14 December 2017

News Flash

इशिगुरो आणि नोबेलचं संकीर्तन

साहित्याच्या नोबेलसाठी जपानी-ब्रिटिश कादंबरीकार काझुओ इशिगुरो यांच्या नावाची घोषणा करण्यात आली

निखिलेश चित्रे | Updated: October 7, 2017 4:15 AM

प्रतिनिधिक छायाचित्र

यंदाच्या साहित्याच्या नोबेलसाठी जपानी-ब्रिटिश कादंबरीकार काझुओ इशिगुरो यांच्या नावाची घोषणा परवा करण्यात आली. सध्याच्या आधुनिकोत्तर साहित्यप्रवाहात इशिगुरो यांच्यासारख्या वास्तववादी लेखकाची ही निवड जागतिक साहित्याच्या वाचकांसाठी सौम्य धक्का ठरते आहे.. इशिगुरो यांच्या लेखनाचा धांडोळा घेऊन केलेली ही नोंद..

कोणत्याही पुरस्काराची गुणवत्ता तो पटकावणाऱ्या व्यक्तीच्या कामाच्या दर्जाशी समानुपाती असते. नोबेलही याला अपवाद नाही. साहित्याबद्दल बोलायचं तर अनेक श्रेष्ठ लेखकांना तो मिळालेला आहे, मात्र त्यांच्यापेक्षा अनेकपटींनी श्रेष्ठ लेखकांना तो मिळालेला नाही. न मिळालेल्या थोर लेखकांच्या यादीत अगदी काफ्कापासून ते गेल्या वर्षी दिवंगत झालेल्या हंगेरीच्या पेतर इश्तरहेझीपर्यंत अनेक नावं आहेत. अर्थात, कोणत्याही पुरस्कारनिवडीत मतभेद आणि वादविवाद असतातच. त्यामुळे नोबेलच्या नावानं बोटं मोडण्यात अर्थ नाही. उलट त्यानिमित्तानं दर वर्षी जागतिक साहित्यातले अज्ञात लेखक चच्रेत येतात हेही खूपच झालं.

जपानी वंशाचा ब्रिटिश लेखक काझुओ इशिगुरोला साहित्यातलं नोबेल जाहीर झाल्यावर काही मिनिटांतच जपानमध्ये समाजमाध्यमांवर ‘हा काझुओ इशिगुरो कोण बुवा?’ अशी विचारणा करणारे मेसेजेस झळकायला सुरुवात झाली. कारण जन्म जपानमधला असला, तरी इशिगुरो अठ्ठावन्न वर्षांपूर्वीच ब्रिटनमध्ये स्थायिक झालेला आहे. त्याचं शिक्षण इंग्रजीतून झालंय आणि लेखनही पूर्णपणे त्याच भाषेत. त्यामुळे जपानी वाचकाला मुराकामी जेवढा माहीत आहे तेवढा इशिगुरो नाही.

इशिगुरोला नोबेल जाहीर होणं अनेकांसाठी धक्कादायक होतं. खरं तर यात काही नवीन नाही. नोबेलची निवड  समिती असे धक्के देण्यासाठी प्रसिद्धच आहे. गेल्या वर्षी रॉक गीत-संगीतकार बॉब डिलन याला नोबेल जाहीर झाल्यानंतर बसलेल्या हादऱ्यापेक्षा इशिगुरोचं नोबेल हा धक्का तसा सौम्यच. पण तरीही ही निवड अनपेक्षित आहेच.

