माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांची बलस्थाने सांगणारे हे पुस्तक, ते कोठे कमी पडले हेही नोंदवते..

‘बाबरी मशीद उद्ध्वस्तीकरणानंतर सोनिया गांधी यांच्या निवासस्थानावर तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी गुप्तवार्ता विभागाकरवी पाळत ठेवली होती’ या बातमीमुळे गेल्या दहा दिवसांत चर्चेत आलेले ‘हाफ-लायन’ हे विनय सीतापती लिखित पुस्तक गेल्याच आठवडय़ात समारंभपूर्वक प्रकाशित झाले. या पुस्तकाची चर्चाही बरीच झाली. ती पुढेही काही दिवस होत राहील. असे का, याची कारणे तीन.

sunil tatkare and ajit pawar devendra fadnavis morning oath
अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीवर सुनिल तटकरेंचा मोठा खुलासा; म्हणाले, “आम्ही दोन्ही…”
Jayant Patil on Ajit Pawar comparision to Modi- Shah
‘तुलना कुणाशी करायची, याचं भान…’, अजित पवारांच्या ‘त्या’ दाव्यानंतर जयंत पाटील यांचा टोला
Sharad pawar on loksatta agralekh
“मी फक्त लोकसत्ताचा अग्रलेख वाचला”, अजित पवारांच्या ‘त्या’ पत्रावरून शरद पवारांचा खोचक टोला, काय लिहिलंय अग्रलेखात?
What Jitendra Awhad Said?
“…तर अजित पवार शरद पवारांच्या पायाशी येऊन बसतील”, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य

पी. व्ही. नरसिंह राव यांच्या या राजकीय चरित्रातील अधिक वादग्रस्त ठरणारा भाग (‘मॅनेजिंग सोनिया’ आणि ‘द फॉल ऑफ बाबरी मस्जिद’ या प्रकरणांत येणारा) ‘इंडियन एक्स्प्रेस’ने आधी छापलेला असल्याने त्याहून अधिक या पुस्तकात काय आहे याचेच औत्सुक्य वाचकांना असणार, हे पहिले कारण. राव हे देशात मूलगामी बदल (‘ट्रान्स्फॉर्मेशन’) घडवून आणणारा कारक घटक कसे होते अशी या पुस्तकाची मांडणी आहे, हे दुसरे कारण. तिसरे कारण असे की, तपशिलांचे नावीन्य अगदी कित्येक पानात असले, तरी एकंदर माहिती नवीन नाही.. गुप्तवार्ता विभागाने राव यांनाच पुरवलेल्या माहितीचे कागद किंवा राव यांचे ज्योतिषी (!) एन. के. शर्मा तसेच त्यांचे खासगी डॉक्टर के. श्रीनाथ रेड्डी यांच्या मुलाखतींमधून मिळालेला तपशील अगदी नवा आहे, तो ठिकठिकाणी येतो. त्यामुळे ‘नोव्हेंबर १९९२ या (बाबरी उद्ध्वस्तीकरणापूर्वीच्या) महिन्याभरात तत्कालीन संघप्रमुख बाळासाहेब देवरस यांच्याशी राव यांचे दूरध्वनी संभाषण अनेकदा झाले होते’ यासारखा तपशीलही महत्त्वाचाच ठरतो.

या पुस्तकातील अनेक गुपिते नवी नाहीत. विश्वासदर्शक ठराव राव यांनी कसे जिंकले, सोनिया गांधींशी नेहमी चर्चा करून विरोधकांचा टीकाविषय ठरलेले राव पुढे या सत्ताकेंद्रापासून कसे दूर गेले या घडामोडी २० ते २५ वर्षांपूर्वीच्या असल्याने अनेकांना आठवतही असतील. बाबरी मशीद पाडली जाईपर्यंत उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री कल्याण सिंह (भाजप) यांचे सरकार होते आणि तेथे राष्ट्रपती राजवट आधीच लादण्याचा पर्याय राव यांनी दूरच ठेवला होता, हेही उघडच आहे. बाबरी मशिदीच्या प्रकरणात राव यांचा धर्मनिरपेक्षतावाद आणि भाजपशी त्यांचे संबंध यांबद्दलचा तपशील (पान २३८-२३९) येतो, तो राव यांनीच लिहिलेल्या पुस्तकातही त्यांचे चिंतन म्हणून किंवा काँग्रेसजनांवरील त्यांचा टीकेचा सूर म्हणून आला असला, तरी येथे सलमान हैदर (तत्कालीन परराष्ट्र सचिव) यांचे एक निरीक्षण लेखक नोंदवतो : भारताच्या जातीय ताण्याबाण्यांची चांगली जाण राव यांना होती. नेहरू यांच्याप्रमाणे या देशाकडे व्यक्तींनी बनलेले राष्ट्र म्हणून न पाहता, जाती आणि धर्माचा महासंघ म्हणून पाहण्याची राव यांची दृष्टी होती. राव यांचे ब्राह्मण असणे, भाजपच्या जवळचे असल्याचा आरोप वारंवार करीत काँग्रेसजनांनी त्यांना पेचात पकडणे हे सारे तपशीलही आहेतच, पण त्यांना भेदून असे एखादे वाक्य लक्षात राहणारे ठरते.

