21 November 2017

News Flash

बुकबातमी : राजन यांची भाषणं आणि राजन यांच्या प्रस्तावना!

४ सप्टेंबरपासून रघुराम राजन यांचं ‘आय डू व्हॉट आय डू’ हे पुस्तक बाजारात आलं

लोकसत्ता टीम | Updated: September 9, 2017 2:35 AM

४ सप्टेंबरपासून रघुराम राजन यांचं ‘आय डू व्हॉट आय डू’ हे पुस्तक बाजारात आलं आहे.

४ सप्टेंबरपासून रघुराम राजन यांचं ‘आय डू व्हॉट आय डू’ हे पुस्तक बाजारात आलं आहे. म्हणजे पुस्तकाचं प्रकाशन होण्याच्या अवघ्या आठवडाभर आधी रिझव्‍‌र्ह बँकेचा वार्षिक अहवाल आला. देशाच्या या मध्यवर्ती शिखर बँकेचे माजी गव्हर्नर (कार्यकाळ : चार सप्टेंबर २०१३ ते ४ सप्टेंबर २०१६), हीच राजन यांची सर्वोच्च ओळख. पुस्तकही नेमक्या याच कालखंडातल्या भाषणांचं आणि प्रासंगिक लिखाणाचा संग्रह, अशा स्वरूपाचं. अवघ्या आठवडय़ापूर्वीच रिझव्‍‌र्ह बँकेनं निश्चलनीकरणाचा लाभ न झाल्याची कबुली दिली होती. आणि राजन यांची प्रतिमा तर वर्षभरापूर्वीच ‘मोदी-विरोधक’ अशी करण्यात आल्यामुळे पुस्तक बाजारात येता-येता झालेल्या इंग्रजी मुलाखतींमधून कशाला महत्त्व मिळणार आणि त्याही पलीकडे, या पुस्तकाची चर्चा कशी होणार, हे निश्चलनीकरणाचा विषय अनायासेच पुन्हा गाजू लागल्यामुळे जणू अटळच होतं!

या पुस्तकाच्या मजकुराबद्दलचा सविस्तर समीक्षालेख यथावकाश ‘बुकमार्क’मध्ये येईलच; पण अनेकांना या पुस्तकाबद्दल कुतूहल आहे आणि ते शमवणं ‘बुकबातमी’ आपलं कर्तव्य मानते. या ३०० पानी मजकूर असलेल्या (अन्य पानं मजकूरबा) पुस्तकाची रचना तीन विभागांची- त्यापैकी पहिल्या विभागात नऊ प्रकरणं आणि २६ उप-प्रकरणं, तर दुसऱ्या व तिसऱ्या विभागात मिळून एकंदर ११ उप-प्रकरणांचा ऐवज, अशी आहे. लेखकीय मनोगतात ‘निश्चलनीकरणा’चा थेट उल्लेख आहे. नऊही प्रकरणांना साधारण १५० ते २५० शब्दांच्या छोटय़ा प्रस्तावना आहेत. उदाहरणार्थ, ‘मी जिथे शिकलो त्या दिल्ली आयआयटीच्या पदवीदान सोहळय़ात प्रमुख पाहुणा म्हणून बोलण्याआधी मला लक्षात आले, की माझी मुले शोभतील अशा वयाच्या तरुणांपुढे मला बोलायचे आहे. मी माझ्या मुलांना काय सांगितले असते? तेच- भारताच्या सहिष्णू परंपरेबद्दल- मी या मुलांना सांगायचे ठरवले’ असे राजन २०१५ मध्ये केलेल्या एका भाषणाबद्दल म्हणतात. या भाषणाचे वृत्तांकन ‘असहिष्णुतेवर कोरडे’ असे  झाले, याबद्दल खंतही व्यक्त करतात. ललित दोशी स्मृती-व्याख्यानात त्यांनी ऑगस्ट २०१४ मध्ये निश्चलनीकरणापेक्षा अन्य मार्ग आहेत, असे म्हटले होते. त्याबद्दल मात्र राजन फार भाष्य करीत नाहीत. प्रकरणांतल्या मजकुराची उपयुक्तता किती हा मुद्दा निराळा (तो आपण समीक्षकावर सोडू); पण या प्रस्तावना हे या पुस्तकाचं मोठंच- आणि वाचनीयसुद्धा- वैशिष्टय़ आहे!

First Published on September 9, 2017 2:35 am

Web Title: i do what i do book by former rbi governor raghuram rajan