12 December 2017

News Flash

परंपरेचा आरसा!

अठराव्या शतकापासून आजपर्यंतच्या कालखंडाला कवेत घेणारे हे पुस्तक.

शुद्धोदन आहेर | Updated: June 17, 2017 3:29 AM

अठराव्या शतकापासून आजपर्यंतच्या कालखंडाला कवेत घेणारे हे पुस्तक. या काळात ‘हिंदूइझम’ या संकल्पनेचा उदय, तिचा आधुनिकता, कायदा, अर्थशास्त्र, प्रसारमाध्यमं यांच्याशी असलेला परस्पर संबंध याची चर्चा या पुस्तकात आहेच; परंतु या संकल्पनेच्या संदर्भात अभिजन-बहुजन संबंध, विवाहसंस्था, जातव्यवस्था अशा मुद्दय़ांवरही ते प्रकाश टाकते. एकप्रकारे परंपरेचा आरसाच हे पुस्तक भारतीय वाचकांसमोर धरते, त्यात डोकावून पाहायला हवेच..

गेल्या शनिवारी- १० जून रोजी- ‘हिंदुइझम इन इंडिया’ या द्वीखंडी ग्रंथाच्या पहिल्या खंडाची ओळख आपण करून घेतली. प्रस्तुत लेखात या ग्रंथाच्या दुसऱ्या खंडाविषयी जाणून घेऊ या.

साधारणपणे १८ व्या शतकाच्या अंतापासून थेट आजपर्यंतच्या सुमारे २५० वर्षांचे प्रतििबब  ‘हिंदुइझम इन इंडिया- मॉडर्न अ‍ॅण्ड कंटेम्पररी मूव्हमेंटस्’ या शीर्षकाच्या दुसऱ्या खंडात पडले आहे. विल स्वीट्मन व आदित्य मलिक यांनी संपादित केलेल्या या खंडात एकूण १२ प्रकरणे असून ‘हिंदुइझम’ या शब्दाच्या उदयाची चर्चा करताना खंडमालिका संपादक जॉफ्री ओडी यांनी १७८७ साली इंग्रजांनी वापरलेला ‘हिंदू’ शब्द पुढे राजा राममोहन राय यांनी १८१६ साली वापरला, असे नमूद केले आहे. हिंदुइझमचे समर्थक म्हणून ब्राह्मण पुढे आल्याने ‘हिंदुइझम म्हणजे ब्राह्मणीझम’ असे समीकरणही दृढ झाले.

आधुनिक काळात गरब्राह्मणदेखील धर्माचा अर्थान्वयार्थ काढू लागल्यामुळे हिंदू परंपरेत पुन्हा वेगवेगळे मतप्रवाह उद्भवले. ग्रंथातील प्रातिनिधिक उदाहरणे म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर व महात्मा गांधी होत. या दोन महानुभावांनी लावलेला श्रौत-स्मार्त धर्माचा वेगवेगळा अर्थ व त्याचे परिणाम आपल्यासमोर आहेत. या दोन्ही नेत्यांच्या जातीय जाणीव-नेणिवांचा शोध तत्कालीन घडामोडींच्या संदर्भात न घेतल्यामुळे या मतभेदांची मूलगामी कारणमीमांसा ग्रंथात सापडत नाही.

विल स्वीट्मन यांनी ‘हिंदुइझम व आधुनिकता’ यांचा परस्परसंबंध शोधताना मागील दोन हजार वर्षांपेक्षा गेल्या दोनशे वर्षांत श्रौत-स्मार्त धर्म जास्त बदलला आहे, असे म्हटले आहे. १७९४ साली विलियम जोन्स यांनी मनुस्मृतीचे इंग्रजीत भाषांतर केले, तर १८०५ साली जगन्नाथ पुरी देवस्थानाने आपले महसूल व्यवस्थापन कंपनीला दिले. १८१३ च्या कायद्यानुसार इंग्रज चर्चला भारतात कार्य करण्यास मान्यता मिळाली. १८२८ साली सतीबंदीच्या मसुद्यात मनुस्मृतीला उद्धृत करण्यात आले. १८५६ सालचा विधवा पुनर्वविाहाचा कायदा न्यायालयाने १८७३ साली मान्य केला. १८९१ साली संमती वयाचा कायदा करण्यात आला. लोकमान्य टिळक यांचे नेतृत्व या कायद्याला विरोध करण्यातून उभारले.

