अजिंक्य कुलकर्णी

पाकिस्तानात रावी नदीकाठी वसलेल्या लाहोर शहराच्या इतिहासात डोकावणारे हे पुस्तक आधुनिक काळातील लाहोरच्या सामाजिक जीवनाचा आढावाही घेते…

लाहोर… रावी नदीकाठी वसलेले ऐतिहासिक शहर… असे शहर, की ज्याच्या अस्तित्वाचे दाखले रामायण काळापर्यंत देता येतात. कधीकाळी श्रीरामाचा पुत्र लव याचे वास्तव्य या ठिकाणी होते म्हणूनच त्याचे नाव लाहोर पडले, अशीही एक धारणा आहे… एक असे शहर, की ज्याच्या रस्त्यांवरून फिरताना कदाचित क्रांतिकारक भगतसिंगांनी रामप्रसाद बिस्मिल लिखित ‘मेरा रंग दे बसंती चोलार्’ किंवा बुल्ले शाह या पंजाबी सुफी तत्त्वज्ञ-कवीच्या कविता उच्चरवात म्हटल्या असतील… हे असे शहर आहे, जिथे मुघल बादशहा औरंगजेबाने आपली प्रिय कन्या झैबुन्नीसा हिला नजरकैदेत ठेवले होते. तिने तिथे कवी-साहित्यिकांची गुप्त मंडळे चालवली होती…

लाहोरचा हा आणि असाच पुरातन तसेच आधुनिक कालखंडाचा आढावा घेतला आहे पाकिस्तानी लेखक हारून खालिद यांनी. ‘वॉकिंग विथ नानक’ आणि ‘अ व्हाइट ट्रेल’ यानंतरचे ‘इमॅजिनिंग लाहोर : द सिटी दॅट इज, द सिटी दॅट वॉज’ हे खालिद यांचे तिसरे पुस्तक होय. अनाम झकेरिया (‘१९७१ : अ पीपल्स हिस्टरी फ्रॉम बांगलादेश, पाकिस्तान अ‍ॅण्ड इंडिया’ या पुस्तकाच्या लेखिका) या त्यांच्या मैत्रिणीबरोबर पाकिस्तानच्या फाळणीचा अभ्यास करताना खालिद यांचे लाहोरविषयीचे वाचन आणि या शहराबद्दलचे आकर्षणही वाढू लागले. लाहोर या शहराला स्वत:चा असा स्वतंत्र इतिहास आहे आणि तो या पुस्तकात प्रवासी-डायरीच्या स्वरूपात खालिद यांनी सांगितला आहे.

लाहोरच्या मध्यवर्ती भागात असलेल्या चौबुर्जीच्या (चार बुरूज असलेला मकबरा) शेजारी मुघल काळात सुंदर अशी एक बाग होती. ही बाग म्हणजे मुघलांच्या सौंदर्यदृष्टीचा उत्कृष्ट नमुना होती, असे खालिद म्हणतात. ही बाग वसवण्याबद्दल इतिहासकारांमध्ये वेगवेगळे तर्क आहेत. त्यातल्या एका तर्कानुसार, ही बाग औरंगजेबाची मुलगी झैबुन्नीसा हिने वसवली आहे. झैबुन्नीसाचे सुफी तत्त्वज्ञानाकडे झुकणे, अकील खानशी (औरंगजेबाच्या वझिराचा मुलगा) तिला निकाह करायची इच्छा असणे, हे औरंगजेबाला मान्य नव्हते. म्हणून औरंगजेबाने तिची रवानगी लाहोरला नजरकैदेत ठेवण्यासाठी केली. अठराव्या शतकापर्यंत ही बाग लाहोरमध्ये होती. मुघलांचा प्रभाव ओसरू लागल्यानंतर लाहोरमध्ये अराजक माजण्यास सुरुवात झाली. त्यात या बागेचे जंगलात रूपांतर झाले. सरदारांनी पंजाबवर कब्जा केला आणि लाहोर शहर तीन शीख सरदारांमध्ये विभागले गेले. याच चौबुर्जीबाबत घडलेली अलीकडची एक घडामोडही खालिद यांनी नोंदवली आहे. २०१६ साली चौबुर्जीला जोडून लाहोर शहरातील मेट्रो प्रकल्प सिद्ध होणार होता. परंतु पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाझ) या संघटनेने या प्रकल्पास विरोध केला. प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने निकाल दिला की, चौबुर्जीपासून कमीत कमी दोनशे फूट लांबूनच हा मेट्रो प्रकल्प न्यावा.

