News Flash

ऑर्वेलची प्रकाशवाणी : कलावंत की प्रचारक?

आजच्या घडीला कलासमीक्षेबद्दल बोलणे म्हणजे युद्धखोर जगात विश्वशांतीवर बोलण्यासारखे आहे.

जॉर्ज ऑर्वेल

ऐतिहासिक परिस्थितीनुसार साहित्याच्या सौंदर्यात्म किंवा राजकीय बाजूंवर भर दिला जातो; कलेत राजकीय जाणीव अपरिहार्य असते, मात्र ती एखाद्या पक्षाला किंवा विचारधारेला बद्ध नसावी- हे मुद्दे अधोरेखित करणारं जॉर्ज ऑर्वेलचं भाषण एप्रिल १९४१ मध्ये बीबीसीवर प्रसारित झाले होते; त्याचा हा स्वैर अनुवाद..

आजच्या घडीला कलासमीक्षेबद्दल बोलणे म्हणजे युद्धखोर जगात विश्वशांतीवर बोलण्यासारखे आहे. शांती आणि समीक्षा दोन्हीही कुठे तरी हरवल्या आहेत. १९३० ते १९४० या दहा वर्षांत साक्षेपी, तपशीलवार, निष्पक्ष आणि कलाकृतीचे मूल्य जपणारी पारंपरिक पद्धतीची साहित्यसमीक्षा अशक्यप्राय होऊन बसली आहे. या काळातील साहित्यविषयक दृष्टिकोनाकडे मागे वळून पाहताना एक गोष्ट ठळकपणे नजरेत भरते- साहित्याचा सौंदर्यात्मकतेशी काहीही संबंध उरलेला नाही. ते प्रचाराच्या दलदलीत फसल्यासारखे झाले आहे. याचा अर्थ या काळातील सर्वच साहित्यकृती वाईट आहेत असा नाही; पण या काळातील साहित्याची ओळख असलेले ऑडेन, स्पेंडर किंवा मॅक्निस यांसारखे लेखक उपदेशपूर्ण आणि राजकीय लेखन करणारे आहेत. साहित्यसौंदर्याची निश्चित जाण असूनही त्यांना साहित्याचे तंत्र किंवा मांडणी यापेक्षा त्याचा आशय आणि विषयवस्तू महत्त्वाची वाटते. या काळातील सर्वात जोमदार समीक्षादेखील मार्क्‍सवादी समीक्षकांची निर्मिती आहे. त्यात ख्रिस्तोफर कॉडवेल, फिलिप हेंडरसन आणि एडवर्ड अपवर्ड असे सर्वच आले. साहित्यकृती एखादे राजकीय पत्रक असल्यासारखी ही मंडळी साहित्यगुणांपेक्षा तिचा राजकीय आणि सामाजिक अन्वयार्थ खोदून काढण्यामध्ये जास्त रस घेताना दिसतात.

‘कलेसाठी कला’

ही भूमिका अधिकच लक्षणीय ठरण्याचे कारण ती १९२०च्या दशकातील साहित्यविचाराच्या अगदी विरुद्ध आहे. या काळातील टी. एस. एलियट, एझरा पाऊंड किंवा व्हर्जिनिया वुल्फ यांसारखे महत्त्वाचे साहित्यिक तंत्रावर भर देणारे होते. त्यांची स्वत:ची अशी राजकीय मते (आणि पूर्वग्रहसुद्धा) होते; पण साहित्याचे तात्पर्य किंवा त्याचा राजकीय अन्वयार्थ यांपेक्षा तांत्रिक प्रयोगांवर त्यांचा भर होता. त्यांचा म्होरक्या म्हणता येईल असा जेम्स जॉईस तर ‘विशुद्ध’ कलावंताच्या पातळीवर पोहोचलेला एक तंत्रज्ञच होता. लेखनात हेतूला महत्त्व देणाऱ्या डी. एच. लॉरेन्ससारख्या लेखकातही सामाजिक जाणिवेचा अभाव जाणवतो. कलाकृतीचे रूप (मांडणी) तिच्या आशय-विषयापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे, हे मानणारी प्रवृत्ती खरे तर १८९० पासूनच अस्तित्वात होती. काहींनी तर त्याला ‘कलेकरिता कला’ असे स्वरूप दिलेले होते. अर्थात, बर्नार्ड शॉसारखे याला अपवाद असलेले लेखकही या काळात होते; पण एकूणच प्रचलित दृष्टिकोन रूपाला महत्त्व देणारा होता. १९२०च्या दशकात जॉर्ज सेंट्सबरीसारख्या वयोवृद्ध समीक्षकानेही कलेकडे बघण्याच्या तांत्रिक दृष्टिकोनाचाच पुरस्कार केला. साहित्यकृतीचे मूल्यमापन करताना लेखकाच्या मतांबद्दल पूर्ण उदासीनता बाळगून तो तिच्या मांडणीला महत्त्व द्यायचा.

