मानवी समाजाच्या इतिहासाचे चौकटीबाहेरचे चिंतन मांडणाऱ्या सेपियन्स- अ ब्रीफ हिस्टरी ऑफ ह्युमनकाइंडया पुस्तकानंतर युवाल हरारी यांचे होमो डय़ीउस- अ ब्रीफ हिस्टरी ऑफ टुमॉरोहे पुस्तक प्रकाशित झाले. सेपियन्स..भूतकाळाविषयी भाष्य करणारे, तर होमो डय़ीउस..भविष्यकाळाबद्दल. तंत्रज्ञानातील प्रगती मानवी समाजाला कुठे घेऊन जाईल, याचे आकलन मांडत हरारी यांनी आजच्या वर्तमानाचा सांगितलेला हा फ्यूचर शॉक’..

२०११ साली मूळ हिब्रू भाषेत लिहिलेल्या आणि तब्बल तीन वर्षांनंतर इंग्रजीत भाषांतरित झालेल्या ‘सेपियन्स’ या पुस्तकामुळे युवाल नोह हरारी यांची ओळख जगाला त्यामानाने उशिराच झाली. त्यांनी ‘सेपियन्स’मध्ये मांडलेला युक्तिवाद तीन वर्षे र्सवकष पातळीवरती खोडून न काढता आल्याने इंग्रजीत आल्यानंतर ‘सेपियन्स’ची वैधता अधिकच वाढली. त्यानंतरचे काही दिवस युवाल हरारी हे निरनिराळ्या विद्यापीठांमध्ये आणि जागतिक कीर्तीच्या संस्था व कंपन्यांमध्ये आपले म्हणणे व्याख्यानांतून मांडीत होते. या व्याख्यानांना उपस्थित असणाऱ्या निरनिराळ्या विद्वानांकडून आणि सर्वसामान्य वाचकांकडून येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देत असताना त्यांचा मूळचा युक्तिवाद गतकाळाच्या इतिहासातून नजीकच्या भविष्यकाळासंदर्भात अनेक भाष्ये करीत होता. या प्रक्रियेचा परिणाम आणि परिपाक म्हणून ‘होमो डय़ीउस- अ ब्रीफ हिस्टरी ऑफ टुमॉरो’ या पुस्तकाचा जन्म झाला. हे पुस्तकही मूळ हिब्रू भाषेत लिहिले गेले, पण त्याचा इंग्रजीतील अनुवाद आणि प्रकाशन तत्परतेने झाले. ‘सेपियन्स’ला मिळालेला प्रतिसाद पाहून त्याच्या पुढच्या भागाचं प्रकाशकांनी व्यवस्थित ‘मार्केटिंग’ही केलं आणि २०१६ साली युनायटेड किंगडम आणि या वर्षांच्या सुरुवातीला अमेरिकेत ते प्रकाशित करण्यात आले. भारतीय बाजारात हे पुस्तक वर्षांच्या सुरुवातीपासूनच उपलब्ध होते आणि ‘सेपियन्स’ वाचून भारावून गेलेल्या जवळजवळ प्रत्येकाने ‘होमो डय़ीउस’ विकत घेऊन आठवडाभराच्या आतच त्याचे पहिले वाचन संपविले.

