19 November 2017

News Flash

फिल्म सोसायटय़ांच्या वाऱ्यांचा वेध

चित्रपटरसिकांची नोंदणीकृत संस्था म्हणजे ‘फिल्म सोसायटी’..

अभिजित देशपांडे | Updated: May 13, 2017 3:01 AM

चित्रपटरसिकांची नोंदणीकृत संस्था म्हणजे फिल्म सोसायटी’.. ‘चित्रपटया माध्यमाची ओळख झाल्यानंतर लवकरच भारतात फिल्म सोसायटींचेही वारे वाहू लागले. गेल्या सात दशकांचा इतिहास पाठीशी असणाऱ्या फिल्म सोसायटींनी जाणते प्रेक्षक आणि उत्कृष्ट रंगकर्मी घडवले. फिल्म सोसायटी चळवळीच्या या वाटचालीचा व योगदानाचा वेध घेणारं हे पुस्तक.. त्यातून फिल्म सोसायटींचा सुरुवातीचा काळ, नंतर ऐंशी व नव्वदच्या दशकांमध्ये या सोसायटींसमोर उभा ठाकलेला अस्तित्वाचा प्रश्न व पुढे गेल्या दशकभरात त्यांना आलेली ऊर्जितावस्था- असे टप्पे कळतातच, परंतु भारतात चित्रपटसंस्कृतीला आकार देण्यातही या चळवळीने हातभार लावला आहे, हेही आकळते..

चित्रपटरसिकांची नोंदणीकृत संस्था म्हणजे ‘फिल्म सोसायटी’. अशा फिल्म सोसायटी जगभर पसरलेल्या आहेत. एरवी सहसा चित्रपटगृहांत अथवा उपलब्ध माध्यमांतून सहजासहजी बघायला मिळणार नाहीत, अशा जगभरातील उत्तमोत्तम चित्रपटांचे नियोजनबद्ध प्रदर्शन, त्यावर चर्चा व तत्सम विविध उपक्रमांतून रसिकाचे जाणतेपण घडवणारी ही एक जगभर पसरलेली सांस्कृतिक चळवळ आहे. पाश्चात्त्य देशांत त्याला फिल्मक्लब किंवा सिनेक्लब असेही म्हटले जाते. १९०७ मध्ये सर्वप्रथम फिल्मक्लब ही संज्ञा अस्तित्वात आली. पॅरिसमधील या पहिल्यावहिल्या फिल्मक्लबमध्ये विविध चित्रपट व त्यासंबंधीचे साहित्य प्रदर्शनार्थ ठेवले जाई. परंतु पॅरिसस्थित इटालियन चित्रपट सिद्धांतनकार रिकिओतो कानुदो याने १९२१ ला स्थापन केलेल्या अशाच एका फिल्म क्लबला अधिक अकादमिक स्वरूप दिले. चित्रपटाचा माध्यम व कला म्हणून रीतसर अभ्यासच या क्लबच्या उपक्रमांतून त्याने चालवला. या काळात फ्रान्सबरोबरच रशिया, इटली, अमेरिका, जर्मनी आदी देशांमध्ये सिनेमा माध्यमात नवनवीन प्रयोग होऊ लागले होते. त्याचे भाषा व व्याकरण सिद्ध होऊ लागले होते. कला म्हणून त्याविषयीचे कुतूहल कलावंत व विचारवंतांमध्ये वाढीस लागले होते. या पाश्र्वभूमीवर, आजच्या अर्थाने ज्याला फिल्म सोसायटी म्हणता येईल, अशा लंडन फिल्म सोसायटीची स्थापना १९२५ मध्ये झाली. तिच्या संस्थापकांमध्ये एच. जी. वेल्स, जॉर्ज बर्नार्ड  शॉसारखे प्रथितयश लेखकमंडळी व विचारवंतही होते. त्यांतून उत्तमोत्तम चित्रपट दाखवून या माध्यमाविषयी जाणतेपण वाढीस लागणाऱ्या चर्चा होत असत. याच प्रारूपाने पुढे अनेक पाश्चात्त्य देशांत या प्रकारच्या फिल्म सोसायटी वाढू लागल्या. त्यांतून देशोदेशी व पुढे आंतरराष्ट्रीय पातळीवर अशा फिल्म सोसायटींचे जाळे विणले गेले. जगभरातील अशा फिल्म सोसायटींची छत्रसंस्था असलेल्या ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज’ (आयएफएफएस)ला युनेस्कोचे पाठबळही लाभले आहे. तेव्हा, फिल्म सोसायटी चळवळ ही चित्रपटाचा कला म्हणून अभ्यास करणारी, जगभर पसरलेली चित्रपट रसिकांची एक बौद्धिक-सांस्कृतिक-बिगरसरकारी चळवळ आहे. साहजिकच ही चळवळ तद्दन व्यावसायिक चित्रपटांना नव्हे, तर कलात्मक-गंभीर-आशयप्रधान-प्रयोगशील-समांतर चित्रपटांना प्रोत्साहन देणारी, त्यासंबंधीच्या कलाविचारांना व रसास्वादाला चालना देऊन चित्रपटसाक्षरतेचा प्रसार करणारी व पर्यायाने सुजाण व प्रगल्भ प्रेक्षक- दर्जेदार चित्रपट- समृद्ध चित्रपटसंस्कृती घडवणारी चळवळ आहे.