बुटासिंग-झैनाब यांच्या प्रेमाची कथाही लाहोरपासून वेगळी काढता येणार नाही. भारताच्या फाळणीवेळी झालेल्या दंगलीत बुटासिंगने झैनाबला वाचवले होते. पुढे हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. दोन मुलीही झाल्या त्यांना. फाळणीच्या पाच वर्षांनी दोन्ही देशांनी एक निर्णय घेतला, की ज्या स्त्रियांचे अपहरण झाले आहे त्यांना आपापल्या देशात परत पाठवावे. त्यामुळे झैनाबला लाहोरला परतावे लागले. तिला परत भारतात आणण्यासाठी बुटासिंग अवैधरीत्या सीमा ओलांडून पाकिस्तानात जातो. पण या वेळी झैनाब त्याच्याबरोबर येण्यास नकार देते. परतताना लाहोर रेल्वे स्थानकावर बुटासिंग रेल्वेखाली जीव देतो. लाहोरमध्ये बुटासिंगचे समाधीस्थळ आजही आहे, ते ‘शहीद-ए-मोहब्बत’ म्हणून ओळखले जाते.

१९९२ साली अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली. या अयोध्येपासून हजारेक किलोमीटर लांब तिकडे पाकिस्तानातल्या लाहोरमध्ये सुंदर अशी तीन जैन मंदिरे होती. एक चौबुर्जीजवळ, एक पट्टी गेटजवळ आणि तिसरे सम्राट अकबराने जैन साधूंच्या विनंतीला मान देऊन एक मंदिर बांधून दिले होते. फाळणीच्या वेळी दोन जैन मंदिरे नष्ट केली गेली. इकडे बाबरी मशीद पाडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हजारो लोकांनी त्या उरलेल्या तिसऱ्या जैन मंदिरालाही जमीनदोस्त केले. फाळणीआधीच्या पंजाबचेही मुख्य व्यापारी केंद्र लाहोरच होते. पंजाबमध्ये सगळीकडे जैनांचा वावर होता. त्यांची एक मोठी परंपराच पंजाबात होती. आजही तिथे ‘भाबरियन’ नावाचा एक जैन अल्पसंख्याक समुदाय आहे. ‘भाबरा’ नावाचे एक जैन व्यापारी हे त्या पंथाचे मूळ पुरुष. चौबुर्जीजवळील जैन मंदिर पाडून त्यावर बांधलेल्या रस्त्यावरील चौकास आता सरकारदरबारी वेगळे नाव असले तरीही ‘जैन मंदिर चौक’ म्हणूनच ओळखले जाते. मात्र, धार्मिक स्थळांबद्दल दाखविल्या गेलेल्या अनुदारपणाची अनेक उदाहरणे खालिद यांनी कोणत्याही धार्मिक विचारधारेला झुकते माप न देता तटस्थपणे दिली आहेत.

लाहोर हे पाकिस्तानातील पंजाबचे एक सांस्कृतिक केंद्रदेखील आहे. पण आज तिथे पंजाबी भाषकांना पंजाबी बोलण्याचीसुद्धा भीती वाटते. गेल्याच वर्षी एका व्यक्तीने रस्त्यावरील पोलीस अधिकाऱ्याला पंजाबीत माहिती विचारली. त्या पोलिसाला पंजाबीत माहिती विचारणे ही जणू आपल्याला शिवीच दिली आहे असे वाटले. यावरून त्या पोलीस अधिकाऱ्याने त्या व्यक्तीस बेदम मारहाण केली. हे असे का घडले? या पाठीमागची कारणे कोणती? या प्रश्नांची उत्तरे इतिहासात सापडतात. पाकिस्ताननिर्मितीपासून तेथे शालेय शिक्षणाचे इस्लामीकरण केले गेले. शाळांमध्ये उर्दू भाषा शिकवणे, कुराणाचे पठण करणे हे पूर्व तसेच पश्चिम पाकिस्तानात सर्वत्र सक्तीचे केले गेले. पाकिस्तानातील पंजाब, सिंध, बलुचिस्तान, पूर्व पाकिस्तान यांच्यात मुस्लीम हा धर्म जरी एक असला, तरी त्यांच्या रोजच्या बोलाचालाच्या भाषा मात्र वेगवेगळ्या होत्या. या सर्वांना एका सूत्रात बांधणे पाकिस्तानातील कोणत्याही सरकारांना, लष्करी हुकूमशहांना कधीही जमले नाही. यामुळे पाकिस्तानात नेहमीच अराजकाची परिस्थिती राहिलेली आहे. पूर्व पाकिस्तानात बंगाली भाषा बोलली जाते; त्यांच्यावर उर्दू भाषा थोपवण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानने स्वत:चे दोन तुकडे करून घेतले.

लाहोर शहर आज आपल्या ऐतिहासिक वारशापासून, इतिहासापासून दूर जाऊ पाहात आहे. लाहोर हे शहर राष्ट्रवादाचे मोठे प्रतीक होते. लाहोर हे आज जवळजवळ ‘मुस्लिमांचे शहर’ झाले असले, तरी ते ७० वर्षांपूर्वी हिंदूंचेही होते. खालिद म्हणतात- हे कसे अमान्य करणार, की पाकिस्तानच्या निर्मितीनंतर जे मुस्लीम झाले, त्यांचे पूर्वज हे एकेश्वरवादी बनण्यापूर्वी हिंदू देवतांची उपासना करायचे आणि त्यांच्या स्तुतीसाठी भजने गात असत?

