श्रीरंजन आवटे

अकादमिक क्षेत्रातील बुद्धिवंत आणि स्वयंसेवी संस्थांतील कार्यकत्रे यांनी कुटुंब, पितृत्व, स्थलांतर, विकास, िहसा अशा मुद्दय़ांच्या चौकटीत ‘पुरुषत्वा’ची केलेली उकल या पुस्तकात वाचायला मिळते..

यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे ब्रीदवाक्य होते : ‘बेटर द बॅलन्स, बेटर द वर्ल्ड’- अर्थात, चांगल्या प्रकारचे संतुलन असेल तर अधिक सुंदर जग आपल्याला लाभू शकते. स्त्री-पुरुष समतेबाबत दरवर्षीचे ब्रीदवाक्य आणि समकालीन परिस्थिती समजून घेणे हे कोणत्याही चिकित्सक संशोधकापुढील मनोवेधक आव्हान असते. हे आव्हान पेलण्यासाठी पुरुषत्वाच्या विविध छटा, रूपे लक्षात घ्यावी लागतात. नुकतेच या अनुषंगाने ‘ग्लोबल मॅस्क्युलिनिटीज् : इन्टरोगेशन्स अ‍ॅण्ड रीकन्स्ट्रक्शन्स’ हे प्रा. मंगेश कुलकर्णी यांनी संपादित केलेले पुस्तक आज अनेक संदर्भात महत्त्वाचे आहे. मानववंशशास्त्र, धर्मशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध, सार्वजनिक आरोग्य ते मज्जाजैविकी (न्यूरोबायोलॉजी) असा प्रचंड आंतरविद्याशाखीय आवाका असलेल्या या पुस्तकात ‘पुरुषत्वा’चा धांडोळा घेतला आहे. संपादकीय प्रस्तावना आणि १३ संशोधनपर प्रकरणांमधून अगदी महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्य़ातील आदिवासी जमातीतील पुरुषत्वापासून आशिया, आफ्रिका, युरोप, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया या खंडांतील पुरुषत्वाचे एक वैश्विक कोलाजच रेखाटले आहे.

पहिल्याच प्रकरणात नोलवाझी मखवांझी यांनी दक्षिण आफ्रिकेतील खोसा भाषा बोलणाऱ्या समाजातील मुलांचा पुरुषत्वाकडे होणारा प्रवास समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या समाजातील सुंता करण्याच्या प्रथेतून पितृसत्ताक पुरुषत्व कसे बिंबवले जाते, याबाबत सुमारे दीड दशकभर संशोधन करून समोर आलेल्या माहितीच्या आधारे मांडणी केली आहे. आरोग्याबाबतच्या शास्त्रीय मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून पारंपरिक सुंता कायदा २००१ साली अस्तित्वात आला, तरीही या प्रथेचा गैरवापर होत राहिला आणि पुरुषत्वाची रूढ चौकट भंगली नाही, या निष्कर्षांप्रत मखवांझी येतात. दुसऱ्या प्रकरणात संजीव उप्रेती यांनी सांस्कृतिक धारणा, सामाजिक संरचना आणि कायदा यांमार्फत पुरुषप्रधान व्यवस्था कशी दृढ होते, हे काठमांडू (नेपाळ) येथील न्यायालये, स्वयंसेवी संस्था, पोलीस ठाणी आणि माध्यमे यांच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तींकडून मिळविलेल्या माहितीच्या आधारे स्पष्ट केले आहे. तिसऱ्या प्रकरणात हॅना राइट यांनी पुरुषत्वाच्या बदलत्या रूपांमधून व दृष्टिकोनांतून संघर्षांस प्रतिबंध होऊ शकतो काय, याबाबत केल्या गेलेल्या पाच खंडांमधील विविध प्रयत्नांचा आढावा घेतला आहे. स्त्रीवादी सद्धांतिक मांडणीतून आणि चळवळीतून संघर्ष प्रतिबंध आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी निर्माण झालेल्या विपुल साधनसामग्रीचा ऊहापोह करून तिच्या काही मर्यादाही त्यांनी दाखवून दिल्या आहेत. शशिश कमल या बांगलादेशी संशोधकाने संख्यात्मक आणि गुणात्मक संशोधन पद्धतींचा वापर करून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे हिंसक वर्तन कसे आकाराला येते, हे चौथ्या प्रकरणात स्पष्ट केले आहे.

