News Flash

लिहित्या लेखकाचे वाचन

लेखक हा स्खलनशील प्राणी आहे. कलावंत म्हणून या मनुष्यप्राण्याचे सातत्याने स्खलन होत असते.

प्रतिनिधिक छायाचित्र

हृषीकेश गुप्ते

२३ एप्रिल रोजी येणाऱ्या जागतिक पुस्तक दिनानिमित्त हे दोन खास लेख. पहिला पुस्तकांचे बारूप न्याहाळणारा; तर दुसरा, लेखकाला त्याच्या वाचनातून काही साधनसामग्री मिळते का, की आणखीही काही मिळतं, याचा ठाव घेणारा..

‘लिहित्या लेखकाचे वाचन’ या विषयावर लिहायचे म्हटले, की आपण लेखक असून वर्तमानकाळात आपण लिहिते आहोत, आपल्या लेखनात खंड पडलेला नाही हे गृहीत धरणे अध्याहृत असते. खरे तर लेखकाचे लिहिणे आणि ते लेखन प्रसिद्ध होऊन वाचकांसमोर येणे या दोन अत्यंत भिन्नकालीन घटना असू शकतात. त्यामुळेच ‘लिहित्या लेखकाचे वाचन’ या विषयावर लेखकाने व्यक्त होणं हे निसरडय़ा वाटेवरून चालण्यासारखे असू शकते. अशा वेळी लेखक काय वाचतोय यापेक्षा तो हे जे ‘काय’ आहे ते का वाचतोय, याचा शोध घेणे जास्त महत्त्वाचे ठरते.

लेखक हा स्खलनशील प्राणी आहे. कलावंत म्हणून या मनुष्यप्राण्याचे सातत्याने स्खलन होत असते. हे स्खलन प्रतिभेचे, प्रतिमानिर्मितीचे आणि कथनशैलीच्या हातोटीचेही असू शकते. कोणतीही निर्मिती ही स्खलनशीलच असते. स्खलनाशिवाय कलानिर्मिती ही एक अशक्यप्राय गोष्ट आहे. परंतु इथे हे स्खलन लेखकाच्या अनुभवांचे, त्याने आत्मसात केलेल्या रचनातंत्राचे वा प्रतिमारूपांचे नसून लेखकाकडे लेखक म्हणून असणाऱ्या आशयद्रव्याची आणि रूपबंधाची झीज या अर्थाने अभिप्रेत आहे. कधी कधी हा प्रवास उलटय़ा दिशेचा असतो. तो एक विशिष्ट उंची गाठून थांबतो. लेखक संपृक्त होतो. लेखक संपृक्त होतो म्हणजे त्याच्याकडले आशयद्रव्य संपते असे नाही, परंतु ते व्यक्त करण्यासाठी आवश्यक असणारा रूपबंध त्याला सापडत नाही. जुन्याच रूपबंधात बऱ्याचदा नवे आशयद्रव्य शिळे होऊन जाते. नव्या रूपबंधात जुने आशयद्रव्य ठिसूळ भासते. नवे आशयद्रव्य, नवा रूपबंध, नवा पोत आणि नवी प्रतिमासृष्टी शोधत व्यक्त होत राहणं यासाठी लेखक सातत्याने धडपडत असतो. या धडपडीतला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे लेखकाचं वाचन, असं मला वाटतं.

