चौथी औद्योगिक क्रांती ही माणसांपेक्षा यंत्रमानव व डेटा या दोन गोष्टींवर आधारित असणार आहे. या क्रांतीमुळे जीवन अधिक सुखकर होणार असले तरी त्यासाठी जास्त माणसांची गरज लागणार नसल्याने, येत्या काळात निर्माण होणाऱ्या कोटय़वधी निरुपयोगीलोकांचे काय करायचे, हा गंभीर प्रश्न जगभरातल्या व्यवस्था आणि सरकारांसमोर असेल.. त्याच वेळी जैववैज्ञानिक प्रगतीमुळे निसर्गनियम डावलून महामानवजन्माला घालण्याची प्रक्रियाही सुरू होईल, ज्यामुळे जैविक विषमता तयार होईल.. मानवी समाजाच्या भवितव्याविषयी एकाच वेळी प्रचंड उत्सुकता आणि भीती निर्माण करणारे हे चित्र रंगवणाऱ्या युवाल हरारी यांच्या होमो डय़ीउसया पुस्तकाची ओळख करून देणाऱ्या लेखमालिकेतील हा शेवटचा लेख..

धारणांच्या पलीकडे जाताना पराकोटीच्या तांत्रिक प्रगतीत समाजरचनेच्या मूलभूत व्याख्यादेखील बदलत आहेत आणि या बदलांचा वेग दिवसेंदिवस वाढतो आहे. माणसांचा सहभाग कमीत कमी अथवा जवळजवळ शून्य ठेवून डेटा व यंत्रमानवाच्या साहाय्याने उत्पादन क्षेत्रात औद्योगिक क्रांतीचे चौथे पर्व सुरू झाले आहे. पहिल्या औद्योगिक क्रांतीत शेतीशी निगडित असणारे अनेक लोक मजूर बनून कारखान्यांमध्ये काम करू लागले व कामगारवर्गाचा जन्म झाला. दुसऱ्या औद्योगिक क्रांतीत माणसांची उत्पादन क्षमता वाढवून त्यातून जागतिक व्यापारस्पर्धा निर्माण झाली. तिसऱ्या औद्योगिक क्रांतीत अवाढव्य यंत्रांची निर्मिती आणि असेंब्ली लाइन्सचा उदय झाला. या तीनही टप्प्यांत जुन्या तंत्रज्ञानाची जागा नवीन तंत्रज्ञान घेत असताना काही कामगारांना या बदलांसोबत जुळवून घेणे अशक्य झाले. असे असले तरी औद्योगिक क्रांतीतला माणसांचा मूलभूत सहभाग आणि विकासाचा वेग हा एकमेकांशी व्यवस्थित अनुपातात फिरत राहिला. चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या मुळाशी माणूस नसून प्रगत यंत्रमानव आणि चाणाक्ष