News Flash

मानव्यशास्त्रातला महाराष्ट्र : आधुनिक इतिहास-भान आणि हिंदूत्व

या पुस्तकात मराठी विचार आणि हिंदुत्व यांच्या ऐतिहासिक संबंधाविषयी काही चर्चा उपयुक्त ठरली असती.

‘हिस्टरी अ‍ॅण्ड द मेकिंग ऑफ अ मॉडर्न हिंदू सेल्फ’

राहुल सरवटे

महाराष्ट्राच्या समाज-संस्कृतीविषयक अभ्यासाचा आढावा घेणाऱ्या मासिक सदरातील हा पाचवा लेख; महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या महाराष्ट्रीय विचारकांच्या विचारांतील ‘हिंदू इतिहासा’ची आकलनस्थळं शोधणाऱ्या डॉ. अपर्णा देवरे लिखित पुस्तकाबद्दल..

इतिहास ही जराशी चकवा देणारी संकल्पना आहे. इतिहासाचा एक अर्थ ‘जे घडून गेलं ते’ असा कालिक आहे, तर दुसरा अर्थ ‘भूतकाळाचं अध्ययन आणि त्याच्या पद्धती’ असा आहे. आधुनिक युरोपीय परिप्रेक्ष्यात इतिहासाचा अर्थ अधिक नेमका आणि मूल्याधिष्ठित झाला. ‘इहवादी, बुद्धिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ पुराव्यावर आधारित काळाचा आलेख रेखाटण्याची पद्धत’ या अर्थानं इतिहासाचं शास्त्र विकसित होतानाच जगाची विभागणी इतिहास-भान असणारे पाश्चिमात्य आणि त्याचा अभाव असणारे पौर्वात्य अशी केली गेली. इंग्रजी शिक्षणाद्वारे आधुनिकतेचा परीसस्पर्श झालेल्या १९व्या शतकातल्या भारतात या नव्या इतिहास-भानातून नव्या सामाजिक अस्मिता आणि राजकीय मांडणी जन्माला आल्या. वसाहतवादी रचनेच्या निर्मितीला २०० वर्षे होताना बाबरी मशिदीच्या विध्वंसासारखं कृत्य घडतं याचा घनिष्ट संबंध या आधुनिक इतिहास-भानाशी आहे.

आधुनिक भारतीयांनी या नव्या इतिहास-भानाशी कसं जुळवून घेतलं? त्यातून भारतीय- हिंदू- समूहांची अस्मिता आणि ओळख कशी आकाराला आली? हिंदू धार्मिकता आणि हिंदू इतिहासाच्या कल्पनांचा एकूण विमर्ष कुठल्या चौकटीत वावरत होता आणि त्याच्या अंगभूत मर्यादा काय होत्या? – अशा स्वरूपाचे प्रश्न अपर्णा देवरे यांच्या ‘हिस्टरी अ‍ॅण्ड द मेकिंग ऑफ अ मॉडर्न हिंदू सेल्फ’ या पुस्तकाच्या मध्यवर्ती आहेत. हिंदू/ पौर्वात्य वैचारिक परंपरेत वस्तुनिष्ठ इतिहासाचा ठळक अभाव जाणवतो तरीही, ‘आधुनिक हिंदू व्यक्तित्वा’च्या जडणघडणीत इतिहास-भान प्रखरपणे व्यक्त होताना दिसतं. पूर्वापार अनैतिहासिक सांस्कृतिक परंपरा असणाऱ्या हिंदू समाजात आधुनिक इतिहास-भानाला आत्यंतिक महत्त्व कसं प्राप्त झालं, हा ऐतिहासिक विरोधाभास देवरे यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. वासाहतिक काळात इंग्रजी शिक्षणाद्वारे भारतीय विचारवंतांचा ‘युरोपीय ऐतिहासिक जाणिवे’शी परिचय झाला आणि त्यातून नवं ऐतिहासिकतेचं भान असणारं आधुनिक हिंदू व्यक्तित्व आकाराला आलं, असं सध्या हैदराबाद विद्यापीठात अतिथी प्राध्यापक असणाऱ्या देवरे यांचं प्रतिपादन आहे.

