22 January 2019

News Flash

इतिहासाचा भाष्यकार

प्रा. व्हाइट यांच्यावर दक्षिण अमेरिकेपासून उत्तर भारतातील विद्यापीठीय वर्तुळांपर्यंत टीका सुरू झाली.

प्रा. हेडन व्हाइट

इतिहासलेखनाचा इतिहास लिहून, ‘इतिहास सत्य मांडतो’ या समजाला साधार शह देणारे प्रा. हेडन व्हाइट यांच्यावरील हा स्मृतिलेख, त्यांच्याकडून शिकण्याची संधी म्हणजे काय हेही सांगणारा..

प्रा. हेडन व्हाइट  यांचं ५ मार्च रोजी अमेरिकेतल्या राहत्या घरी निधन झालं आणि जाणिवांच्या इतिहासातलं एक महत्त्वाचं व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेलं. ८९ वर्षांच्या समृद्ध आयुष्यात प्रा. व्हाइट यांनी १९६६ पासून ‘द बर्डन ऑफ हिस्टरी’, ‘मेटाहिस्टरी’ आणि ‘द फिक्शन ऑफ नॅरेटिव्ह’ यांसारखी अनेक महत्त्वपूर्ण पुस्तकं लिहिली. मुळात समीक्षाशास्त्राचे प्राध्यापक असणारे प्रा. व्हाइट हे ‘जाणिवांचा इतिहास’ या अमेरिकेतही अभिनव मानल्या गेलेल्या ज्ञानशाखेत सेवानिवृत्तीपर्यंत रमले. याचं कारण त्यांनी केलेल्या साहित्य आणि इतिहासाच्या चिकित्सेमध्ये सापडतं. इतिहास आणि साहित्य यांमध्ये अनेक पातळ्यांवर एकत्व असल्याचं काहीसं खळबळजनक प्रतिपादन त्यांनी केलं होतं. यामुळे इतिहासाच्या अंताचं दु:स्वप्न दाखवणाऱ्या उत्तराधुनिक विचारवंतांच्या कथनाला बळ मिळतंय की काय, असा संशय निर्माण झाला आणि प्रा. व्हाइट यांच्यावर दक्षिण अमेरिकेपासून उत्तर भारतातील विद्यापीठीय वर्तुळांपर्यंत टीका सुरू झाली.

मुळात १९७३ साली त्यांचं ‘मेटाहिस्टरी- द हिस्टॉरिकल इमॅजिनेशन इन नाइन्टीन्थ सेंच्युरी युरोप’ हे इतिहासलेखनाच्या इतिहासाची चिकित्सा करणारं पुस्तक प्रसिद्ध झालं. त्यात त्यांनी इतिहासाचं कथन करण्यासाठी कसकशा क्लृप्त्या आणि तंत्रं वापरली जातात याचे ठोकताळे मांडले होते. ‘पूर्वी होऊन गेलेल्या संरचना आणि प्रक्रिया कशा होत्या हे समजावून सांगण्यासाठी शब्दांच्या साहाय्यानं पुन्हा साकारलेल्या नव्या संरचना म्हणजे ऐतिहासिक ग्रंथ’ अशी काहीशी गुंतागुंतीची मांडणी त्यांनी केली. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर, भूतकाळात घडल्या असतील त्याही संरचनाच आणि नव्यानं केलेली त्यांची मांडणी हीसुद्धा संरचनाच, असं गतकालीन वास्तवाला आणि इतिहासाच्या आत्ता केलेल्या कथनाला त्यांनी एकाच पारडय़ात तोललं. त्याचं नीट आकलन न करून घेता ढोबळ पातळीवर त्यांच्या टीकाकारांनी प्रा. व्हाइट हे इतिहासाला कल्पित ललित (फिक्शन) साहित्याच्या पातळीवर आणत आहेत, अशी टीका सुरू केली. पण तरीही इतिहासलेखनाचा इतिहास मांडणारं हे पुस्तक लोकप्रिय झालंच.

