25 February 2021

News Flash

आधुनिकतेचे अनेक आयाम..

 ‘आधुनिकता व इतिहास’ हा भारतीय समाजातल्या सर्वात संवेदनशील विषयांपैकी एक.

‘इंडियन मॉडर्निटी : चॅलेंजेस् अ‍ॅण्ड रिस्पॉन्सेस्’ संपादन : डॉ. जास्वंदी वांबुरकर प्रकाशक : द युनिक फाउंडेशन पृष्ठे : ३५०, किंमत : ३५० रुपये

हेमंत राजोपाध्ये

अत्यंत गुंतागुंतीच्या अशा भारतीय समाजविश्वात पाश्चात्त्य धाटणीची आधुनिकता रुजली खरी; पण त्याकडे केवळ पाश्चात्त्यांचे अनुकरण म्हणूनच पाहायचे का, या प्रश्नासह आधुनिकतेचे निरनिराळे आयाम तपासणाऱ्या, या आधुनिकतेबरोबरच परंपरेचाही परामर्श घेणाऱ्या निबंधसंग्रहाविषयी..

‘आधुनिकता व इतिहास’ हा भारतीय समाजातल्या सर्वात संवेदनशील विषयांपैकी एक. अकादमिक चर्चाविश्व आणि भारतीय समाजातील नित्य व्यवहारातला ‘आधुनिकता’ हा शब्द ढोबळमानाने ब्रिटिश वसाहतवादी काळ व त्यानंतर उदयाला आलेल्या काळाच्या चौकटींना उद्देशून अधिक वापरला जातो. मात्र अगदी प्राचीन काळापासूनच समाजव्यवहारांचे भान असलेल्या, समाजातील ज्ञानव्यवहार, राजव्यवहार व अर्थव्यवहाराची सूत्रे हाताळणाऱ्या आणि या वर्गाभोवती घुटमळत सामाजिक व्यवस्थेत स्वत:चे वैयक्तिक अगर सामूहिक उन्नयन करू बघणाऱ्या वर्गास संबंधित काळाच्या आधुनिकतेचे स्पष्ट-अस्पष्ट भान असल्याचे दिसून येते. ‘पुरा नवम्’ या व्युत्पत्तीद्वारे निर्देशित होणारे पुराणसाहित्य रचणाऱ्या, त्यात भर घालून त्यांचा पसारा वाढवणाऱ्या व त्यांना उपखंडात सर्वदूर पसरवणाऱ्या वर्गानी ‘जुन्या’ काळातील घटनांविषयीच्या स्मृती नव्या करून सांगण्याची परंपरा जागती व ‘वाढती’ ठेवल्याचे दिसून येते.

‘आधुनिकता’ हा शब्दच मुळी ‘अधुना’ म्हणजे ‘हल्ली’ या शब्दावरून बनला आहे. त्याअर्थी आज ढोबळमानाने जिला आधुनिकता असे म्हटले जाते ती स्वाभाविकत: आजच्या दृष्टीने निकटतम अशा विशिष्ट काळमर्यादेच्या चौकटींच्या सीमांनी युक्त अशी चौकट आहे. भारताच्या संदर्भात विचार करायचा झाल्यास पाश्चात्त्य धाटणीचे शिक्षण, औद्योगिकीकरण, विज्ञानवाद, समतादी क्रांतिकारी मूल्ये, छपाईविद्या आदी गोष्टींशी ओळख आणि अंगीकार करून घेतल्यावर १९व्या आणि २०व्या शतकात समाजात आधुनिकता हळूहळू रुजत गेली. जसजशी ती रुजत गेली तसतसे त्या आधुनिकतेचे पदर, सहसंबंध आणि सामाजिक संदर्भदेखील अधिक जटिल होत गेले. या आधुनिकतेचा अभ्यास करणाऱ्या अनेक अभ्यास-परंपरा जगभरातल्या अनेक विद्यापीठांत, संशोधन संस्थांत गेल्या दीडेक शतकात उदयाला आल्या आणि त्यांनी या अभ्यासशाखेच्या विकासाला हातभार लावला.

