थोडीथोडकी नव्हे, २२ वर्ष जॉन बकरे हे ब्रिटिश पार्लमेंटच्या कनिष्ठ सभागृहाचे- म्हणजे आपल्या लोकसभेसारख्या ‘हाऊस ऑफ कॉमन्स’चे- सदस्य होते आणि त्यापैकी सुमारे दहा वर्ष ते या सभागृहाचे अध्यक्ष किंवा ‘स्पीकर’ होते. महत्त्वाचं म्हणजे, ‘दुसऱ्या महायुद्धात ब्रिटननं उतरणं जितकं चुकीचं होतं, तितकीच मोठी दुसरी चूक ब्रेग्झिट ठरेल,’ असं स्पष्ट मत मांडणारे होते. अन्य देशात इतक्या स्पष्टवक्त्या अध्यक्षांवर पक्षपातीपणाचा आरोप सहज होऊ शकला असता, पण बर्कोवर तो झाला नाही, कारण ते जे बोलत ते साधार आणि संसदीय परंपरांना धरूनच असायचं. स्वत:च ठरवल्याप्रमाणे दोन आठवडय़ांपूर्वी- ३१ ऑक्टोबर रोजी – त्यांनी पद सोडलं. त्यानंतर लगेच बातमी आली – जॉन बकरे पुस्तक लिहिताहेत.. होय, संसदेतल्या आठवणींचंच पुस्तक!

राजकारण्यांच्या आठवणी या काही ‘फक्त’ आठवणी नसतात. आठवणी सांगण्याच्या मिषानं काही हिशेब चुकते होत असतात, काही माजी सहकाऱ्यांवर आरोप करता येतात.. आपणच कसे योग्य आणि बिनचूक वागलो हे वाचकांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्नही असतो..  जॉन बकरे यांचंही पुस्तक तसंच असेल का?

कदाचित नसेल. म्हणजे, कोण चुकीचं होतं हे सांगायला बकरे कचरणार नाहीत. तोंडाळ अध्यक्ष अशी त्यांची संभावना एरवीही त्यांचे राजकीय विरोधक करायचेच. स्वत: बकरे हे, ‘माझे निर्णय सोयीचे नसतील, पण योग्य असतात,’ असं अनेकदा म्हणायचेच. पण बकरे यांच्या पुस्तकात वाचनीय भाग वेगळाच असू शकेल. थॅचर काळ संपल्यानंतर ते पार्लमेंटात आले. तेव्हापासून सहा पंतप्रधानांची कारकीर्द त्यांनी पाहिली. जॉन मेजर आणि टोनी ब्लेअर यांच्या काळात ब्रिटन हा खुला, सर्वसमावेशक, अनेकान्तवादी आणि बहुसांस्कृतिक देश म्हणून आकाराला येत होता. पण कॅमेरून यांच्या काळात ‘ब्रेग्झिट’ सार्वमत झाल्यामुळे ही ओळखच पुसटच होत गेली. ती आणखी पुसून काढण्याचं काम बोरिस जॉन्सन यांनी २४ जुलै २०१९ पासून हाती घेतलं. रंगीबेरंगी ‘टाय’ घातल्यामुळे हास्यास्पद ठरवले गेल्यानंतरही तो बहुरंगीपणा न सोडणारे बकरे हे ब्रिटनच्या सर्वसमावेशकतेचा ऱ्हास कसा झाला, याहीबद्दल लिहितील, अशी अपेक्षा आहे.