जपानचा हारुकी मुराकामी, केनियाचा न्गुगी वा थियोंगो, इस्रायलचा अमोस ओझ, पोर्तुगालचा अन्तोन्यो लोबो अन्तुन्येश अशी अनेक दिग्गज नावं यंदा चच्रेत होती. लेखनसंन्यास घेतलेल्या फिलिप रॉथ या अमेरिकन लेखकाचं नावही या चच्रेत डोकावून जायचं. शिवाय प्रत्येक वाचकानं आपापल्या आवडत्या लेखकाचं नाव अग्रभागी असलेली यादी तयार केलेली होतीच. पण या सगळ्यात काझुओ इशिगुरोचा कुठे उल्लेखही आला नव्हता. म्हणूनच त्याच्या चाहत्यांसाठी हा सुखद धक्का होता.

‘अ पेल वू ऑफ हिल्स’ (१९८२) आणि ‘अ‍ॅन आर्टिस्ट ऑफ द फ्लोटिंग वर्ल्ड’  (१९८६) या इशिगुरोच्या पहिल्या दोन कादंबऱ्यांना जपानची पाश्र्वभूमी आहे. पण हा जपान आपल्या कल्पनेतला आहे, असं इशिगुरोचं म्हणणं आहे. वयाच्या पाचव्या वर्षीच जपान सोडून ब्रिटनमध्ये आलेल्या इशिगुरोच्या मनात जपानची प्रतिमा स्वप्नात दिसलेल्या अनोळखी, तरीही ओळखीच्या वाटणाऱ्या प्रदेशाप्रमाणे धूसर आहे. तिथला भौगोलिक अवकाश त्याच्या केवळ स्मरणाच्या कोपऱ्यात शिल्लक उरलेला आहे. त्याच्या कादंबऱ्यांमधली पात्रं बऱ्याचदा मिश्र सांस्कृतिकतेचे ताण पेलताना दिसतात. ‘अ पेल व्हय़ू ऑफ  हिल्स’ची नायिका इत्सुको ही दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंडमध्ये स्थायिक झालेली जपानी स्त्री आहे. ती कादंबरीच्या सुरुवातीलाच म्हणते : ‘‘आमच्या धाकटय़ा मुलीला दिलेलं ‘निकी’ हे नाव म्हणजे तिचे वडील आणि माझ्यातली एक तडजोड होती. कारण गमतीचा भाग म्हणजे, तिच्या वडिलांना- ते जपानी नसूनही- तिचं जपानी नाव ठेवण्याची इच्छा होती, आणि मला- कदाचित भूतकाळ विसरण्याच्या स्वार्थी  इच्छेमुळे असेल- तिचं इंग्रजी नाव ठेवायचं होतं.’’

‘‘मी जर टोपणनावानं लिहिलं असतं आणि अमेरिकन जॅकिट घालून बातमीदारांना फोटो दिले असते, तर मी वंशानं जपानी आहे हे कदाचित कुणाच्या लक्षातही आलं नसतं,’’ असं इशिगुरो गमतीनं म्हणतो. त्याच्या व्यक्तिमत्त्वातल्या या सांस्कृतिक द्वैतामुळे त्याला आयुष्यातल्या अस्थिरतेची, क्षणभंगुर निसटतेपणाची जाणीव फार लवकर झाली. त्याची पात्रंही अशीच दोन विश्वांच्या छेदनबिंदूवर उभी असलेली दिसतात. केव्हाही काहीही घडू शकतं आणि बसवलेली घडी विसकटू शकते, ही तीव्र जाणीव त्याच्या कादंबऱ्यांच्या निवेदनातून आरपार झिरपलेली दिसेल. ‘नेव्हर लेट मी गो’ (२००५) या त्याच्या कादंबरीतला निवेदक म्हणतो : ‘‘हे काहीसं बुद्धिबळासारखं असतं. आपण एक चुकीची चाल खेळतो आणि हात सोंगटीवरून वर यायच्या आतच आपल्याला ती चूक कळून येते. मग आपण घाबरतो. कारण या चुकीच्या चालीचे परिणाम किती दूरगामी होतील, याचा आपल्याला अंदाज येतो.’’