डॉ. मधुकर श्रीधर ऊर्फ राजा दीक्षित हे विद्यमान अकादमिक बौद्धिक वर्तुळातील, इतिहास अभ्यास क्षेत्रातील हे विद्वन्मान्य असे नाव. मराठी भाषक बौद्धिक वर्तुळाच्या दृष्टीने डॉ. दीक्षित यांचे नाव महत्त्वाचे आहेच, मात्र त्यांच्या अभ्यासकीय योगदानाचा, व्यासंगाचा विचार राष्ट्रीय अकादमिक चर्चाविश्वाच्या इतिहासातही करणे अनिवार्यच ठरेल. आज लौकिकार्थाने निवृत्त झालेल्या, मात्र अधिक जोमाने नवनव्या अकादमिक जबाबदाऱ्या उचलणाऱ्या डॉ. दीक्षित यांच्या विद्यार्थ्यांनी, सहकाऱ्यांनी एकत्र येत त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नुकताच ‘प्रोफेसर राजा दीक्षित फेलिसिटेशन व्हॉल्यूम’ अर्थात ‘प्रा. राजा दीक्षित गौरवग्रंथ’ प्रकाशित केला. डॉ. जास्वंदी वांबुरकर यांनी त्याचे संपादन केले आहे. ग्रंथामध्ये शिरताना दिसते अनुक्रमणिका आणि त्यातील ज्येष्ठ लेखक, अभ्यासकांच्या नावांची मालिका. या मालिकेत रशियातील इण्डोलॉजी क्षेत्रातील- विशेषत: वारकरी साहित्यावर काम करणाऱ्या अभ्यासिका इरिना ग्लुष्कोव्हा यांच्यापासून वर्षां शिरगावकर, अरविंद गणाचारी, उमेश बगाडे, मधुमिता बंदोपाध्याय, चंद्रकांत अभंग, चंद्राणी चटर्जी, श्रद्धा कुंभोजकर, मीना वैशंपायन, यशवंत सुमंत, अभिधा धुमटकर, रश्मी चोन्द्रा, चैत्रा रेडकर व जास्वंदी वांबुरकर या नामवंत, व्यासंगी अभ्यासकांची नावे आहेत.

आचारमूल्यांतील बदल..

अत्यंत जटिल अशा भारतीय समाजविश्वात रुजलेली वा वेगवेगळ्या संदर्भात रुजू घालण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू ठेवण्यास भाग पाडणाऱ्या आधुनिकतेचे वेगवेगळे आयाम या नामवंत लेखकांनी त्यांच्या निबंधांतून मांडले आहेत. ग्लुष्कोव्हा यांनी त्यांच्या निबंधात आधुनिकतेने मराठी भाषक समूहांत शिरकाव केल्यावर समाजावर प्रभाव टाकणाऱ्या, आधुनिकतेला गती देणाऱ्या छपाईकलेतून मराठी संतमालिकेतील ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या प्रतिमांची निर्मिती, त्यांत होत गेलेले बदल, या बदलांसाठी कारणीभूत असलेले, अतिशय गतिमान असे सामाजिक आयाम आदींचा अतिशय साकल्याने परामर्श घेतला आहे. ख्रिस्तोफर पिन्नी या विख्यात मानववंशशास्त्रज्ञाच्या ‘फोटोज् ऑफ द गॉड्स : द प्रिंटेड इमेज अ‍ॅण्ड पॉलिटिकल स्ट्रगल इन इंडिया’ या अत्यंत साक्षेपी ग्रंथाची आठवण करून देणाऱ्या या निबंधाद्वारे ग्लुष्कोव्हा यांनी या दोन संतांच्या चित्रणांमध्ये झालेल्या बदलांचा इतिहास चाचपत मराठी जनांतील श्रद्धा वा कर्मकांडविश्वातील पवित्रतेच्या बदलत्या धारणा, आचारमूल्यांतील बदल दाखवून देत संशोधनाच्या नव्या दिशा आणि गरजांकडे निर्देश केला आहे.

