03 June 2020

News Flash

बुकबातमी : ऑर्वेलची रेघ मोठी होताना..

दुसरीकडे राजकारण- राज्यशास्त्राविषयक विश्लेषक लेखन परिभाषेच्या-जडजंबाळ शब्दांच्या कचाटय़ात अडकलेलं

खरं तर लिहिलं-बोललेलं प्रत्येक विधान राजकीय असतं, याची जाणीव आपल्याकडील लेखकूंमध्ये अभावानंच आढळते. त्यामुळेच मराठीतलं राजकीय साहित्य म्हटलं की, सत्ताकेंद्री राजकारणाभोवतीचे कंगोरे टिपणाऱ्या अरुण साधूंच्या दोनेक कादंबऱ्या वगळता काही नाही, असाच अनेकांचा सूर असतो. दुसरीकडे राजकारण- राज्यशास्त्राविषयक विश्लेषक लेखन परिभाषेच्या-जडजंबाळ शब्दांच्या कचाटय़ात अडकलेलं. त्यातून सुटका करत ते वाचण्यातच अनेकांचा श्वास कोंडतो. खरं तर यातून बाहेर पडण्याचा मार्ग गेल्या शतकात जॉर्ज ऑर्वेलनं दाखवला होता. शैलीदार, तरी गंभीर ‘राजकीय लेखन’ करू इच्छिणाऱ्यांसाठी तो आदर्शच.

हे सांगण्याचं कारण म्हणजे, ऑर्वेलनं ओढलेल्या रेघेवरून चालणारं, किंबहुना ती आणखी वाढवत नेणारं लेखन आता होते आहे का, याचा वार्षिक वेध घेणाऱ्या ‘जॉर्ज ऑर्वेल प्राइझ’ पुरस्काराच्या या आठवडय़ात जाहीर झालेल्या दीर्घ-याद्या. ब्रिटनच्या ‘द ऑर्वेल फाऊंडेशन’कडून १९९४ सालापासून दिला जाणारा हा पुरस्कार गतवर्षीपासून राजकीय ललित साहित्यासाठीही स्वतंत्रपणे देण्यात येऊ लागला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही ‘राजकीय ललितेतर लेखन’ आणि ‘राजकीय ललित लेखन’ अशा वर्गवाऱ्यांत अनुक्रमे १२ आणि १३ पुस्तकांच्या दोन नामांकन-याद्या जाहीर झाल्या आहेत. ललितेतर पुस्तकयादीत पटकन लक्ष वेधून घेतं ते डोरियन लिन्स्की या तरुण लेखकानं लिहिलेलं ऑर्वेलच्याच ‘१९८४’चं चरित्र! ‘द मिनिस्ट्री ऑफ ट्रथ’ या शीर्षकाचं हे पुस्तक ऑर्वेलची ही कादंबरी कशी घडली, याचा पट मांडतं. त्याच यादीत गेली दोन दशके मध्यपूर्वेतून पत्रकारिता करणाऱ्या अझादेह मोवेनीचं ‘गेस्टहाऊस फॉर यंग विडोज्, अमंग द विमेन ऑफ आयसिस’ हे शीर्षकातच स्वयंस्पष्ट पुस्तक, तसेच शोषना झुझॉफचं ‘द एज ऑफ सव्‍‌र्हिलन्स कॅपिटॅलिझम’ आणि ‘अपीजिंग हिटलर’, ‘माओइझम : ए ग्लोबल हिस्ट्री’, ‘क्रेमलिन विन्टर’ अशी चर्चेतली पुस्तकंही आहेत. तर १३ ललित पुस्तकांच्या यादीत अ‍ॅली स्मिथच्या कादंबरीत्रयीतील ‘स्प्रिंग’ आहेच; पण मिनोली सॅलगाडो या श्रीलंकन लेखिकेचा ‘ब्रोकन जॉ’ हा कथासंग्रह, गतवर्षी मॅनबुकर पुरस्कारासाठी नामांकन मिळालेली ल्युसी एलमनची ‘डक्स, न्यूबरीपोर्ट’ ही कादंबरीही आहे!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2020 12:35 am

Web Title: george orwell prize 2020 the orwell foundation zws 70
Next Stories
1 मूर्ती लहान, पण..
2 भाष्यकारांच्या नजरेतून ‘करोना’
3 बुकबातमी : पुन्हा एकदा ‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’!
Just Now!
X