|| नंदा खरे

तीन पिढय़ांच्या उपेक्षित, अवमानित वर्गापासून सुटण्याच्या झगडय़ाची कहाणी सांगणाऱ्या आणि एका उपेक्षित वर्गाचा ‘मला सामावून घ्या!’ हा आक्रोश अमेरिकी समाजाला ऐकवणाऱ्या पुस्तकाविषयीचं हे टिपण..

अन्याय सहन करतच त्याला मनापासून केलेला विरोध वाढत जाणे मला आकर्षित करते. परंतु त्याऐवजी अन्यायकर्त्यांना सामील होण्याची इच्छाही होऊ शकते! असे घडताना दाखवणारे एक आत्मवृत्त वाचनात आले. हे आहे जे. डी. व्हॅन्सचे ‘हिल्बिली एलेजी’! या नावाचा अर्थ आहे : गावंढळाचे शोकगीत!

अमेरिकी संघराज्याच्या (यूएसए) पूर्व किनाऱ्याला समांतर, पण समुद्रापासून काहीशे किलोमीटर आत एक अ‍ॅपॅलाचियन (Appalachian) नावाची पर्वतराजी आहे. तिचा न्यू यॉर्क राज्याच्या दक्षिणेकडचा परिसर ‘अ‍ॅपॅलाचिया’ म्हणून ओळखला जातो. तो लोकवस्तीने विरळ, पण खनिजांमध्ये अत्यंत श्रीमंत आहे. तेथील कोळसा व लोहखनिज वापरून शिकागो- पिट्सबर्ग- डीट्रॉइट हे औद्योगिक क्षेत्र अ‍ॅपॅलाचियाच्या पश्चिमेला घडले आहे. तेथील गंजलेल्या लोखंडाच्या ‘सुकाळा’मुळे त्या क्षेत्राला ‘रस्ट बेल्ट’ (गंजाचा पट्टा!) म्हणतात.

अ‍ॅपॅलाचियन परिसरातील लोक बव्हंशी स्कॉट्स-आयरिश मुळाचे आहेत. त्यांचे पूर्वज काही पिढय़ांपूर्वी इंग्लिश जाच व बेकारीपासून सुटका करवून घेण्यासाठी अमेरिकेत आले. आज आणि गेली पन्नास-पाऊणशे वर्षे ते ‘नशीब काढायला’ अ‍ॅपॅलाचियातून रस्ट-बेल्टमध्ये जात आहेत. परंतु अमेरिकेतील गोऱ्या प्रजेचा हा उपविभाग जरा खास आहे, हे अनेक निरीक्षक नोंदवतात.

रस्ट-बेल्टमध्ये राहतानाही दर मोठय़ा सप्ताहाच्या अंताला ते मूळ अ‍ॅपॅलाचियात ‘गावी’ जातात. हे खूपसे कोकणी लोकांच्या गौरी-गणपतीला ‘गावी’ जाण्यासारखे आहे. महाराष्ट्रात गौरी-गणपतीला जादा बस-रेल्वे गाडय़ा सोडल्या जातात, तर रस्ट-बेल्ट-अ‍ॅपॅलाचिया प्रवास कारने केला जातो, एवढाच काय तो फरक! मूळ अ‍ॅपॅलाचिया डोंगराळ असल्याने या लोकांना ‘हिल्बिली’ अर्थात ‘डोंगरी-गावंढळ’ असे म्हटले जाते.