२८ डिसेंबर १८९५ रोजी पॅरिसमध्ये जन्माला आलेले चित्रपट हे माध्यम अवघ्या सहा महिन्यांत ७ जुलै १८९६ रोजी भारतात पोहोचले. पुढील काळात, १९१२ नंतर दादासाहेब फाळके- दादासाहेब तोरणे-हिरालाल सेन आदींच्या प्रयोगांतून क्रमश: भारतीय चित्रपट आकाराला येत गेला व अल्पावधीतच फोफावला. त्यासाठीचा प्रेक्षकवर्गही आकाराला येऊ लागला. तेव्हा, ब्रिटिश आधिपत्याखाली असणाऱ्या तत्कालीन भारतात पाश्चात्त्य देशांतील हे फिल्म सोसायटींचे लोणही लवकरच पसरले नसते, तरच नवल. भारतातील या फिल्म सोसायटी चळवळीचा वेध घेणारे व्ही. के. चेरियन यांचे ‘इंडियाज फिल्म सोसायटी मुव्हमेंट- द जर्नी अ‍ॅण्ड इट्स इम्पॅक्ट’ हे अभ्यासपूर्ण पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. यापूर्वीची, एच. एन. नरहरी राव, प्रेमेंद्र मुझुमदार यांची इंग्रजी व सुधीर नांदगावकर यांचे मराठी- अशी मोजकीच पुस्तके या विषयावर उपलब्ध आहेत. ती चळवळीच्या मर्यादित परिघातच पोहोचली आहेत. परंतु, या चळवळीचा अधिक विस्तृत वेध घेत अधिकांपर्यंत पोहोचू शकेल, असे हे सेज प्रकाशनाचे पुस्तक म्हणूनच महत्त्वाचे ठरते. फिल्म सोसायटी चळवळीचा हा इतिहास एकुणातच व्यापक अशा चित्रपट संस्कृतीवरही प्रकाश टाकणारा आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात- प्रामुख्याने मुंबईत- अमॅच्युअर फिल्म क्लब (१९३७) अस्तित्वात होता. त्याची स्थापना हंगेरीच्या कॅमेरामन फेरेन्स बोरका यांनी बी. डी. गर्ग आणि ख्वाजा अहमद अब्बास यांच्या सहकार्याने केली होती. १९४२ साली मुंबईत बॉम्बे फिल्म सोसायटी ही दुसरी फिल्म सोसायटी स्थापन झाली. पण खऱ्या अर्थाने ही चळवळ रुजली नि फोफावली ती कोलकाता फिल्म सोसायटीच्या स्थापनेने. स्वातंत्र्यानंतर लगेचच- ऑक्टोबर १९४७ रोजी स्थापन झालेल्या या फिल्म सोसायटीचे संस्थापक होते- चिदानंद दास गुप्ता आणि सत्यजित राय. जगभरातले उत्कृष्ट चित्रपट पाहावेत, त्यावर चर्चा करावी, या हेतूने काम करीत असलेल्या सोसायटीतील रसिक सदस्यांना लुई माले, ज्याँ रेन्वां, स्वेवोलेद पुदोवकिन यांसारख्या बडय़ा, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या दिग्दर्शकांसोबत चर्चा करण्याची संधीही मिळाली. राय यांच्या ‘पाथेर पांचाली’ (१९५५) या चित्रपटाला कान महोत्सवाबरोबरच अनेकविध आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले. जागतिक पातळीवर वाखाणला गेला. एका फिल्म सोसायटीवाल्या दिग्दर्शकाचा हा पहिलावहिला तरीही अत्युत्कृष्ट चित्रपट जगभरातल्या रसिकांना भावला. जागतिक पातळीवर टिकू शकेल असे उत्तम चित्रपटाचे भारतीय प्रारूप त्यातून सिद्ध झाले. ‘पाथेर पांचाली’च्या या यशाने कोलकाता फिल्म सोसायटीलाही पाठबळ मिळाले. पण या दरम्यानच्या इतरही काही महत्त्वाच्या घटनांनी त्यासाठी अनुकूल, पोषक असे वातावरण निर्माण केले होतेच. त्यांतून फिल्म सोसायटी रुजायला आवश्यक ती भूमी अनायासेच मिळाली.