शिवाय, १९ व्या शतकात आधुनिक युरोपीय इतिहास-भानाची ओळख होताना भारतीय विचारवंतांनी त्या विचारांचं परिशीलन कसं केलं, हे समजून घेण्यातूनच आपण इतिहासावरून चाललेल्या समकालीन लढाया नीट समजू शकू, अशी देवरे यांची भूमिका आहे. त्यांनी महात्मा फुले, न्या. म. गो. रानडे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा आणि चरित्राचा तपशीलवार अभ्यास करून आधुनिक हिंदू व्यक्तित्वातल्या अंतर्विरोधांची सखोल चर्चा केली आहे. फुले, रानडे आणि सावरकर यांनी वासाहतिक आधुनिकतेतून निर्माण झालेल्या इतिहास आणि धर्मविषयक मांडणींना कोणता प्रतिसाद दिला आणि त्यातून आधुनिक-ऐतिहासिक असं ‘हिंदू इतिहासा’चं आकलन कसं घडलं, त्याची चर्चा देवरे करतात. या तिन्ही विचारवंतांच्या धर्मविषयक मांडणींमध्ये आधुनिक इतिहासाच्या संकल्पनेला मध्यवर्ती स्थान असलं तरीही त्या तिघांच्याही विवेचनाच्या दिशा निराळ्या असल्याचं त्या नमूद करतात. सावरकरांच्या मांडणीत आधुनिक राष्ट्रीयत्वाला सर्वोच्च स्थान असल्यामुळे ‘हिंदू’ ही संकल्पना त्यातल्या धार्मिकता/ पारलौकिकतेला वगळून एका इहवादी राजकीय जाणिवेच्या स्वरूपात वावरते. तर, फुले आणि रानडे यांच्या विवेचनात धार्मिकतेचा आशय अधिक महत्त्वाचा ठरतो. फुलेंच्या सत्याचा शोध किंवा रानडेंचं राजकारणातल्या नैतिक अधिष्ठानाचं प्रतिमान हे सावरकरांच्या इहवादी धार्मिकतेपेक्षा अधिक बहुआयामी आणि व्यापक अर्थानं मानवीय आहे, असं देवरे सांगतात.

युरोपीय इतिहासाभ्यासाच्या एका विशिष्ट टप्प्यावर इतिहास आणि धार्मिकता यांची फारकत होऊन इतिहास हा वस्तुनिष्ठ आणि स्वायत्त ज्ञानप्रांत मानायला सुरुवात झाली. त्यापूर्वी, ‘इतिहास’ आणि ‘काळ’ या संकल्पना ख्रिश्चन धार्मिकता आणि ईश्वरशास्त्र यांच्याशी घनिष्टपणे संबंधित होत्या. जगभरच्या इतर संस्कृतींप्रमाणेच, ग्रीकांपासूनच्या युरोपीय परंपरेत मिथक, पुराणे आणि वस्तुनिष्ठ ऐतिहासिकता यांची नेहमीच सरमिसळ होती. मात्र साधारणपणे अठराव्या शतकापासून वैज्ञानिकतेचा झोत सर्वव्यापी झाला आणि ‘वस्तुनिष्ठ’ (ऑब्जेक्टिव्ह) आणि ‘अनुभवनिष्ठ’ (इम्पिरिकल) ज्ञानाच्या तुलनेत धार्मिक आणि पारलौकिक श्रद्धेच्या ज्ञानशास्त्रीय आधारांना दुय्यम मानलं जाऊ  लागलं. प्रगतीच्या (महाराष्ट्राचा लाडका शब्द वापरायचा तर : ‘पुरोगामित्वा’च्या) सगळ्या धारणाच विज्ञान आणि धर्म यांच्या संपूर्ण फारकतीवर आधारित होत्या. अर्थात, ही फारकत हवाबंद नसते. उलट, अमोस फन्केन्स्टाइन यांच्यासारख्या विज्ञानाच्या इतिहासकारांनी ख्रिश्चन धार्मिक संकल्पनांचा विज्ञानाच्या तत्त्वज्ञानावर असणारा खोलवरचा प्रभाव तपशिलात दाखवलेला आहे. त्यामुळे अगदी विज्ञानाच्या नेत्रदीपक काळातही धर्म आणि विज्ञान हे संकल्पनात्मक दृष्टीने परस्परांशी संबद्धच राहिलेले दिसतात.

