18 March 2019

News Flash

रशियाच्या जाळ्यात ट्रम्प कसे अडकले?

 ‘‘माझा पक्ष रशिया आणि ब्लादिमीर पुतिन यांच्या हातातील बाहुलं बनत आहे.

‘कोल्युजन, ‘फायर अ‍ॅण्ड फ्युरी

अलीकडेच प्रसिद्ध झालेली ही दोन्ही पुस्तकं केवळ अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वागण्या-बोलण्याबाबतच नव्हे, तर एकूणच अमेरिकी शासन व्यवस्थेतील कट-कारस्थानांचा व ते करणाऱ्यांच्या मनोभूमिकेचा तळ दाखवून देतातच; शिवाय या साऱ्यात तिथं धैर्यानं उभे राहिलेल्या विवेकी आवाजांचं दर्शनही घडवतात..

‘‘माझा पक्ष रशिया आणि ब्लादिमीर पुतिन यांच्या हातातील बाहुलं बनत आहे. ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ (एफबीआय) आणि न्याय खात्यावर पक्षातर्फे जो पक्षपाताचा आरोप करण्यात आला आहे, त्यानं एक देश म्हणून ना अमेरिकेचं हित साधलं जाणार आहे, ना माझ्या पक्षाचं, ना अध्यक्षांचं हित साधलं जाणार आहे; ते हित फक्त रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचंच..’’

– हे उद्गार आहेत जॉन मॅकेन यांचे. मॅकेन हे अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. बराक ओबामा यांच्याविरोधात ते २००८ साली रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार होते. त्याचबरोबर नव्वदच्या दशकात राजकारणात येईपर्यंत मॅकेन अमेरिकी सन्यदलात वरिष्ठ पदावर होते. व्हिएतनामच्या युद्धात एका भीषण लढाईनंतर ते उत्तर व्हिएतनामी सन्याच्या हाती सापडले आणि त्यानंतर काही वर्षे युद्धकैदी म्हणूनही त्यांना काढावी लागली होती. आज मॅकेन हे कर्करोगाने आजारी आहेत आणि त्यांचा हा आजार असाध्य आहे. जीवनाचा अंत जवळ आला असताना अत्यंत व्यथित होऊन त्यांनी हे उद्गार काढले आहेत.

मॅकेन यांना अशी जाहीर व्यथा व्यक्त करण्यास ज्या घटना कारणीभूत ठरल्या आहेत, त्यांची अत्यंत वेधक आणि चित्रमय शैलीतील सविस्तर हकीगत ल्यूक हार्डिग यांच्या ‘कोल्युजन : सीक्रेट मीटिंग्ज, डर्टी मनी अ‍ॅण्ड हाऊ रशिया हेल्प्ड डोनाल्ड ट्रम्प विन’ या पुस्तकात वाचायला मिळते.. आणि ट्रम्प असं का वागत आहेत, याचा नाटय़मय, चुरचुरीत, चटपटीत आणि अनेकदा असंभव व अविश्वसनीय वाटणारा तपशील वाचायला मिळतो तो ‘फायर अ‍ॅण्ड फ्युरी : इनसाइड द ट्रम्प व्हाइट हाऊस’ या मायकेल वुल्फ यांच्या पुस्तकात.

अलीकडेच प्रसिद्ध झालेली ही दोन्ही पुस्तकं केवळ ट्रम्प यांच्या वागण्या-बोलण्याबाबतच नव्हे, तर एकूणच अमेरिकी शासन व्यवस्थेतील कट-कारस्थानांची व ते करणाऱ्यांच्या मनोभूमिकेची कल्पना वाचकाला आणून देतात. तसेच अशा प्रकारांमुळे देशातील लोकशाही राज्यव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांची कल्पना आल्यावर त्याच्या विरोधात उभं राहण्याचं धर्य दाखवणाऱ्या राजकीय नेत्यांचंही दर्शन घडवतात.

जॉन मॅकेन हे त्यापैकीच एक आहेत.

मॅकेन यांनी ‘एफबीआय’चे प्रमुख जेम्स कॉमे यांना ८ डिसेंबर २०१६ रोजी जे एक ‘फोल्डर’ दिलं. त्यात जे अहवाल होते, ते तयार केले होते ख्रिस्तोफर स्टील या ‘एमआय ६’ या ब्रिटिश गुप्तहेर संघटनेच्या माजी अधिकाऱ्यानं. हाच अधिकारी ल्यूक हार्डिग यांच्या पुस्तकातील प्रमुख पात्र आहे. उलट आज ट्रम्प प्रशासनातील अनागोंदी व सावळागोंधळ यांचं जगाला जे दर्शन घडत आहे, त्यास कारणीभूत आहे ती स्टीव्ह बॅनॉन यांची व्हाइट हाऊसमधून झालेली गच्छंती. बॅनॉन हेच मायकेल वुल्फ यांच्या पुस्तकातील प्रमुख पात्र आहे.