भारताचे तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी नवनिर्माणाचे जे स्वप्न पाहिले, जनतेला दाखवले नि त्या अनुषंगाने विविध क्षेत्रांत व्यवस्थात्मक उभारणी सुरू केली- त्यांतून कला व सांस्कृतिक क्षेत्रांतही पायाभरणी चालू झाली. त्याचाच भाग म्हणून साहित्य अकादमी, संगीत नाटक अकादमी, ललित कला अकादमी- यांसारख्या व्यवस्था उभ्या राहिल्या. १९५१ साली भारत सरकारनेच नेमलेल्या पहिल्या फिल्म इन्क्वायरी कमिटीअंतर्गत एस. के. पाटील यांनी आपला विस्तृत अहवाल सादर केला. त्यातील सूचनांतूनच वास्तविक पुढील काळात फिल्म इन्स्टिटय़ूट (एफटीआयआय) ही प्रशिक्षण संस्था, फिल्म फायनान्स कॉर्पोरेशन (एफएफएस) ही उत्तम चित्रपटांना आíथक पाठबळ देणारी संस्था (त्यातूनच पुढे नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएफडीसी) ही संस्था उत्क्रांत झाली), नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया (एनएफएआय) हे चित्रपट संग्रहालय आदी संस्था उभ्या राहिल्या, कार्यरतही झाल्या. माहिती व प्रसारण मंत्रालयाने फ्रेंच-भारतीय वंशाच्या ज्याँ भावनगरी यांची नियुक्ती करून त्यांच्या नियोजनातून पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (आयएफएफआय) जानेवारी १९५२ मध्ये मुंबईत आयोजित केला. पुढे हा महोत्सव त्याच वर्षी चेन्नई, दिल्ली व कोलकात्यालाही भरवला. ‘‘या महोत्सवांतील चित्रपट प्रदर्शनातून विविध देशांतील नवनवीन कल्पना आपल्याला मिळतील, त्याचा आपल्याला फायदाच होईल,’’ असा विश्वास पं. नेहरूंनी या प्रसंगी व्यक्त केला. अन्य कला क्षेत्रांतील अकादमीप्रमाणेच दर्जेदार चित्रपटांना प्रोत्साहन देणारी व त्यासाठी नियोजनबद्धरीतीने काम करणारी चलतचित्र अकादमी ही सरकारी संस्था असावी, ही कल्पना मात्र आजवर प्रत्यक्षात येऊ शकली नाही. परंतु, नेहरूंच्याच सूचनेवरून संगीत नाटक अकादमीने २७ फेब्रुवारी १९५७ रोजी फिल्म सेमिनार आयोजित केला. त्याचे संचालक होते- देविका राणी आणि पृथ्वीराज कपूर, तर सचिव होत्या पंतप्रधानांच्या कन्या दस्तरखुद्द इंदिरा गांधी. राज कपूर, बिमल रॉय, ख्वाजा अहमद अब्बास यांसारख्या भारतभरातील चित्रपट क्षेत्रातील बडय़ा बडय़ा मंडळींनी या सेमिनारला हजेरी लावली होती. उद्घाटनप्रसंगी पं. नेहरू म्हणाले होते, ‘‘भारतात असो की इंग्लंड, अमेरिकेत- खूप मोठय़ा लोकसंख्येला मेलोड्रामा आवडतोच. लोकांची अभिरुची त्यांना काय दाखवलं जातं या गोष्टीला घडवते. तसंच त्यांना काय दाखवलं जातं आहे, त्यातूनही लोकाभिरुचीला वळण लागायला हवे..’’ नेहरूंसमोर बदलाचे स्पष्ट स्वप्न होतेच. या सेमिनारला संबोधित करणाऱ्यांमध्ये एक होते- व्ही. के. कृष्ण मेनन. चित्रपट उद्योग विस्तारावा व त्यातून अनेकांना रोजगार मिळावा, असे सेमिनार सातत्याने व भारतातील विविध शहरांतून व्हावेत, त्यासंबंधी लोकांनीही आपल्या सूचना आवर्जून मांडाव्यात, आदींवर त्यांनी भर दिला. पुढे पं. नेहरूंनी याच कृष्ण मेनन यांच्याकडे चित्रपटसंस्कृती विकसित करताना त्यातील अकादमिक बाजूवर भर देण्यासाठी भारताला साहाय्यभूत ठरेल अशा तज्ज्ञ व्यक्तीची नेमणूक करावी, अशी कामगिरी सोपवली. काही काळ रशियन दिग्दर्शक आयजेन्स्टाइन यांच्यासोबत काम केलेल्या मारी सिटन या ब्रिटिश विदुषीची यासाठी निवड केली गेली. ही निवड सर्वार्थानेच उचित ठरली, असे म्हणावे लागेल.

