रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन नेमके आहेत तरी कसे, जनमानसांत त्यांचं नक्की स्थान काय आहे, त्यांच्याविरोधात होणारी आंदोलने, पुतिनविरोधकांचं अचानक गायब होणं किंवा त्यांचं अचानक परदेशात जाणं या सगळ्या सगळ्यांविषयी जाणून घेणं औत्सुक्याचं असतं.. ते कुतूहल शमवणारं हे पुस्तक!

२४ सप्टेंबर २०११ या दिवशी मॉस्कोतील एका सभागृहात रशियाच्या सत्ताधारी युनायटेड रशिया या पक्षाचं वार्षिक अधिवेशन सुरू होतं. या अधिवेशनाच्या सुरुवातीला तत्कालीन पंतप्रधान व्लादिमिर पुतिन यांनी संबोधित करायला सुरुवात केली. पक्षाची ध्येयधोरणे वगैरे नेहमीच्या छापाचे भाषण झाल्यावर पुतिन यांनी अचानक जाहीर करून टाकलं की, आगामी संसदीय निवडणुका तत्कालीन अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील. झालं, कॅमेरे अर्थातच मेदवेदेव यांच्याकडे वळले. अध्यक्षांनी कसनुसं हसून वेळ मारून नेली. त्यानंतर भाषणाची पाळी अध्यक्षांची होती. मेदवेदेव यांनीही मग आगामी अध्यक्षीय निवडणुकीत पुतिन यांनीच िरगणात उतरावं असं खुलं आवाहन केलं. मेदवेदेव यांच्या या आवाहनाचे टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात स्वागत झालं. सभागृह शांत झाल्यावर पुतिन यांनी, ‘हा असा करार आमच्यात चार वर्षांपूर्वीच झाला होता,’ असं जाहीररीत्या सांगून टाकलं. अध्यक्ष मेदवेदेव हे पुतिन यांच्या हातातले बाहुले आहेत, या समजावर त्यामुळे शिक्कामोर्तब तर झालंच, शिवाय ‘चोर आणि लबाडांचा पक्ष’ (पार्टी ऑफ क्रूक्स अ‍ॅण्ड थिव्हज) अशी जनमानसांत झालेली युनायटेड रशिया या पक्षाची प्रतिमा अधिकच घट्ट झाली.. आणि झालंही तसंच. डिसेंबर, २०११ मध्ये झालेल्या संसदीय निवडणुकांत पुतिन यांच्या युनायटेड रशिया या पक्षाला बहुमत मिळालं, परंतु मतपत्रिकांचा घोळ (म्हणजे लांडय़ालबाडय़ा) करूनच. आणि त्यासाठी वापरलं गेलं कोणाला, तर भावी पिढी घडविण्याचे महान कार्य करणाऱ्या शिक्षकांना. कारण मतदान केंद्रांवर तैनात असलेले बव्हंशी कर्मचारी हे शिक्षकच होते. त्यांनीच युनायटेड रशिया पक्षाच्या उमेदवारांच्या मतपत्रिकांवर शिक्के मारून त्यांना विजयी केलं. काही ठिकाणी तर मतदारांच्या डोळ्यांदेखत हे गैरप्रकार झाले आणि कोणी त्याविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केलाच तर ‘कोणी काहीच पाहिलं नाही,’ अशा शब्दांत त्यांना दरडावलं गेलं. निवडणूक प्रक्रियेतील या घोळाला विरोध झाला तो मॉस्को परिसरात. म्हणजे ज्या ठिकाणी राजकीय जाणिवा-नेणिवा प्रकर्षांने होत्या/आहेत, तिथेच. कारण मॉस्को, सेंट पीटर्सबर्ग वा तत्सम शहरी भाग वगळला तर इतरत्र ‘पुतिन म्हणजेच रशिया आणि रशिया म्हणजेच पुतिन’ असंच चित्र पद्धतशीरपणे गेल्या १६-१७ वर्षांत उभं केलं गेलंय. त्यामुळे शहरी भाग वगळता अन्यत्र युनायटेड रशिया पक्षालाच भरघोस मतं मिळणं क्रमप्राप्त होतं. मात्र, असं असलं तरी या निवडणुकीने असंतोषाची बिजं पेरलीच.. आणि अर्थातच पुतिन यांच्याविरोधात जनमानस तयार होऊ  लागलं. अलेक्झी नोवोल्नी आणि इलिया याशिन यांच्या नेतृत्वाखाली मॉस्कोच्या मध्यवर्ती भागात असलेल्या क्रेमलिनसमोर निदर्शनं आयोजित करण्यात आली. नेहमीप्रमाणे शे-पाचशे लोक जमतील आणि विरोध प्रकट करून परत जातील, या क्रेमलिनच्या अंदाजाला इथेच धक्का पोहोचला आणि बघता बघता आंदोलनाने विराट स्वरूप धारण केले. नवलानी आणि याशिन यांनाही एवढा मोठा प्रतिसाद अपेक्षित नव्हताच.. आपल्या भविष्यातील स्वप्नांचा चुराडा, मुक्त धोरणाचं खच्चीकरण, मूठभरांच्याच हाती एकवटलेली सत्ता आणि संपत्ती, मेदवेदेव यांनी केलेली घोर फसवणूक आणि पुन्हा अध्यक्षपदी पुतिन नकोच.. या सगळ्या भावनांचा एकत्रित परिपाक म्हणून या आंदोलनाकडे जगभरातील माध्यमांनी पाहिलं आणि त्याची दखल घेतली. ही अशी परिस्थिती अचानक उद्भवली का, पुतिन यांच्याविरोधात एका रात्रीत जनता एकवटली का.. तर याचं उत्तर ‘नाही’ असंच द्यावं लागेल. मग कसं काय हे सर्व झालं.. याची उत्तरं मिळतात मार्क बेनेट्स यांच्या ‘आय अ‍ॅम गोइंग टू रुइन देअर लाइव्हज’ या पुस्तकात.