त्यांची अनेक सांस्कृतिक वैशिष्टय़े निरीक्षक नोंदवतात. हिल्बिली धार्मिक (प्रोटेस्टंट ख्रिश्चन) असतात. ते कुटुंबसंस्थेला अपार महत्त्व देतात. उदाहरणार्थ, इतर अमेरिकेत ‘सन ऑफ अ बिच्’ ही सौम्य शिवी मानली जाते, पश्चिम महाराष्ट्रातल्या ‘च्यायला’सारखी! अ‍ॅपॅलाचियन मात्र ती शब्दश: गांभीर्याने घेतात! यासोबत दोन कुटुंबांमधील भांडणे विकोपाला जाऊन ती पिढय़ान्पिढय़ा टिकून राहणेही आहे. यांपैकी ‘हॅट्फील्ड’ व ‘मॅकॉय’ या दोन कुटुंबांमधले ‘फ्यूड’ (भांडण) अमेरिकी लोकेतिहासाचा भाग झाले आहे. आपण इथे ज्या पुस्तकाचा विचार करतो आहोत (‘हिल्बिली एलेजी’) त्याचा लेखक जे. डी. व्हॅन्स हा आपला या प्रसिद्ध भांडणाशी दूरान्वयाने संबंध असल्याचे गर्वाने सांगतो! हे लोक अत्यंत मानी, मनस्वी आहेत. आपल्या हक्कांवरील अतिक्रमणांचा ते जोमदारपणे विरोध करतात. एक गाय चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्याला आपल्या आजीने कशी बंदुकीने ‘गोळी घातली’ व दुसरी गोळी सुटण्याआधी चोर कसे पळाले, ते लेखक कौतुकाने सांगतो. या घटनेच्या वेळी आजी १४ वर्षांची होती; त्यामुळे ती लेखकाची हिरॉइन झाली!

इतर अमेरिकन मात्र हिल्बिलींकडे कुत्र्याने काटेरी साळूकडे पाहावे तसे पाहतात. त्यांना हिल्बिलींच्या गावंढळपणाचा त्रास होतो. एक हिल्बिली रस्ट-बेल्ट शहरात मध्यवस्तीत कोंबडय़ा पाळत असे आणि गरजेनुसार त्यांना आवारात मारत असे. अर्थातच गैर-हिल्बिलींना हे नकोसे झाले व त्यावरून त्या मोहल्ल्यात भांडण झाले. हिल्बिली बेजबाबदारही समजले जातात. मन लावून काम करणे, विनाकारण गैरहजर न राहणे, वगैरे तथाकथित प्रोटेस्टंट कार्य-नीती (work ethic) ते पाळत नाहीत. हाती पैसे आले तर ते साठवण्याऐवजी, घरा-माणसांची टापटीप वाढवण्याऐवजी हिल्बिलीज् ‘झटॅक’ मोटरगाडय़ा घेण्यावर पैसे उधळतात, हे स्वत: लेखकाचे नातलगांबद्दलचे निरीक्षण आहे!

भारतातील उच्चवर्णीयांची दलितांबद्दलची (किंवा हिंदू-मुस्लीम लोकांची एकमेकांबद्दलची!) मतेही फारदा याच नमुन्याची असतात. अमेरिकनांत ‘वॉस्प’ (wasp: व्हाइट- अँग्लो- सॅक्सन प्रोटेस्टंट) आणि स्कॉट्स-आयरिशांमधले एकमेकांविषयीचे पूर्वग्रह खूपसे भारतीय जातिभेद-धर्मभेदांतून येणाऱ्या पूर्वग्रहांसारखेच आहेत, फार तर जरा सौम्य.

तर ‘हिल्बिली एलेजी’चा लेखक आपल्या आईकडील आजी-आजोबांपासून स्वत:पर्यंतचा इतिहास कधी उपहासाने, तर कधी खिन्नपणाने नोंदवतो. आजी-आजोबांनी अ‍ॅपॅलाचियातील गाव सोडले ते मात्र नशीब काढण्यासाठी नव्हे. बहुधा त्यांच्या ‘प्रेम’ प्रकरणात ‘तिसरा कोन’ होता, जो प्रश्न स्थलांतराने सुटला. नंतर मात्र नानी-नाना निष्ठेनेही राहिले आणि आपल्या गावी जात-येतही राहिले. त्यांचे रस्ट-बेल्टमधील आयुष्य मात्र नेहमीच निम्न आर्थिक दर्जाचेच राहिले.