या पुस्तकाच्या शीर्षकातल्या ‘डय़ीउस’ या शब्दाचा प्रथमदर्शनी अर्थ ‘द्वितीय’ किंवा ‘दुसरा’ असा जरी वाटत असला, तरी त्याचे सरळ भाषांतर ‘देव’ असे आहे. सेपियन्स नावाचा प्रगतिशील जीव आता तंत्रज्ञानात इतकी प्रगती करतो आहे, की हजारो वर्षांची माणूसपणाची ज्ञात व्याख्या जाऊन तो आता प्रत्यक्ष देव बनू लागला आहे. माणसाच्या देव बनण्याच्या या प्रक्रियेतल्या शक्यता, त्यात येणारे निरनिराळे अडथळे आणि तत्त्वज्ञानाची संभाव्यता यावर ‘होमो डय़ीउस’ भाष्य करते. हे भाष्य करताना ‘सेपियन्स’ या आपल्या आदल्या पुस्तकाप्रमाणेच युवाल हरारी संशोधनाअंती सिद्ध झालेली काही विलक्षण तथ्ये आणि निष्कर्ष आपल्यासमोर मांडतात. या पुस्तकाच्या लिखाणावेळी वापरलेली संशोधने आणि टिपांच्या अनुक्रमणिकेने पुस्तकाचा पंधरा टक्के भाग व्यापलेला आहे. यावरून युवाल हरारींच्या युक्तिवादामागे असलेल्या अभ्यासाच्या आकाराची कल्पना येते. विसाव्या शतकात रचल्या गेलेल्या काल्पनिक विज्ञानांतल्या परिकथा आणि अचाट तंत्रज्ञानाच्या संकल्पनांनी रचलेल्या हॉलीवूडपटांत दिसलेल्या विश्वात आता आपण प्रत्यक्ष वावरायला सुरुवात केली. ऑल्वीन टॉफलरच्या ‘फ्यूचर शॉक’मधून सावरून जग आता ‘प्रेझेंट शॉक’मध्ये जगते आहे. टॉफलरचा फ्यूचर शॉक वर्तमान बनलेला असताना आजच्या वर्तमानाचा फ्यूचर शॉक काय असेल या संदर्भात होमो डय़ीउस भाष्य करते. हा शॉक टॉफलरच्या शॉकच्याही कित्येक पट मोठा असून त्यातून माणूसपणाची नवी व्याख्या आणि माणसाची नवी प्रजातीच उभी राहण्याची शक्यता होमो डय़ीउसमध्ये वर्तविण्यात आलेली आहे. या शक्यतेला तर्क, इतिहास आणि मानवी बुद्धीची झेप व मर्यादा या दोहोंचाही आधार असल्याने हे पुस्तक वर्तमानकाळातल्या सर्वात महत्त्वाच्या पुस्तकांपैकी एक आहे, याबद्दल कुठलीही शंका नाही.

‘सेपियन्स’च्या प्रचंड लोकप्रियतेमुळे युवाल हरारी यांच्याविषयी अनेकांना व्यक्तिगत कुतूहल निर्माण झालेले आहे. आपल्या व्यक्तिगत आयुष्याचे काही तपशील हरारी यांनी वेगवेगळ्या चर्चासत्रांमध्ये दिलेले आहेत. त्यातून ते जेरुसलेम आणि तेल अवीव्ह या इस्रायलच्या दोन महत्त्वाच्या शहरांदरम्यान असलेल्या एका लहानशा खेडय़ात आपल्या नवऱ्यासोबत राहतात. ते हिब्रू विश्वविद्यालयात इतिहास संशोधनाचे काम करीत असून आपल्या व्यग्र वेळापत्रकात सिलिकॉन व्हॅलीतल्या बलाढय़ कंपन्या आणि वैचारिक परिसंवादात भाग घेत असतात. मुख्य शहरांपासून दूर खेडय़ात राहणे आणि त्यातही इस्रायलसारख्या प्रचंड राजकीय उलथापालथीच्या देशात राहणे, यामुळे हरारी यांच्या विचारांना एक दूरस्थ निरीक्षकाचा परीघ मिळतो. या परिघातल्या चिंतनात कृत्रिम बुद्धिमत्ता, जैवअभियांत्रिकीमध्ये रोज लागणारे नवे शोध आणि सिलिकॉन व्हॅलीत सुरू असलेल्या तांत्रिक घडामोडींचा समावेश आहे.

सेपियन्सचा भूतकाळ आणि येऊ घातलेला भविष्यकाळ यांची सांगड घालताना हजारो वर्षांपासून ज्या समस्यांमुळे माणूसप्राणी नियतीवादी वा दैववादी राहिला त्या समस्यांवर विजय मिळविण्यात अलीकडच्या काळात माणसाला प्रचंड यश आलेले आहे. या समस्यांपैकी दुष्काळ, महामारी आणि महायुद्ध या तीन अत्यंत महत्त्वाच्या समस्यांवर तोडगा काढण्यात माणूस यशस्वी झाला आहे. माणसाच्या इतिहासात हजारो वर्षांपासून चालत आलेल्या या जागतिक समस्या अजूनही पूर्णपणे नष्ट झालेल्या नाहीत, पण त्या दैवाच्या हातातून काढून घेत माणसाने आपल्या हातात घेऊन त्याचे उत्तम व्यवस्थापन केलेले आहे. दुष्काळांमुळे होणाऱ्या भूकबळींची समस्या इथे प्रामुख्याने विचारात घेता येईल. गेल्या काही दशकांमध्ये तंत्रज्ञान, अर्थशास्त्र आणि राजकारणाच्या मदतीने आपण किमान पोट भरेल इतक्या स्वस्त अन्नाची निर्मिती व त्याचे व्यवस्थापन करून भुकेच्या समस्येवर नियंत्रण मिळविण्यात यशस्वी झालो आहोत. जगातल्या विविध भागांकडे नजर टाकल्यास काही भागांमध्ये आजही भूकबळींची समस्या जिवंत असल्याचे दिसते, पण त्याची कारणे आता भौगोलिक राहिलेली नसून पूर्णत: राजकीय आहेत. जगातले एकूण अन्नाचे उत्पादन हे जगाच्या एकूण लोकसंख्येच्या गरजेपेक्षा जास्त आहे. जगात भूकबळींची वार्षिक संख्या ही दहा लाखांच्या आसपास असते, तर अतिखाण्याच्या समस्येमुळे तीस लाखांहून अधिक मृत्यू दर वर्षी होतात. उपाशीपणामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण घटत असताना अतिखाण्यामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढते आहे.