‘हिंदुइझम व कायदा’ या विषयाचे विवेचन तिमोथी ल्युबीन यांनी केले आहे. धर्मसूत्रांत राजाची कर्तव्ये व राज्यधोरणही निश्चित करणारे ब्राह्मणच असल्याने त्यांचे धर्मज्ञान व न्यायप्रशासन या दोहोंवर वर्चस्व तयार झाले. ‘अर्थशास्त्र’ इ.स.पूर्व तिसऱ्या शतकातील असले तरी मॅक्लिश यांच्या मते, त्यात ब्राह्मणांचा अपवाद केलेले प्रकरण नंतर घुसविले असावे. दिल्लीपतींनी इस्लामिक कायद्यानुसार कारभार केला तरी व्यवहारात ब्राह्मणी धर्मशास्त्र सुरू असले पाहिजे. त्याशिवाय संतांच्या छळणुकीचा उलगडा होत नाही. नंतर ब्रिटिशांनी आधुनिक कायदेप्रणाली आणली. १८५७ नंतर समान गुन्हेगारी कायदा व मुलकी कायदा लागू केला. भारतीय संविधानाचे वैशिष्टय़ सांगताना जॅकोबसन यांनी म्हटले आहे, की जेव्हा धर्म सामाजिक प्रगतीला विरोध करतो तेव्हाच कायदेकारी यंत्रणा हस्तक्षेप करू शकते.

थॉमस ब्रिट्क्नेल यांनी ‘हिंदुइझम व अर्थशास्त्र’ समजावून सांगितले आहे. देवालयासाठी नियोजन, सामानांची वाहतूक, देवाणघेवाण, यात्रेकरू, व्यापार, वित्त, गुंतवणूक, दान-भेटवस्तू, पुस्तके, इतर साहित्य, गोदामे, दळणवळण, बांधकामे वगरे सोयी लागतात. त्यातून होणाऱ्या आर्थिक उलाढालीतून पुरोहित, व्यापारी अशा मध्यस्थांना उत्पन्न मिळते. अनेक साधू आर्थिक व्यवहारही करतात. कुंभमेळ्यासारख्या प्रसंगात साधूंचे अशील यात्रेकरूंच्या वेशात येऊन दान गोळा करणे, त्याची वाटणी करणे, वस्तुरूपातील दानांचे चलनात रूपांतर करणे, देवाणघेवाण अशी कामे करतात. तसेच सुमारे पाच हजारांहून अधिक हिंदू स्वयंसेवी संघटना नसíगक आपत्ती वा इतर संकटांच्या काळात जागतिक स्तरावरही देणग्या व दान गोळा करतात.

उर्सुला राव यांनी प्रसारमाध्यमे व श्रौत-स्मार्त धर्माचा परस्परसंबंध विशद करतात. १९८७ साली रामानंद सागर यांनी ‘रामायण’ मालिकेद्वारे केलेली सुरुवात आता अनेक मिथकांच्या चित्रकथा व संगणक खेळांपर्यंत विकसित झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. या प्रक्रियेत दूरस्थ भारतीयांच्या ब्राह्मणी राष्ट्रवादाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अर्थात, प्रसार माध्यमांतील हिंदुइझम हा भारतीय समाजातील क्लिष्ट समस्यांचे विश्लेषण करण्याऐवजी निम्नस्तरीय प्रचारकाच्या थाटात वावरत आहे. मायाजालावरील पूजापाठ भरभराटीला येत आहे. जगन्नाथ पुरीच्या देवळांत गरिहदूंना प्रवेश नसला तरी त्यांचे मायाजालदर्शन मात्र सर्वाना उपलब्ध आहे.                                                      मायकेल स्पर यांनी आधुनिक गुरू चळवळीचे विवरण केले आहे. कमालीचे अंतर्बाह्य़ वैविध्य असलेली गुरुपरंपरा सातव्या शतकापर्यंत जाते. इंग्रजी राजवटीचा परिणाम म्हणून निर्माण झालेल्या विविध धार्मिक संस्थांनी पारंपरिक गुरू चळवळींचा चेहरामोहरा बदलला. गुरू आणि चमत्कार यांचे अतूट नातेही आहे. याव्यतिरिक्त सिद्धयोगी म्हणविणाऱ्यांच्या मथुन प्रथा या तंत्राशी निगडित असल्याचे सांगितले जाते. काही गुरू समिलगी असल्याचेही म्हटले जाते. शहरी मध्यमवर्गाला जीवनातील अपूर्णता, ताणतणाव आणि वाढणाऱ्या संधींमध्ये स्वत:ला पदोपदी सिद्ध करण्याची निकड यातून गुरूची गरज भासते.