पुढे सरकण्याआधी मला इथे तीन घटना सांगाव्याशा वाटतात.. पहिली घटना साधारणत: १९९७ सालची. विंदा करंदीकरांच्या घरी जायचा योग आला. त्यांच्याशी गप्पा मारताना शेजारच्या टीपॉयवर एक उघडं पुस्तक पालथं ठेवलेलं दिसलं. त्या पुस्तकाचं नाव होतं- ‘द कॉल ऑफ कथुलू अ‍ॅण्ड अदर वियर्ड स्टोरीज’ अन् लेखकाचं नाव- एच. पी. लवक्राफ्ट! दुसरी घटना साधारणत: २००८ सालची. नारायण धारपांच्या निधनापश्चात त्यांचा मोठा पुस्तकसंग्रह पुण्यातल्या जुनी पुस्तकं विकणाऱ्या एका ग्रंथविक्रेत्याकडून विकत घेण्याची संधी मला लाभली. सर्व मिळून जवळपास दीड-दोन हजार पुस्तकं असावीत. धारपांच्या लेखनप्रवृत्तीला शोभतील अशा परदेशी भयगूढ कथांची पुस्तकं त्यात होतीच; पण कान्ट, नित्शे, देकार्त यांच्या तत्त्वज्ञानाची मीमांसा करणारी पुस्तकंही त्या संग्रहात होती. पाटणकरांचा ‘कान्टची सौंदर्यमीमांसा’ हा ग्रंथ धारपांच्या हस्ताक्षरातल्या नोट्ससह मला त्या संग्रहात सापडला. फ्रांझ काफ्का, जॉन स्टाइनबेक, डोस्टोव्हस्की आणि माख्र्वेजच्या पुस्तकांचा मोठा साठा त्यात होता. जवळपास प्रत्येक पुस्तकासोबत धारपांच्या हस्ताक्षरातल्या टिपणांचं स्वतंत्र टाचण जोडलं होतं. तिसरी घटना वसंत नरहर फेण्यांची. मध्ये कधी तरी फेण्यांशी फोनवर वार्तालाप झाला. त्या काळात ते त्यांची नुकतीच प्रकाशित झालेली ‘कारवारी माती’ ही कादंबरी लिहीत होते. ‘लिहिताना कधी कुंठावस्था म्हणजेच ब्लॉक आला तर मी पल्प फिक्शन वाचतो,’ असं ते म्हणाले. या विषयावर त्यांना फोनवर पुढे जास्त छेडता आले नाही.

परंतु या तीनही घटनांचा आज लेखकांच्या वाचनाविषयीच्या विवेचनाच्या दृष्टीने विचार करता, मला त्यांत काही विलक्षण सामायिक धागे सापडतात. मुळात लेखकाचे लेखन हे कधीही थांबत नाही. कागदाच्या तावांवर तो पांढऱ्याचे काळे करत असेल नसेल, पण त्याच्या नेणिवेच्या पातळीवर लेखक हा कायम लिहिताच असतो. अशा वेळी लेखकाचे वाचन हा त्याच्या लेखनाच्या वा अभिव्यक्तीच्या दृष्टीने अत्यंत कळीचा मुद्दा ठरतो. वर सांगितलेल्या तीन भिन्न लेखकांच्या तीन भिन्न घटनांमध्ये जो सामायिक धागा आहे तो आहे त्या लेखकांच्या वाचनाचा. वरील तीन घटनांमधून हे तीन भिन्न प्रवृत्तीचे लेखक त्यांच्या लेखनप्रवृत्तीशी काटकोन साधणाऱ्या आशयाचे लेखन का वाचत असावेत बरे? का लेखकाकडचे आशयद्रव्य भिन्न नसतेच आणि इथूनतिथून लेखक हा एका सामायिक आशयद्रव्याच्याच विभिन्न अभिव्यक्तींचा आविष्कार घडवत असतो?

वाचनाशिवाय लेखक घडणं ही एक अशक्यप्राय घटना असते. वाचन हाच लेखनाचा मूलस्रोत असतो. लेखकाच्या मनात असलेली प्रतिमासृष्टी कागदावर उतरवण्यासाठी आवश्यक असलेले बांधकामाचे साहित्य वाचन पुरवते. वाचन हा व्यक्तीच्या आयुष्याच्या उभारणीचा, म्हणजे शिक्षणव्यवस्थेचाच एक वस्तुनिष्ठ भाग असल्यामुळे प्रत्येक व्यक्ती प्रमाणबद्ध भाषा शिकत वाचू लागतेच. हे वाचन शैक्षणिक गरजांपुरते मर्यादित ठेवायचे, की स्वत:च्या विचारांच्या समृद्धीसाठी त्या वाचनाच्या कक्षा विस्तारायच्या- या टप्प्याशी येऊन प्रत्येक व्यक्ती आपापली वेगळी वाट चोखाळते. आशयद्रव्यातील विभिन्नता, रचनाबंधातील नवनवे प्रयोग शोधत अधिकाधिक क्लिष्ट आणि व्यामिश्र होत जाणारा वाचनप्रवास सुरू असतानाच वाचकास स्वत: व्यक्त व्हावेसे वाटू लागते. ही आतून धडका मारणारी अभिव्यक्ती कागदावर उतरवण्यात तो यशस्वी होतो. वाचता वाचता वाचकामधून लेखकाचा जन्म होतो. वाचकाचे वाचन, त्यातून झालेला लेखकाचा जन्म आणि त्या लेखकाचे पोषण या पुन्हा तीन भिन्न गोष्टी.