लेखकाची आई सौम्य ड्रग-व्यसनाधीन होती. पहिल्या लग्नापासून लेखक जन्मला, परंतु लवकरच जास्त सरळमार्गी वडील आईपासून वेगळे झाले. सतत मिळत-सुटत असलेल्या नोकऱ्या, बदलते पुरुषमित्र अशा तुटक रेषेने आईचे आयुष्य जात राहिले. लेखक दर अडचणीच्या वेळी आजीकडे जात राहिला. वडिलांशी संपर्क राहिलाही, पण जुजबीच. उलट आईला खिन्नतेचे, औषध अतिरेकाचे झटके येत. आजोबाही लवकरच गेले. आईचे ‘मित्र’ हे तसे ‘कागज के फूल’ संबंध. मामा सगळे हिल्बिली वृत्तीचे अर्क. वडिलांची ‘प्रतिमा’ पुरवणारा पुरुष अशी नाही. सामाजिक-आर्थिक स्तर सुधारायची इच्छा मात्र आजीने तेवत ठेवलेली. त्यामुळे लेखक धडपडून शिकत गेला, की शिक्षणच आपल्याला गर्तेतून बाहेर काढू शकेल. स्थानिक महाविद्यालयातून पदवी कमावून ख्यातनाम येल  विश्वविद्यालयात वकिलीचे शिक्षण घ्यायला गेला.

अमेरिकेत उच्च दर्जाची विधी महाविद्यालये आपापली ‘लॉ रिव्ह्य़ू’ मासिके चालवतात. ‘येल लॉ रिव्ह्य़ू’च्या संपादक मंडळात जागा मिळणे मानाचे समजले जाते. एका अर्थी ते गुणवत्तेचे प्रमाणपत्र असते. लेखकाला ते पद गाठताही आले.. परंतु त्यानेच त्याला अमेरिकी समाजातले वर्ग-विभाजनही प्रकर्षांने जाणवले!

अमेरिका स्वत:ची जोरदार जाहिरात करतो, की त्यांच्या देशात वंश, लिंग, धर्म वगैरे भेद ओलांडून गुणवान लोक सामाजिक स्तरांमध्ये सहज ‘वर’ चढू शकतात. दरिद्री आईबापांची मुले श्रीमंत तर होऊ शकतातच, परंतु आपला जन्मजात वर्गही ओलांडून ‘प्रगत’ होऊ  शकतात. अनेक जाहिरातींसारखी ही जाहिरातही खोटी आहे! २००५ साली न्यू यॉर्क टाइम्सच्या वार्ताहरांनी ‘क्लास मॅटर्स’ नावाचे पुस्तक लिहिले. त्याचा निष्कर्ष असा : ‘खरे पाहता अमेरिकेत सामाजिक चलनवलन (social mobility) फारसे शक्य नाही. तुमचा जन्मजात वर्गच तुमचे शिक्षण, सुबत्ता; फार कशाला, तुमची आयुर्मर्यादाही ठरवून देतो! समाजाचे जर पाच स्तर मानले तर अत्यंत मेहनतीनेही एखाद्या स्तरालाच ‘वर’ जाता येते, आणि असे वर्ग-शिडी चढणाऱ्यांचे प्रमाण नगण्य आहे.’ ‘हिल्बिली एलेजी’च्या लेखकाला आपला वर्ग तर मागे टाकता आला, परंतु येलची पदवी, ‘येल लॉ रिव्ह्य़ू’चे संपादक मंडळ वगैरेही शेवटचा उंबरठा ओलांडू शकले नाहीत! त्याला मोठय़ा वकिलांसोबत, न्यायाधीशांसोबत सुट्टय़ांमधल्या ‘इंटर्नशिप्स’ करायला मिळाल्या नाहीत. तसली कामे मिळायला ‘योग्य’ ओळखीच लागतात आणि त्या वर्ग-स्वभावातूनच येतात. त्यामुळे लेखक मोठय़ा वकिली संस्थेत पोचू शकलेला नाही. त्याने काही काळ ‘मरीन्स’ या सैन्य-शाखेत घालवलेले दिवसही या प्रवासात नगण्य ठरले. एका पिढीआधी जॉन एफ. केनेडी मात्र अशाच सैनिकी अनुभवातून राष्ट्राध्यक्ष-पदापर्यंत गेले, असे मानायला जागा आहे. लेखक पुस्तकाच्या शेवटच्या पानांत लिहितो ते त्याच्याच शब्दांत पाहणे उपयुक्त ठरेल : ‘तुम्ही या दोन गटांची व्याख्या कशीही करा- श्रीमंत-गरीब, सुशिक्षित-अशिक्षित, उच्चवर्गीय-कामगारवर्गीय; त्यांचे सदस्य दोन वेगळ्या विश्वांत वाटले जातात. एका वर्ग-संस्कृतीतून दुसरीकडे पोचलेला मी याबद्दल अत्यंत संवेदनशील आहे. मी अभिजनवर्गाकडे मूलभूत तुच्छतेने पाहतो. मध्ये एका जणाने ‘कॉन्फॅब्युलेट’ (गप्पा मारण्यासाठी वापरला जाणारा ‘झटॅक’ शब्द!) म्हटले तेव्हा मला किंचाळावेसे वाटले. पण त्यांना खूप काही जमते हे तर खरेच! त्यांची मुले निरोगी आणि आनंदी असतात. घटस्फोटांचे प्रमाण कमी असते. चर्चमध्ये ते जास्त नियमितपणे जातात. ते जास्त जगतात. ते साले आमच्याच खेळात आम्हाला हरवतात.’