भारतीय समाजात पाश्चात्त्य धाटणीची आधुनिकता रुजली ती मुंबई-महाराष्ट्र आणि बंगाल प्रांतात. साहित्य, कला, शिक्षण, भारतविद्या किंवा इण्डोलॉजीचा अभ्यास अथवा निरनिराळ्या विषयांना वाहिलेल्या नियतकालिकांचा उदय आदी क्षेत्रांत या दोन प्रांतांत आधुनिक इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भारतीय मध्यमवर्गाने उत्तम बस्तान बसवण्यास सुरुवात केली. वैचारिक प्रबोधनाच्या क्षेत्रात बंगाली आणि मराठी विद्वानांनी आपसात लक्षणीय विमर्श केल्याची अनेक उदाहरणे दिसून येतात. विश्वनाथ नारायण मंडलिक आणि भूदेव मुखोपाध्याय यांच्या वैचारिक मांडणीतील समानस्थळांची चर्चा करणारा प्रा. वर्षां शिरगावकर यांचा साक्षेपी लेख या धर्तीवर लक्षणीय आहे. संस्कृतातील स्मृतिग्रंथ, विधवाविवाहादी रूढींविषयीचा विवेकविमर्श करताना या दोन अभ्यासकांना अभिप्रेत असलेली आधुनिकता व त्यांचा कालानुरूप, संस्कारप्रभावातून बनलेला मूळचा रूढीवादी पिंड या द्वैताची समीक्षा प्रा. शिरगावकर यांनी नेमकेपणाने केली आहे. बंगाल-महाराष्ट्राच्या या वैचारिक संबंधांच्या पटावरील आणखी एका आयामाचा परामर्श घेतला आहे प्रा. अरविंद गणाचारी यांनी. बंगाली ब्राह्मो समाजाचे महत्त्वाचे चिंतक केशवचंद्र सेन व प्रार्थना समाजाचे मराठी सभासद आत्माराम पांडुरंग, दादोबा पांडुरंग, भाऊ दाजी आणि न्या. म. गो. रानडे यांच्या चिंतनाचा व मतमतांतरांचा रोचक आढावा घेत या मराठी, बंगाली अभिजन वर्गातून आकाराला आलेल्या संस्थांना अभिप्रेत असलेले परिवर्तन नेमके कसे होते याचा विचार गणाचारी यांच्या निबंधात दिसून येतो.

अभिजनकेंद्री कोंडी

वसाहतयुगाचा सर्वाधिक प्रभाव पडलेल्या महाराष्ट्र आणि बंगाल या दोन प्रदेशांतील अभिजन वर्गाच्या चिंतनविश्वाचा गाभा स्वाभाविकत: अभिजनकेंद्री राहिला. बहुजन, दलित समाजासंदर्भात आवश्यक असलेला सामाजिक क्रांतीचा विचार अभिजनांच्या मांडणीतून अगदी कृतकरीत्या मांडला गेल्याचे दिसून येते. लोकव्यवहारात सांस्कृतिक, राजकीय संदर्भात बरोबरीचे हक्क मिळण्यासाठी आधुनिक शिक्षण हाच पर्याय असल्याने ही कोंडी फोडणे अत्यावश्यक झाले होते. ही कोंडी फोडली महाराष्ट्रातील द्रष्टे विचारक, सुधारक महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी. इतिहासाचे साक्षेपी अभ्यासक प्रा. उमेश बगाडे यांनी त्यांच्या निबंधात फुले दाम्पत्याने मराठी बहुजन वर्गात शिक्षण चळवळ सुरू करत प्रस्थापित ब्राह्मणी व्यवस्थेला दिलेल्या आव्हानाचा ‘इंटलेक्च्युअल हिस्टरी’च्या अंगाने परामर्श घेतला आहे. बहुजनकेंद्री इतिहास मांडताना फुले यांनी केलेला मिथकांच्या फेरमांडणीचा प्रयत्न, बौद्धिक उद्योग आणि शारीरिक श्रम यांचा सहसंबंध जोडत बहुजन वर्गाच्या बुद्धिजीवित्वाला नवे, प्रगमनशील आयाम देण्याचा महात्मा फुले व त्यांच्या सहकाऱ्यांचा प्रयत्न यांचा ‘सबऑल्टर्न’ इतिहास, प्राज्ञ इतिहास, आधुनिकता अशा आंतरविद्याशाखीय अंगाने प्रा. बगाडे यांनी विचार केलेला दिसतो.