प्रसरणशील प्रतिभा आणि प्रसवशील कल्पना या दोन्ही गोष्टींची वानवा लेखकात नसते, परंतु लेखनाचा प्रत्यक्ष जन्म होण्यासाठी नवनवीन प्रतिमा आणि नवनवीन रूपबंध यांचा शोध घेणे लेखकासाठी अनिवार्य असते. लेखक हा काही निर्वात पोकळीतून लिहीत नसतो. म्हणजे लेखक नवे आशयद्रव्य जन्माला घालतो, क्वचित प्रसंगी नव्या रूपबंधांचे बांधकामही करतो. परंतु यासाठी लागणारे शब्दद्रव्य त्याला सभोवतालातूनच घ्यावे लागते. त्याअर्थी लेखक कधीच पोकळीत वास्तव्य करत नाही, तर तो या शब्दद्रव्याने, कधी या शब्दद्रव्याच्या प्रकटीकरणासाठी गरजेच्या असलेल्या उपमा-अलंकारांनी समृद्ध अशा वातावरणात राहात असतो. हे वातावरण लेखकाला त्याचे वाचन पुरवते. लेखक लिहू लागतो किंवा तो लिहिता लेखक बनतो तेव्हा त्याचे वाचन एका वेगळ्या टप्प्यावर पोहोचते, असे मला वाटते. स्वत:च्या लेखनाला पोषक असणाऱ्या प्रतिमासृष्टीने नटलेले लेखनच तो वाचत राहतो. यापुढचे विवेचन ही सार्वत्रिक शक्यता नसून माझ्या वैयक्तिक वाचनानुभवावर अवलंबून असल्याने त्याला अपवाद संभवण्याच्या शक्यताही विपुल आहेत.

सध्याचा टप्पा..

लेखक म्हणून स्वत:च्या वाचनाचा विचार करत असताना आजवरच्या वाचनप्रवासातले बदलत गेलेले टप्पे, अवचित समोर आलेली वळणे आणि याच प्रवासात वाटय़ाला आलेले दुर्गम, दुस्तर घाट यांचा विचार करता, मला माझं सध्याचं वाचन हे एका विशिष्ट टप्प्यावर येऊन थांबलेलं, नव्हे थांबवलेलं वाचन वाटतं. ज्या प्रकारचा लेखनप्रकार लेखक हाताळतो त्या प्रकारच्या वाचनाकडेच त्याचा लिहित्या काळात कल असतो, असं मला आज स्वत:चं उदाहरण पाहता वाटतं. इथं कोणत्याही लेखकाशी स्वत:ची तुलना करणं मला अभिप्रेत नसून कोणत्या लेखकांच्या वारीत मला सामील व्हायला आवडेल एवढं सांगणंच अभिप्रेत आहे. या पाश्र्वभूमीवर गेल्या तीन वर्षांत वाचलेली काही पुस्तकं आठवणं क्रमप्राप्त ठरतं.

