News Flash

परीकथांचं गारूड..

कल्पनेतूनच सृजनशीलता आकारास येते आणि सृजनशीलतेतून नवनिर्मिती होते.

हान्स अँडरसन यांचा हा डेन्मार्कमधील पुतळा पूर्णत खेळण्यातील ‘लेगो’ ठोकळय़ांनी बनवला गेला आहे.

हान्स अँडरसनच्या परीकथांची मोहिनी आजही या ना त्या प्रकारे आहेच..  दोनशे वर्षांपूर्वीच्या या परीकथा-लेखकाची आठवण आजच्या आंतरराष्ट्रीय बाल वाङ्मय दिनीनिघत असताना, परीकथांची जादू  एकविसाव्या शतकातही कायम ठेवणाऱ्या  हॅरी पॉटरचीही आठवण निघणं स्वाभाविक आहे..

मनुष्याचा स्वभाव हा मुळात कल्पनाविलासी असतो. या स्वभावगुणामुळेच मानव अन्य सजीवांपासून वेगळा ठरतो. कल्पनेतूनच सृजनशीलता आकारास येते आणि सृजनशीलतेतून नवनिर्मिती होते. अगदी सुरुवातीच्या मानवानेही कल्पना आणि तर्कबुद्धी यांच्या संयोगातून चाकाची निर्मिती केली, दगडांची हत्यारं बनवली आणि अंगावर पांघरण्यासाठी वस्त्रं, वल्कलं तयार केली. मानवाचं कल्पनाविश्व अफाट आहे. त्याला सीमा नाहीत. म्हणूनच कोणे एके काळी मानवाने चंद्रावर पोहोचण्याची कल्पना केली. या कल्पनेचा विस्तार झाला, मग तो विचार बनला आणि त्या विचाराने प्रेरित होऊन मानवाने चंद्रावर पोहोचण्याइतपत सामथ्र्य प्राप्त केलं. कल्पना करण्याची ही शक्ती निसर्गदत्त आहे. जन्माला आलेल्या बाळाला काही दिवसांतच भोवतालच्या सृष्टीतील वेगवेगळय़ा गोष्टींची समज होऊ लागते. आसपासच्या परिस्थितीला त्याचा मेंदू झपाटय़ाने ग्रहण करत जातो आणि त्यासोबतच त्याची विचारशक्ती वाढत जाते. लहानपणीच या विचारांना खतपाणी मिळतं ते घरातल्या आजीआजोबांनी किंवा आईबाबांनी सांगितलेल्या गोष्टींचं. अगदी राजाराणीपासून पशुपक्ष्यांपर्यंत आणि परीपासून देवापर्यंतच्या अनेक गोष्टी लहानपणी त्याच्या कानावर पडतात. या काल्पनिक कथा त्याच्या विचारांत मुरत जातात आणि त्याचं स्वत:चं कल्पनाविश्व उभारी घेऊ लागतं. थोडक्यात सांगायचं तर परीकथा किंवा ज्याला इंग्रजीत ‘फेअरी टेल्स’ म्हणतात, त्या लहान मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देतात, आकार देतात.

हे सगळं आज सांगण्याचं कारण म्हणजे, आज २ एप्रिल- आंतरराष्ट्रीय बालवाङ्मय दिन. अवघ्या जगावर परीकथांचं गारूड पांघरणारे थोर साहित्यिक हान्स ख्रिस्टियन अँडरसन (१८०५-१८७५) यांचा हा जन्मदिवस. खरं तर नावानिशी हा साहित्यिक फार कुणाला आठवणार नाही. पण त्यांनी लिहिलेल्या परीकथांची नावं उच्चारताच त्यातील प्रत्येक पात्र डोळय़ांसमोर जिवंत होईल. ‘द लिटल मरमीड’,‘ स्नो क्वीन’, ‘द नायटिंगेल’ अशा अनेक परीकथांतून कल्पनांचं अफाट जग अँडरसन यांनी निर्माण केलं. अँडरसन यांच्या आधीही काही लेखकांनी आपल्या लहानपणी ऐकलेल्या गोष्टींना लिखित स्वरूप देऊन त्या पुनर्जीवित केल्या होत्या. पण अँडरसन यांच्या अनेक परीकथा त्यांच्या स्वत:च्या कल्पनेतून साकार झालेल्या होत्या. लहानपणी ऐकलेल्या, वाचलेल्या कथांमधील पात्रांतून प्रेरणा घेऊनही त्यांनी नवीन परीकथा लिहिल्या. त्यांच्या या परीकथांचं जगभर गारूड इतकं की, मूळ डॅनिश भाषेतील या कथा तब्बल १२५ भाषांत रूपांतरित झाल्या. ‘द अग्ली डकलिंग’ ही त्यांची कथा आपल्यापैकी अनेकांना माहीत नसेल.. मात्र, त्यावर ग. दि. माडगूळकरांनी रचलेलं ‘एका तळय़ात होती..’ हे गीत आजही अनेकांना तोंडपाठ असेल. अँडरसन यांच्या अशा अनेक कथा गेल्या जवळपास दोन शतकांपासून जगभरातील लहान मुलांच्या कल्पनाविश्वावर अधिराज्य गाजवून आहेत. अँडरसन यांच्या कथांनी पुढे अनेक लेखकांना प्रेरित केलं. या कथांमधील पात्रं पुढे इतर लेखकांनी आपल्या परीकथांतून जिवंत ठेवली. एवढंच नव्हे तर त्यावर चित्रपट, नाटिका, गाणी, अ‍ॅनिमेशनपटही तयार झाले. त्यापैकी ‘द लिटल मरमेड’ हा अ‍ॅनिमेशनपटांच्या दुनियेतील मैलाचा दगड ठरला.