इशिगुरोच्या बऱ्याच कादंबऱ्यांचे निवेदक द्विधा मन:स्थितीत आहेत. ते पटकन निर्णय घेऊ शकत नाहीत. निवड करण्यातली ही असमर्थता कादंबरीच्या निवेदनाला वळण देण्यात निर्णायक ठरते. याच असमर्थतेमधून त्याच्या पात्रांपुढे बऱ्याचदा नतिक पेच उभे ठाकतात. मात्र ते सोडवण्यात त्यांना क्वचितच यश येतं. त्याच्या ‘द रिमेन्स ऑफ द डे’ (१९८९) या गाजलेल्या कादंबरीचा नायक एका जमीनदाराकडे बटलरचं काम करतो. आपला मालक आपण समजतो तेवढा चांगला माणूस नाही, हे जेव्हा या प्रामाणिक आणि स्वामिभक्त बटलरच्या लक्षात येतं तेव्हा तो ही गोष्ट स्वत:पासूनही लपवण्याचा प्रयत्न करतो. कारण ती स्वीकारल्यामुळे त्याच्या जगण्याचा पायाच खचण्याची भीती असते. या कादंबरीचा नायकसुद्धा इशिगुरोच्या पहिल्या दोन कादंबऱ्यांमधल्या प्रमुख पात्रांप्रमाणे सतत स्वत:च्या भूतकाळाचा अन्वय लावण्याचा प्रयत्न करताना दिसतो. या कादंबरीच्या माध्यमातून इशिगुरोनं ब्रिटिश वर्गव्यवस्थेवर अतिशय शांत, पण तीव्र भाष्य केलेलं आहे.

सुरुवातीला सरधोपट वास्तववादी पद्धतीनं लेखन करणाऱ्या इशिगुरोनं नंतर कादंबरीच्या फॉर्मचा अधिक कल्पक वापर केलेला दिसतो. त्याच्या ‘नेव्हर लेट मी गो’ या कादंबरीचा तोंडवळा विज्ञान कादंबरीचा आहे. मात्र, वैज्ञानिक घटकांचा केवळ चौकटीपुरता वापर करून इशिगुरोनं पात्रांच्या मन:स्थितीवर, परस्पर संबंधांवर लक्ष केंद्रित केलेलं दिसतं. ‘व्हेन वी वेअर ऑर्फन्स’ (२०००) ही डिटेक्टिव्ह कथेच्या रूपातली सामाजिक कादंबरी आहे, तर सर्वात अलीकडची ‘द बरीड जायंट’ (२०१५) ही कादंबरी अद्भुतकथा या प्रकारातली आहे. इशिगुरोच्या कादंबऱ्यांची तुलना काफ्काशी केली जाते. विराट यंत्रणेपुढे हतबल झालेला न-नायक, असंभाव्य किंवा अतक्र्य घटनांचं दैनंदिन घटनांप्रमाणेच सहजतेनं केलेलं वर्णन आणि आयुष्याबद्दलची शोकात्म जाणीव हे दोघांच्या साहित्यातले काही समान दुवे. इशिगुरोच्या ‘द अनकन्सोल्ड’ (१९९५) या कादंबरीत नायकाच्या मार्गात अचानक भिंती उभ्या राहतात, तर ‘द बरीड जायंट’मध्ये रस्त्यावरच्या कुत्र्याचं वर्णन करावं तेवढय़ा सहजतेनं निवेदक ड्रॅगनचं वर्णन करतो.

इशिगुरोच्या बहुतेक सर्वच कादंबऱ्यांचे निवेदक प्रथमपुरुषी आहेत. सर्वसाक्षी निवेदन इशिगुरोच्या एकूणच कादंबरीविषयक भूमिकेशी फारसं सुसंगत नाही. प्रथमपुरुषी निवेदक सांगेल तेच आणि तेवढंच वाचकाला दिसत असल्यामुळे लेखकाला निवेदनाचं क्षेत्र ताब्यात ठेवता येतं. कथांतर्गत माहिती गुलदस्त्यात ठेवणं, क्रमश: उघड करत जाणं किंवा अचानक समोर आणणं लेखकाला सहजतेनं करता येतं. इशिगुरोच्या कादंबऱ्यांमध्ये स्मृतीचा घटक महत्त्वाची भूमिका बजावतो. ही स्मृती उलगडत नेण्यासाठी तृतीयपुरुषी निवेदकापेक्षा प्रथमपुरुषी निवेदन सोयीचं ठरतं.