सॅन्डी रक्सटन, मार्टिन रॉब, ब्रिड फेदरस्टन आणि मायकेल वॉर्ड यांनी सहलेखन केलेल्या पाचव्या प्रकरणात तरुण मुलांवरील समवयस्कांचा प्रभाव तसेच ‘रोल मॉडेल्स’ आणि मार्गदर्शक यांची पुरुषत्वाच्या जडणघडणीतील भूमिका यांबाबत विवेचन केले आहे. सहाव्या प्रकरणात बॅरन ओरॉन आणि अ‍ॅलिस वेलबॉर्न यांनी मज्जाजैविकीय परिप्रेक्ष्यातून लिंगभेदाधारित हिंसाविषयक जाणीवजागृती करण्यासाठी कारमोजा (युगांडा) इथे नऊ महिने चाललेल्या प्रशिक्षण कार्यशाळेतून समोर आलेल्या तथ्यांच्या अनुषंगाने मांडणी केली आहे. प्रशिक्षणार्थीमध्ये सुरक्षिततेबाबतचे आश्वासक भान, हिंसामुक्त सहजीवनाचा स्वीकार, जी कामे स्त्रियांची समजली जातात अशा कामांमध्ये पुरुषांचा वाढता सहभाग आणि राजकीय साक्षरता यांचा परिपोष झाल्याचे आढळले. सातव्या प्रकरणात प्रबू दीपन आणि लिझल लूट्स यांनी आफ्रिकेतील बुरुंडी, रिपब्लिक ऑफ कॉन्गो आणि रवांडा या भागातील १,२३३ लोकांचा अभ्यास करून धर्म, लिंगाधारित हिंसा आणि पुरुषत्व यांतील संबंधांचा वेध घेतला आहे. मुक्तिप्रवण धर्मशास्त्राद्वारे या भागातील पुरुषत्वाची विधायक फेररचना करण्यासाठी त्यांनी उपाययोजना सुचविल्या आहेत. पुढील प्रकरणात मायकेल फ्लड यांनी स्त्रियांच्या विरोधातील हिंसेचा प्रतिबंध करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची मूलगामी चिकित्सा केली आहे आणि त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी मोलाचा सल्ला दिला आहे.

साना कॉन्ट्रॅक्टर, श्रीती शाक्य, महेंद्र कुमार आणि सतीश सिंग यांनी लिहिलेल्या नवव्या प्रकरणाचा रोख मध्य प्रदेशमधील गर्भनिरोधनाच्या साधनांच्या वापरातील पुरुषांच्या सहभागावर आहे. गर्भनिरोधनाची व कुटुंबनियोजनाची जबाबदारी ही केवळ स्त्रीची आहे अशा प्रकारचा अलिखित नियमच असावा, अशी अवस्था असल्याने या संदर्भात पुरुषांचा सहभाग वाढावा तसेच पूरक धोरणात्मक बदलही केले जावेत, अशी आग्रही भूमिका या अभ्यासकांनी मांडली आहे. दहाव्या प्रकरणात स्नेहा मक्कड आणि मीरा सद्गोपाल यांनी महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्य़ातील पुरुष दाईंच्या भूमिकेची मांडणी केली आहे. दुर्गम भागात कोणत्याही सोयीसुविधा नसताना या दाईंचे प्रसूतीच्या वेळेला लाभणारे साहाय्य महत्त्वाचे ठरते. महिला दाईंसोबत सहकार्य करून पुरुष दाई ‘पारंपरिक पुरुषीपणा’ची चौकट मोडतात. ११ व्या प्रकरणात सरजन दुसानिक यांनी बोस्निया आणि हझ्रेगोविना येथील पितृत्वाच्या नव्या संकल्पनांसंदर्भात कोणत्या प्रकारच्या संधी आणि आव्हाने निर्माण झाली आहेत, याविषयी विश्लेषण केले आहे. १२ व्या प्रकरणात व्हॅलेन्टिना उतारी यांनी उच्च शिक्षण घेण्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये गेलेल्या पत्नीसोबत तेथे वास्तव्य करणाऱ्या इंडोनेशियातील पुरुषांच्या पुरुषत्वाच्या धारणा आणि घरकामातील त्यांचा सहभाग यांतील बदलांचा आढावा घेतला आहे. अखेरच्या प्रकरणात २० ते ५९ वर्षे या वयोगटातील सुमारे पाच कोटी पुरुषांचे आरोग्य जपण्यासाठी २००९ साली ब्राझीलने स्वीकारलेल्या धोरणाची एदुआर्दो श्वार्झ आणि डॅनियल कोस्टा लिमा यांनी सविस्तर चर्चा केली आहे.

