‘एफबीआय’ या अमेरिकी केंद्रीय अन्वेषण विभागाचे प्रमुख जेम्स कॉमी हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारकाळात पोपटासारखे बोलू लागले होते. ट्रम्प यांच्या प्रमुख प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन यांनी खासगी ईमेल वापरणं हे कसं भ्रष्टाचारासारखंच आहे, नव्हे तो राष्ट्रद्रोहसुद्धा असू शकतो, अशी खात्री असल्यासारखंच कॉमी यांचं बोलणं असायचं. साहजिकच, कॉमी हे ट्रम्प यांचे किंवा रिपब्लिकन पक्षाचे सहानुभूतीदार आहेत किंवा काय, अशी कुजबुजही होती. ही कुजबुज अगदी चिडीचूप झाली ती ९ मे २०१७ रोजी. त्या दिवशी ट्रम्प यांनी कॉमी यांना एफबीआय-प्रमुख पदावरून बडतर्फ केलं. त्यानंतर आता, याच कॉमी यांनी पुस्तक लिहिण्यासाठी २० लाख डॉलरचा करार प्रकाशन-कंपनीशी केल्याची बातमी परवा आली.

कॉमी हे स्वत:वरले सर्व आक्षेप धुऊन काढणार, मी केवढं मोठं काम केलं हे सांगणार असं सारं अपेक्षितच.. पण कॉमी यांनी स्पष्टच सांगितलं आहे : ट्रम्प यांच्या रशिया-संबंधांबद्दलही मी लिहिणार आहे आणि हिलरी यांच्या ईमेलबद्दलही; पण कॉमी यांना उत्तर मिळणार आहे, तेही खुद्द हिलरींकडूनच. ईमेल प्रकरणात कसा पराचा कावळा करण्यात आला, याविषयीची सविस्तर बाजू हिलरी यांच्या ‘व्हॉट हॅप्पन्ड’नामक आगामी पुस्तकात मांडली जाणार आहे. राष्ट्राध्यक्षपदी आपला विजय निर्विवाद समजला जात असताना पराभव पत्करावा लागला, त्यामागे असे ‘काय घडले’ हेच या पुस्तकातून हिलरी सांगणार आहेत. ‘सायमन अँड शूस्टर’ हे या पुस्तकाचे प्रकाशन करणार आहेत.

आता प्रश्न एवढाच आहे, की या दोन पुस्तकांतून आपल्याला त्या – अमेरिकी निवडणुकीत प्रचंड गाजलेल्या – ईमेल प्रकरणाचे नेमके रहस्य कळेल का? तर तसे काहीच सांगता येत नाही. याचे कारण आत्मकथनांच्या रूपशैलीतच आहे. त्यातील सत्य हे त्या व्यक्तीचे आणि व्यक्तीपुरते सत्य असते व त्याला दुसरीही बाजू असते. ही दोन्ही आत्मकथने समोरासमोर आली, तर नेमके काय घडले हे जाणून घेण्यासाठी वाचकांना त्यांच्या सत्याची तिसरी बाजू जाणून घ्यावी लागणार. ती समोर कधी येणार, हा प्रश्नच आहे. तोवर कॉमी व क्लिंटन यांच्या प्रचारी सत्यावरच जिज्ञासेची तहान भागवावी लागेल.