जग जेव्हा एकविसाव्या शतकाच्या स्वागताच्या तयारीत होतं त्या वेळी रशियात एक वेगळंच सत्तांतर घडत होतं. सोव्हिएत संघाच्या फाटाफुटीनंतर उदयास आलेले नेतृत्व आणि तत्कालीन अध्यक्ष बोरिस येल्तसिन यांनी ३१ डिसेंबर १९९९ रोजी अध्यक्षपदाचा राजीनामा देत तत्कालीन पंतप्रधान व्लादिमिर पुतिन यांच्याकडे सूत्रे सोपवत असल्याचं अचानक जाहीर करून टाकलं. नाही तरी दहा वर्षांच्या कंटाळवाण्या, देशाला पार कंगाल करून सोडलेल्या येल्तसिन यांच्या राजवटीला जनता कंटाळलीच होती. त्यामुळे काहीसा अपरिचित असलेला, तरुण तडफदार, केजीबीचा माजी अधिकारी, मितभाषी, व्होडका न पिणारा, ज्युडो खेळणारा, टीव्हीवर जास्त न झळकणारा बुजऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या व्लादिमिर पुतिन या नव्या काळजीवाहू अध्यक्षाचे रशियन जनतेने स्वागत केले. आणि २०००च्या मार्चमध्ये त्याच्याकडे अधिकृतरीत्या अध्यक्षपदाची सूत्रेही सोपवली. पुतिन यांनीही देशाचा मूड ओळखून, क्रेमलिनमधील राजकारण आत्मसात करत, कमालीची सावधगिरी बाळगत आपला अजेंडा राबवायला सुरुवात केली. पुतिन यांना अध्यक्ष करण्यामागे येल्तसिन यांचाही स्वार्थ होता. म्हणजे आपण केलेला भोंगळ कारभार निस्तरून आपल्याला सुरक्षाकवच पुरवू शकेल आणि निवृत्तीनंतरचं आयुष्य बिनबोभाट जगता येईल, असा उत्तराधिकारी त्यांना हवा होता, जो की, त्यांना पुतिन यांच्यात दिसला. असो, तर पुतिन यांनीही अनेक आर्थिक सुधारणा राबवून रशियन जनतेबरोबरच जगाचेही लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. २००० ते २००८ या आठ वर्षांच्या अध्यक्षीय कारकीर्दीत रशियाची आणि रशियन जनतेची आर्थिक प्रगती झाली. त्यामुळे नाही म्हटलं तरी जनता पुतिन यांच्या कारभारावर खूश होती. मात्र, या कालावधीत मूठभर लोकांच्याच हाती सत्ता आणि संपत्ती एकवटली हेही तितकंच खरं. आपल्याविरोधात उमटणारा आवाज जास्त मोठा होणार नाही याची काळजी पुतिन यांनी घेतली. विरोधी आवाज त्यांनी पद्धतशीरपणे, अगदी केजीबी शैलीत, दाबून टाकले. २००४ मध्ये तर त्यांनी रशियातील राज्यांचे गव्हर्नर नियुक्तीचे सर्वाधिकार अध्यक्षांकडेच राहतील, अशी घटनादुरुस्ती करून घेत पुढील चार वर्षेही अध्यक्षपद आपल्याकडेच राहील याची तजवीज करून घेतली. २००८ नंतर मात्र त्यांना अध्यक्षपदी राहणं रशियन घटनेनुसार शक्य नव्हतं. मग पुतिन यांनी त्यांचाच बगलबच्चा असलेल्या दिमित्री मेदवेदेव यांना अध्यक्षपदी बसवलं. आणि आपण स्वत: पंतप्रधानपदी राहिले. म्हणजे २०१२ मध्ये पुन्हा अध्यक्षपदी येण्याचा पुतिन यांचा मार्ग त्याच वेळी सुकर झाला.

