X

सार्वत्रिक पडझडीचा इतिहास

समकालीन इतिहास मांडण्याची जोखीम पत्करलेल्या पुस्तकाची ही ओळख..

|| देवेंद्र इंगळे

समकालीन इतिहास मांडण्याची जोखीम पत्करलेल्या पुस्तकाची ही ओळख..

नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्यासत्राचा तपास आजवर तसा धिम्या गतीनेच चाललेला आहे. नालासोपारा प्रकरण उघडकीस आल्यानंतर तपास प्रक्रियेस काहीशी गती प्राप्त झाल्याचे दिसते आहे. आजवर झालेल्या हत्यांमधील साधम्र्य लक्षात घेता, त्या हत्या म्हणजे एका व्यापक आणि सुनियोजित षड्यंत्राचा केवळ छोटासा हिस्सा आहे ही बाबही स्पष्ट होते. म्हणूनच केवळ गोळ्या झाडणाऱ्या मारेकऱ्यांना जेरबंद करणे पुरेसे नसून त्या षड्यंत्राची पाळेमुळे खणून काढणेही तितकेच आवश्यक आहे. चिदानंद राजघट्टा यांचे नुकतेच प्रकाशित झालेले ‘इल्लिबरल इंडिया’ हे पुस्तक तशा तपासाची आवश्यकता स्पष्ट करणारे आहे.

हे पुस्तक गौरी लंकेश, त्यांचे व्यक्तित्व-विचार- कार्य आणि त्यांची निर्घृणपणे करण्यात आलेली हत्या केंद्रस्थानी ठेवून लिहिलेले आहे. त्यात लेखक चिदानंद राजघट्टा आणि गौरी लंकेश यांच्या वैयक्तिक स्मृतींचा भावस्पर्शी कोलाज आहे. विचारवंतांच्या हत्यासत्रातील गुंतागुंतीची उकल करता करता लेखकाने वर्तमान भारताच्या सार्वत्रिक पडझडीचाच इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

गौरी आणि चिदानंद हे बंगळूरुमधील ज्ञानसंपन्न वारसा लाभलेल्या नॅशलन कॉलेजचे विद्यार्थी होते. विज्ञान शाखेतील पदवीनंतर दोघांनीही पत्रकारितेचे शिक्षण घेतले. शिकत असतानाच दोघांची मने जुळली. लग्न केले. बंगळूरु आणि नंतर दिल्लीत राहून काही वष्रे इंग्रजी पत्रकारिता केली. पाचेक वष्रे संसार केला. त्यानंतर दोघांचे जमेनासे वाटले तेव्हा त्यांनी सहमतीपूर्वक विभक्त होण्याचा निर्णयही घेतला. पुढे चिदानंद मुंबईत आले आणि नंतर अमेरिकेत जाऊन स्थिरावले. गौरी बंगळूरुला परत आल्या. आपल्या वडिलांचा पुरोगामी पत्रकारितेचा वारसा चालवण्याचा निर्धार त्यांनी केला होता. सोबत त्यांनी सातत्याने समतावादी, मुक्तिगामी व जनवादी चळवळींशी जैविक बांधिलकी जोपासली. तिकडे अमेरिकेत चिदानंद यांनी दुसरे लग्न करून कौटुंबिक आणि व्यावसायिक स्थर्य प्राप्त केले होते. परंतु तरीही दोघांमधील निस्सीम मत्रभाव कायम होता. गौरी काही दिवसांसाठी अमेरिकेत चिदानंद यांच्या कुटुंबीयांसोबत राहूनदेखील आल्या. परस्परांपासून दूर असतानाही जगात, देशात आणि कर्नाटकात घडणाऱ्या घटनांसंबंधीची स्वतची निरीक्षणे ते एकमेकांना कळवत असत. परस्परांच्या वैचारिक मतभिन्नतेचा आदर राखत त्यांचे वैचारिक आदानप्रदान सुरू होते. गौरी आणि चिदानंद यांच्या आयुष्यातील अशा अनेक बऱ्या-वाईट प्रसंगांविषयी पुस्तकात लिहिले आहे. सर्वसामान्यांमध्ये रमणाऱ्या गौरी यांना त्यांनी जीवननिष्ठा म्हणून जोपासलेल्या आदर्श आणि मूल्यांमुळे कसे धर्माध-माथेफिरूंच्या गोळ्यांची शिकार व्हावे लागले, त्यांच्या मृत्योपरांत त्यांच्यातील असामान्यत्वाचा कसा जगाला परिचय झाला, याची एक आत्मीय हकिकत लेखकाने या पुस्तकात मांडली आहे. पुस्तकात त्यांच्या ईमेल संवादातील काही अंश लेखकाने दिले आहेत. ते खरोखरच मूळ रूपात वाचण्यासारखे आहेत. चिदानंद यांची दुसरी पत्नी मेरीने गौरी यांच्याविषयी लिहिलेला मृत्युलेखही तसाच हृदयस्पर्शी आहे.