व्हिक्टोरियन युग ते आर्थिक महामंदी

अशा परिस्थितीत वाङ्मयीन दृष्टिकोनाचा लंबक अचानक आशय अणि विषयवस्तू यांच्याकडे कसा काय सरकला असावा? १९२०चे दशक संपतानाच्या काळात एडिथ सिटवेलचे साहित्य उथळपणे तंत्रावर भर देत लेखनाकडे एक प्रकारची कशिदाकारी म्हणून पाहते. जणू काही शब्दांना अर्थ असा नसतोच. तर दुसरीकडे, १९२९ पासूनचे समीक्षक एडवर्ड अपवर्डचे लेखन फक्त मार्क्‍सवादी साहित्यकृतींनाच श्रेष्ठ ठरवते. या दोन्ही लेखकांच्या दृष्टिकोनात एवढा फरक कसा? माझ्या मते, या प्रश्नाचे उत्तर बाह्य़ परिस्थितीत दडलेले आहे. साहित्याकडे बघण्याचे सौंदर्यवादी आणि राजकीय असे दोन्ही दृष्टिकोन त्या त्या कालखंडातील सामाजिक वातावरणाचा परिपाक होते. १९२९च्या आर्थिक महामंदीने जसा एका युगाचा अस्त झाला, तसाच हिटलरच्या १९३९ मधील पोलंडवरील आक्रमणाने दुसऱ्या एका युगाचा शेवट झाला. साहित्यविषयक दृष्टिकोनांतील बदल ऐतिहासिक घटनांच्या संदर्भातच अर्थपूर्ण ठरतात. बाह्य़ घटकांचा साहित्यिक दृष्टिकोनांवर कसा परिणाम होतो, ते समजून घेण्यासाठी थोडे आणखी मागे जावे लागेल.

एकोणिसाव्या शतकातील इंग्लंडमध्ये गंभीर साहित्यसमीक्षा किंवा साहित्याकडे पाहण्याचा कलात्मक दृष्टिकोन अस्तित्वातच नव्हते. याचा अर्थ चांगले साहित्य निर्माण होत नव्हते असा नाही. उलट या काळातील डिकन्स, थॅकरे, ट्रॉलप यांच्यासारखे अनेक लेखक नंतरच्या लेखकांपेक्षा दीर्घकाळ स्मरणात राहतील; परंतु त्या काळच्या फ्रान्समधील फ्लॉबेर, बॉदलेअर किंवा गोतिए यांच्यासारखे साहित्यिक व्हिक्टोरियन इंग्लंडमध्ये नव्हते. साहित्यसौंदर्याबद्दल काटेकोर असणे या गोष्टीला अजिबात महत्त्व नव्हते. या काळातील लेखकांच्या दृष्टिकोनातून साहित्य थोडाफार पैसा कमावण्याचे आणि उपदेशाचे डोस पाजण्याचे साधन होते. झपाटय़ाने बदलणाऱ्या इंग्लंडमध्ये मावळत्या सरंजामशाहीच्या अवशेषांवर एका नव्या धनिक वर्गाचा उदय होत होता. युरोपबरोबरचे संबंध तुटल्याने एका दीर्घ कलापरंपरेत खंड पडला होता. खरे सांगायचे तर, १८५० नंतरच्या काळातील इंग्रजी लेखक – अगदी डिकन्ससारखे श्रेष्ठ साहित्यिकसुद्धा सौंदर्यविषयक काटेकोरपणाबाबत एका अर्थाने असंस्कृत आदिम मानवासारखे होते.