आधुनिक युरोपीय/ पाश्चात्त्य संस्कृतीनं या विज्ञानाधिष्ठित असण्यालाच आपलं व्यवच्छेदक लक्षण मानलं आणि त्या निकषांवर इतर ‘अनैतिहासिक’, ‘अंधश्रद्ध’ आणि ‘दंतकथांना इतिहास मानणाऱ्या’ (विशेषत: पौर्वात्य) संस्कृती अप्रगत किंवा मागासलेल्या ठरू लागल्या. या वैज्ञानिक काळात ‘धर्म’ आणि ‘राज्यसंस्था’ यांच्या फारकतीतून इहवादी (सेक्युलर) राज्यतंत्राची निर्मिती झाली. यातून धार्मिक परंपरांची आणि तत्त्वांची वैज्ञानिक चिकित्सा सुरू झाली. अर्थात, या प्रक्रियेतून धर्म सार्वजनिक जीवनातून हद्दपार झाला नाही; उलट धार्मिकतेनं स्वत:ला व्यक्तिवाद, बुद्धिनिष्ठता आणि शास्त्रीयतेवर आधारित अशा स्वरूपात सादर करायला सुरुवात केली. म्हणजे निराळ्या शब्दांत सांगायचं तर, धर्मच इहवादी भाषेत बोलू लागला!

भारतीय संदर्भात, वासाहतिक आधुनिकतेतून इतिहास नावाची एक वस्तुनिष्ठ रचना आकाराला आली आणि तिच्या पेटाऱ्यातून नव्या अस्मितांना ऐतिहासिक आकार प्राप्त झाले. भारतीय राजकीय विचारांच्या इतिहासाचे विश्लेषक सुदीप्त कविराज यांच्या मते, १९ व्या शतकातल्या भारतातला सगळ्यात मोठा सार्वत्रिक शोध हा ‘इतिहास’ हाच होता. देवरे यांच्या मते, वासाहतिक राजवटीतून निर्माण झालेल्या आधुनिकतेला भारतीयांचे पुढील चार प्रमुख प्रतिसाद आले- १) भारतीय समाजसुधारणेची प्रेरणा २) ब्राह्मणी वर्चस्वाविरुद्धचं बंड  ३) सशस्त्र राजकीय क्रांतीचा विचार आणि ४) काँग्रेसच्या माध्यमातून कार्यरत असणारी इहवादी राजकीय चळवळ. या चारही प्रतिसादांच्या केंद्रस्थानी असणारी जाणीव ही इतिहास-भानाची होती. या व्यापक पाश्र्वभूमीवर फुले, रानडे आणि सावरकर यांच्या इतिहासविषयक आणि एकूण धार्मिकतेविषयक मांडणींची चर्चा देवरे यांनी केली आहे.