वास्तविक पाहता प्रा. व्हाइट हे काही अराजकतावादी किंवा उत्तराधुनिकतेच्या हव्यासापोटी अतिसापेक्षतावादी असणारे इतिहासकार नव्हते. ‘इतिहास’ आणि ‘स्मृती’ यांविषयी २००१ साली त्यांनी बुडापेस्टच्या सेंट्रल युरोपिअन युनिव्हर्सिटीमध्ये एक अभ्यासक्रम घेतला होता. त्यानिमित्त मला त्यांची विद्यार्थिनी म्हणून पूर्व युरोपातल्या सहपाठींसोबत त्यांच्या कल्पना समजून घेण्याची संधी मिळाली. या अभ्यासक्रमात त्यांनी फ्रेंच तत्त्वज्ञ पिअरे नोरा यांच्या स्मृतीविषयक अभ्यासाच्या साहाय्याने इतिहासलेखनातील स्मृतींचं महत्त्व अधोरेखित केलं. गतकाल, त्याचे आपल्या मनावर उमटलेले ठसे- म्हणजेच स्मृती आणि त्या स्मृतींची आपण आपापल्या आकलनानुसार केलेली पुनर्रचना म्हणजे इतिहास, असे तीन टप्पे त्यांनी मांडले होते. इथंही इतिहास ही एक रचना (कन्स्ट्रक्ट) आहे, हा मूलभूत विचार होताच. ‘पुरावे नाहीत तर इतिहास नाही’ अशा गृहीतावर आधारित जर्मन विचारवंत लिओपोल्ड फॉन रांके यांच्या संप्रदायाच्या मुशीत इतिहासाचे धडे गिरवलेली मी एकटीच नव्हते. आमच्या वर्गातील अनेक इतिहास शिक्षक आणि संशोधकांनी शंका उपस्थित केल्या की, ‘इतिहास ही केवळ रचना असेल, तर ती पूर्ण व्यक्तिनिष्ठ ठरणार आणि हे कसं शक्य आहे? आपापला अन्वयार्थ कदाचित असेलही सापेक्ष; परंतु ऐतिहासिक तथ्यं तर निरपेक्ष आणि वस्तुनिष्ठच असतात ना!’ यावर इतिहासविषयक मूलभूत कल्पनांना धक्का लागल्यामुळे कातावलेल्या आम्हां दहा-बारा विद्यार्थ्यांना ते कॉफीसाठी विद्यापीठाच्या कॅन्टीनमध्ये घेऊन गेले. आणि शांतता ढळू न देता त्यांनी इतिहासात ज्या सत्यांचे दाखले दिले जातात तीदेखील कशी निवडक आणि गरजेनुरूप बेतलेली असतात, हे स्पष्ट केलं. याखेरीज आपल्या मनावर उमटणाऱ्या स्मृतीदेखील सत्याचं जसंच्या तसं दर्शन घडवत नाहीत, हेही त्यांनी स्पष्ट केलं.

घडून गेलेल्या, परंतु अप्रिय अशा काही गोष्टी- जसे की भारताची फाळणी- आपण इतिहासात मांडायचंच टाळतो. भूतकाळात घडलेल्या दुसऱ्या काही गोष्टींची स्मृती अवाच्या सवा प्रमाणात जपली जाते, तर काही गोष्टींची स्मृती फारच तोकडय़ा स्वरूपात जपली जाते. कधी कधी तर ‘अगा जे घडलेचि नाही’ अशा न घडलेल्या गोष्टींचीही आठवण पद्धतशीरपणे निर्माण करून जतनही केली जाते. या स्मृतींच्या विविध रूपांना त्यांनी अनुक्रमे स्मृतिभ्रंश (अ‍ॅम्नेशिया), अतिस्मृती (हायपरअ‍ॅम्नेशिया), स्मृतिक्षय (हायपॉम्नेशिया) आणि कृतकस्मृती (स्यूडोम्नेशिया) अशी नावं दिली होती. या सगळ्या मांडणीचा उद्देश हा होता की, इतिहासाचे दोन्ही मुख्य घटक- म्हणजे तथ्य आणि त्यांचा अन्वयार्थ- हे व्यक्तिसापेक्ष असतात. त्यामुळे परिपूर्ण असा सर्वमान्य आणि वस्तुनिष्ठ इतिहास ही अशक्य गोष्ट आहे.

याखेरीज मुळात तौलनिक भाषाशास्त्रज्ञ असल्याने प्रा. व्हाइट यांनी इतिहासलेखनातील लक्षणा, रूपक, उपहासादी भाषिक कसरतींचाही निर्देश करून इतिहासाचं साहित्याशी असणारं साधर्म्य स्पष्ट केलं होतं. मात्र या सगळ्या इतिहासविषयक जाणिवांना मुळापासून उखडून काढणाऱ्या तत्त्वज्ञानाच्या मंथनानंतरही इतिहासाचं ज्ञानशाखा म्हणून स्वतंत्र अस्तित्व आहे, यावर त्यांचा विश्वास होता. ‘द कंटेन्ट ऑफ द फॉर्म’ या पुस्तकातून आणि इतरत्रही त्यांनी गतकालाचं जे कथन- नॅरेटिव्ह- केलं जातं त्याचं महत्त्व अधोरेखित केलं. इतिहासलेखकाला अभिप्रेत असणाऱ्या अशा गतकालाचं कथन तो किंवा ती करतात तेव्हा त्यांना आजच्या वर्तमानात अभिप्रेत असणारा, त्यांच्या कार्यक्रमपत्रिकेला साजेसा इतिहासच ते आशय आणि अभिव्यक्तीच्या माध्यमातून मांडत असतात, असं त्यांचं सांगणं होतं.