१८७५ नंतर मॅथ्यू अरनॉल्ड, वॉल्टर पेटर आणि ऑस्कर वाइल्ड यांच्यासारख्या अनेकांमुळे युरोपबरोबरचा संपर्क पुनस्र्थापित होऊ  लागला. त्यामुळे साहित्याचे रूप आणि तंत्र यांचे महत्त्व नव्याने लक्षात येऊ  लागले. आज कालबाह्य़ ठरलेले ‘कलेकरिता कला’ हे तत्त्व याच काळात पुढे आले. हा दृष्टिकोन १८९० ते १९३० असा दीर्घकाळ उचलून धरला गेला, कारण हा चाळीस वर्षांचा काळ असाधारण सुखसुविधा आणि सुरक्षिततेचा होता. भांडवलशाही युगाची ती सोनेरी दुपारच म्हणावी लागेल! एक कोटी बळी घेणाऱ्या पहिल्या महायुद्धानेही या परिस्थितीला फारसा धक्का पोहोचवला नाही. मात्र दुसरे महायुद्ध आणि त्याकडे नेणाऱ्या घटना यांनी या युगाचा निर्णायक शेवट झाला. जोवर हे सुबत्तेचे युग होते तोवर प्रत्येक युरोपीय व्यक्तीला ही समाजव्यवस्था अनंत काळ टिकेल असा विश्वास होता. वैयक्तिक आयुष्यात सुदैवी किंवा दुर्दैवी असणे शक्य होते, पण भोवतालचे जग फारसे बदलणार नाही याची खात्री होती. अशा वातावरणात बौद्धिक तटस्थता शक्य होती अन् हौशी उच्छृंखलताही. इंग्रजी चर्चचा समर्थक असलेल्या सेंट्सबरीसारख्या जुन्या हुजुरपक्षीय खोडाची समीक्षा याच काळात लिहिली गेली. लेखकांची राजकीय किंवा नैतिक भूमिका मान्य नसतानाही तो त्यांच्या साहित्यकृतींना योग्य न्याय देऊ  शकला.

‘राजकीय’ अपरिहार्यता

१९३० नंतर ही सुरक्षिततेची भावना हरवली. पहिले महायुद्ध आणि रशियन राज्यक्रांतीनंतरही टिकून राहिलेल्या या भावनेच्या जागतिक महामंदी आणि हिटलरशाही यांनी चिंधडय़ा उडवल्या. या काळातील लेखकांच्या जिवाला तर धोका होताच, शिवाय त्यांची मूल्यव्यवस्था कोणत्याही क्षणी उद्ध्वस्त केली जाऊ  शकत होती. अशा परिस्थितीत तटस्थता सहजसाध्य नसते. एखाद्या जीवघेण्या व्याधीबद्दल केवळ सौंदर्यवादी दृष्टिकोन ठेवणे शक्य नसते. तुमचा गळा कापू पाहणाऱ्या माणसाबद्दल तुमच्या भावना निष्पक्ष राहू शकत नाहीत. फॅसिस्ट आणि समाजवादी एकमेकांशी निकराने लढत असताना विचारी माणसाला कुणाची तरी बाजू घेणे भाग होते आणि याबद्दलच्या त्याच्या भावना साहित्यात आणि साहित्यविषयक मतांमध्ये झिरपणे अपरिहार्य होते. थोडक्यात, साहित्याला ‘राजकीय’ होण्याशिवाय गत्यंतर नव्हते. दुसरा कोणताही पर्याय वैचारिक अप्रामाणिकपणा ठरला असता. प्रत्येकाच्या बांधिलकीच्या कल्पना आणि तिटकाऱ्याचे विषय जाणिवेच्या पृष्ठभागावरच असल्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे अशक्य होते. साहित्याच्या आशय-विषयाला इतके महत्त्व आले होते, की लेखनशैली ही क्षुल्लक बाब होती.