याच शहरात १९४० साली २२ ते २४ मार्चदरम्यान मुस्लीम लीगचे अधिवेशन झाले. याच अधिवेशनात स्वतंत्र पाकिस्तानच्या मागणीचा ठराव मांडण्यात आला. लाहोरमधील मुघल काळातील बदामी बागचे इंग्रजांच्या वसाहतकाळात गव्हर्नर जनरल मिंटो यांच्या सन्मानार्थ ‘मिंटो गार्डन’ म्हणून नामांतरण झाले. लाहोर ठरावाच्या जोशात याच बागेचे मोहम्मद इक्बाल यांच्या सन्मानार्थ ‘इक्बाल बाग’ म्हणून पुन्हा नामांतरण झाले. पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान इम्रान खान यांच्यासाठी लाहोर आणि ही इक्बाल बाग खूप महत्त्वाची ठरली. ३० ऑक्टोबर २०११ च्या एका सभेत इम्रान खान म्हणाले की, ‘‘पाकिस्तानच्या राजकीय इतिहासात लाहोरने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.’’ इम्रान खान यांनी त्या वेळी लाहोरमध्ये अधिक जोर लावला. राजकीय पंडितांनी इम्रान खान यांना तेव्हा गांभीर्याने घेतले नव्हते. मात्र, त्या वेळच्या निवडणुकीत इम्रान खान यांना चांगले यश मिळाले. पुढे पाकिस्तानच्या राष्ट्रीय राजकारणातही इम्रान खान यांच्या पक्षाने जोरदार मुसंडी मारली.

लाहोर जसे वर्चस्ववादाचे प्रतीक आहे, तसेच हे शहर बंडखोर कवी हबीब जालीब यांचेही आहे. जालीब यांनी आयुष्यभर या वर्चस्ववादाला आव्हान दिले. पाकिस्तानचे पहिले लष्करी हुकूमशहा अयुब खान यांच्या लष्करशाहीविरुद्धचा सर्वात बुलंद आवाज जालीब यांचाच होता. ज्या वेळी लष्करी राजवटीसमोर बहुतांश विचारवंत, कवी, लेखक, कलाकार यांनी आपल्या तलवारी म्यान केल्या होत्या, तेव्हा जालीब यांनी अयुब खान यांच्याविरोधात दंड थोपटले होते. लष्करशाही असताना इतरांप्रमाणे ते घाबरून रोमँटिक वा स्वच्छंदवादी कविता करत न बसता रस्त्यावर उतरले. सरकारच्या सर्व प्रकारच्या सूचनांचा धिक्कार करत त्यांनी पाकिस्तान रेडिओवरून अयुब खान यांच्या लष्करशाहीविरुद्ध एक मुशायरा सादर केला. आपल्या शायरीमधून त्यांनी अयुब खान यांच्या लष्करशाहीला चांगलेच धारेवर धरले. पाकिस्तानातील डाव्या विचारसरणीच्या प्रागतिक साहित्यिक चळवळीशीही ते संबंधित होते. १९६२ साली अयुब खान यांनी त्यांचे संविधान सादर केले. तेव्हा या संविधानाचा विरोध करणारी जी मोजकी मंडळी होती, त्यांत जालीब यांचा क्रमांक वरचा लागतो. या संविधानाच्या निषेधार्थ त्यांनी लिहिलेली ‘दस्तुर’ ही नज़्म आजही निषेधगीत म्हणून सादर केली जाते. या जालीब यांच्याविषयी पुस्तकात वाचायला मिळते.

लाहोर शहराने २०१० साली पाकिस्तानात अल्पसंख्याक असलेल्या अहमदिया मुस्लिमांचे सामूहिक हत्याकांड अनुभवले. तब्बल ९० हून अधिक अहमदिया पंथीयांची हत्या केली गेली. जे जखमी झाले होते त्यांना जीना रुग्णालयात दाखल केले होते, त्यांचीही नंतर रुग्णालयात जाऊन हत्या करण्यात आली. ईशनिंदा (ब्लास्फेमी) केल्याचा आरोप या अहमदिया पंथीयांवर ‘तेहरिक-ए-तालिबान’ या संघटनेने केला होता. लाहोरच्या इतिहासातील या सुन्न करणाऱ्या घटनेविषयीही खालिद यांनी लिहिले आहे.

अशा प्रकारे लाहोर शहराशी निगडित इतिहास-वर्तमानातील बहुतेक महत्त्वाच्या धार्मिक-राजकीय घटनांचा आढावा या पुस्तकात घेतला आहे. पुस्तक वाचून प्रश्न पडतो की, लाहोर शहराने आधुनिक काळात कधी आनंद अनुभवलाच नाही का? शहराच्या ऐतिहासिक वास्तूंच्या खाली हजारो निरपराध लोकांच्या किंकाळ्या दाबून टाकल्या आहेत. पाकिस्तान तसेच लाहोर आपल्या या इतिहासावर पडदा टाकू पाहात आहे. पण ते शक्य आहे का?

ajjukul007@gmail.com