राव यांचे ज्योतिषी शर्मा हे त्यांचे सल्लागार होते, असे या पुस्तकातून उलगडते. शर्मा यांनी भाकीत केले आणि ते खरेच ठरले, असा कोणताही दावा पुस्तकात नाही. शर्मा स्वत: मी हे भाकीत केले असे सांगतात, पण त्यांनी जे सांगितले ते सांगायला ज्योतिषाची गरज नव्हतीच! उदाहरणार्थ, ‘सत्ता जाताच आज भोवती असणारे काँग्रेस नेतेही तुम्हाला विसरतील व तुम्ही अधिक अडचणीत याल’ हे भाकीत. तरीही शर्मा तसेच डॉक्टर रेड्डी यांना लेखकाने भरपूर बोलते केल्यामुळे राव यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडण्यास मदत होते. राव हे बाबरी मशीद पाडण्यात आल्याच्या दिवशी काय करीत होते हे डॉक्टर सांगतात. अधिकृत निवासस्थान सोडताना, ‘पुस्तके नीट बांधा’ असे राव म्हणतात आणि ती बांधाबांध नीट झाली आहे ना याची खात्री करतात! तर, विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदारांना ‘व्हिटामिन एम’ दिले, अशी कबुलीच शर्मा देतात. याच प्रकरणी खटला चालून, झामुमोचे खासदार दोषी ठरल्यानंतर ही कबुली आल्यामुळे तिचे काही महत्त्व नसले, तरी ज्योतिषांना या बाबी त्या वेळीही माहिती होत्या, असे वाचकांना समजते.

एकीकडे अमेरिकेच्या अध्यक्षांशी अण्वस्त्र प्रसारबंदी करार (एनपीटी) र्सवकष अणुचाचणी बंदी कराराबद्दल (सीटीबीटी) चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असतानाच १९ डिसेंबर १९९५ रोजी अणुस्फोट चाचणी घडवून आणण्याचे ठरविले होते. ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये त्याआधी ‘भारतात संशयास्पद हालचालींची अमेरिकी उपग्रहांची माहिती’ अशी बातमी छापून आली आणि या चाचण्या बारगळल्या. पण चर्चा सुरू ठेवून दुसरीकडे ‘एक धक्का और दो’ पद्धतीने चाचणी अणुस्फोट घडवायचा आणि ‘अण्वस्त्रसज्ज देश’ म्हणून मान्यता मिळवायची, हा राव यांचा इरादा होता. यातून राव यांच्या कार्यपद्धतीवर- किंवा ‘कार्यभाग साधण्याच्या पद्धतीं’वर प्रकाश पडतो.

या पुस्तकाची पहिली जवळपास साठ-सत्तर पाने राव यांची हैदराबाद संस्थानातील जडणघडण, ते आंध्र प्रदेशाचे ‘कठपुतळी मुख्यमंत्री’ झाले तेव्हाचा कालखंड याबद्दल आहेत. पुढे दिल्लीदरबारी १९७५ पासून ते कसे रुजू झाले याबद्दलच्या प्रकरणात राजीव गांधी यांच्या कालखंडात त्यांना परराष्ट्रमंत्रिपदाचा कालखंडही येतो. श्रीलंकेत शांतिसेना पाठविण्याच्या धोरणाला उघडपणे अजिबात विरोध न करता, खासगीत मात्र ते या धोरणाच्या विरुद्धच बोलत राहिले हे सांगून लेखक मत नोंदवतो : अयोध्या आणि श्रीलंका या दोन्ही प्रकरणांत चूक काय व बरोबर काय हे राव यांना माहीत होते. पण आपल्या मते काय बरोबर आहे हे राव यांनी कधीच उघड केले नाही. राजीव गांधींच्या कालखंडात राव हे अर्थव्यवस्थेबद्दल पंतप्रधानांपेक्षा अतिसावध भूमिका घेणारे होते. पण याच राव यांनी पुढे स्वत: पंतप्रधान झाल्यावर बदल घडवून आणले.

आर्थिक कामगिरी, अणुतंत्रज्ञान यांबद्दलची प्रकरणे राव यांना श्रेय देणारी आहेत. मात्र एकंदर पुस्तकाचा सूर राव आणखी काही करू शकले असते, पण अर्जुनसिंह यांच्यासारख्या काँग्रेसजनांनी त्यांना ते करू दिले नाही, असा आहे. राव यांची बलस्थाने सांगताना ते कुठे कुठे कमी पडले याची नोंदही हे पुस्तक करतेच. परंतु या पुस्तकाचे प्रकाशन अशा वेळी झाले आहे की, बाबरी ज्या राज्यात होती तो उत्तर प्रदेश जिंकण्यासाठी पुन्हा धार्मिक भावना भडकावणे सुरू झाले आहे. अशा स्थितीत या पुस्तकाचा राजकीय तोटा कोणाला होणार, याची चिंता काँग्रेसजनांनी तरी करायला हवी.

 

हाफ लायन- हाउ पी. व्ही. नरसिंह राव ट्रान्स्फॉर्म्ड इंडिया

लेखक : विनय सीतापति

प्रकाशक : पेंग्विन व्हायकिंग

पृष्ठे : ३९२, किंमत : ६९९ रुपये