या दोन्ही पुस्तकांना पाश्र्वभूमी आहे ती अध्यक्षीय निवडणुकीच्या काळात बॅनॉन यांच्या मदतीनं रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळविण्याकरिता व नंतर विजय मिळविण्यासाठी ट्रम्प यांनी केलेल्या अनेक विधिनिषेधशून्य उपद्व्यापांची, त्या संदर्भातील पक्षनेतृत्वाच्या हतबलतेची आणि ट्रम्प निवडून आल्यावर त्यांच्यावर नियंत्रण कसं ठेवायचं, यावरून रिपब्लिकन पक्षात असलेल्या मतभेदांची.

मॅकेन यांना आज जी व्यथा व्यक्त करणं भाग पडलं आहे, ते या मतभेदाचाच परिपाक आहे.

अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात रशियानं विविध स्तरांवर हस्तक्षेप केला, याबद्दल आज त्या देशातील प्रशासन, गुप्तहेर संघटना, डेमोक्रॅटिक पक्ष आणि रिपब्लिकन पक्षातील एक मोठा गट यांना अजिबात शंका नाही.

ट्रम्प यांच्या विजयाचे प्रमुख शिल्पकार असलेले स्टीव्ह बॅनॉन यांचाही त्यात समावेश आहे, हेही लक्षात घ्यायला हवं. किंबहुना ट्रम्प यांच्या मुलानं एका रशियन विधिज्ञाशी केलेली चर्चा ही ‘देशद्रोही’ स्वरूपाची होती, असं बॅनॉन यांनी आपल्याला सांगितल्याचं लेखक मायकेल वुल्फ यांचं म्हणणं आहे. त्यावर ‘बॅनॉन यांना वेड लागलं आहे’ अशी तिखट प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली असली, तरी वुल्फ यांच्याशी मी असं काही बोललोच नव्हतो, असा इन्कारही बॅनॉन यांनी केलेला नाही.

‘अमेरिकी न्याय खातं आणि एफबीआय यांनी माझा पराभव व्हावा याकरिता प्रयत्न केले व प्रचार यंत्रणेतील काही प्रमुख व्यक्तींवर पाळत ठेवली,’ असा आरोप आज ट्रम्प करीत आहेत आणि त्याकरिता ते आधार घेत आहेत तो ख्रिस्तोफर स्टील यांनी तयार केलेल्या अहवालाच्या ‘फोल्डर’चाच.

हे फोल्डर तयार करण्याची जबाबदारी कशी स्टील यांच्याकडं आली आणि ती निभावण्याची क्षमता ब्रिटनच्या ‘एमआय ६’ या गुप्तहेर संघटनेतील रशियाविषयक तज्ज्ञ म्हणून स्टील यांनी कशी कमावली होती, याचा अत्यंत वेधक असा वृत्तांत ल्यूक हार्डिग यांच्या पुस्तकात वाचायला मिळतो. तसेच हेरगिरीचं जग, त्यात असलेले धोके व आकर्षणं, दोन्ही निवारून यश मिळविण्यासाठी करावा लागणारा अभ्यास व परिश्रम याचा जो तपशील हार्डिग यांनी स्टील यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवती गुंफला आहे तो मुळातूनच वाचण्याजोगा आहे. या सगळ्या वर्णनाला पट लाभला आहे तो सोव्हिएत संघराज्य कोसळून रशिया फक्त उरला त्या ऐंशीच्या दशकाच्या अखेरच्या काळाचा आणि मग रशियाच्या राजकारणात झालेल्या पुतिन यांच्या उदयाचा व त्यांनी राज्यसंस्थेवर बसवलेल्या पकडीचा.

त्याचबरोबर पत्रकारितेच्या व्यवसायात असूनही असं पुस्तक लिहिण्यासाठी करावं लागणारं संशोधन, अभ्यास आणि पायपीट यांचा प्रत्यय हार्डिग यांच्या पुस्तकात पानोपानी येतो.