..आणि झालेही तसंच. २००८ ते २०१२ या कालावधीत मेदवेदेव नामधारी अध्यक्ष होते. या कालावधीत पुतिन यांनी आणखी एक महत्त्वाची घटनादुरुस्ती करून घेतली आणि ती म्हणजे अध्यक्षपदाचा कार्यकाल सहा वर्षांचा करून घेतला. २०१२ मध्ये होऊ  घातलेल्या अध्यक्षीय निवडणुकीत पुन्हा पुतिन यांच्याकडेच अध्यक्षपद जाणार याची कुणकुण जनतेला लागताच पुतिनविरोधी वारे रशियात वाहू लागले. आणि त्याचीच परिणती जनआंदोलनात झाली. जनआंदोलनाची धार बोथट करण्यासाठी पुतिन यांनी धर्मसत्तेलाही वेठीस धरले. रशियन ऑथरेडॉक्स धर्मपीठाच्या सर्वोच्च धर्मगुरूंकडून अध्यक्षपदासाठी पुतिन यांनाच पाठिंबा असल्याचे त्यांनी वदवून घेतले. इतके करूनही पुतिन यांच्याविरोधातील आंदोलन काही शमेना. मे, २०१२ मध्ये तिसऱ्यांदा अध्यक्षपदाची शपथ घेताना पुतिन यांना या असंतोषाला सामोरे जावे लागले. त्यातून त्यांनी या असंतोषाला कारणीभूत असणाऱ्यांचे जिणे हराम करीन, अशी प्रतिज्ञा घेतली.

आणि मग सुरू झाला सूडाचा प्रवास. एकेका राजकीय विरोधकाला तुरुंगात डांबणे, त्यांच्यावर खोटेनाटे आरोप लावून त्यांना वर्षांनुर्वष तुरुंगात टाकण्याची तजवीज करणं, दरडावून-धमकावून विरोधकांना गप्प बसवणं वगैरे प्रकार सुरू झाले. त्यातूनही कोणी भीक घातली नाहीच तर त्याला सरळ करण्यासाठी अन्य उपाय योजले जाऊ  लागले. नोवोल्नी, याशिन यांनाही तुरुंगात डांबले गेले.