नागरीकरण आणि आधुनिकता

आधुनिक भारतातील जात, धर्मसमूहांच्या राजकारणाचे वेगवेगळे आयाम विविध अभ्यासकांनी समोर आणलेले दिसतात. या नेहमीच्या आयामांच्या पल्याड जात मधुमिता बंदोपाध्याय यांनी रेल्वेच्या आगमनानंतर कोळी, मारवाड भागांतील वाणी, गुजराती औदिच, अवधकडचे सरवरीया आदी समूहांची झालेली प्रगती व खत्री, धेड, सुन्नी बोहरा नागौरी व अन्य जातसमूहांना बसलेला फटका यांवर झोत टाकला आहे. आधुनिक नागरीकरणाच्या प्रक्रियेत जातींच्या एकसाचीकरणाला अधिक गती देण्याचे काम ब्रिटिशकालीन ‘मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग’च्या व्यवस्थेने कसे केले, यावर डॉ. चंद्रकांत अभंग यांनी प्रकाश टाकला आहे. मुंबई, पुणे, नाशिक यांसारख्या शहरांच्या संरचना किंवा महाराष्ट्राबाहेरील गुजरात, राजस्थान आदी राज्यांत जातनिहाय नेमून दिलेली स्वच्छतेची कामे व त्यांचे संस्थात्मीकरण आणि यातून जातीयतेला मिळालेली बळकटी यांवर प्रा. अभंग यांनी केलेली चर्चा लक्षणीय आहे.

भारतीय संदर्भात ज्यास ‘प्रबोधनपर्व’ असे ढोबळमानाने म्हटले जाते, त्या काळातील साहित्यविषयक उपक्रम, त्यांवरील इंग्रजी प्रभाव आदींची पौर्वात्यवादाच्या अनुषंगाने चंद्राणी चटर्जी यांनी केलेली मांडणी ऐतिहासिकदृष्टय़ा लक्षणीय ठरते. मायकेल मधुसूदन दत्त यांच्यासारखे बंगाली आधुनिक कवी व मराठीतील केशवसुत यांनी ‘सॉनेट’ (सुनीत) हा इंग्रजी काव्य प्रकार संबंधित भाषांत रुजवताना स्थानिक, प्रादेशिक वर्तुळावर झालेल्या सांस्कृतिक परिणामांची मीमांसा त्यांनी केलेली आहे. श्रद्धा कुंभोजकर यांचा निबंध अशाच साहित्येतिहासाच्या अंगाने जाणारा आहे. मराठी रंगमंचीय विश्वात प्रवेश करणारी कृतक आधुनिकता, त्यातून दिसून येणारी जातविषयक गणिते आणि वरवर प्रागतिक भासणाऱ्या मांडणीतून प्रतीत होणारी प्रच्छन्न जातीयता कुंभोजकर यांनी त्यांच्या निबंधात टिपली आहे.

सेनापती बापट, साने गुरुजी..