जे अन्नसमस्येबाबत तेच प्लेगसारख्या महामारीच्या आजाराबाबतही सत्य आहे. जगाच्या इतिहासात प्लेगसारख्या साथींच्या आजारांनी लाखोंची लोकसंख्या अवघ्या काही महिन्यांत नष्ट होत असे. काही वेळा एखाद्या देशाचा राजकीय इतिहासही केवळ महामारीमुळे बदलून गेल्याची उदाहरणे आहेत. गेल्या काही दशकांपासून अशा महामारीवर नियंत्रण मिळविण्यात आपण यशस्वी झालो आहोत. इबोला, स्वाइन फ्ल्यू किंवा बर्ड फ्ल्यूसारखे आजार आजही अधूनमधून आपले डोके वर काढीत असतात; पण योग्य उपचार पद्धती आणि संसर्ग रोखण्यासाठी केल्या गेलेल्या उपाययोजनांमुळे हे अतिभयंकर आजार आपल्या नियंत्रणात आहेत. प्लेग जसा आपल्या नियंत्रणात आहे, तसेच युद्धेही आहेत. युद्धाला नियंत्रणात ठेवण्यासाठी राजकीय शिष्टाई आणि अर्थकारण जसे कारणीभूत आहे, तसेच जगातील अनेक राष्ट्रांचे अण्वस्त्रसज्ज असणेही आहे. जगभरातल्या युद्धजन्य परिस्थितीत जाणारे बळी, दहशतवादी हल्ल्यांत व रस्त्यावरच्या अपघातांत मरणाऱ्या लोकांची एकूण संख्या ही आत्महत्या करणाऱ्या लोकांच्या संख्येपेक्षा कमी आहे. व्यक्तीला आज बाह्य़ जगातल्या विरोधापेक्षा आपल्या अंतर्विरोधाशी तीव्र संघर्ष करावा लागत असल्याने त्याला इतरांपेक्षा स्वत:पासून अधिक धोका आहे.

हजारो वर्षांपासून माणसाला आपत्तीत ठेवणाऱ्या या तीन समस्यांवर तोडगा मिळविताना आपल्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ झालेली आहे. सभोवताली तंत्रज्ञानाचे नवनवे आविष्कार दिसून येत असताना, यापूर्वी तोडगा न सापडलेल्या अनेक ज्ञात समस्यांचे पुन्हा एकदा अवलोकन करून या समस्या कायमच्या सोडविल्या जाण्यासाठी माणसाने नव्या जोमाने प्रयत्न सुरू केले आहेत. जगातल्या कुठल्याही समस्येचे मुळापासून उच्चाटन करण्यासाठी आता फक्त आपले अज्ञान किंवा इच्छाशक्तीच काय ती आडवी येऊ शकते, इथपर्यंतच्या बिंदूपर्यंत आपण पोहोचलो आहोत. मृत्यू आणि वृद्धत्व हे शाश्वत सत्य जे आपण हजारो वर्षांपासून स्वीकारीत आलो आणि ज्यांच्या भवताली तत्त्वज्ञान, साहित्य आणि धर्माची व्यापक व्यवस्था उभी राहिली ती शाश्वत सत्येदेखील केवळ एक समस्या म्हणून पाहिली जात आहेत. कधी काळी जगत्नियंत्याचे अस्तित्व मान्य करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा प्रतिवाद ठरणाऱ्या ‘मृत्यू’कडे फक्त तांत्रिक समस्या म्हणून पाहिले जात आहे. योग्य त्या माहिती आणि संसाधनांचा वापर केल्यास लवकरच आपण मृत्यूवरही विजय मिळवू शकतो असा विश्वास जगातल्या काही कंपन्या आणि शास्त्रज्ञांना येऊ लागला आहे. ज्ञात धर्माच्या कक्षांमध्ये मृत्यूची धार्मिक व्याख्या ही मृत्यूनंतर प्रेषितांचे पुनरागमन आणि स्वर्गाच्या संकल्पनांबद्दल बोलते. वैद्यकीय तंत्रज्ञान अतिप्रगत होऊ लागल्यापासून ‘स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही’ या म्हणीऐवजी ‘स्वर्ग पाहण्यासाठी मरायची गरज नाही’ या नव्या म्हणीपर्यंत पोहोचण्याच्या वाटेवर काही संशोधक काम करीत आहेत. त्यांचा हा दावा पूर्णपणे खरा वा शक्य मानता येणार नाही, परंतु अशा दाव्यांना अतिश्रीमंत व अतिप्रगत कंपन्या आणि माणसांचा वाढता प्रतिसाद पाहता ‘अमरत्व’ या शब्दाची निश्चित एक व्याख्या करण्यापर्यंत माणसाच्या बुद्धीची विश्लेषक नजर झेप घेऊ लागली आहे. माणूस दीर्घायू वा अमर होण्याच्या शक्यता जसजशा वाढायला लागतील तसतसा समतेच्या मूलभूत तत्त्वाचा आग्रह अमरत्वाच्या मूलभूत अर्थात परिवर्तित होऊ लागेल, असे युवाल हरारी यांना वाटते.