लॉरेन्झ यांनी इस्कॉनच्या प्रभुपाद यांच्या विधानांपकी ५६ टक्के विधाने ही स्त्रियांना लैंगिक साधन मानणारी, ८ टक्के विधाने ही स्त्रियांच्या वर्ग, दर्जा, पद याच्याशी निगडित, ९ टक्के विधाने ही स्त्रियांना कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य देऊ नये व ७ टक्के विधाने ही स्त्रिया अवगुणी असतात, अशा आशयाची असल्याचे भेदक विश्लेषण केले आहे. श्रौत-स्मार्त परंपरेप्रमाणे स्त्रीत्व हे विवाह व संततीसाठीच असल्याने स्त्रीगुरूंना सामाजिक प्रतिष्ठा नाही. स्त्रीगुरूदेखील स्त्रियांना पारंपरिक गृहस्थीधर्म पाळण्याचा उपदेश करतात. माता अमृतानंदमयी आपल्या भक्तांना जवळिकीने वागवतात, याचे एक कारण त्यांच्या कनिष्ठ जातीत असावे.

आदित्य मलिक यांनी बहुजन व अभिजन यांच्यातील साम्य-भेद शोधण्याचा प्रयत्न केला आहे. अभिजन म्हणजे मुख्यत्वेकरून ब्राह्मण व त्यांच्या अखिल भारतीय देवदेवता आणि बहुजन म्हणजे स्थानिक भाषा-परंपरा यातून निर्माण झालेल्या देवदेवता व गुरवांसारखे अब्राह्मण पुरोहित, असे अभिप्रेत आहे. ब्राह्मणी परंपरा ही बव्हंशी लेखी ग्रंथांवर आधारित असून बहुजनांची मात्र मौखिक आहे. महाराष्ट्रातील खंडोबासारख्या स्थानिक दैवतांकडे नवस म्हणून वैवाहिक प्रश्न, आरोग्य, संपत्ती, बंधुप्रेम, नोकरी-व्यवसाय असे ‘भौतिक’ प्रश्न मांडले जातात. त्यांची सोडवणूक आध्यात्मिक मार्गाने होणे असंभव आहे, हे उघड आहे.

फेब्रिझिओ फेरारी यांनी श्रौत-स्मार्त धर्मातील उपचारपद्धतीविषयी विवेचन केले आहे. अथर्व वेदात भेष्यज म्हणजे औषधविषयक स्वतंत्र विभाग आहे. अमानवी शक्तीचा पीडिताशी असणारा संबंध तोडणे व रोग दूर करणे या उपचारपद्धतीत मंत्रोच्चार, नृत्य, बळी, औषधे तयार करणे यांचा समावेश असे. सुतार, भषज व ब्राह्मण हे कसबी कारागीर समजले जात असत.

आयुर्वेदात ‘चरक संहिता’ (इ.स. पहिले व दुसरे शतक) व ‘सुश्रुतसंहिता’ (इ.स. तिसरे व चौथे शतक), वाग्भटकृत ‘अष्टांगहृदयसंहिता’ (६-७ वे शतक), ‘माधवनिदान’ (८ वे शतक), ‘सारंगधरसंहिता’ (१३-१४ वे शतक) हे महत्त्वाचे ग्रंथ आहेत. वात, पित्त व कफ यांच्यातील संतुलन साधले गेले की व्यक्ती निर्दोष होतो. तंत्राचीही उपचारपद्धती असून ती शैव धर्माशी निगडित आहे. विस्तारभयास्तव झपाटण्याबाबतच्या पाश्चात्त्य व हिंदू साम्यभेदाचे विवरण करणाऱ्या प्रकरणाची दखल घेता येत नाही.

