मूळची कोलकात्याची असणारी झुम्पा लाहिरी अमेरिकेत स्थलांतरित झाली.  इंग्रजी भाषिक लेखिका म्हणून तिने नाव कमावले. काही वर्षांपूर्वी इटालियन भाषा शिकण्यासाठी तिने रोममध्ये मुक्काम ठोकला. अन् चक्क इटालियन भाषेत एक कथा रचली. इटालियन भाषेच्या तिने केलेल्या या सर्जकशोधावर आधारलेल्या तिच्या मूळ इटालियन व आता इंग्रजीत अनुवादित झालेल्या पुस्तकाबद्दल..

झुम्पा लाहिरी ही ‘न्यूयॉर्कर’ साप्ताहिकाने पुढे आणलेली लेखिका. मूळची भारतीय. ‘न्यूयॉर्कर’ हे साधारणपणे दशलक्षावधीने खपणारे, अनेक तपशीलवार कथा, कविता व्यक्तिचित्र आणि इतर अनेक विषयांवर दीर्घ लेख प्रसिद्ध करणारे साप्ताहिक ८० वर्षे प्रसिद्ध होत आहे. हेमिंग्वे, सालिंजर, जॉन शिवर, विला कँथर, मार्टिन अमिस, जॉन बर्जर, रूथ प्रावर झाबावला, जॉन अपडाईक, सॉल बेलो, मिलान कुंदेरा असे इंग्रजी-युरोपीय साहित्यातील हुजहू काढले तर त्यातील अनेकांच्या कथा सुरुवातीला किंवा नंतरही सातत्याने न्यूयॉर्करमध्ये प्रसिद्ध झालेल्या आढळतील. १९९९च्या सुमारास कधी तरी झुम्पा लाहिरीची ‘सेक्सी’ ही कथा न्यूयॉर्करमध्ये प्रसिद्ध झाली आणि वाचकांचे तिने लक्ष वेधले. त्यानंतर तिच्या तीन कथा न्यूयॉर्करमध्ये प्रसिद्ध झाल्या.

त्यानंतर झुम्पा लाहिरीचा जो प्रवास सुरू झाला तो अव्याहत आहे. तिच्या पहिल्या कथासंग्रहाला पुलित्झर पारितोषिक मिळाले. त्यानंतर तिने ‘नेमसेक’ ही कादंबरी लिहिली. जिच्यावर हॉलीवूडचा सिनेमा बनला आणि चाललाही. पुढे तिचा ‘अनअ‍ॅकस्टम्ड अर्थ’ हा कथासंग्रह प्रसिद्ध झाला. तर दोन वर्षांपूर्वीच ‘लोलॅण्ड’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली, जी कोलकात्यातून अमेरिकेत रवाना झालेल्या कुटुंबाची चाळीस वर्षांची कहाणी सांगते. आधीच्या कथा-कादंबऱ्यांप्रमाणेच यात बंगाली पाश्र्वभूमी आहेच. ही दोन भिन्न संस्कृतीच्या घुसळणीत अडकलेल्या मंडळींची कथा तर आहेच, पण नक्षलवादापासून अमेरिकेतील विद्यापीठातील शिक्षणापर्यंत विविध तपशील या कादंबरीतून येतात.

तर पुरस्कार-मानसन्मान, आंतरराष्ट्रीय कीर्ती लाभल्यानंतर कुठल्याही लेखिकेने, लेखकाने थोडंसं सुख अंगी बाणवून घ्यायला हरकत नव्हती, पण झुम्पा लाहिरीने मात्र इटालियन शिकण्यासाठी चक्क रोममध्ये मुक्काम ठोकायचे ठरवले. इथे अनेकांना बंगालमध्ये गेलेल्या पु.लं.ची आठवण येऊ  शकेल आणि ‘वंगचित्रे’मधील तपशील आठवतील; पण तरीही झुम्पा लाहिरीने तिथल्या वास्तव्यावर लिहिलेल्या पुस्तकात काही तरी खूप वेगळे सापडते. हे कथा-कादंबऱ्यांच्या पल्याड आहे. ते काय आहे? हे एका छोटय़ा प्रसंगातून सांगता येईल. लेखिका कायम स्वत:बरोबर एक डिक्शनरी वागवायची आणि कुठलाही शब्द अडला की डिक्शनरीत पाहायची. एके ठिकाणी तिने ‘क्लोस्त्रयले’ असा शब्द पाहिला ज्याचा अर्थ ‘क्लॉयस्टर’ असा असावा तिला वाटले. पण डिक्शनरीत त्याचा अर्थ नव्हता. तिला खूप आनंद झाला. कारण तिने असे लिहिलेय, की अचानक मला त्याचा अर्थ समजण्याचा चस्का लागला. हा अर्थ आपले जगणं बदलेल असे तिला वाटू लागले. पुढे ती लिहिते, ‘आपलं आयुष्य बदलेल अशी गोष्ट नेहमी आयुष्याबाहेर असते.’