कर्नाटकातील सार्वजनिक वादविवादांत गौरी यांचा वैचारिक हस्तक्षेप महत्त्वाचा मानला जात असे. लिंगायत धर्मावरून झालेल्या वादविवादात त्यांचे म्हणणे होते की, ‘लिंगायत आणि वीरशैव हे एक नसून िलगायत धर्म हा अब्राह्मणी परंपरेचा भाग आहे. तो जात्यंतक, स्त्री-पुरुष समतावादी, बुद्धिवादी आणि वैश्विक मानवतेचा पुरस्कार करणारा आहे. त्याउलट वीरशैव हे वर्णजातिसमर्थक ब्राह्मणी धर्मपरंपरेचे भाग होत.’ या प्रश्नी डॉ. कलबुर्गी आणि गौरी यांच्यात वैचारिक सहमती होती आणि त्यासाठी दोघांनाही जीवनाचे मोल द्यावे लागले, असे निरीक्षण लेखक नोंदवितो.

गौरी यांचे व्यक्तित्व निखळ बुद्धिवादी होते. राजकीयदृष्टय़ा त्यांची बांधिलकी लोकशाही- धर्मनिरपेक्षता आणि समाजवादाशी होती. शोषित-पीडित जनतेच्या मुक्तिलढय़ात न्यायासाठी व समतेसाठी त्या लोकशाही मार्गाने सहभागी होत असत. धार्मिक, सांस्कृतिक, भाषिक, वैचारिक बहुलतेचा वारसा जोपासणारा सहिष्णू आणि उदार भारत त्यांना हवा होता. ‘संविधान हाच माझा खरा धर्म आहे’ असे त्या नेहमी म्हणत.

कर्नाटकातील अंधश्रद्धाविरोधी प्रबोधन चळवळीत, तसेच धर्माधता- मूलतत्त्ववाद आणि फॅसिझमच्या विरोधात सुरू असलेल्या जनलढय़ात गौरी यांनी मोठे योगदान दिले. त्यांनी अनेक बुवा-बाबांचा आणि अनिष्ट सामाजिक चालीरितींचा पर्दाफाश केला. त्यांच्या ‘गौरी लंकेश पत्रिके’ने त्या संदर्भात महत्त्वाची भूमिका निभावली होती. कर्नाटक विधिमंडळात मांडण्यात आलेल्या अंधश्रद्धाविरोधी विधेयकाचा पाठपुरावा करणाऱ्यांमध्ये त्या आघाडीवर होत्या. टिपू सुलतान जयंती आणि बाबा बुदन गिरीप्रकरणी कर्नाटकातील राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न मागच्या काही वर्षांपासून सुरू आहे. हिंदू-मुस्लीम सलोखा कायम राखण्याच्या हेतूने या प्रश्नी गौरी यांनी घेतलेली भूमिका धर्माध-जमातवादी शक्तींचा रोष ओढवून घेण्यास कारणीभूत ठरली. मात्र दबावाला न जुमानता गौरी आपल्या वैचारिक भूमिकांवर ठाम राहिल्या. अखेर त्यांच्यावर भ्याड हल्ला करून त्यांना संपवण्यात आले.