फुले यांनी जरी ब्राह्मणी वर्णव्यवस्थेला आणि त्यांच्या सामाजिक-धार्मिक वर्चस्वाला कट्टर विरोध केला असला तरीही ते धार्मिकतेच्या आशयाबद्दल अधिक सकारात्मक दिसतात. बुद्धिवादी असूनही फुलेंचा नास्तिकतेला ठाम विरोध होता, हे भा. ल. भोळे यांच्या आधारे देवरे दाखवून देतात. फुलेंनी केलेलं पुराणांचं वाचन हे ब्राह्मणी वर्चस्ववादी बुरखे फाडण्याचं काम करत असतानाच, निम्न जातवर्गीय धार्मिक-सांस्कृतिक परंपरांचा अवकाश साजरा करण्याचाही फुले यांचा प्रयत्न दिसतो. रानडे जरी फुलेंप्रमाणे धार्मिकतेविषयी अनुकूल असले तरीही त्यांची भिन्न सामाजिक स्थानं त्यांच्या दृष्टिकोनातल्या अंतरांसाठी कारणीभूत ठरलेली दिसतात. रानडेंच्या दृष्टीनं नैतिकता हा धार्मिकतेचा आशय आहे आणि तोच राजकीय-सार्वजनिक व्यवहारांचा पाया असला पाहिजे. सावरकर मात्र धर्म आणि राजकारण यांची संपूर्ण फारकत करतात. धर्माधारित ओळख हा जरी त्यांच्या राजकारणाचा पाया असला तरीही सावरकरांच्या मते, ‘हिंदू ही एक इहवादी, राजकीय आणि राष्ट्रवादी ओळख असून त्याचा ईश्वरशास्त्र अथवा पारलौकिकतेशी काहीएक संबंध नाही.’ फुले आणि रानडे हे धार्मिकतेच्या बहुआयामी आणि जिवंत परंपरेबद्दल जागरूक दिसतात आणि सामूहिकतेच्या नैतिक अधिष्ठानासाठी धार्मिकता आवश्यक मानतात. तर सावरकर धार्मिकतेपेक्षा वैज्ञानिकता आणि विजिगीषु राष्ट्रीयत्वाला महत्त्व देतात.

देवरे यांचं विश्लेषण आपल्याला दाखवून देतं, की पाश्चात्त्य इतिहास-भानाच्या प्रेरणेतून साकारलेला भारतीय हिंदुत्ववादी राष्ट्रवादाचा प्रकल्प हा भारतीय परंपरांच्या नकारावर उभा आहे. तर, त्याऐवजी अधिक व्यापक आणि मानवतावादी असा आधुनिक धर्मचिकित्सेचा फुले-रानडेप्रणीत प्रयोग भारतीय सामूहिक धारणेसाठी अधिक मौल्यवान आहे. अखेरीस, आशीष नंदी यांच्या ज्या ओळींनी देवरे यांनी समारोप केला आहे त्या थोडक्यात पाहू :

‘‘हिंदुत्व’ हे ‘हिंदू धर्मा’चा कर्दनकाळ ठरेल. बहुतेक भारतीय लोक ज्या धार्मिक धारणांनी जगतात तो हिंदू धर्म. हिंदुत्व हे मुख्यत: आपल्या सांस्कृतिक आणि भौगोलिक भूमीतून विस्थापित झालेल्या ब्राह्मणी, मध्यमवर्गीय, शहरी आणि पाश्चात्त्य-विद्याविभूषित भारतीय मंडळींची प्रतिक्रिया आहे. स्वत: उघडपणे अज्ञेयवादी आणि पश्चिमी दृष्टीनं प्रभावित असणाऱ्या ज्या सावरकरांनी ‘हिंदुत्व’ ही संज्ञा निर्माण केली, त्यांच्या मते, हिंदुत्व म्हणजे निव्वळ राजकीय व्यवस्थेचं हिंदूकरण नसून स्त्रण  आणि असंघटित अशा हिंदूंचं सैनिकीकरण करणं आहे. हिंदुत्व ही उघडपणे हिंदू धर्मावरची टीका आहे आणि त्याचं अखेरचं उत्तरही!’