अँडरसन यांच्या कथांची मोहिनी आजही मनामनांवर कायम आहे. असंच काहीसं गारूड अलीकडच्या काळात ‘हॅरी पॉटर’ने केलं. जे. के. रोलिंग या ब्रिटिश लेखिकेच्या कल्पनेतून साकार झालेल्या या व्यक्तिरेखेनं साहित्यविश्वातील अनेक विक्रम मोडीत काढले, नवीन इतिहास घडवला. जादूचं शिक्षण देणाऱ्या एका काल्पनिक विद्यापीठात घडणाऱ्या या कथासूत्रांतून रोलिंग यांनी सात पुस्तकं लिहिली. या सातही पुस्तकांनी केवळ लहान मुलांनाच नव्हे तर मोठय़ांनाही वेड लावलं. जादूचं प्रशिक्षण देणारं विद्यापीठ, तेथील चित्रविचित्र माणसं, हवेत उडणारा झाडू आणि अतिशय भयावह दिसणारा खलनायक यांनी कल्पनेच्या जगाला आणखी एका उंचीवर नेलं. कहाणीतील दैत्याच्या वा खलनायकाच्या शक्तीचा एक अंश आपल्या शरीरात घेऊन मोठा झालेला हॅरी पॉटर या विद्यापीठात दाखल होतो येथपासून त्या खलनायकाचा नायनाट करतो इथपर्यंतची प्रत्येक कथा पुन:पुन्हा वाचावीशी वाटणारी. या पुस्तकमालिकेतून निर्मिती करण्यात आलेले आठही चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरले. याच मालिकेतील नवीन पुस्तक येत्या जुलैमध्ये येऊ घातलं आहे. रोलिंग यांच्यासोबत जॅक थॉर्न आणि जॉन टिफनी यांनी एकत्रितपणे लिहिलेल्या ‘हॅरी पॉटर अ‍ॅण्ड द कर्सड् चाइल्ड’ (ऌं११८ ढ३३ी१ ंल्ल ि३ँी उ४१२ी िउँ्र’)ि या पुस्तकाच्या दोन्ही भागांची विक्रीपूर्व नोंदणी आधीच सुरू झाली आहे. ‘मिनिस्ट्री ऑफ मॅजिक’मध्ये कामाच्या बोज्याखाली दबल्या गेलेल्या हॅरी पॉटरला भूतकाळातील कटू स्वप्नं अजूनही छळत आहेत. तर दुसरीकडे, ‘हॅरी पॉटरचा मुलगा’ अशा ओळखीमुळे अपेक्षांच्या ओझ्याखाली दबला गेलेला त्याचा लहान मुलगा अल्बस स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी झगडत आहे. अशा १९ वर्षांच्या काळानंतरचा कथापट रंगवणारं हे पुस्तक आहे.

अँडरसन यांच्या परीकथा असोत की रोलिंग यांच्या ‘पॉटर’कथा असोत, या गोष्टी लहान मुलांकडे बघून रचल्या गेल्या. मात्र, केवळ लहानच नव्हे तर मोठय़ांनीही त्या डोक्यावर घेतल्या. कल्पनेच्या जगात मानवी मन प्रफुल्लित होतं, उत्तेजित होतं, रमतं, ही यामागची कारणं. लहान वयात भवतालच्या जगाचं विकृत रूप आणि वास्तव भान समजण्याची गरज नसते. त्यामुळे आसपासच्या प्रत्येक गोष्टी आपल्या मनासारख्याच निर्मळ आणि स्पष्ट वाटत असतात. मोठेपणी हे भान मनातला ओलावा कमी करतं. आसपासची कोणतीही गोष्ट, कितीही स्वच्छ असली तरी धूसर वाटते. प्रत्येक घटनेभोवती संशयाचं वलय उभं राहतं आणि या साऱ्यांतून मनाचाच कोंडमारा होतो. हा कोरडेपणा परीकथा कमी करतात. म्हणूनच अशा कथांचं गारूड यापुढेही कायम राहणार आहे.

asif.bagwan@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 2, 2016 6:00 am

Web Title: hans andersens fairy tales harry potter
Next Stories
1 विविधांगी लेखकाचे स्मरण
2 विकासपुरीचा मुकाबला..
3 ‘ग्रंथरूपी उरलेले’ अँडी ग्रोव्ह..
Just Now!
X