयी निरुत्साही होती. त्यांची देशभक्ती हा बराचसा नेणिवेतला मामला होता. किपलिंगचे अधिकृत प्रशंसक मध्यमवर्गीय नोकरशाहीतील होते. उच्च आणि मध्यमवर्गीयांतील बेफिकीर वृथाभिमानी मंडळींना त्याच्या रूपाने कवी म्हणता येईल असा कुणीतरी त्यांची बाजू घेताना सापडला आणि त्यांनी त्याला डोक्यावर घेतले. किपलिंगच्या ‘कऋ’सारख्या उपदेशपर कवितांना बायबलमधील वचनांचा दर्जा दिला गेला. परंतु त्याने मांडलेले बरेचसे मुद्दे या मंडळींना पटण्यासारखे नाहीत. इंग्रज असून इंग्लंडवर टीका करणारा त्याच्यासारखा कडवट देशभक्त तसा दुर्मीळच. सर्वसाधारणपणे कामगारवर्गावर टीका करणारा किपलिंग उच्चभ्रू शाळांतील क्रिकेट आणि फुटबॉलवरदेखील कोरडे ओढतो. तो त्यांना ‘पांढऱ्या कपडय़ांतली गाढवे आणि चिखलाने माखलेले बैल’ म्हणतो!

वर्गविषयक पूर्वग्रह बाजूला सारण्यात किपलिंग यशस्वी झाला असता तर ब्रिटिश साम्राज्याबद्दलच्या त्याच्या अद्भुतरम्य कल्पनांनी फारसा फरक पडला नसता. दुय्यम दर्जाच्या लष्करी अधिकाऱ्यांचे तो प्रमाणाबाहेर उदात्तीकरण करतो. मात्र, त्याला दुर्लक्षित सामान्य सैनिकाविषयी जास्त कळकळ आहे. तुटपुंज्या वेतनाच्या बदल्यात ज्यांच्या उत्पन्नाच्या साधनांचे तो रक्षण करतो त्या दांभिकांकडून सैनिकाच्या वाटय़ाला तिरस्कारच येतो. किपलिंगने युद्धाचे उदात्तीकरण केल्याचा आरोप बव्हंशी खरा असला तरी त्याचा युद्धविषयक दृष्टिकोन वास्तववादी आहे. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धातील ब्रिटिश लष्कराची साहित्यातील वर्णने फक्त किपलिंगच्या लिखाणात सापडतात. मौखिक परंपरा आणि रेजिमेंट्सचा अधिकृत इतिहास यांच्यातच उपलब्ध असलेल्या सामग्रीला त्याने साहित्यिक रूप दिले : लखनौ किंवा जिब्राल्टरमधील घामेजलेल्या बराकी, लाल कोट, बिगुलाचा आवाज, सरजटांचा आरडाओरडा.. मात्र, सर्वत्र छुपे अस्तित्व असलेल्या अघोषित वर्गलढय़ाला लष्करही अपवाद नाही याकडे किपलिंग डोळेझाक करतो. सैनिक कधीही ‘हे मातृभूमी इंग्लंड, मी तुझ्यासाठी काय बरे केले आहे?’ असे विचारीत नाही. हा प्रश्न मध्यमवर्गीय बनावटीचा आहे.

किपलिंगचे काव्य पाहून म्हणावेसे वाटते की, तो ‘कधी कधी’ कवीही होता. त्याची बहुतेक पद्यरचना भडक असली तरी काव्यरसिकांना काही तरी देऊन जाते. त्याला मी उत्तम प्रतीचा सुमार कवी म्हणेन. उदाहरण देऊन सांगायचे, तर ज्याअर्थी हॅरीयट बीचर स्टोव्ह कांदबरीकार होती त्याअर्थी किपलिंग कवी होता! भावनाविवशतेने ओसंडून वाहणारी बरीच उत्तम प्रतीची सुमार कविता इंग्रजीत आहे. काहीतरी चुकतेय ही जाणीव होऊनही त्यातून मिळणारा आनंद कमी होत नाही. तसे पाहता आजच्या काळात खरेखुरे ‘उत्तम’ काव्य लोकप्रिय होईल ही अपेक्षाच चुकीची आहे. मूठभर लोकच अशा काव्याचे चाहते असू शकतात. काव्य आज सगळ्यात कमी सहन केली जाणारी कला आहे. अशा परिस्थितीत उत्तम प्रतीचे सुमार काव्य बुद्धिजीवी आणि सामान्य माणूस यांच्यातील दुवा ठरते. हे काव्य ‘उघड सत्याचे सहजसुंदर स्मारक’ असते. सर्वाच्या परिचयाच्या भावना अथवा विचारांना संस्मरणीय रूपात मांडणारी या प्रकारची कविता गीतरूपातील म्हणीसारखी असते. त्यातील विचार फारसा प्रगल्भ नसतो, पण म्हणूनच सर्वाना आपला वाटणारा असतो.

दुसऱ्या एखाद्या संवेदनशील प्रतिभावंत लेखकाला किपलिंगसारखी संधी मिळाली असती तर त्याच्याकडून अधिक चांगले साहित्य लिहिले गेले असते, हा एक गैरसमज आहे. त्या काळातील इंग्लंडमध्ये टॉलस्टॉयच्या कथा-कादंबऱ्या कधीच निर्माण झाल्या नसत्या. प्रतिभेची कमतरता होती म्हणून नव्हे, तर तेवढी संवेदनशीलता असणारा इंग्लंडमध्ये युद्धासारख्या गोष्टींच्या संपर्कातच आला नसता. टॉलस्टॉय एका मोठय़ा लष्करी साम्राज्याचा भाग होता, तर ब्रिटिश साम्राज्यात अतिशय कमी प्रमाणात लष्करीकरण अस्तित्वात होते.

ज्यांच्या भूमिकेशी किपलिंग एकरूप झाला होता तो ब्रिटिश सत्ताधारी वर्ग कसा आहे, हे त्याला समजलेलेच नव्हते. त्यामुळे त्याच्या साहित्यात दांभिकता आणि अर्थहीनता वाढत गेली. अशा वेळी त्याच्यातील लेखनचातुर्याचा अभाव सद्गुण ठरला. नसता धीटपणा नसल्याने (त्या काळातील काही फ्रेंच कवींप्रमाणे) धक्कातंत्राचा अवलंब करून मध्यमवर्गावर तुटून पडणे त्याला टाळता आले. त्याच्या लेखनात मोठय़ा प्रमाणात घासून गुळगुळीत झालेले संदेश आहेत. पण जमानाच अशा संदेशांचा असल्याने ही गोष्ट फार खटकत नाही. तुलनाच करून सांगायचे, तर त्याची वाक्ये ऑस्कर वाइल्डच्या शब्दचातुर्याने ओसंडणाऱ्या ओळींपेक्षा कमी उथळ आणि बर्नार्ड शॉच्या ‘मॅन अ‍ॅण्ड सुपरमॅन’मधल्या चमकदार ब्रीदांपेक्षा कमी वैतागवाणी वाटतात! एक कलावंत म्हणून किपलिंगचे प्रमादही कधी कधी अशा अभिनिवेशी लेखनापेक्षा उजवे ठरतात.

manojrm074@gmail.com

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: George orwell essay on rudyard kipling
First published on: 18-08-2018 at 04:29 IST