या पुस्तकातून पुरुषत्वाच्या अभ्यासाची सद्धांतिक चौकट अधिक विस्तृत करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. आर. डब्लू. कॉनेल यांनी मांडलेल्या ‘प्रभुत्वशाली पुरुषत्व’ व ‘पितृसत्ताक लाभांश’ या संकल्पना, मायकेल किमेल यांनी वर्णिलेले पुरुषांचे सत्तेसोबतचे अंतर्विरोधपूर्ण संबंध, मृणालिही सिन्हा यांचे ‘वासाहतिक पुरुषत्व’विषयक भेदक विश्लेषण, एरिक अ‍ॅण्डरसन यांनी केलेला ‘समावेशी पुरुषत्वा’संबंधीचा विवाद्य दावा.. अशा वैचारिक पाश्र्वभूमीवर प्रत्यक्ष अनुभवजन्य अभ्यासातून हे लेखन केले गेले आहे. प्रा. मंगेश कुलकर्णी यांनी संपादकीय प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे, जगड्व्याळ पितृसत्तेविरुद्ध लढण्यासाठी दुहेरी रणनीतीची आवश्यकता या पुस्तकातून मांडली आहे. ती रणनीती अशी : पुरुषी धुरीणत्वाची सतत चिकित्सा करणे आणि आबालवृद्ध पुरुषांचा सहभाग मिळवून लिंगभाव समानतेच्या दिशेने मार्गक्रमण करणे. सिद्धांत आणि व्यवहार या दोन्ही पातळ्यांवर सक्रिय राहण्याची निकड यातून अधोरेखित होते.

या पुस्तकात अकादमिक क्षेत्रातील बुद्धिवंत आणि स्वयंसेवी संस्थांतील कार्यकत्रे यांनी कुटुंब, पितृत्व, स्थलांतर, विकास आणि िहसा अशा बहुविध घटितांच्या संदर्भात आंतरविद्याशाखीय परिप्रेक्ष्यातून पुरुषत्वाची उकल केली आहे. लिंगभावात्मक न्यायावर आधारित समाज-उभारणीस उपकारक मार्गदर्शनही या अभ्यासकांनी सादर केले आहे. ‘चिकित्सक पुरुष-अभ्यास’ या विद्याशाखेच्या प्रमुख संस्थापक प्रा. रेविन कॉनेल यांनी प्रास्ताविकात म्हटल्याप्रमाणे संशोधन आणि कृतिशीलता यांचा मिलाफ हे या पुस्तकाचे बलस्थान होय.

‘ग्लोबल मॅस्क्युलिनिटीज् : इन्टरोगेशन्स अ‍ॅण्ड रीकन्स्ट्रक्शन्स’

संपादन : डॉ. मंगेश कुलकर्णी / रिमझिम जैन

प्रकाशक : रूटलेज

पृष्ठे: २६५, किंमत : ६९५ रुपये

shriranjan91@gmail.com