परंतु जे. डी. व्हॅन्स त्याच्या जन्मजात हिल्बिली संस्कृतीचे बरेचसे दुष्परिणाम टाळू शकला. गाव-क्षेत्र सोडून पश्चिमेला कॅलिफोर्नियात जाऊन नव्या कंपन्या हेरून त्यांना अर्थ-बळ पुरवू शकणारा झाला. अतिश्रीमंतांच्या संपत्तीला अशा गुंतवणुकीच्या संधी शोधून देणारा झाला. मात्र व्यवस्थेशी भांडण्याची भूमिका तो घेत नाही. उलट ‘वर’ पोचता न आल्याने, मोठय़ा वकिली संस्थेत न जाता आल्याने, व्यवस्थेतल्याच जरा हलक्या, जास्त ‘रिस्की’, काहीशा शंकास्पद कोपऱ्यात तो जाऊन पोचला.

‘गोरे’ असूनही वर्ग-शिडी चढता येत नाही, हे अधोरेखित करणारी ही तीन पिढय़ांच्या उपेक्षित, अवमानित वर्गापासून सुटायच्या झगडय़ाची कहाणी आहे. आपल्या समाजातील एका उपेक्षित उपविभागाचा ‘‘मला सामावून घ्या!’’ असा आक्रोश ‘हिल्बिली एलेजी’च्या रूपाने ऐकवला गेला आहे, याची दखल अमेरिकी समाजात घेतली जात आहे. मध्य-अमेरिकेने पारंपरिक डेमॉक्रॅटिकभूमिका त्यागून रिपब्लिकन भूमिकेतलेही ट्रम्पचे टोक का धरले, ते समजून घेण्यासाठी ‘हिल्बिली एलेजी’ वाचा असा सल्ला परीक्षक-विश्लेषक देत आहेत.

  • ‘हिल्बिली एलेजी: अ मेमॉयर ऑफ अ फॅमिली अ‍ॅण्ड कल्चर इन क्रायसिस’
  • लेखक : जे. डी. व्हॅन्स
  • प्रकाशक : विल्यम कॉलिन्स
  • पृष्ठे : २७२, किंमत : ८६० रुपये

nandakhare46@gmail.com