विशेष म्हणजे हार्डिग यांचं हे पुस्तक मायकेल वुल्फ यांच्या सनसनाटी पुस्तकाच्या काही महिने आधी प्रसिद्ध झालं होतं. पण त्याकडे फारसं कोणी लक्ष दिलं नाही. याचं कारण त्यात वुल्फ यांच्या पुस्तकाप्रमाणे ‘चटपटीत व सनसनाटी’ माहिती नव्हती. मात्र हार्डिग यांच्या पुस्तकातील माहिती प्रक्षोभक होती. अमेरिकी गुप्तहेर संघटना ‘सीआयए’, अमेरिकी गुन्हे अन्वेषण संघटना ‘एफबीआय’, अमेरिकी राष्ट्रीय सुरक्षा संघटना- ‘नॅशनल सिक्युरिटी एजन्सी’ (एनएसए) या सर्वानी स्टील यांच्या ‘फोल्डर’ची गांभीर्यानं दखल घेतली. म्हणूनच मॅकेन यांनी कॅनडातील हॅलिफॅक्स येथे ‘इंटरनॅशनल सिक्युरिटी फोरम’च्या बठकीला गेलेले असताना रशियातील ब्रिटनचे माजी राजदूत अ‍ॅण्ड्रय़ू वूड यांनी सांगितलेली स्टील यांच्या फोल्डरसंबंधीची माहिती मनावर घेतली आणि जॉर्ज बुश यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत अमेरिकी परराष्ट्र खात्यात राज्यमंत्री असलेल्या डेव्हिड क्रॅमर यांना लंडनला पाठवून स्टील यांच्याशी चर्चा करायला सांगितलं. परतल्यावर क्रॅमर यांच्याशी मॅकेन यांनी सविस्तर चर्चा केली आणि नंतरच एफबीआयचे प्रमुख जेम्स कॉमे यांच्या हाती ते फोल्डर ठेवलं. मग कॉमे यांनी अमेरिकी निवडणुकीतील रशियाच्या हस्तक्षेपाची चौकशी सुरू केली. मात्र त्याची किंमत कॉमे यांना मोजावी लागली. ट्रम्प यांनी अध्यक्षपद हाती घेतल्यावर अल्पावधीतच एफबीआयच्या संचालकापदावरून कॉमे यांना दूर केलं.

स्टील यांच्या फोल्डरची सत्यता पटवणारी ट्रम्प यांनी अप्रत्यक्ष दिलेली ही पहिली कबुली होती. अर्थात, केवळ स्टील हेच नव्हे, तर अमेरिकेच्या एनएसएप्रमाणेच जगभरातील माहिती अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक यंत्रणेद्वारे जमा करणाऱ्या ब्रिटनच्या ‘जीसीएचक्यू’ या संघटनेच्या हातीही रशियाच्या या हालचालीची माहिती पडली होती. रशियात वारंवार जाणाऱ्या वा रशियाशी विविध स्तरांवर संबंध असणाऱ्या व्यक्तींच्या इतरांशी असलेल्या संबंधांवर देखरेख ठेवणं, हे या ब्रिटिश संघटनेचं नित्याचं काम असतं. याच कामाच्या ओघात २०१५ साली ट्रम्प यांच्याशी संबंधित व्यक्ती रशियनांशी वारंवार बोलत असल्याचं या संघटनेच्या निदर्शनास आलं. ट्रम्प यांचे सहकारी व रशियन लोक यांच्यातील या दूरध्वनी चर्चा २०१६ च्या मध्यापर्यंत चालू होत्या. त्यातील तपशील हाती आल्यावर या ब्रिटिश संघटनेचे त्या वेळचे प्रमुख रॉबर्ट हॅनिगन यांनी वॉशिंग्टनला जाऊन सीआयएचे प्रमुख जॉन ब्रेनन यांची भेट घेतली व त्यांच्या हाती हा तपशील दिला.

जॉन मॅकेन यांनी एफबीआय प्रमुख कॉमे यांच्या हाती डिसेंबर, २०१६ मध्ये दिलेल्या स्टील यांच्या त्या फोल्डरची अशी पुष्टीही मिळत गेली. मुळातच स्टील यांच्याकडं प्रथम जे काम आलं होतं ते पूर्वी पत्रकार असलेल्या आणि नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर संपर्कतज्ज्ञ म्हणून काम करणाऱ्या ग्लेन सिम्पसन यांच्याकडून. अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचारमोहिमेत दोन्ही पक्षांचे उमेदवार ठरण्याच्या आधीच्या काळात ट्रम्प यांचे खंदे विरोधक असलेले रिपब्लिकन नेते पॉल सिंगर यांनी सिम्पसन यांच्याशी संधान बांधून ट्रम्प यांच्या रशियातील संबंधांविषयी माहिती जमविण्याची कामगिरी त्यांच्यावर सोपविली होती. ते काम सिम्पसन यांनी स्टील यांच्याकडे दिलं. स्टील ही माहिती जमा करण्याच्या प्रयत्नांत असतानाच अध्यक्षीय उमेदवार म्हणून रिपब्लिकन पक्षानं ट्रम्प यांची निवड केली आणि पॉल सिंगर यांनी काढता पाय घेतला. मात्र सिंगर यांची जागा घेतली ती मार्क एलियास या डेमॉक्रॅटिक पक्षाशी संबंधित वकिलानं. एलियास यांनी सिम्पसन यांच्याकडे सिंगर यांना हवी असलेली ती माहिती जमविण्याची जबाबदारी दिली.