डेटा आहे आणि या दोन गोष्टी माणसांपेक्षा किती तरी अधिक पटीने, वेगाने आणि कुठल्याही मोबदल्याशिवाय काम करीत आहेत. माणसांपेक्षा यंत्रे जास्त चांगले काम करीत असल्याने अर्थातच उद्योगांना कामगारांची गरज उरणार नाही. या संभाव्यतेमुळे सर्व जगच चिंतित असून यंत्रमानवाच्या आक्रमणामुळे वाढणाऱ्या बेरोजगारांना पर्यायी रोजगार कसे उपलब्ध करून दिले जावेत, हा प्रश्न व्यवस्थांसमोर असणार आहे. स्वयंचलित कारचा जगभर बोलबाला होत असताना येत्या पाच ते दहा वर्षांत या स्वयंचलित कार जेव्हा जगभरातल्या रस्त्यांवरून धावू लागतील तेव्हा त्या लाखो टॅक्सीचालक आणि वाहनचालकांचा रोजगार नष्ट करतील. जे स्वयंचलित कारच्या बाबतीत तेच बांगलादेशच्या कापड उद्योगाबाबतीत आणि तेच चीनच्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनांबाबतीतही, कुठलीही औद्योगिक क्रांती जशी रोजगार नष्ट करते तसेच ती नवीन रोजगारही निर्माण करते; परंतु या नव्या समीकरणांत नष्ट होणारे रोजगार आणि नव्याने निर्माण होणारे रोजगार यांच्या प्रमाणात कमालीची तफावत असणार आहे. नव्याने निर्माण होणारे रोजगार हे प्रोग्रॅमर्स, डिझायनर्स आणि अभियांत्रिकी क्षेत्रांमध्ये असतील. यांत्रिकीकरणाने बेरोजगार होणाऱ्या माणसांना नवीन रोजगार मिळविण्यासाठी नवीन तंत्र- जसे की संगणकीय प्रणाली लिहिण्याचे काम- शिकून घ्यावे लागेल, जे तसे पाहता बरेचसे अवघड ठरू शकते. थोडय़ाबहुत फरकाने हाच बदल अनेक क्षेत्रांमध्ये होईल, ज्यामुळे कोटय़वधी लोकांचा कुठलेही काम न करू शकणारा एक बेरोजगार वर्ग तयार होईल- ज्याला हरारी ‘निरुपयोगी माणसे’ असे संबोधतात. यांत्रिकीकरणामुळे जीवन अधिक सुखकर होणार असले तरी त्यासाठी जास्त माणसांची गरज लागणार नसल्याने, येत्या काळात या कोटय़वधी ‘निरुपयोगी’ लोकांचे काय करायचे, हा गंभीर प्रश्न जगभरातल्या व्यवस्था आणि सरकारांसमोर असेल.

Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
changes in temperature and inflation marathi news, temperature change impact on inflation marathi news
विश्लेषण : उष्णतेच्या झळांमुळे अन्नधान्य महागाई? नवीन संशोधनामध्ये कोणते गंभीर इशारे?
mpsc mantra environment question analysis career
mpsc मंत्र: पर्यावरण प्रश्न विश्लेषण

अल्गोरीदम्स आणि यंत्रमानवांच्या प्रगतीसह समांतर काळात जैववैज्ञानिक क्षेत्रातही मोठी प्रगती होते आहे. मागचे शतक हे वाहने, विजेवर चालणारी यंत्रे आणि शस्त्रास्त्र उत्पादनांचे होते. एकविसाव्या शतकाचे मुख्य उत्पादन हे शरीर, बुद्धी आणि मेंदू यांभोवती केंद्रित झालेले आहे. जगाच्या इतिहासाकडे नजर टाकता, कुठल्याही काळात असलेले समाजातले उच्चवर्णीय स्वत:ला इतरांपेक्षा जास्त सक्षम, बुद्धिवान आणि सर्जनशील समजत आलेले आहेत. अलीकडच्या काळातल्या काही महत्त्वाच्या संशोधनांनंतर माणसाचा वर्ग अथवा जात आणि त्याची मूलभूत क्षमता यांचा परस्परांशी काहीएक संबंध नसल्याचे सिद्ध झाले आहे. येत्या काळात मात्र आर्थिक विषमता ही माणसांच्या कार्यक्षमतेमध्ये वा त्याच्या बुद्धी आणि सर्जनशीलतेमध्ये थेट हस्तक्षेप करू शकते. पैशाने श्रीमंत असलेल्या लोकांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा मिळाल्याने त्यांचे सरासरी आयुर्मान वाढेल, ते आपल्या शरीरात कृत्रिम अवयवांचे रोपण करू शकतील, शरीरातच संगणकरोपण करून आपल्या क्षमता वाढवू शकतील. या व्यवस्था व प्रक्रियेतून तयार होणारा माणूस हा ‘महामानव’ असेल. ही संधी अर्थातच तांत्रिक क्षेत्रात काम करणाऱ्या आणि तंत्रज्ञानाच्या विस्फोटानंतरही जगाला उपयुक्त राहणाऱ्या कमावत्या आणि श्रीमंत लोकांसाठी असेल. पूर्वापारपासून चालत आलेली आर्थिक विषमता आता थेट जैविक विषमतेला जन्म देईल आणि पहिल्यांदाच जैविकदृष्टय़ा भिन्न असे माणसाचे दोन उपप्रकार पृथ्वीवर अस्तित्वात येतील. फलनापूर्वी अंडे आणि वीर्याच्या जनुकीय संरचनेत बदल करून त्यात आपल्याला हवे तसे बाळ निर्माण करण्याची पद्धतीही रूढ होण्याची शक्यता येत्या काळात आहे. अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाने ‘महामानव’ जन्माला घालण्याच्या नादात निसर्गाचे नियम डावलण्याला बऱ्याच सरकारांचा आणि धर्माचा विरोध आहे. असे असले तरी, कुठल्या तरी एका सरकारला आपल्या देशात महामानव निर्माण होऊ द्यावे, जेणेकरून तो देश बलशाली होईल, असे वाटले तरी ‘महामानव’ जन्माला घालण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होईल. शस्त्रास्त्र स्पर्धेप्रमाणेच कुठल्याही देशाने असा काही प्रयत्न केल्यास त्या देशाला प्रत्युत्तर म्हणून मग इतर देशही यात मागे राहणार नाहीत. माणसांमध्ये मूलभूत जैविक बदल केल्यानंतर सुरू होणारी स्पर्धात्मक प्रक्रिया ही थांबविण्यासारखी नसेल. दरम्यान, दोन देशांमधल्या माणसांमधली जैविक विषमता किंवा एकाच देशातल्या दोन प्रकारच्या माणसांमध्ये जैविक विषमता येऊन त्यांच्यामधले विभवांतर वाढण्याच्या शक्यताही आहेत. अर्थात कुठलीही यशस्वी सेवा वा उत्पादन बहुसंख्याकांनी स्वीकारल्यास ते स्वस्त होऊन सर्वाच्या आवाक्यात आणले जाऊ शकते, परंतु जैवविज्ञान क्षेत्रातला इतिहास पाहता हे तंत्रज्ञान गरिबांना उपलब्ध होईपर्यंत श्रीमंतासाठी अजून किती तरी पुढे गेलेले असेल. त्यामुळे जैविक विभवांतर कदाचित कधीही कमी होणार नाही.

