अभिजीत ताम्हणे abhijit.tamhane@expressindia.com

‘स्त्रियांशी लगट करणाऱ्या पं. नेहरूंची ही पाहा छायाचित्रं’, किंवा ‘राहुल गांधींनी सोमनाथ मंदिराच्या अतिथी-वहीत ‘अन्यधर्मीय’ म्हणून केली नोंद’, किंवा ‘फोब्र्जच्या यादीनुसार मोदीजीच ठरले जगातील सर्वाधिक विश्वासार्ह पंतप्रधान’ आणि हेही नाही तर, ‘मोदींनी घातला नथुराम गोडसेच्या पुतळ्याला हार’ यांपैकी एखादी तरी ‘पोस्ट’ किंवा नोंद फेसबुक/ ट्विटर किंवा व्हॉट्सअ‍ॅपसारख्या समाजमाध्यमाद्वारे तुमच्यापर्यंत आली असेलच. नसेल, तरीही अशीच दिशाभूलकारक माहिती देणाऱ्या अनेक नोंदींविषयीचं ‘इंडिया मिसइन्फॉर्म्ड’ हे पुस्तक वाचनीय ठरतं, ते दिशाभूल नेमकी कुठे आणि कशी झाली, याच्या कथांमुळे! ‘आल्ट न्यूज’ हे संकेतस्थळ केवळ मुख्य धारेतली माध्यमं (वृत्तपत्रं/ चित्रवाणी वृत्तवाहिन्या) आणि समाजमाध्यमं यांवर फिरणाऱ्या माहितीची शहानिशा करतं. अमुक माहिती दिशाभूलकारक आहे ती का आणि कशी, हे शोधण्याचं काम ‘आल्ट न्यूज’ सातत्याने करतं. याच संकेतस्थळानं हाताळलेली एकंदर ८२ ‘प्रकरणं’ या पुस्तकात आहेत. पुस्तकाचे तिघेही लेखक आणि अन्य पाच सहलेखक याच संकेतस्थळाशी संबंधित आहेत.

ही ‘प्रकरणं’ दोन-तीन पानांत, फार तर आठ-नऊ पानांत संपणारी असल्यामुळे पुस्तक चटपटीतही आहेच. शिवाय कोणतंही पान उघडावं आणि कुठलंही ‘प्रकरण’ वाचावं, अशीही सोय! याच वैशिष्टय़ांमुळे खरं तर, पुस्तकाच्या गुणवत्तेविषयी शंका घ्यायलाही वाव राहतो. ‘पुस्तक किस्सेबाज दिसतंय.. मग ते ‘ज्ञानलक्ष्यी’ कसं ठरणार?’ ही शंका तर दुकानात पुस्तक चाळतानाही येतेच. पण ‘फेक न्यूज’चं हे संकलन म्हणजे गेल्या काही वर्षांमधल्या आपणा सर्वाच्या माध्यम-वर्तनाचा जणू एक दस्तावेज आहे, हेही लक्षात येतं. मग मात्र पुस्तक सोडवत नाही.

‘फेक न्यूज’साठी मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रात काही प्रतिशब्द (आधीपासूनच!) रुळले होते, ते ‘फोकनाड’, ‘पुडी’ किंवा ‘मिलीजुली बातमी’ असे आहेत. ‘पुडी’ हा त्यांपैकी सौम्य पर्याय. पण पत्रकारितेच्या क्षेत्राबाहेर – समाजमाध्यमांत- या पेरलेल्या, पसरवलेल्या बातम्या जीवघेण्यासुद्धा ठरत असतात. केवळ प्रचार, प्रतिमासंवर्धन किंवा प्रतिमाभंजन असा अन्य काही फेक न्यूजचा हेतू असतो, तर इतिहासाची मोडतोड करणं अथवा ‘हाच इतिहास’ असा समज पसरवणं असा आणखी काहींचा. हेतूंमधला हा फरक ओळखून, तसंच आजच्या काळातील सर्वाधिक ‘फेक न्यूज’ कशाबद्दल होत्या, हेही लक्षात घेऊन पुस्तकाची रचना ११ विभागांमध्ये करण्यात आली आहे. ‘सामाजिक असंतोष फैलावणे’, ‘मोदी यांचे प्रतिमासंवर्धन’, ‘राहुल गांधी यांना लक्ष्य करणारा प्रचार’, ‘मोदी यांना अथवा भाजपला लक्ष्य करण्याचे प्रयत्न’, ‘अन्य नेत्यांबद्दलच्या वावटळी’, ‘पं. नेहरूंचे प्रतिमाहनन’ हे त्यांपैकी अधिक ‘वाचनीय’ भाग. मात्र, पुस्तकातला सर्वात महत्त्वाचा भाग ठरू शकेल असा भाग आहे विज्ञानविषयक. या सुमारे ३० पानी विभागात एकेका फेक न्यूजचा समाचार घेतलेला नसून गोवर-रुबेला लसीबद्दलचे गैरसमज, ‘आयुष’ने प्रमाणित केलेल्या काही नव्या औषधांबद्दलचे भाबडे समज, होमिओपॅथीबद्दलच्या शंका-कुशंका या विषयांची साधार चर्चा केलेली आहे.

अर्थातच, गेल्या काही वर्षांत राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांत ‘फेक न्यूज’चा थेट प्रभाव दिसून आला आणि तो वाढतच गेल्याचंही दिसलं. त्यामुळे पुस्तक वाचताना एक अस्वस्थता येतेच, पण अखेर या साऱ्या घडून गेलेल्या खोटेपणाच्या घटना आहेत आणि त्यांचा खोटेपणा आता तरी उघड झालेला आहे, असा उसासा सोडता येतो. महत्त्वाचं म्हणजे, खोटेपणा कसा उघड केला याची साधी ‘कृती’ किंवा प्रक्रियाच ‘आल्ट न्यूज’ने कशी पाळली, हेही या पुस्तकातून समजत जातं.

त्यानंतर उरतो, तो शुद्ध बौद्धिक आनंद! त्यामुळेच मोदीसमर्थकांनीही वाचावं, लोकशाहीवादय़ांनीही वाचावं व सेक्युलरांप्रमाणेच हिंदुत्ववादय़ांनी किंवा अन्य धर्मवेडय़ांनीही मुद्दाम वाचावं असं हे पुस्तक झालं आहे. या सर्व प्रकारच्या वाचकांना बुद्धी आहेच, हे इथं गृहीत धरलेलं आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्य सर्वानाच आहे, हेही मान्य आहे आणि कोणत्याही अभिव्यक्तीवर निर्बंध असू नयेत, हेसुद्धा. या अनिर्बंध अभिव्यक्तीचा गैरवापर होत असेल, तर चौकस बुद्धीनं तो रोखता येतो, असा विश्वास सर्वाना देणारं हे पुस्तक आहे.

‘इंडिया मिसइन्फॉर्म्ड’

लेखक : प्रतीक सिन्हा, सुमैया शेख, अर्जुन सिद्धार्थ

प्रकाशक : हार्पर कॉलिन्स

पृष्ठे: २७०, किंमत : ३९९ रुपये