ते काम स्टील यांनी पुढं चालू ठेवलं आणि त्यातूनच ट्रम्प यांच्याविषयी रशियन गुप्तहेर संघटना ‘एफएसबी’नं काय काय माहिती जमविली आहे, याचे एकूण १६ अहवाल स्टील यांनी तयार केले. त्यातील जी काही माहिती ल्यूक हार्डिग यांच्या पुस्तकात दिली आहे ती नुसती थक्क करणारीच नाही, तर इतकी सर्व दृष्टीनं विकृत असलेली व्यक्ती अमेरिकेच्या अध्यक्षपदावर कशी काय निवडून येऊ शकते, याचं आश्चर्य वाटल्याविना राहत नाही.

आज तेच फोल्डर ‘हा माझ्या विरोधातील कट आहे,’ असं ट्रम्प म्हणताहेत आणि त्यासाठी ते आधार घेत आहेत तो अमेरिकी संसदेच्या गुप्तहेर संघटनाविषयक समितीनं तयार केलेल्या एका टिपणाचा. हे टिपण तयार केलं आहे डेव्हिन नन्स या समितीचे अध्यक्ष असलेल्या रिपलिब्कन नेत्यानं. या टिपणाचा रोख आहे तो डेमॉक्रॅटिक पक्षावर. या पक्षानं एफबीआय व न्याय खात्याचा वापर करून अध्यक्षीय निवडणुकीच्या काळात ट्रम्प यांच्या प्रचारमोहिमेतील प्रमुख नेत्यावर पाळत ठेवली होती, असा आरोप या टिपणात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, नन्स यांच्यासाठी या टिपणाचा प्राथमिक मसुदा तयार केला आहे तो भारतीय वंशाच्या कश्यप पटेल या अमेरिकी नागरिकानं. पटेल हे रिपब्लिकन पक्षाशी संबंधित आहेत आणि नन्स अध्यक्ष असलेल्या संसदीय समितीच्या कार्यालयात ते काम करतात. स्टील यांना भेटण्यासाठी पटेल यांनी लंडनची वारीही केली होती.

अर्थात, ट्रम्प यांचे असे आरोप हा कांगावा आहे. काहीही करून रशियाशी असलेल्या आपल्या संबंधांविषयीची चौकशी पुढं जाऊ नये याकरिता ट्रम्प यांचा सारा आटापिटा चालला आहे. स्टीव्ह बॅनॉन यांनीही या संबंधांबाबत जी पुष्टी दिली ती मायकेल वुल्फ यांच्या पुस्तकात प्रसिद्ध होणार म्हटल्यावर ते पुस्तक प्रकाशित करू नये याकरिताही ट्रम्प यांनी प्रयत्न केले. आपल्या वकिलातर्फे त्यांनी वुल्फ यांच्या प्रकाशकांना नोटीसही पाठवली. त्याचा काहीच उपयोग होणार नव्हता. साहजिकच पुस्तक प्रसिद्ध झालं आणि मग ट्रम्प म्हणू लागले की, ‘अमेरिकेतील बदनामीविषयक कायदे कडक करण्याची गरज आहे’!

बॅनॉन व ट्रम्प यांचं बिनसलं, त्याचं मुख्य कारण म्हणजे रिपब्लिकन पक्षातील नेतृत्वाचा बॅनॉन यांच्या अतिरेकी उजव्या प्रवृत्तीच्या कार्यक्रमांना असलेला विरोध आणि आपल्या विरोधातील चौकशी थांबविण्याकरिता ट्रम्प यांना रिपब्लिकन नेतृत्वाची भासत असलेली गरज हेच आहे. त्यासाठीच ट्रम्प यांनी करविषयक विधेयक संमत करवून घेण्याचा खटाटोप केला. ओबामा यांच्या कारकीर्दीत संमत झालेलं विमाविषयक विधेयक – जे पुढं ‘ओबामाकेअर’ म्हणून ओळखलं गेलं ते – रद्द करवून घेण्याचाही प्रयत्न ट्रम्प यांनी केला.

रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वाला ट्रम्प हे अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून नको होते. पण गौरवर्णीय मध्यमवयीन अमेरिकी नागरिकांच्या मनांतील विविध आशंका व पूर्वग्रह यांना प्रखर प्रचाराच्या आधारे खतपाणी घालून त्यांना ट्रम्प यांच्या पाठीशी उभं केलं ते बॅनॉन यांनीच. त्यांच्या या प्रयत्नांनी रिपब्लिकन नेतृत्व हतबल झालं; पण ट्रम्प विजयानंतर आपला अतिरेकी अजेंडा राबविण्याची बॅनॉन यांची मनीषा काही पुरी झाली नाही.

कारण ट्रम्प यांना कोणत्याही विचाराशी काही देणंघेणं नव्हतं व नाही. ‘स्वार्थ’ हीच त्यांच्या सर्व वागण्यामागची प्रेरणा होती व आहे. त्याचेच प्रत्यंतर ल्यूक हार्डिग यांच्या पुस्तकात स्टील यांच्या अहवालातील जो मजकूर उद्धृत केला आहे तो वाचल्यावर येतो. आता अध्यक्षपद तर मिळालं आहे; ते वाचवायचं असेल तर रिपब्लिकन पक्षातील नेतृत्वाचं पाठबळ हवं, असं दिसू लागल्यावर ट्रम्प यांनी बॅनॉन यांना डच्चू दिला. ट्रम्प यांच्या अशा स्वार्थी वागण्याचे अनेक तपशील मायकेल वुल्फ यांच्या पुस्तकात वाचायला मिळतात.

येत्या काही महिन्यांत अमेरिकी संसदेच्या द्वैवार्षिक निवडणुका आहेत. त्यात सिनेट व प्रतिनिधी सभा या दोन्ही सभागृहांत डेमॉक्रॅटिक पक्षाला बहुमत मिळालं, तर ट्रम्प यांची खरी कसोटी लागणार आहे. मतदानपूर्व चाचण्यांत आताच डेमॉक्रॅटिक पक्ष किमान १३ टक्क्यांनी आघाडीवर आहे. त्यामुळे दोन्ही सभागृहांत या पक्षाला बहुमत मिळण्याची मोठी शक्यता आहे. तसं झाल्यास ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव अमेरिकी संसदेत मांडला जाऊ शकतो.

हे संकट टाळण्याच्या इराद्यानंच ट्रम्प आणि त्यांच्या पाठीशी असलेल्या रिपब्लिकन पक्षातील गटानं गुप्तहेरविषयक संसदीय समितीच्या कागदपत्रांतील गोपनीय टिपण जाहीर केलं.

हे डावपेच कसे व किती खालच्या पातळीवर जाऊन खेळले जात आहेत, ते वुल्फ आपल्या पुस्तकात रंगवून सांगतात. त्यातील ५० टक्के भाग जरी खरा असेल, तर ट्रम्प यांच्यासारखा माणूस निवडूनच कसा येऊ शकतो, हा प्रश्न सतावत राहतो.. आणि अशा व्यक्तीला हाताशी धरणं रशियाला कसं शक्य झालं, याची प्रचीती ल्यूक हार्डिग यांचं पुस्तक आणून देतं.

दोन्ही पुस्तकं वाचून खाली ठेवल्यावर एक प्रश्न पडतो. आपल्या देशातील राजकीय व्यवस्थेत होणाऱ्या घडामोडींचं वर्णन करणारी अशी काही पुस्तकं- विशेषत: हार्डिग यांच्या पुस्तकासारखी- कधी तरी लिहिली जातील काय आणि लिहिली गेल्यास प्रसिद्ध होऊ दिली जातील काय?

‘कोल्युजन : सीक्रेट मीटिंग्ज, डर्टी मनी अ‍ॅण्ड हाऊ रशिया हेल्प्ड डोनाल्ड ट्रम्प विन’

लेखक : ल्यूक हार्डिग

 प्रकाशक :  व्हिन्टेज बुक्स, न्यू यॉर्क 

 पृष्ठे : ३५४, किंमत : ११७३ रुपये 

 

‘फायर अ‍ॅण्ड फ्युरी : इनसाइड द ट्रम्प व्हाइट हाऊस’

लेखक : मायकेल वुल्फ

 प्रकाशक : लिटिल ब्राऊन, लंडन

 पृष्ठे : ३३६, किंमत : ५१५ रुपये

प्रकाश बाळ  prakaaaa@gmail.com

First Published on February 17, 2018 3:31 am

Web Title: how donald trump stuck in the trap of russia