विसाव्या शतकात अनेक सरकारांनी आपल्या जनतेला स्वस्त वा मोफत वैद्यकीय व्यवस्था देऊ केल्या होत्या. यासाठी अगदी हिटलरही अपवाद नव्हता. महासत्ता बनण्यासाठी हिटलरला एका मोठय़ा लोकसंख्येची गरज होती, त्यात ती लोकसंख्या गरीब असल्यास ती हिटलरच्या आदेशानुसार अधिक काम करू शकत होती. ही गरीब लोकसंख्या निरनिराळ्या उत्पादन क्षेत्रांत कामगार बनू शकत होती अथवा सैन्यात सहभागी होऊ शकत होती. गेल्या पंचवीस वर्षांत झालेल्या निरनिराळ्या तंत्रज्ञानाच्या वाढत गेलेल्या वापरामुळे आता थेट गोळी घालणारे वा थेट गोळी झेलणाऱ्या सैनिकांचा सैन्यात उपयोग नाही. आधुनिक युद्ध हे स्वयंचलित ड्रोन्स, सायबर वॉरफेअर आणि क्षेपणास्त्रांच्या उपयोगाने लढले जाते. हे ड्रोन्स वा क्षेपणास्त्रे चालवण्यासाठीही माणसांची गरज असते, पण त्यासाठी लागणाऱ्या एकूण सैनिकांची संख्या ही पायदळांच्या गरजेपेक्षा किती तरी पटीने कमी असते. कुठल्याही अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर सर्वप्रथम लष्करात केला जातो, त्यामुळे सामान्य नागरिकांना उपलब्ध असलेले तंत्रज्ञान आणि लष्कराला उपलब्ध असलेले तंत्रज्ञान यात वीस- प्रसंगी तीस- वर्षांचाही फरक असतो. तंत्रज्ञानातल्या उच्चतम शोधांचा सर्वप्रथम वापर करून युद्धतंत्र असे वेगाने प्रगत होत असताना त्यात सहभागी सैन्यांची गरज वा संख्या मात्र उत्तरोत्तर कमी होत जाणार आहे. देशसंकल्पना टिकवून ठेवण्यासाठी वा थेट शत्रूंशी लढण्यासाठीही जास्त माणसांची गरज नसल्यास सरकार वा व्यवस्थेला त्यांच्यासाठी वैद्यकीय खर्च करणे वा त्यांची काळजी घेण्याची जास्त गरज राहणार नाही. उद्योग क्षेत्रातल्या प्रगतीप्रमाणेच युद्धतंत्रातल्या प्रगतीमुळेही कोटय़वधी लोक बेरोजगार होऊन ते निरुपयोगी होणार आहेत आणि सरकार वा श्रीमंतांना त्यांचे कल्याण करून बदल्यात काही मिळणार नसल्याने ते कदाचित या निरुपयोगी वर्गाकडेही दुर्लक्ष करतील. स्वीडनसारख्या काही प्रगत देशांनी कितीही प्रगती झाली तरी प्रत्येक नागरिकाला एक आर्थिक सुरक्षितता आणि किमान उत्पन्नाची हमी दिली आहे. त्यांच्या व्यवस्थापन आणि सामाजिक प्रगतीमुळे हे शक्यही आहे. नायजेरिया, दक्षिण आफ्रिका, भारत, मेक्सिको, ब्राझिल यांसारख्या विकसनशील देशांतल्या सरंजामी आणि नवभांडवलवादी श्रीमंतांची वागणूक पाहता ते समाजातल्या निरुपयोगी लोकांची जबाबदारी कितपत घेतील याविषयी शंकेला वाव आहे.

चौथ्या औद्योगिक क्रांतीनंतर येऊ घातलेल्या बेरोजगार निरुपयोगी नागरिकांनी संघर्ष करू नये म्हणून नेमके काय करावे याबद्दल कुठल्याही व्यवस्थेला अजून नेमका उपाय सापडलेला नाही. सद्य:स्थितीत ज्ञात असलेला समाजवाद, साम्यवाद, कल्याणकारी राज्य संकल्पना वा कुठल्याही ज्ञात व्यवस्थेमध्ये या प्रश्नाचे व्यवस्थित उत्तर नाही. व्यापक संघर्ष टाळण्यासाठी निरुपयोगी लोकांची मूलभूत अन्न-वस्त्र-निवारा या गरजांची पूर्तता करणे तसे सहजशक्य आहे; पण या इतक्या मोठय़ा लोकसंख्येच्या जीवनाला अर्थ देण्याचे आणि आपण जे काही करतो आहे ते महत्त्वाचे व उपयोगाचे आहे, ही भावना जागृत करणे हा येत्या काळातला महत्त्वाचा प्रश्न असू शकतो. माणसांना अधिकाधिक संगणकांच्या गेम्समध्ये व्यग्र ठेवल्यास आणि मानसिक औषधे वा अमली पदार्थ दिल्यास ते व्यग्र राहतील आणि व्यवस्थेला विद्रोह करणार नाहीत, असे काही लोकांचे म्हणणे आहे. माणसांनी मोठा काळ हा आभासी वास्तवात आणि कृत्रिम बुद्धिरसायनाच्या प्रभावाखाली घातल्यास त्यांच्या भावना आणि प्रतिक्रिया या अधिकाधिक काळ नियंत्रित अवस्थेत राहू शकतील, असे काही तज्ज्ञांना वाटते.