राबर्ट फ्रायकेन्बर्ग यांनी ‘हिंदुइझम व हिंदुत्व’ यांच्यातील अनन्यभावाचा वेध घेताना अब्बे दुआच्या ‘हिंदू मॅनर्स, कस्टम्स अ‍ॅन्ड सेरेमनीज’ या अद्वितीय ग्रंथातील संदर्भ घेतले आहेत. ईस्ट इंडिया कंपनीचे दुभाषी, मुंशी, वकील असे सेवक म्हणून द्विज उच्चजातीयांनी कळीची भूमिका बजावली आहे. हिंदुइझम व ईस्ट इंडिया कंपनीचे साम्राज्य उभारणी या समांतर घडामोडींत द्विजांचा सिंहाचा वाटा होता. मॅक्स म्युलर यांचा ‘द सॅक्रेड बुक्स आफ द ईस्ट’ हा ५० खंडांचा प्रकल्प व विलियम वार्ड लिखित १८११ साली प्रसिद्ध झालेला ‘अकाऊंट आफ रायटिंग्ज, रिलिजन अ‍ॅन्ड मॅनर्स आफ हिंदूज’ हा चार खंडी ग्रंथ यांद्वारे हिंदुइझमची रचना झाली. इंग्रज शासनपद्धतीमुळे सुधारणावादी व कर्मठ असे दोन प्रवाह हिंदू समाजात निर्माण झाले. या कर्मठ प्रवाहातील महाराष्ट्र व उत्तरेच्या काही भागांतील ब्राह्मणांनी ‘मत्स्य न्याय’ वापरून आधुनिक मूल्यांना आव्हानित केल्याचे सांगतानाच त्यांच्यासाठी फॅसिस्ट व मूलतत्त्ववादी अशी शेलकी विशेषणे लेखकाने वापरली आहेत. मात्र विविध समाजघटकांमधील अंतर्द्वद्व सांभाळण्याचे नवे आव्हान कर्मठ घटकांना सतावते आहे.

रेश्मी लाहिरी रॉय यांनी समकालीन हिंदू समाजातील शहरी उच्चजातीयांत ठरवून केलेल्या विवाहाचा उद्बोधक आढावा घेतला आहे. शत्पथ ब्राह्मणानुसार पत्नी म्हणजे अर्धागिनी; परंतु मनूने पत्नीला सर्व स्तरांवर दुय्यम स्थान दिले आहे. हिंदू पुरुषाने आपल्या नवविवाहित पत्नीविषयी स्वारस्य प्रदर्शित करणे अपेक्षित नाही. पती-पत्नीच्या सुख-दु:खापेक्षा घराण्याची इभ्रत मोठी असल्याने पती-पत्नी यांच्यात प्रबळ सहजीवनबंध निर्माण होत नाहीत.

विवाहाच्या बाजारात कॉन्व्हेंटमध्ये शिकलेल्या मुलींना मागणी असली तरी त्यांच्याकडून सांस्कृतिक मर्यादाभंग अपेक्षित नाही. तथापि, शिक्षणासारख्या अनेक कारणांमुळे हिंदू समाजात प्रेमविवाहास अनुकूल वारे वाहू लागले आहेत. विशेषत: जातिसंस्था व स्त्रीदास्य हे परस्परसंबंधित असून सीता व शंबूक तसेच द्रौपदी व एकलव्य यांना स्वमुक्तीसाठी तात्त्विक एकजूट करणे अपरिहार्य आहे. २००५-०६ च्या दरम्यान कायद्यात झालेल्या बदलानुसार, वैवाहिक संबंधात पतीने केलेल्या जबरदस्तीसारखे मुद्दे प्राधान्यक्रमाने चच्रेला येत आहेत. तरीही ‘टाइम’ या जगप्रसिद्ध मासिकाचा हवाला देऊन लेखिका सांगतात, की १९८० च्या दशकात ४०० पर्यंत असलेली हुंडाबळींची नोंद १९९० च्या दशकात १५ पटींनी वाढून ५,८०० पर्यंत गेली आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय गुन्हे आकडेवारीनुसार १९९५ साली ६,००० हुंडाबळी नोंदविण्यात आले आहेत. सीता-द्रौपदीसमोरील आव्हान किती मोठे आहे, हे यावरून ध्यानी यावे.