भाषेशी झालेल्या या परिचयाचे, ओढीचे वर्णन म्हणजे हे पुस्तक! हा परिचय केवळ मानसिक, शारीरिक नसतो, तर भारतीय मूळ घेऊन अमेरिकेत रुजू होण्यातला संघर्ष आणि अमेरिकन मूळ घेऊन इटलीत वास्तव्य करून तिथे जगण्याचे आणि भाषेचे केलेले शोषण असा हा प्रवास आहे. तो युनिक आहे, वेगळा आहे आणि मुख्य म्हणजे भाषेविषयीची थोडीफार पुस्तके वाचलेल्या व्यक्तीलाही या पुस्तकाशी समांतर असे भोवताली काही सापडत नाही. ती सांगते, ‘मी जेव्हा इटालियनमधील काही वाचते तेव्हा आपण पाहुणे आहोत, प्रवासी आहोत, पण तरीही हे काम हवंहवंसं आणि आवश्यक असं वाटतं. पण मी जेव्हा इटालियन भाषेत लिहिते तेव्हा वाटतं आपण आगंतुक आहोत, कोणाची तरी जागा घ्यायचा प्रयत्न करत आहोत. इंग्रजीचा कोश सोडून मी वावरते तेव्हा माझी हुकूमत गमावते. मी दुबळी बनते.. परंतु नेहमीची आयुष्य व्यापणारी भाषा सोडून माझ्यासारखी लेखिका इटालियन भाषेसाठी वाहून घेते, हे घडण्यामागचा मोह कोणता? प्रेरणा कोणती?’

लेखिका इटालियन वाचता वाचता डिक्शनरी पाहत नाही, तर अडलेल्या सगळ्या शब्दांखाली खुणा करते आणि नंतर त्या शब्दांचे अर्थ डिक्शनरीत पाहते. मग ते शब्द आपल्या वहीत लिहून काढते. भोवताली सर्वच ठिकाणी तिला शब्द दिसू लागतात. ती दांते, ओविड यांचे अभिजात इटालियन साहित्य वाचते, मोरावियासारखा आधुनिक लेखक वाचते. ती इटालियनमधील विविध शब्द गोळा करते. साधे पण ताठर शब्द, विचित्र शब्द, माहीत असलेले पण ज्याबद्दल अधिक जाणायला आवडेल असे शब्द, ज्यांना इंग्रजीत प्रतिशब्द नाहीत असे. आणि विशेषणं. भाषेच्या झाडाला लगडलेले हे शब्द खुडून गोळा करताना तिला सोन्याची खाण गवसल्याचा भास होतो. आपली वही पाहताना तिला आपल्यात होणारी भाषेची वाढ दिसते आणि स्वत:च्या तान्ह्य़ा बाळाला डॉक्टरकडे नेऊन वजन मोजण्यासारखे, स्वत:चे लिखाण आणि हा दिसामासांनी वाढणारा शब्दसंग्रह यांबद्दल तिला वाटू लागते.

हळूहळू ती डायरीत इटालियनमध्ये लिहू लागते. इटालियनमध्ये पहिल्यांदा संगणक वापरून टाइप करू लागते. माणसांबद्दलचे, घटनांबद्दलचे छोटे छोटे तुकडे लिहून काढते.  भाषा हस्तगत करायच्या वेगवेगळ्या टप्प्यांतून जात असताना एक दिवस तिला अचानक विजेसारखी एक कथा इटालियन भाषेत सुचते. अशी कथा आपण इंग्रजीमध्ये लिहिली नसती, असेही ती सांगते.

