21 September 2020

News Flash

बुकबातमी : पहिला ‘जेसीबी’ पुरस्कार ‘जस्मिन डेज्’ला!

दशकभरापूर्वी प्रसिद्ध झालेली त्यांची ‘गोट डेज्’ ही कादंबरी सौदीतील भारतीय कामगाराचे अनुभवविश्व मांडते.

महाकाय यंत्रवाहन बनवणाऱ्या ‘जेसीबी’ कंपनीने ‘जेसीबी लिटरेचर फाऊंडेशन’ स्थापून यंदापासून वार्षिक ग्रंथपुरस्काराची सुरुवात केली असून मल्याळम् लेखक बेन्यामिन हे त्याचे पहिले मानकरी ठरले आहेत. त्यासाठी बेन्यामिन यांच्या ‘जस्मिन डेज्’ या कादंबरीची निवड करण्यात आली आहे.

भारतीय नागरिक असलेल्याच लेखकांच्या मूळ इंग्रजी (अथवा भारतीय भाषांतून इंग्रजीत अनुवादित) ललित साहित्यकृतींसाठी देण्यात येणाऱ्या या पुरस्कारासाठी पहिल्या संभाव्य दहा पुस्तकांच्या दीर्घयादीनंतर ३ ऑक्टोबरला पाच पुस्तकांची लघुयादी जाहीर झाली होती. त्यात बेन्यामिन यांच्या कादंबरीसह अमिताभ बागची (‘हाफ द नाइट इज गॉन’), अनुराधा रॉय (‘ऑल द लाइव्ह्ज वी नेव्हर लिव्हड्’), शुभांगी स्वरूप (‘लॅटिटय़ूड्स ऑफ लाँगिंग’) आणि तमिळ लेखक पेरुमल मुरुगन (‘पूनाचि’) यांच्या कादंबऱ्यांचाही समावेश होता. मात्र, शहनाझ हबीब यांनी मल्याळम्मधून इंग्रजीत अनुवादित केलेल्या बेन्यामिन यांच्या ‘जस्मिन डेज्’ या कादंबरीची निवड या पहिल्यावहिल्या ‘जेसीबी भारतीय साहित्य पारितोषिका’साठी करण्यात आली आहे. मूळ लेखकाला २५ लाख आणि अनुवादकाला पाच लाख रुपये इतकी घसघशीत रक्कम मिळवून देणाऱ्या या पुरस्काराच्या निवड समितीत यंदा प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शिका दीपा मेहता, उद्योजक रोहन मूर्ती, लेखिका प्रियंवदा नटराजन  आणि कादंबरीकार विवेक शानभाग यांचा समावेश होता.

केरळमध्ये जन्मलेले बेन्यामिन २०१३ पासून कायमचे केरळवासी झाले असले, तरी त्याआधीची दोन दशके ते मध्यपूर्वेतल्या बहरीनमध्ये वास्तव्यास होते. मध्यपूर्वेतील नव्वदनंतरची राजकीय-सामाजिक घुसळण आणि २०११ ची ‘अरब स्प्रिंग’ची धामधूम त्यांनी अनुभवली. या वास्तव्याचा प्रभाव बेन्यामिन यांच्या लेखनावर आहे. दशकभरापूर्वी प्रसिद्ध झालेली त्यांची ‘गोट डेज्’ ही कादंबरी सौदीतील भारतीय कामगाराचे अनुभवविश्व मांडते. तर ‘जस्मिन डेज्’ या कादंबरीतही मध्यपूर्वेतल्या २०११ च्या क्रांतिज्वरात समरसून गेलेल्या समीरा परवीन या मूळ पाकिस्तानी असलेल्या मुलीची कथा सांगितली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 3:43 am

Web Title: jasmine days shortlisted for jcb literature award
Next Stories
1 गणिती विश्वाची सफर..
2 नसून असलेल्या शहराची कादंबरी!
3 ‘हत्तींमधल्या मुंगी’ला दोन लाखांचं बक्षीस!
Just Now!
X