21 February 2019

News Flash

‘सम न्यायी’ भूगोलाचा इतिहासकार!

जिओस्पेशिअल इन्फर्मेशन रेग्युलेशन अ‍ॅक्टच्या नव्या कायद्याच्या संदर्भात सध्या देशात उलट-सुलट चर्चा सुरू

जिओस्पेशिअल इन्फर्मेशन रेग्युलेशन अ‍ॅक्टच्या नव्या कायद्याच्या संदर्भात सध्या देशात उलट-सुलट चर्चा सुरू असतानाच नकाशाशास्त्राला, म्हणजेच भूगोलाला नवे वळण देणाऱ्या एका विख्यात इतिहासकाराची जन्मशताब्दी २२ मे २०१६ या दिवशी साजरी व्हावी हा एक विलक्षण योगायोग म्हटला पाहिजे! या इतिहासकाराला ‘नकाशात लुडबूड करण्याचं काय काम?’ अशी टीकाही सहन करावी लागली होती. तरीही, सातत्यानं पाठपुरावा करून आणि मुद्दा स्पष्ट करत राहून त्यानं या नकाशाला मान्यता मिळवली. आज त्याचं कार्य जर्मनीतली एक संस्था पुढे नेते आहे..
जिओस्पेशिअल इन्फर्मेशन रेग्युलेशन अ‍ॅक्टच्या नव्या कायद्याच्या संदर्भात सध्या देशात उलट-सुलट चर्चा सुरू असतानाच नकाशाशास्त्राला, म्हणजेच भूगोलाला नवे वळण देणाऱ्या एका विख्यात इतिहासकाराची जन्मशताब्दी २२ मे २०१६ या दिवशी साजरी व्हावी हा एक विलक्षण योगायोग म्हटला पाहिजे!
या इतिहासकाराचे नाव आहे अर्नो पीटर्स! त्याची ऐतिहासिक महत्त्वाची कामगिरी म्हणजे त्याने जगासमोर मांडलेला जगाचा नवा नकाशा. पीटर्स वर्ल्ड मॅप या नावाने ओळखला जाणारा हा नकाशा ‘समान न्याय’ या तत्त्वावर आधारित आहे. या तत्त्वनिष्ठ इतिहासकाराचे प्रतिपादन उल्लेखनीय आहे. जगभरातले सर्व प्रचलित नकाशे १६व्या शतकातील नकाशे-कार (काटरेग्राफर) गेरार्ड्स मर्केटर यांच्या मांडणीवर आधारित आहेत; परंतु ही मांडणी सदोष असल्याचे अर्नो पीटर्ससारख्या अनेकांचे म्हणणे आहे. या मंडळींच्या तर्कशुद्ध मांडणीनुसार गोलाकार पृथ्वीची सपाट पृष्ठभागाच्या भिंतीवर लावलेल्या नकाशातील आकृती ही दिसणाऱ्या पृथ्वीची नव्हे तर असणाऱ्या जगाची असायला हवी. उदाहरणार्थ आफ्रिका खंड उत्तर अमेरिकेपेक्षा मोठा आहे, पण प्रचलित नकाशात उत्तर अमेरिका नेहमीच्या आफ्रिकेपेक्षा मोठी दाखविली जाते. ही भ्रामकता केवळ अफ्रिकेपुरतीच नाही. प्रत्यक्ष दशलक्ष चौरस मैलांचा हिशेब केला तर उत्तर गोलार्धापेक्षा (१८.९ दशलक्ष चौरस मैल) दक्षिण गोलार्ध (३८.६ द.चौ.मै.) दुपटीपेक्षा मोठा आहे. पण प्रस्थापित मर्केटर नकशा-प्रणालीत उत्तर गोलार्ध खूप मोठा दाखविला जातो. ‘जसे भासते तसेच दाखवायचे’ या सूत्रावर आधारित या नकाशा-प्रणालीने अनेक विकृती निर्माण केल्या आहेत.
इतिहासकार अर्नो पीटर्सने प्रस्थापित प्रणालीतल्या या विसंगती हेरून त्यावर नेमके बोट ठेवले. विलासराव साळुंख्यांमुळे प्रचलित झालेल्या ‘समन्यायी पाणीवाटप’ या शब्दावलीचाच आधार घ्यायचा तर पीटर्सचे सूत्र होते ते समन्यायी क्षेत्रवाटपाचे. गोलाकार पृथ्वीच्या वाकलेल्या वा वळसेदार पृष्ठभागावर येणारी आकृती ही नेहमीच दिसायला विस्तृत दिसते. उदाहरणार्थ ग्रीनलंडसारखा देश चौरस मैलांच्या गणितात लहान असूनही दिसायला मोठा दिसतो. ग्रीनलंडचे क्षेत्रफळ अवघे २.१ दशलक्ष चौरस कि.मी. आहे आणि चीनचे ९.५ द.चौ.कि.मी.; पण मर्केटर नकाशात ग्रीनलंड हा चीनपेक्षा दुप्पट मोठा दिसतो. तीच गोष्ट स्कँडिनेव्हिया आणि भारताच्या बाबतीत आहे. भारताचे क्षेत्रफळ आहे ३.३ द.चौ.कि.मी. तर स्कँडिनेव्हियाचे १.१ द.चौ.कि.मी. पण दिसताना स्कँडिनेव्हिया मोठा दिसतो.