तर, ही कथा आहे ज्याला इंग्रजीत ‘फेबल’ म्हणतात तशी एका अनुवादिकेची. एक दिवस ही अनुवादिका ठरवते, की सारे काही हरवून स्वत:चे अस्तित्व पुसून टाकायचे. एका छोटय़ा बॅगेत काही वस्तू घेऊन, मित्र-नातेवाईक साऱ्यांना सोडून काही काळापुरते दूर जायचे. ती अशा ठिकाणी जाते की तिथली भाषाच तिला येत नसते. एक दिवस ती पावसात आसरा घ्यायला म्हणून एका दुकानात शिरते. दर्शनी काचेत अनेक कपडे लावलेले असतात. दुकानातून सुंदर वेशभूषा केलेल्या अनेक महिला ये-जा करत असतात. वरच्या मजल्यावरच्या दुकानवजाच खोलीत ती शिरते. त्याची मालकीण फॅशन डिझायनर असते आणि तिही तिच्याप्रमाणेच परकीय असते. अनुवादिका आपला काळा स्वेटर काढून ठेवते आणि वेगवेगळे कपडे घालून बघते. हे झाल्यावर तिच्या लक्षात येते की तिचा स्वेटर कुठे तरी हरवलेला आहे. मालकीण तिला स्वेटर काढून देते. तेव्हा तो तिला आपला वाटत नाही. पण ती तो घरी घेऊन जाते. दुसऱ्या दिवशी झोपेतून उठल्यावर तिच्या लक्षात येते की हा आपलाच स्वेटर आहे.

कुठल्याही चांगल्या फेबलप्रमाणे अनेक अर्थ याही कथेतून निघू शकतात. तंत्रज्ञानाने खूप जवळ आणलेल्या जगात आता अंतर नाही. त्यामुळे जग आता अधिकच लहान वाटत आहे. असे असतानाही आपण घेतलेला भाषा शिकण्याचा अनुभव दोन भाषांमधील प्रचंड अंतराची जाणीव करून देतो. तरीही दुसऱ्या भाषेच्या हृदयाचा छेद घ्यायला तंत्रज्ञान अपुरे पडते. हे वाचल्यावर मात्र लेखिकेच्या प्रकल्पाकडे पाहायची आपली दृष्टी बदलते. अशा वेळी तिनेच विचारलेला प्रश्न मनात रुंजी घालतो- काय असावे या भाषा शिकण्यामागचे कारण?

यशस्वी लेखक-कलावंताला स्वत:चा आधीचा सर्जनशील टप्पा ओलांडायचे आव्हान असते. परंतु यश हेच त्यात अडसर बनून राहते. त्यामुळेच नोबेल पारितोषिक मिळवल्यावर लेखकांना श्रेष्ठ कलाकृती निर्माण करता येत नाही आणि श्रेष्ठत्वाच्या अहंकाराचे विसर्जन झाल्याशिवाय नवे बीजही अंकुरत नाही. लेखिकेचा सारा प्रयत्न हा आधीची पाटी पुसण्याचा आहे. झेन गुरू-शिष्याला मन रिकामे करायला सांगतात तसा. त्यासाठी ती अनोळखी भाषेच्या प्रदेशात स्वत:ला झोकून देते. अर्थात ‘इन अदर वर्ड्स’ – झुम्पा लाहिरी’ नावाच्या फेबलमधून काढलेला हा एक निष्कर्ष होय. वाचणारे आणखीही अनुमाने काढू शकतात.

इटालियन वास्तुकलेबद्दल लिहिण्याच्या निमित्ताने १९९४ साली या भाषेशी तिचा ओझरता परिचय झाला आणि २०१२ साली तिने पूर्णत: इटालियनमधून पुस्तक लिहिले, ज्याचा अनुवाद इटालियनमधून दुसऱ्याच लेखिकेने (अ‍ॅन गोल्डस्टीन) इंग्रजीत केला आहे. यामध्ये आणखी बरेच काही येते. इटलीमधील प्रवासवर्णन आणि वस्त्यांचे अनुभव, इंग्रजी व बंगाली भाषा आत्मसात करताना झालेली तिची घडण, कोलकातासारख्या ठिकाणी तिला येणारा भाषिक उपरेपणाचा अनुभव, इत्यादी आणि शिवाय ‘..शेवटी प्रत्येक लेखक योग्य तो शब्द शोधत असतो’ अशी आशयगर्भ, विचारप्रवर्तक वाक्येही. छोटेखानी, एका बैठकीत संपणारे हे पुस्तक असले तरी ते ज्याला-त्याला आपल्या भाषिक प्रवासाबद्दल सजग करू शकेल.

  • इन अदर वर्डस-
  • लेखिका : झुम्पा लाहिरी
  • अनुवाद (इटालियन-इंग्लिश) : अ‍ॅन गोल्डस्टीन
  • प्रकाशक : पेंग्विन प्रकाशन
  • पृष्ठे : २०३, किंमत : ३९९ रुपये,

 

– शशिकांत सावंत

shashibooks@gmail.com