भारतीय संदर्भातील आधुनिकता या ना त्या निमित्ताने प्राचीन काळाच्या परिप्रेक्ष्याशी जोडून घेणे हा भारतीय समाजाचा आवडता छंद आहे. अर्थात, यातून आकाराला आलेल्या संशोधनव्यूहाने आधुनिक संदर्भात अभिजात विद्या/साहित्यावर केलेले संशोधन आधुनिकता आणि परंपरा यांविषयीच्या अभ्यासाला आणि सामाजिक धारणांना उपयुक्त ठरल्याचे दिसून येते. ‘इण्डोलॉजी’ या ज्ञानशाखेच्या उदयानंतर ब्रिटिश व अन्य युरोपीय अभ्यासकांनी आरंभलेल्या इण्डोलॉजिकल अभ्यासाच्या उद्योगातून प्रेरणा घेत अनेक देशी संशोधक निर्माण झाले. व्यासंगी भारतविद्याभ्यासक असलेल्या डॉ. मीना वैशंपायन यांनी शंकर पांडुरंग पंडित या अभ्यासकाच्या काहीशा दुर्लक्षित कारकीर्दीचा आणि संस्कृत व मराठी ग्रंथांच्या चिकित्सक आवृत्ती बनवण्याच्या त्यांच्या लक्षणीय उद्योगाकडे लक्ष वेधले आहे.

परंपरा आणि आधुनिकतेचा परामर्श घेणाऱ्या या विचारपरंपरांतून या दोन्ही तत्त्वांचा समन्वय साधत, वेळ पडल्यास सामाजिक चळवळी उभारत नव्या बदलांना सामोरे जाण्यासाठी देशी चिंतकांनी, नेत्यांनी समाजाला उद्युक्त केल्याचे दिसते. राज्यशास्त्राचे अभ्यासक सुस्मृत यशवंत सुमंत यांनी सेनापती बापट यांच्या गांधीवाद, समाजवाद, लोकशाही आदी मूल्यांच्या आधारावर बेतलेल्या विचारसृष्टीचा आढावा घेणारा लेख आणि अभ्यासक चैत्रा रेडकर यांचा साने गुरुजींच्या पंढरपूर मंदिर सत्याग्रहाचा आढावा घेणारा लेख- हे दोन्ही लेख यादृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठरतात. बहुजनकेंद्री वारकरी परंपरेच्या मुळाशी असलेली कृषिसंस्कृती आधुनिकीकरणाच्या मार्गावर नेणारे, पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे संस्थापक डॉ. हेरॉल्ड मान यांच्या कार्याचा आढावा डॉ. अभिधा धुमटकर यांच्या लेखात घेतला आहे. या ग्रंथाच्या संपादक असलेल्या डॉ. जास्वंदी वांबुरकर यांनी विभावरी शिरुरकर यांच्या साहित्यातील स्त्रीविषयक विचार, मराठी स्त्रीवादाच्या घडणीत विशिष्ट काळातील अभिजन धारणांचे शिरुरकर यांच्या साहित्यातील चित्रण आणि त्यांनी स्त्रीविषयक मांडणीला दिलेला नवीन आयाम याची चर्चा केलेली दिसते.

या अनेकविध विषयांना हात घालणारा हा निबंधसंग्रह डॉ. राजा दीक्षित यांनी हाताळलेल्या विषयवैविध्याच्या व्यापतेला अनुरूप असा आहे. पुस्तकात काही ठिकाणी इंग्रजी वाक्यरचनांमधील  विस्कळीतता किंवा अनवधानाने राहून गेलेल्या काही त्रुटी क्वचित दिसून येतात. मात्र बंगाली बुद्धिजीवित्वाच्या तुलनेत मराठी सामाजिक अभ्यासविश्व काहीसे संकुचित भासत असले, तरी अशा प्रकारचे संग्रह आणि लेखन यांच्यात सातत्य राखल्यास, त्याला शासकीय स्तरावरून यथायोग्य साहाय्य झाल्यास मराठी अभ्यासकवर्गाला, समाजशास्त्रे शिकणाऱ्या ताज्या दमाच्या विद्यार्थिवर्गाला हुरूप येईल याविषयी शंका नाही.

rajopadhyehemant@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2021 12:07 am

Web Title: indian modernity challenges and response book review abn 97
Next Stories
1 एक बेगम अशीही..
2 परिचय : गुरुदत्तचं गूढ..
3 बुकबातमी : ‘कळा’ ज्या लागल्या जीवा..
Just Now!
X