इशिगुरोनं त्याच्या कादंबऱ्यांमध्ये विविध लोकप्रिय साहित्यप्रकारांचा यशस्वी वापर केलेला आहे. मात्र त्याच्या एकूणच साहित्यात एक बेतलेपण जाणवतं. ‘नेव्हर लेट मी गो’चा विज्ञानकथेचा फॉर्म ठरवून ‘वापरलेला’ वाटतो. ‘द रिमेन्स ऑफ द डे’मधला अविश्वसनीय निवेदक कायम कृत्रिम वाटत राहतो. ‘द बरीड जायंट’मधलं अद्भुताचं तत्त्व कुठेही कादंबरीच्या संरचनेशी एकरूप होताना दिसत नाही. आज जागतिक साहित्यात ‘आधुनिकोत्तर’ कादंबऱ्यांचं खास स्थान आहे. कादंबरीच्या रचनेशी खेळणाऱ्या, लेखक किंवा वाचकाला पात्र म्हणून संहितेत आणणाऱ्या, इतर साहित्यबा घटकांचा यशस्वी वापर करून कादंबरी या वाङ्मयप्रकाराचीच अर्थवत्ता वाढवणाऱ्या कादंबऱ्यांमुळे कल्पित साहित्याच्या दरबारातली नीरस वास्तववादाची मक्तेदारी नाहीशी झालेली आहे. मिलोराद पाविचसारख्या सर्बियन कादंबरीकारानं तर शब्दकोश, शब्दकोडं, टॅरो कार्डस् अशा फॉम्र्सचा कादंबरीच्या संरचनेत अर्थपूर्ण वापर करून कादंबरी लिहिण्याच्याच नव्हे, तर वाचण्याच्या प्रक्रियेतही बदल घडवता येतो, वाचकाला अधिक सक्रिय बनवता येतं, हे सिद्ध केलेलं आहे. या पाश्र्वभूमीवर आपण जेव्हा काझुओ इशिगुरोच्या कादंबऱ्या वाचतो तेव्हा हाती काय लागतं? त्या काहीशा थिजलेल्या, कृत्रिम वाटायला लागतात. सामाजिक वास्तववाद आणि ठोस पात्ररचना लेखकाला जवळचे आहेत, हे ध्यानात येतं. अर्थात, तसं असण्यात काहीच गैर नाही. मात्र, पिंड वास्तववादी आणि फॉर्म अद्भुताला महत्त्व देणारा, या संघर्षांत इशिगुरो कायम अडकलेला वाटतो. त्यामुळेच त्याच्या कादंबऱ्या अनेक ठिकाणी रखडलेल्या, रेंगाळलेल्या वाटतात.

इशिगुरोच्या सांस्कृतिक विस्थापनाचा त्याच्या कादंबऱ्यांच्या संरचनेशी असलेला संबंध तपासला, तर कदाचित या प्रश्नाच्या मुळाशी जाता येईल. इशिगुरोला नोबेल मिळाल्यामुळे त्याच्या साहित्याशी संबंधित अशा कळीच्या मुद्दय़ांवर चच्रेला किमान सुरुवात होईल, अशी आशा करू या.

निखिलेश चित्रे satantangobela@gmail.com

First Published on October 7, 2017 4:15 am

Web Title: japanese born british author kazuo ishiguro nobel prize in literature 2017
टॅग Kazuo Ishiguro