दिल्लीत असताना नेहरू कुटुंबीयांसमवेतच राहण्याइतपत मारी सिटन यांचे नेहरू घराण्याशी घनिष्ठ संबंध होते. इंदिरा गांधी यांच्या तर त्या मत्रीणच बनल्या होत्या. चित्रपट संस्कृतीच्या विकासासाठी भारतभर मारी सिटन यांचा व्याख्यान दौरा आयोजित करण्यात आला. छोटय़ा-मोठय़ा गटांना, फिल्म सोसायटींना त्या भेटी देत. फिल्म सोसायटीच्या स्थापनेलाही त्यांनी जाणीवपूर्वक प्रोत्साहन दिले. पण विशेषत: चित्रपट अभ्यास यावर त्यांनी भर दिला. लेखन, व्याख्याने, रसास्वाद कार्यशाळा, शिबिरे करीत भारतभर प्रवास केला. कोलकाता फिल्म सोसायटीवर तर त्यांचा विशेषच जीव जडला. त्याच दरम्यान, ‘पाथेर पांचाली’ प्रदíशत झाला. ‘पाथेर पांचाली’ व सत्यजित राय यांचे महत्त्व जागतिक पटलावर स्थापित करण्यात मारी सिटन यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यांनी पुढे सत्यजित राय यांचे विस्तृत व अभ्यासपूर्ण चरित्रही लिहिले. आग्रा येथील विद्यापीठात पदव्युत्तर स्तरावरील दीडेकशे विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम  जागतिक सिनेमे दाखवून त्यावर चर्चा घडवून आणणारे अर्थशास्त्राचे प्राध्यापक सतीश बहादूर यांना मारी सिटन यांनीच हेरले व पुढे पुण्यातील फिल्म इन्स्टिटय़ूट येथे त्यांची चित्रपट रसास्वादाचे शिक्षक म्हणून नियुक्ती करवली. सतीश बहादूर हे चित्रपट रसास्वादाचे पहिले भारतीय शिक्षक. ते आणि पी. के. नायर यांच्या एकत्रित प्रयत्नांतून १९६७ पासून सातत्याने आजतागायत पुण्यात चित्रपट रसास्वादाचा महिनाभराचा अभ्यासक्रम चालतो. याच मारी सिटन यांनी दिल्ली फिल्म सोसायटीला प्रोत्साहन देत इंदिरा गांधींना त्यात सक्रिय सहभागी करून घेतले. इंदिरा गांधी, अरुणा असफ अली, कृष्ण मेनन, इंदर कुमार गुजराल हे दिल्ली फिल्म सोसायटीचे कार्यकारिणी सदस्य होते. मारी सिटन यांच्या प्रयत्नांतूनच भारतभरातील फिल्म सोसायटीजची छत्रसंस्था फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया (एफएफएसआय) ची १९५९ साली स्थापना झाली. त्याचे अध्यक्ष होते सत्यजित राय, तर १९६४ पर्यंत उपाध्यक्ष होत्या इंदिरा गांधी. पुढे लालबहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात त्या माहिती-प्रसारण खात्याच्या मंत्री झाल्या. मंत्री या नात्याने इंदिराजींनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. उदा.- एफएफएसआयच्या चित्रपट प्रदर्शनासाठी मनोरंजन शुल्कातून पूर्ण सूट व चित्रपट हे जागतिक माध्यम आहे हे लक्षात घेऊन सेन्सॉरशिपच्या जाचातून पूर्ण मोकळीक. या निर्णयांचा अर्थातच फिल्म सोसायटी चळवळीला फायदा झाला. नंतरच्या टप्प्यावर पंतप्रधान असताना इंदिरा गांधींनी १९८० साली डॉ. शिवराम कारंथ यांच्या नेतृत्वाखाली फिल्म इन्क्वायरी कमिटी नेमली. कारंथ यांनीदेखील चलतचित्र अकादमी असावी, या मागणीचा पुनरुच्चार केला. पण ती अपेक्षा अपुरीच राहिली.