आशीष नंदी, माधव देशपांडे, दीपेश चक्रवर्ती, पार्थ चॅटर्जी, विनय लाल, सुदीप्त कविराज, एस. पी. उदयकुमार अशा समकालीन विचारवंतांचा ठळक प्रभाव देवरे यांच्या मांडणीवर आहे. समकालीन ‘हिंदुत्ववादी’ आणि ‘सेक्युलर’ इतिहासकारांच्या इतिहासाविषयीच्या भांडणांवर भाष्य करताना देवरे ‘इतिहासाच्या बेडय़ांत जखडलेले’ असा शब्दप्रयोग करून, हिंदुत्ववादी आणि इहवादी हे दोन्हीही एकाच वसाहतीक आधुनिकतेच्या इतिहास-भानाची निर्मिती आहेत याकडे निर्देश करतात. भारतीय इतिहास (शास्त्र) आणि त्यातून निर्माण झालेल्या सामूहिक अस्मिता या संपूर्णपणे आधुनिक इतिहास-भानाच्या प्रक्रियेची उपज आहेत, हे देवरे यांचं म्हणणं योग्यच आहे. परंतु गंमत म्हणजे, देवरे यांचं हे पुस्तक आधुनिक इतिहास-दृष्टी आणि त्यातून आकाराला आलेल्या हिंदू व्यक्तित्वाविषयी असलं तरीही ते इतिहासाचं पुस्तक नाही. तर, हे पुस्तक संहितांच्या सूक्ष्म अध्ययनाच्या विमर्ष-पद्धतीवर (डीस्कोर्स अ‍ॅनालिसिस) आधारित आहे. ही पद्धती अतिशय उपयुक्त असली तरीही हिंदू धार्मिक आणि राजकीय अस्तित्व-भान हे निव्वळ विमर्षांधारित चर्चेतून आकळणार नाही. त्यासाठी त्यातल्या अनेक अंतर्गत जोडण्या आणि विसंगतींचा परामर्श घ्यावा लागेल. उदाहरणार्थ, फुलेवादाच्या वैचारिकतेतून विकसित झालेली ब्राह्मणेतर चळवळ क्षात्र जगद्गुरूंच्या टप्प्यावर येऊन हिंदुत्वाच्या जाणिवेशी निगडित कशी होते; किंवा, इहवादी आणि विज्ञानवादी सावरकरी विचारसृष्टीचा राजकीय वारसा सनातनी हिंदू धार्मिकतेच्या आशयाशी एकनिष्ठ असणाऱ्यांकडे कसा जातो, या प्रक्रिया समजून घेण्यासाठी निव्वळ संहितांच्या अभ्यासापेक्षाही वैचारिक इतिहासाच्या अभ्यासपद्धती अधिक उपयुक्त ठरल्या असत्या.

दुसरं असं की, या तिन्ही विचारवंतांना जशी आधुनिक युरोपीय विचारांची पाश्र्वभूमी आहे तशीच महाराष्ट्रीय वैचारिक इतिहासाचीही चौकट आहे. शिवाय या तिन्ही विचारवंतांचा महाराष्ट्राच्या जडणघडणीवर खोल प्रभाव पडला आहे. म्हणजे, महाराष्ट्राची राजकीय-वैचारिक जाणीव आणि आधुनिक हिंदूपणाची रचना या एकमेकांशी खोलवर निगडित आहेत. या दोन्ही घटकांच्या विकासात फुले-रानडे-सावरकर या तिघांचंही योगदान दिसतं. त्यामुळे या पुस्तकात मराठी विचार आणि हिंदुत्व यांच्या ऐतिहासिक संबंधाविषयी काही चर्चा उपयुक्त ठरली असती.

तर, आपल्या पुढच्या लेखात इतिहास-भान आणि महाराष्ट्र यांच्यातल्या विशेष संबंधांच्या आकलनाच्या दिशेनं शोध घेणाऱ्या पुस्तकाचा परिचय करून घेऊ..

‘हिस्टरी अ‍ॅण्ड द मेकिंग ऑफ अ मॉडर्न हिंदू सेल्फ’

लेखिका : अपर्णा देवरे

प्रकाशक : रुटलेज, नवी दिल्ली

पृष्ठे : २५०, किंमत : ७९५ रुपये 

rahul.sarwate@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2018 2:09 am

Web Title: history and the making of a modern hindu self book review
Next Stories
1 ऑर्वेलची प्रकाशवाणी : वुडहाऊस जेव्हा ‘गिनिपिग’ होतो..
2 बुकबातमी : आफ्रिकी कथेचा वानवळा
3 भू-संपादनाचे ‘राज्यार्थकारण’
Just Now!
X