हारुकी मुराकामी हा लेखक माझा एके काळचा आवडता लेखक, पण नंतर नंतर त्याचं लेखन वाचणं दुरावलं. यामागची कारणमीमांसा शोधताना असं लक्षात येतं, की मुराकामीच्या विरळ लेखनशैलीपेक्षा मला दाट विणीचं निवेदन हाताळणारा मो यान आजकाल जास्त भावतो. आशयद्रव्याचं प्रकटीकरण आणि निवेदनाचे साचे या दोन्ही बाबतींत या दोनही लेखकांच्या अभिव्यक्तीत कमालीची भिन्नता आहे. पण मुराकामीचं ‘काफ्का ऑन द शोर’ आज पुन्हा वाचण्यापेक्षा मो यानच्या ‘बिग ब्रिस्ट्स अ‍ॅण्ड वाइड हिप्स’ची पारायणं करण्याकडे माझा जास्त कल असतो. क्लासिक न्वार लेखक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या रॉबर्तो बोलॅनोचं ‘द सॅवेज डिटेक्टिव्हज्’ पुन्हा पुन्हा वाचणं हा मला माझ्या लेखनाचा रियाज वाटतो. जॉन स्टाइनबेक आणि ग्रॅहॅम ग्रीन हे एके काळचे माझे अत्यंत आवडते लेखक, पण आज या लेखकांचं पुन्हा वाचण्यापेक्षा आर्थर कॉनन डॉयलचा ‘शेरलॉक होम्स’ वाचताना मला लेखक म्हणून माझे आशयद्रव्य संवर्धित करण्याची संधी मिळते. झुरॉन झुकॉवीचसारखा लेखक आज वाचताना कल्पनाशक्ती कितीही ताणली तरी तुटत नाही याची अनुभूती मिळते.

निखिलेश चित्रे या मित्राद्वारे नव्यानेच सापडलेले मिलोराद पावीच आणि मनोहर श्याम जोशी हे दोन लेखक अनुक्रमे रचनाबंधाच्या आणि निवेदनाच्या नवनव्या प्रयोगांची ओळख करून देत मेंदू बधिर करून सोडतात. ‘लॅण्डस्केप पेन्टेड विथ टी’ ही मिलोराद पाविचची रचनाबंधाच्या दृष्टीने क्लिष्ट असणारी कादंबरी काही दिवसांपूर्वी वाचण्याचा योग आला. शब्दकोडय़ाच्या रचनाबंधातून एका वास्तुविशारदाच्या शोधाची कथा सांगणारी ही कादंबरी वाचक म्हणून तुम्हाला थकवते, दमवते; पण लेखक म्हणून तुमच्यासमोर नव्या आव्हानांचे अडथळेही उभे करते. मनोहर श्याम जोशींच्या अद्भुत कथानकांच्या निवेदनाला लाभलेला नर्मविनोदी पोत लेखकाच्या व्यामिश्र अभिव्यक्तीची साक्ष देतो. आजही जी. ए. कुलकर्णी, श्री. ना. पेंडसे, त्र्यं. वि. सरदेशमुख, शरच्चंद्र वासुदेव चिरमुले या जुन्या मराठी लेखकांचं पुनर्वाचन माझ्या झिजू लागलेल्या शब्दसौष्ठवाची डागडुजी करतात. सतीश तांबे यांच्या कथेतला दडलेला निवेदक शोधण्यासाठी त्यांच्या कथांचे पुनर्वाचन करणे जेव्हा बंधनकारक बनते तेव्हाही प्रत्येक नव्या वाचनातून नव्याने सापडलेल्या नवनवीन निवेदकांच्या शक्यता लेखक म्हणून मला काही तरी देऊनच जातात. एखाद्या गायकाला जसा स्वत:चा आवाज जपावा लागतो, त्याचप्रमाणे लेखकाला स्वत:चं शब्दसौष्ठव आणि निवेदनाचा सूर जपणं आवश्यक असतं. प्रतिमानिर्मिती करताना शब्दांचं बांधकाम अनिवार्य असतं. अशा वेळी हाताशी बांधकामाचं साधन आणि योग्य ती साधनसामग्री असणं अत्यंत गरजेचं असतं. लिहित्या लेखकाचं वाचन लेखकाला या साधनसामग्रीची उणीव भासू देत नाही.

gupterk@yahoo.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2018 3:38 am

Web Title: hrishikesh gupte article on occasion of world book day
Next Stories
1 ग्रंथ-बंधांची बांधणी..
2 फसवे पुस्तक, फसवा लेख
3 वादावर पडदा!
Just Now!
X