या काळात मुंबई, कोलकाता, दिल्ली, पटना, लखनौ, रुरकी, भोपाळ, चेन्नई, थिरुवनंतपुरम, बंगळुरू आदी ठिकाणी फिल्म सोसायटी उभ्या राहिल्या. काही बंदही पडल्या. पण काहींनी दर्जेदार जागतिक चित्रपटांच्या प्रदर्शनांबरोबरच रसास्वाद कार्यशाळा, शिबिरे, चित्रपट अभ्यासविषयक नियतकालिके वा अभ्याससाहित्याचे प्रकाशन, चित्रपटविषयक संदर्भसाहित्याची ग्रंथालये, चर्चासत्रे, परिसंवाद, व्याख्याने, दिग्दर्शक-समीक्षकांशी संवाद, छोटे-मोठे चित्रपट महोत्सव.. या सातत्यपूर्ण उपक्रमांतून चित्रपट संस्कृतीत भर घातली. टीव्ही व व्हिडीओ लायब्ररी, शेकडो चॅनेल्स व आता इंटरनेटवर सहज उपलब्ध होणारे हजारो चित्रपट यांमुळे फिल्म सोसायटी चळवळीपुढे गंभीर आव्हानेही उभी राहिली. पण कल्पक उपक्रमांतून तग धरीत आजघडीला, २०१४ च्या आकडेवारीनुसार, एफएफएसआयच्या छत्राखाली (१९५९ साली स्थापनेवेळी सहा सोसायटी होत्या, त्या तुलनेत) २९२ फिल्म सोसायटी आहेत. हे सुचिन्हच म्हणायला हवे. या सर्वाचा विस्तृत ऐतिहासिक पट या पुस्तकातून उभा राहतो.