बंद रस्त्याकडे..

१९३०च्या दशकात कवितेसहित सर्वच साहित्य राजकीय वादविवादात ओढले गेले. या दहा वर्षांनी ‘विशुद्ध सौंदर्यवादा’चा भ्रम दूर करून साहित्यसमीक्षेत मोलाची भर घातली. ‘कलेकरिता कला’ या तत्त्वामागचा फोलपणा त्यांनी उघड केला. या कालखंडाने आपल्या लक्षात आणून दिले, की प्रत्येक साहित्यकृतीच्या गाभ्याशी कसला तरी प्रचार हा असतोच. प्रत्येक कलाकृती कसला तरी अर्थ स्पष्ट करून सांगण्यासाठी आणि कोणत्या तरी राजकीय, सामाजिक, धार्मिक उद्देशाने बनलेली असते. आपल्या सौंदर्यविषयक निकषांमागे आपले पूर्वग्रह आणि विश्वास दडलेले असतात. मात्र त्याच वेळी या दशकाने साहित्याला एका बंद रस्त्याकडे नेले. अनेक तरुण लेखकांची विचारशक्ती विशिष्ट राजकीय विचारधारेशी जोडून टाकली गेली. त्या विचारधारेशी एकनिष्ठ राहण्याच्या नादात त्यांना प्रामाणिकपणे विचार करणे अशक्य झाले. बहुसंख्य लेखक त्या काळात नवीन असलेल्या अधिकृत मार्क्‍सवादी विचारसरणीकडे ओढले गेले. याचा परिणाम असा झाला, की स्वत:ला मार्क्‍सवादी म्हणवणाऱ्या लेखकांना रशियाबद्दल राजकीय निष्ठा बाळगणे आवश्यक ठरले. यातूनच ते सत्ताकारणातील अप्रामाणिकपणाशी जोडले गेले. असे होणे योग्यच होते असे मानले तरी ज्या गृहीतकांवर या लेखकांची निष्ठा उभारलेली होती ती गृहीतकेच राजकारणातील कोलांटउडय़ांमुळे निर्थक ठरली.

१९३०च्या दशकात लेखकांना कळून चुकले की, ते समकालीन घटनांपासून अलिप्त राहू शकत नाहीत. १९४०च्या दशकात त्यांना शोध लागला, की एखाद्या राजकीय विचारधारेसाठी वैचारिक प्रामाणिकपणाचा बळी देणेही योग्य नाही. निदान असे करणारा खऱ्या अर्थाने लेखक राहू शकत नाही. चांगला लेखक होण्यासाठी साहित्यसौंदर्याबाबतचा काटेकोरपणा जसा पुरेसा नाही तशी राजकीय निष्ठाही पुरेशी नाही. गेल्या दहा वर्षांतील घटनांनी आपल्याला त्रिशंकू अवस्थेत नेऊन सोडलेले आहे. त्यामुळे इंग्लंडमधील साहित्य दिशाहीन झाल्यासारखे वाटते आहे. मात्र या दशकाने- कला आणि प्रचार यांच्यातील सीमा लक्षात घेणे लेखकासाठी महत्त्वाचे आहे, याचे भान आपल्याला दिले आहे.

डॉ. मनोज पाथरकर manojrm074@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2018 1:56 am

Web Title: george orwell speech translation broadcast on bbc in april 1941
Next Stories
1 बुकबातमी : अनुवादित पुस्तकांचं ‘बुकर’..
2 सार्वत्रिक हिंसेची चिकित्सा
3 ‘नक्षल/माओवादोत्तर’ लोकशाहीकडे..
Just Now!
X