देशाची ढासळती अर्थव्यवस्था, घटते तेलउत्पादन, दारिद्रय़रेषेखालील लोकांच्या संख्येत झपाटय़ाने होत असलेली वाढ, घटत चाललेली लोकप्रियता या सगळ्याच्या पाश्र्वभूमीवर आपली मलिन होत जाणारी प्रतिमा उजळ करण्यासाठी पुतिन यांनी युक्रेनवर युद्ध लादले. युक्रेनवरील आक्रमणाच्या निर्णयावरूनही रशियात विरोधकांनी गदारोळ घातला. पुतिन यांच्याविरोधात आंदोलन छेडले गेले. परंतु त्यालाही पुतिन बधले नाहीतच. त्यातच आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या बोरिस नेमत्सोव्ह यांच्यासारख्या कट्टर पुतिनविरोधी नेत्याची क्रेमलिननजीकच हत्या झाली. ही हत्या कोणी केली, कशी केली, याचे काही पुरावेही मिळाले नाहीत. परंतु हत्येच्या काही दिवस आधीच नेमत्सोव्ह यांनी आपली हत्या होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली होती.

नव्या घटनादुरुस्तीनुसार पुतिन आता थेट २०२४ पर्यंत अध्यक्षपदी राहू शकतात (अलेक्झी नोवोल्नी यांची गेल्याच महिन्यात सुटका झाली असून ते बहुधा २०१८ मध्ये होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुतिन यांना कडवे आव्हान उभे करू शकतात). त्यातूनही पुतिनच अध्यक्षपदी राहिले तर सोव्हिएत संघाच्या अस्तानंतर प्रदीर्घ काळ सत्ताकेंद्री राहण्याचा मान स्टॅलिन आणि ब्रेझनेव्ह यांच्यानंतर थेट पुतिन यांच्याकडे जाणार आहे. एका अर्थी इतिहास लिहिण्याचाच पुतिन यांचा प्रयत्न आहे. मात्र, २०२४ नंतर अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यावर पुतिन यांना कोण सुरक्षाकवच पुरवणार, हा मोठा प्रश्नच आहे. कारण येल्तसिन यांनी त्यांचा उत्तराधिकारी पुतिन यांच्यात पाहिला होता. पुतिन यांचं काय.. हा प्रश्न उरतोच..

लेखक मार्क बेनेट्स स्वत: ब्रिटिश पत्रकार आहेत. मॉस्कोत राहून त्यांनी अनेक ब्रिटिश तसेच पाश्चिमात्य वर्तमानपत्रांसाठी पत्रकारिता केली आहे. मार्क स्वत: पुतिनविरोधी आंदोलनाचे साक्षीदार आहेत. पुतिन यांचे कट्टर विरोधक, आधी निस्सीम चाहते मग विरोधक बनलेले, पुतिन यांचे माजी सल्लागार, पुतिन यांचे मित्र, विरोधी पक्षातील नेते, युवा कार्यकर्ते, पत्रपंडित, राजकीय विश्लेषक, आजी-माजी कम्युनिस्ट नेते, २०१२च्या लाल चौक आंदोलनात सहभागी झालेले तरुण, तरुणी, तसेच रशियातील उद्योजक, अर्थतज्ज्ञ, सामाजिक जाणीव असलेले पुढारी, पुतिन यांच्या कार्यशैलीमुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे दुखावले गेलेले, गॅरी कॉस्परॉव्हसारखे पुतिनविरोधक, तर काही पुतिनप्रेमी.. अशा एक ना अनेक लोकांशी चर्चा करून लेखकाने या पुस्तकाची मांडणी केली आहे. त्यातूनच पुतिन यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होत जाते.

क्रांतीनंतरच्याच काय पण क्रांतिपूर्व रशियाचाही इतिहास अशाच महत्त्वाकांक्षी, हुकूमशाही प्रवृत्तींनी भरलेला आहे हे मराठीजनांना ‘रासपुतिन’च्या संदर्भामुळे थोडं फार तरी माहीत असतं.. आणि आपणही नकळत रशियाच्या राशीत असलेल्या (रास) पुतिन या काहीशा गूढ व्यक्तिमत्त्वाकडे, यांच्याकडे नेमकं कसं पाहावं, हे शिकू लागतो.

  • आय अ‍ॅम गोइंग टू रुइन देअर लाइव्हज- इनसाइड पुतिन्स वॉर ऑन रशियाज ऑपोझिशन
  • लेखक : मार्क बेनेट्स
  • प्रकाशक : वनवर्ल्ड पब्लिकेशन्स (पॅन मॅकमिलन)
  • पृष्ठे : ३५० किंमत : ४९९ रुपये.

 

विनय उपासनी

vinay.upasani@expressindia.com