अर्नो पीटर्सने हा दृष्टिभ्रम दूर करण्याचा चंग बांधून इक्वल अ‍ॅक्सिस इक्वल-एरिया या सूत्रानुसार देशांचे आकारमान आणि क्षेत्रफळ जसे आहे तसे दाखविणारी नवी नकाशा-प्रणाली तयार केली. १९७४ मध्ये पीटर्सने एक पत्रकार-परिषद घेऊन ही नकाशा-प्रणाली सर्वाधिक वस्तुनिष्ठ असल्याचे ठामपणे सांगून मोठीच खळबळ उडवून दिली.
पीटर्सच्या आधी १८५५ मध्ये रेव्हरंड जेम्स गाल यानेही याचप्रकारे ‘आहे तसेच दिसावे’ हे सूत्र घेऊन एका नकाशाचे प्रकाशन केले होते. परिणामी पीटर्सच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या काहींनी त्याच्यावर प्रतिभा-चौर्याचा आरोपही केला. पीटर्सला रेव्ह. गालच्या कामाची कल्पना नव्हती. ती कल्पना आल्यावर त्याने आपल्या सिद्धान्ताचे सिद्धान्ताऐवजी केवळ एक नवी नकाशा-प्रणाली या पद्धतीने नामकरण केले. काहींनी या इतिहासाच्या अभ्यासकाने भूगोलात कशासाठी लुडबुड करावी? असाही आक्षेप घेतला.
अर्थात, हे काहीही असले तरी पीटर्सचा नकाशा जगप्रसिद्ध झाला. संयुक्त राष्ट्रसंघाने तो प्रकाशित केला. शाळा, महाविद्यालये आणि कॉर्पोरेट जगतानेही तो स्वीकारला. कारण त्यामागे असलेले समान न्यायाचे सूत्र कोणालाही नाकारता येणारे नव्हते.
या सर्व कथानकात महत्त्वाचे आहे ते म्हणजे स्वत: जर्मन असूनही अर्नो पीटर्सने ‘युरोप-केंद्रित’ मानसिकतेतून झालेले इतिहासाचे व भूगोलाचे विकृतीकरण अन्याय्य असल्याचे स्पष्टपणे मांडले व प्रस्थापितांना जबरदस्त आव्हान दिले. ही नकाशा प्रणाली लवकरच लोकप्रिय झाली. सुमारे आठ कोटी नकाशे हातोहात खपले. या प्रतिसादाने भारावून जाऊन पीटर्सने नंतर एक पीटर्स वर्ल्ड अ‍ॅटलासही प्रकाशित केला.
जागतिक अकादमिक जन-चर्चा (ऊ्र२ू४१२ी) युरोप केंद्रिततेच्या अवस्थेतून बाहेर आणायला हवी असे पीटर्सचे ठाम मत होते. यासाठीच त्याने ‘सिन्क्रीनोप्टिक वर्ल्ड हिस्टरी’ हा प्रकल्प हाती घेतला. त्यात त्याने तक्त्यांचा वापर करून एकाच कालखंडात विविध भू-प्रदेशात काय काय चालले होते ते कोणत्याही एका प्रदेशाला झुकते माप न देता मांडले. आफ्रिका, अशिया आणि द. अमेरिकेच्या तुलनेत युरोपला आवश्यकतेपेक्षा जास्त महत्त्व मिळू नये ही त्याची ठाम, आग्रही भूमिका होती.
अशा या ध्येयवेडय़ा, तत्त्वनिष्ठ आणि मूलभूत प्रमेयाशी बांधिलकी ठेवून संशोधनाला वाहून घेणाऱ्या इतिहासकाराचे व्यक्तिगत आयुष्यही वैशिष्टय़पूर्ण होते. त्याची ध्येयनिष्ठा इतकी प्रखर होती की हाती घेतलेल्या कामात अडथळा नको म्हणून त्याने अनेक मानाच्या जागांवरील नियुक्ती नाकारली. वयाच्या सोळाव्या वर्षीच पोलिओग्रस्त होऊनही त्याने आयुष्यभर काठी घेऊन चालणे नाकारले, वयाच्या सत्तरीत प्रवेश केल्यावरही तो रोज पोहत असे आणि आपल्याच लहान मुलीने एकदा ओळखले नाही म्हणून आयुष्यभर त्याने चष्मा लावला नाही. तीन वेळा लग्न करणाऱ्या आणि सात अपत्यांना जन्म देणाऱ्या या इतिहासकाराने वयाच्या ८६व्या वर्षी २ डिसेंबर २००२ ला जगाचा निरोप घेतला. जिथे त्याने अखेरचा श्वास घेतला त्या ब्रेमेन (जर्मनी) गावात आज, त्याच्या अधिपत्याखाली एके काळी काम करणारी ‘इन्स्टिटय़ूट ऑफ युनिवर्सल हिस्टरी’ अजूनही त्याचे कार्य नेटाने पुढे नेत आहे.
लेखक भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असून लेखातील मते वैयक्तिक आहेत. ईमेल : vinays57@gmail.com

First Published on May 21, 2016 3:09 am

Web Title: information about arno peters