जिअ‍ॅम्बातिस्ता विको या सतराव्या-अठराव्या शतकात होऊन गेलेल्या इटालियन विचारवंताने ‘व्हेरम एस्स् इप्सम् फॅक्टम’ म्हणजे ‘सत्य तेच असतं जे रचलं-घडवलं जातं’ असा विचार मांडला होता. विकोचं वैचारिक नेतृत्व मान्य करणाऱ्या हेडन व्हाइट यांनी इतिहास ही मूलत: एकमेव- अद्वितीय नसलेली, इतर अनेक रचनांसारखीच एक घडीव अशी रचना (कन्स्ट्रक्ट) आहे, हे अधोरेखित केलं. विसाव्या शतकातही इतिहास हा पूर्ण वस्तुनिष्ठ असलाच पाहिजे अशा भाबडय़ा आदर्शाना मानणाऱ्या अनेक इतिहासकारांना साहजिकच प्रा. व्हाइट हे इतिहासात अराजकतावाद आणताहेत अशी भीती वाटली. मात्र तसं काही न होता, विसावं शतक संपताना अकादमिक जगानं आपल्या मर्यादांचा क्षमाशील स्वीकार करायला सुरुवात केली. आणि इतिहास हा पूर्ण वस्तुनिष्ठ कधीच असणार नाही या तत्त्वाचा स्वीकार केला गेला. दरम्यान, भारतातही प्रा. व्हाइट यांच्या श्रेयनिर्देशासहित असेलच असं नाही, परंतु इतिहासलेखनातील वस्तुनिष्ठतेच्या चिलखताला तडे गेलेच. शाहीद अमीन यांचं ‘इव्हेंट, मेटॅफर, मेमरी : चौरी चौरा १९२२- १९९२’, प्राची देशपांडे यांचं ‘क्रिएटिव्ह पास्टस् : हिस्टॉरिकल मेमरी अ‍ॅण्ड आयडेन्टिटी इन वेस्टर्न इंडिया, १७००- १९६०’ किंवा प्रस्तुत लेखिकेचं ‘नॅशनॅलिझम, लिटरेचर अ‍ॅण्ड क्रिएशन ऑफ मेमरी’ अशी अनेक पुस्तकं इतिहासाच्या अनेकवचनी आणि अनेक पदरी आकलनाचे प्रयत्न करू लागली. आजचे अभ्यासक इतिहासाचं आकलन करण्याच्या प्रयत्नात असताना संपूर्ण सत्याला वस्तुनिष्ठ गवसणी घालण्याचं अशक्यप्राय जोखड त्यांना वाहावं लागत नाही, याचं थोडं तरी श्रेय प्रा. हेडन व्हाइट यांना नक्कीच देता येईल.

इतिहासाच्या आकलनाचा विषय निघालाच आहे, तर प्रा. व्हाइट यांच्या एका महत्त्वाच्या योगदानाकडे निर्देश करणं अप्रस्तुत ठरणार नाही. १९७२ मध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठातल्या वर्गात प्रा. व्हाइट काय बोलतात याच्या तपशीलवार नोंदी पोलीस घेत असत. तत्कालीन टोळीयुद्ध व अमली पदार्थविरोधी आणि एकूणच हिप्पीविरोधी कारवाईचा भाग म्हणून पोलीस रीतसर प्रवेश घेऊन विद्यापीठातील वर्गात उपस्थित राहत. सार्वजनिक पैशाचा अपव्यय केला म्हणून लॉस एंजेलिसच्या पोलीसप्रमुखांवर खटला भरून प्रा. व्हाइट यांनी तो सुप्रीम कोर्टापर्यंत चालवला आणि जिंकलेही. तेव्हापासून सबळ पुराव्याशिवाय पोलिसांना अशी टेहळणी करण्यावर कॅलिफोर्निया राज्यात बंदी घातली गेली. जाणिवांच्या इतिहासाचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झालेल्या प्रा. व्हाइट यांची विवेकाची जाणीव तल्लख होती. त्यांच्यापासून इतिहासाच्या अभ्यासकांनी प्रेरणा घेतली तर त्यांची स्मृती निश्चितच चिरंतन टिकेल.

श्रद्धा कुंभोजकर

लेखिका सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात इतिहासाच्या साहायक प्राध्यापक आहेत. shraddha@unipune.ac.in

First Published on March 17, 2018 1:41 am

Web Title: hayden white metahistory