गौरी यांच्या हत्येनंतर अनेकांनी त्यांच्यावर नक्षलसमर्थक असल्याचे आरोप केले होते. काहींनी तर त्यांची हत्या नक्षलवाद्यांनीच घडवून आणली असल्याची शक्यता वर्तविली होती. त्यातील खोटेपणा स्पष्ट करताना चिदानंद यांनी समोर आणलेली तथ्ये महत्त्वाची आहेत. कर्नाटक राज्यात नक्षलवादी चळवळ रुजविण्याचा प्रयत्न करणारा साकेत राजन हा भारतीय लष्करातून निवृत्त झालेल्या मेजरचा मुलगा होता. विद्यार्थीदशेपासूनच साकेत, चिदानंद आणि गौरी परस्परांना ओळखत होते. पुढे दिल्लीच्या पत्रकारितेचे शिक्षण घेत असतानाही ते मागे-पुढे शिकायला होते. तिथेच साकेत नक्षलवादी चळवळीच्या संपर्कात आला असावा. कारण त्यानंतर तो अनेक वर्षांपर्यंत भूमिगत होता. पुढे जेव्हा कर्नाटकच्या पश्चिम घाटातील कुद्रेमुख परिसरातील लोह खनिज काढणाऱ्या कंपनीच्या विरोधात विस्थापित होणाऱ्या आदिवासींचे आंदोलन उभे राहिले तेव्हा तो एका पत्रकार परिषदेच्या निमित्ताने अनेक वर्षांच्या अवकाशानंतर पत्रकाराच्या भूमिकेत उपस्थित असलेल्या गौरी यांना भेटला होता. २००४ ची ती घटना. त्या पत्रकार परिषदेनंतर गौरी यांनी पुढाकार घेऊन नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सुरू केले होते. परंतु २००५ च्या प्रारंभी पोलिसांशी झालेल्या चकमकीत साकेत राजनचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर गौरी अधिकच जहाल डावेपणाकडे झुकल्याचे चिदानंद सांगतात. परंतु गौरी यांचा सशस्त्र लढय़ावर कधीच विश्वास नव्हता, असे स्पष्टीकरणही ते देतात. साकेतच्या मृत्यूप्रकरणी गौरी यांनी ‘लंकेश पत्रिके’साठी जे लेख लिहिले ते छापण्यास नकार दिल्यामुळे त्यांचे सख्ख्या भावासोबत खटके उडाले. त्यानंतर त्यांनी स्वतची स्वतंत्र ‘गौरी लंकेश पत्रिका’ प्रसिद्ध करायला सुरुवात केली. गौरी यांचे ते अतिडावे साहस त्यांच्या मृत्योपरांतही त्यांना संशयाच्या भोवऱ्यात लोटणारे ठरले. चिदानंद मान्य करतात, की गौरी यांना हिंसक पर्याय मुळीच मान्य नव्हता. पण राज्यसंस्थाच उदासीन असेल तर एखाद्याने करावे तरी काय, असा प्रश्नही त्या विचारत असे ते सांगतात.

अलीकडच्या काळात वाढीस लागलेल्या झुंडप्रणीत हिंसाचार, लव्ह जिहाद, गोडसे पूजनाचे कार्यक्रम, गोरक्षकांनी चालवलेला हिंसाचार, संविधान बदलून टाकण्याची भाषा, काँग्रेसप्रणीत सौम्य हिंदुत्व हे सगळे लेखकाच्या दृष्टीने देशाच्या भवितव्यासंबंधी चिंता वाढवणारे आहे. नथुराम गोडसेचा प्रशंसक असलेल्या एका हिंदुत्ववादी नेत्याने भर पत्रकार परिषदेत त्यांच्या संघटना कशा रीतीने हिंदूंना शस्त्रात्रांचे प्रशिक्षण देऊन आत्मघातकी दस्ते तयार करीत आहेत, यासंबंधीची माहिती दिली होती. तशा प्रकारची काही छायाचित्रेही त्याने त्या वेळी प्रदर्शित केली होती. आमच्याजवळ हजारापेक्षा अधिक सदस्य असे आहेत जे प्रसंगी प्राण देण्यास सज्ज आहेत, वगरे माहितीही त्याने सांगितली होती. त्या पत्रकार परिषदेची हकिकत लेखकाने सांगितली आहे.

चिदानंद म्हणतात, ‘भारतात १९९० च्या दशकापर्यंत क्रांती, पुरोगामी, सुधारणावादी हे शब्द भूषणास्पद मानले जात होते. आज ते सगळे शब्द शिवीवाचक बनले आहेत. व्यवस्था परिवर्तन करू पाहणारी कुठलीही कृती ही आता अतिरेक किंवा राष्ट्रद्रोह मानली जात आहे. ही सगळी लक्षणे देशाच्या पुच्छगामी वाटचालीची आहेत.’

चिदानंद यांच्या मतांशी आणि त्यांनी केलेल्या विश्लेषणाशी प्रत्येकच वाचक सहमत होईल असे नाही. परंतु हे पुस्तक वाचकाला आपल्या भवतालाचे आकलन समृद्ध करण्यासाठी नक्कीच साहाय्यक ठरेल. ख्यातनाम इतिहासकार रजनी पाम दत्त यांनी १९६२ साली मॉस्को विद्यापीठात ‘समकालीन इतिहासाचे लेखन करण्यातील जोखीम आणि आव्हाने’ याविषयी एक व्याख्यान दिले होते. त्यात ते म्हणतात : ‘जर आपणास समकालीन इतिहासाविषयी वृत्तपत्रीय लेखनापेक्षा सरस आणि अधिक टिकाऊ लेखन करायचे असेल तर ती गोष्ट वधस्तंभावर स्वतहून मान ठेवण्याइतकी जोखमीची असते.’ चिदानंद यांनी स्वतच्या काळाचा इतिहास लिहिण्याची तशी जोखीम पत्करली याचे श्रेय त्यांना द्यायलाच हवे.

ingledevs@gmail.com