कोलकाता फिल्म सोसायटी, सिने क्लब-कोलकाता, दिल्ली फिल्म सोसायटी, फिल्म फोरम, आनंदम फिल्म सोसायटी, प्रभात चित्र मंडळ, मद्रास फिल्म सोसायटी, बॉम्बे फिल्म सोसायटी, पटना फिल्म सोसायटी, आग्रा व फैजाबाद फिल्म सोसायटी, सुचित्रा फिल्म सोसायटी, चित्रलेखा फिल्म सोसायटी, चलचित्र फिल्म सोसायटी.. आदी महत्त्वाच्या फिल्म सोसायटी व सत्यजित राय, इंदिरा गांधी, मारी सिटन, चिदानन्द दास गुप्ता, विजया मुळे, ख्वाजा अहमद अब्बास, ज्याँ भावनगरी, सतीश बहादूर, पी. के. नायर, अनिल श्रीवास्तव, अम्मू स्वामिनाथन.. यांच्या कार्यकर्तृत्वाचा विस्तृत आलेख या पुस्तकात येतो. काही ठिकाणचे इसवी सनांचे संदर्भ जुळणारे नाहीत, काही बाबतीत अपुरी वा संक्षिप्त माहिती हे दोष असूनही या पुस्तकाचे संदर्भमूल्य नाकारता येण्याजोगे नाही.

फिल्म सोसायटी चळवळीने आजवर जाणते प्रेक्षक घडवले, तसेच उत्कृष्ट चित्रपटकर्मीही घडवले आहेत. सत्यजित राय, मृणाल सेन, ऋत्विक घटक, अदूर गोपालकृष्णन, जी. अरिवदन, बासू चटर्जी, श्याम बेनेगल, गिरीश कासारवल्ली, अमोल पालेकर, डॉ. जब्बार पटेल, एम. एस. सत्थू, केतन मेहता यांसारखे महत्त्वाचे दिग्दर्शक फिल्म सोसायटी चळवळीतूनच आले आहेत. भारतातील बहुतांश समांतर चित्रपट फिल्म सोसायटीने घडवलेल्या सांस्कृतिक पर्यावरणातून जन्माला आले आहेत. त्याला प्रतिसाद देणारा प्रगल्भ प्रेक्षकही याच फिल्म सोसायटी चळवळीची देण आहे. पं. नेहरू आणि इंदिरा गांधींनी ज्या प्रकारे फिल्म सोसायटी चळवळीची सरकारी व राजकीय पातळीवर पाठराखण केली, ती आज उपलब्ध होऊ शकली, तर आजही चित्रपट संस्कृतीचे चित्र सकारात्मकरीत्या बदलू शकेल. kGreat films will be made only when we become great Audiencel हे आन्द्रे मालरॉ यांचे विधान, हा फिल्म सोसायटी चळवळीचा मूलमंत्र आहे. प्रस्तुत पुस्तकातून त्याची नेमकी दिशा अधोरेखित झाली आहे.

  • इंडियाज फिल्म सोसायटी मुव्हमेंट- द जर्नी अ‍ॅण्ड इट्स इम्पॅक्ट
  • लेखक : व्ही. के. चेरियन
  • प्रकाशक : सेज पब्लिकेशन्स
  • पृष्ठे : २१९, किंमत : ८९५ रुपये

 

अभिजित देशपांडे

abhimedh@gmail.com

First Published on May 13, 2017 3:01 am

Web Title: indias film society movement the journey and its impact