अमरत्व प्राप्त करण्याचे लक्ष्य आणि आकांक्षाचे स्वरूप अगदी पुरातन कालखंडाप्रमाणेच असले तरी ते मिळविण्याचा मार्ग आता धार्मिक राहिलेला नसून तंत्रज्ञानाचा झाला आहे. यातून ज्ञात धर्माची व्याख्या नवीन धर्माने पुनस्र्थित होत असून या धर्माला हरारी ‘टेक्नो रिलिजन’ अर्थात ‘तंत्रधर्म’ हा शब्द वापरतात. मृत्यूनंतरच्या स्वर्गातले चिरंतन आयुष्य, न्याय, आनंद आणि सुखाचे आश्वासन तंत्रधर्मामध्येही असून त्यासाठी देवावर विश्वास ठेवण्याची वा मरण्याची गरज नाही, असे आश्वासन तंत्रधर्म देत आहेत. पारंपरिक धर्माच्या व्याख्यांना नाकारून तंत्रज्ञानाच्या मदतीने पृथ्वीवर स्वर्ग आणण्याची तंत्रधर्माची सद्य: संकल्पना ही गेल्या शतकातल्या मार्क्‍सवादी आणि समाजवादी तत्त्वांशी बरीचशी मेळ खाते, असे हरारी यांनी नोंदविले आहे. तंत्रधर्माने देऊ केलेली आश्वासने ही मार्क्‍सवादी वा समाजवादी आश्वासनांशी मिळतीजुळती असली आणि मार्क झकरबर्गसारखे लोक वैश्विक समूहाचा मॅनिफेस्टो जरी लिहीत असले, तरी तंत्रधर्म वा मार्क झकरबर्ग सरळसरळ साम्यवादी आहेत, असे मात्र म्हणता येणार नाही. औद्योगिक क्रांतिपश्चात वाफेचे इंजिन, वीज आणि रेल्वे या पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करतील, असा रशियन साम्यवादाचा दावा होता. साम्यवादाची एकाच वाक्यातली सुटसुटीत व्याख्या लेनिनला विचारली असता त्याने, ‘कामगार परिषदेला जास्तीचे अधिकार आणि संपूर्ण देशाला वीज’ ही जगप्रसिद्ध व्याख्या केली होती. पूर्ण देशात वीज आणि तारयंत्रणा असल्याशिवाय एखाद्या देशात साम्यवाद आणता येऊ शकत नाही, हे लेनिनला माहिती असावे. आधुनिक तंत्रधर्म या सरळ अर्थाच्याच मार्गाने कित्येक योजने पुढे जाऊन फक्त वीजच नाही, तर निरनिराळे तंत्रज्ञान आणि अल्गोरिदमच्या उपयोगातून माणसाला जिवंतपणीच मोक्षाचे आश्वासन देऊ लागला आहे.

(क्रमश:)

  • होमो डय़ीउस- अ ब्रीफ हिस्टरी ऑफ टुमॉरो
  • लेखक : युवाल नोह हरारी
  • प्रकाशक : हार्विल सेकर
  • पृष्ठे : ४४८, किंमत : ५०९ रुपये

राहुल बनसोडे

rahulbaba@gmail.com