ज्योएल कुर्टझ्मन यांचे ग्रंथजीवन सुमारे ४० वर्षांचे आणि अमेरिकेत सहा एप्रिल रोजी संपलेले त्यांचे आयुष्य उण्यापुऱ्या ६८ वर्षांचे. अर्थशास्त्राचे अभ्यासक म्हणून ते ज्ञात असले तरी, संकल्पनांचा वेध घेण्यात त्यांनी उमेदीची सारी वर्षे वेचली. अल्पायुषीच ठरलेल्या या लेखकाचे पहिले पुस्तक होते दीर्घायुष्याबद्दलचे! ते पुस्तक १९७६ साली, ज्योएल कुर्टझ्मन हे संयुक्त राष्ट्रांच्या सेवेत असताना लिहिले गेले होते. सहज केलेला अभ्यास त्या पुस्तकाच्या कामी आला होता. पुढे अर्थशास्त्राशी संबंधित विषयांवर त्यांनी पुस्तके लिहिली, १९८७ पासून भरपूर स्तंभलेखनही केले, तेव्हा अभ्यासाची शिस्त होती. मात्र संकल्पना आणि वास्तव यांचा मेळ घालणे हे जणू त्यांनी लेखकीय कार्य म्हणून अंगिकारले होते. या संकल्पनांत आर्थिक प्रगती आणि अवनती या जशा होत्या, तशाच ‘पैसा आणि डिजिटल व्यवहार’, ‘व्यवसाय क्षेत्रातील नेतृत्व’, ‘नवोन्मेष आणि उद्यमशीलता’ अशाही होत्या. ‘जागतिकीकरण’ आणि ‘अमेरिकी वर्चस्व’ याही संकल्पना त्यांच्या अभ्यासातून सुटल्या नाहीत. उलटपक्षी, त्या त्यांनी अधिकाधिक धसाला लावल्या आणि अभ्यासान्ती झालेले मतपरिवर्तन म्हणजे ‘घूमजाव’ ठरेल, याची तमा न बाळगता त्यांनी स्वतची सुधारित मते पुस्तकरूपाने प्रकाशितही केली.
जागतिकीकरण अमेरिकेलाही धार्जिणे नाही, असे मत त्यांनी १९९० च्या दशकात मांडले होते. तो काळ जागतिकीरणाला वैचारिक विरोध करणाऱ्यांचाच होता. पण अमेरिकेतून हे विरोधी सूर कमी येत असताना कुर्टझ्मन म्हणत होते- ‘‘जागतिकीकरणामुळे अन्य देश अमेरिकेच्या पुढे जातील. अमेरिकी बाजारांवर त्याचा अनिष्ट परिणाम दिसू लागेल आणि याचा आणखी वाईट परिणाम भांडवलबाजारावरही होईल’. काही ना काही कारणाने २००८ पर्यंत हे सारे टप्पे अमेरिकेने पाहिले. परंतु पुढे अमेरिकेत ‘फ्रॅकिंग’ तंत्राद्वारे तेलसाठय़ांचा शोध लावला जातो आहे, तेल आता अमेरिकेतच मुबलक प्रमाणावर मिळते आहे, हे पाहात असताना कुर्टझ्मन यांनी २० वर्षांपूर्वीचा सूर पूर्णत बदलून अमेरिकेचे दुसरे शतक – ‘अनलीशिंग द सेकंड अमेरिकन सेंच्युरी’ असे पुस्तक लिहिले. या पुस्तकाचा आवर्जून आणि सविस्तर उल्लेख न्यूयॉर्क टाइम्सनेही त्यांना आदरांजली वाहताना केला आहे.
तेलाबरोबरच वाहते भांडवल, नवी उपयोजने करणारी उद्यमशीलता आणि पुरेशी औद्योगिक शक्ती ही अमेरिकेची बलस्थाने आहेत, असे २०१४ सालच्या या पुस्तकात कुर्टझ्मन सांगतात. युरोपातील विद्यार्थी भले अमेरिकी वर्चस्वाच्या विरोधात प्रखर निदर्शने करीत असतील, परंतु त्यांच्या हाती ‘अॅपल’चे आयफोन असतात, हे विद्यार्थी ‘मॅक्डोनाल्ड’ गाठून क्षुधाशांती करतात आणि त्यांनी घातलेले टीशर्ट वा जीन्स हेही अमेरिकी ब्रँडनावांचेच असतात’ अशा शब्दांत अमेरिकेच्या ‘सॉफ्ट पॉवर’चे वर्णन कुर्टझ्मन यांनी केले होते. ‘स्टार्टअप’सारख्या विषयावर पुस्तक लिहिणाऱ्या पहिल्या काही लेखकांत त्यांचा समावेश होतो. मात्र, नव्या कमीत कमी भांडवलाच्या आणि इंटरनेट-आधारित ‘स्टार्टअप’चा विचार ‘स्टार्टअप्स दॅट वर्क’ या पुस्तकात फारसा झालेला नाही, अशी टीकाही त्या वेळी झाली. मात्र त्याआधीचे (२००४) ‘एमबीए इन अ बॉक्स’ हे पुस्तक आजही लोकप्रिय आहे. प्राइसवॉटरहाउस कूपर्स या संस्थेसाठी देशोदेशींचा ‘अपारदर्शकता निर्देशांक’ मोजण्याची पद्धत शोधून दिली, तीही कुर्टझ्मन यांनीच. अनेक विषयांत एकाच वेळी रस घेऊन त्यांचे लिखाण सुरू असतानाच, त्यांना कर्करोगाने गाठले आणि हेच मृत्यूचे कारण ठरले.
निराशावादाकडून आशावादकडे प्रवास करणाऱ्या या लेखकाला कोणीही ‘विद्वान’ मानण्यास तयार नव्हते. कदाचित यापुढेही नसेल. परंतु जे काही घडते आहे त्याचा अर्थ काय, हे सांगणे आपले कर्तव्य आहे, याची जाण कुर्टझ्मन यांना होती.