ही शक्यता तशी नवीन नसून हजारो वर्षांपासून ‘धर्म’ या संकल्पनेनेही माणसाला अशीच मदत केली असल्याबद्दल हरारी निर्देश करतात. धर्म हे हजारो वर्षांपासून चालत आलेले आभासी वास्तव असून त्यात तंत्रज्ञान अथवा संगणकाचा उपयोग केलेला नसला तरी मोबाइलवर गेम खेळताना जसे पॉइंट मिळवून आपण पुढच्या लेव्हलमध्ये जातो, तसेच धर्माचे आचरण करीत पुण्य कमावून आपण मृत्यूपश्चात स्वर्ग नावाच्या नवीन लेव्हलमध्ये जाऊ शकतो. धर्मसंकल्पनेमुळे लाखो लोकांना हजारो वर्षांपासून समाधानी राहण्यासाठी अशा प्रकारे उपयोग झाला आहे.

एकाच वेळी प्रचंड उत्सुकता आणि भीती वा नैराश्य निर्माण करणारे मुद्दे मांडताना या संभाव्य शक्यतांच्या मुळाशी असलेल्या मानवी मेंदूभोवती ‘होमो डय़ीउस’ या ग्रंथाचे मर्म स्थिरावलेले आहे. मानवी मेंदूत एकाच वेळी एका शक्यतेत लाखो चेतातंतू कार्यान्वित होऊन माणसाला आनंदाची भावना होते आणि दुसऱ्या शक्यतेत दुसरे लाखो चेतातंतू कार्यान्वित होऊन संताप येतो, ही प्रक्रिया नेमकी कशी घडते, का घडते आणि त्यामागची प्रेरणा काय असते याबद्दल माणसाला अद्यापही नेमके काही माहिती नाही. अनेक मानसिक स्थितींच्या शक्यता या अंदाजांवर आधारित असून त्याचे नेमके असे गणित वा शास्त्र काय असते हे माणसाला हा लेख लिहिला जाईपर्यंत कळलेले नाही. एकीकडे तंत्रज्ञान हे माणसाला देवाच्या जागी बसविण्याच्या प्रयत्नात असताना ज्या मानवी मेंदूतून हे सर्व तंत्रज्ञान येते आहे तो नेमका काय निर्णय देतो आणि कशाच्या आधारावर देतो या कोडय़ाची पूर्ण उकल माणसाकडे नाही. तंत्रज्ञानाच्या अफाट प्रगतीमुळे लागणारे नवनवे ज्ञान व सभोवतालची परिस्थिती वेगाने बदलत असताना त्याचे परिणाम जगभरातल्या राजकीय व्यवस्था आणि राजकीय पक्षांवर होत आहेत. आपल्याला ज्ञात असलेल्या कुठल्याही राजकीय तत्त्वज्ञानात वा ज्ञानशाखेत सद्य:परिस्थितीचे नेमके आकलन वा समाधान उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत जग एका विचित्र परिस्थितीतून जायला लागले असून त्याच्या नशिबात पुढे नेमके काय वाढून ठेवलेले आहे, हे निश्चितपणे सांगणे अवघड आहे. माणसाचा मेंदू हा अमर्याद चांगल्या गोष्टी करू शकतो आणि अमर्याद वाईट गोष्टीही करू शकतो. येणाऱ्या काळाकडे आशावादाने पाहायचे झाल्यास माणसाच्या मेंदूच्या चांगल्या वापरांच्या शक्यतेकडे लक्ष केंद्रित करायला हवे, असे युवाल हरारी यांना वाटते. ‘होमो डय़ीउस’ हे आजच्या काळातल्या महत्त्वाच्या पुस्तकांपैकी एक असून आधुनिक तंत्रधर्मासाठी तो कदाचित धर्मग्रंथही असू शकतो. हे पुस्तक एकाच वेळी उत्सुकता जागृत करून आशावाद निर्माण करू शकते किंवा निराशा जागृत करून वाचकांना नैराश्यात ढकलू शकते. जगाबद्दल भरपूर वाचन असणाऱ्या आणि ज्ञानाच्या वाढत्या पसाऱ्यामुळे अगोदरच नैराश्यात असलेल्यांसाठी हे पुस्तक औषधाचेही काम करू शकते.

राहुल बनसोडे

rahulbaba@gmail.com