विनय कुमार श्रीवास्तव यांनी ‘हिंदुइझम व जात’ याबाबत विवेचन केले आहे. इ.स. १५६३ मध्ये गॅर्सयिा द ओर्ता या पोर्तुगीजाने वापरलेल्या ‘कास्टा’ या शब्दावरून इंग्रजीत ‘कास्ट’ हा शब्द तयार झाला, जो वर्ण व जात या दोहोंसाठी वापरण्यात येतो. इ.स.पूर्व पहिल्या सहस्रकाच्या अध्र्यावर जातीचा उदय झाल्याचे गेल ऑम्वेट यांच्या हवाल्याने सांगितले गेले आहे. इ.स.पूर्व १५००-९०० दरम्यान रचल्या गेलेल्या ऋग्वेदातील पुरुष सूक्ताचा उल्लेख करून ‘वर्ण’ ही ग्रंथसंज्ञा असून ‘जात’ ही व्यवहारसंज्ञा आहे, असे लेखक म्हणतात. कर्मकांड अधिकारविहीन अथवा लढाऊ वा शेतकरी-व्यावसायिक म्हणून गणल्या न जाणाऱ्या कायस्थ, जग्गा, बहीभट, सोनार अशा जाती ‘शूद्र’ म्हणून गणल्या गेल्या आहेत. तथापि, वर्ण ही बुद्धपूर्व काळातील संस्था असून जात ही बुद्धोत्तर काळात आल्याचे अभ्यासक सांगतात.

उच्चशिक्षित उच्चजातीयांनी मुख्य प्रवाहात जवळजवळ एकाधिकारशाही निर्माण केली असून धोरणात्मक निर्णय घेणाऱ्यांत व शासन-प्रशासन, शिक्षण-उद्योग यांत त्यांचे प्राबल्य आढळून येते. आजच्या जातिव्यवस्थेचे वैशिष्टय़ म्हणजे ब्राह्मण जात सर्व प्रांतांत आढळत असल्याने राष्ट्रीय स्तरावर प्रभुत्वशाली ठरली आहे. आपापल्या राज्यातील प्रभुत्वशाली शेतकरी जाती व मधल्या ओबीसी जातींमध्येही सामाजिक उतरंडीची जाणीव तीव्र असून विशेषत: सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या निदान १३ लक्ष पूर्वास्पृश्य हिंदू समाजघटकांना आजही हाताने मला साफ करण्याचे व तो डोक्यावर वाहून नेण्याचे काम करावे लागते, असे लेखक सांगतात. हिंदू संस्कृतीचा अभिमान बाळगणाऱ्यांकडे या प्रश्नाचे उत्तर नसल्याने ते बेशरमपणे त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. तसेच कनिष्ठ जातींवर वाढत असलेले अन्याय-अत्याचाराचे कारण म्हणजे त्यांची प्रगती पचविणे तथाकथित उच्चजातीयांना जड जात आहे.

वस्तुत: भटके विमुक्त-ओबीसी व अनुसूचित जाती-जमाती या बहुसंख्य हिंदू जनतेला सुखी करण्याचा कार्यक्रम हिंदू परंपरेत का नाही, याची कारणमीमांसा ग्रंथात अपेक्षित होती. या जागतिक अभ्यासकांनी आपल्यासमोर आपल्याच परंपरेचा आरसा धरला आहे. ग्रंथात वर्णिलेली भली मोठी सांस्कृतिक परंपरा असूनही जगासमोर जगाचा आरसा दाखविण्याची कुवत आपण अजूनही निर्माण करू शकलेलो नाही. तरीही या आरशात डोकावून बघण्यास काहीच हरकत नाही!

 

  • हिंदुइझम इन इंडिया- मॉडर्न अ‍ॅण्ड कंटेम्पररी मूव्हमेंटस्
  • संपादक : विल स्वीट्मन / आदित्य मलिक
  • मालिका संपादक : जॉफ्री ओडी
  • प्रकाशक : सेज पब्लिकेशन
  • पृष्ठे : ३५६, किंमत : ४३७ रुपये

 

शुद्धोदन आहेर

ahersd26@gmail.com

First Published on June 17, 2017 3:29 am

Web Title: hinduism in india modern and contemporary movements