X

काफ्काचा वारसा

ब्रोडनं त्याच्या आयुष्याची शेवटची २९ वर्ष इस्राएलमध्ये काढली. त्यानं ऐंशीहून जास्त पुस्तकं लिहिली.

जयप्रकाश सावंत jsawant48@gmail.com

विसाव्या शतकातील थोर लेखक फ्रांत्झ काफ्काच्या कागदपत्रांचा ताबा कोणाकडे असावा, यासाठी न्यायालयांत दीर्घकाळ खटला चालला. १९७३ पासून चाललेल्या या वादाचा अंतिम निकाल अडीच वर्षांपूर्वी लागला. या साऱ्या प्रकरणाची सर्वागांनी माहिती देणाऱ्या पुस्तकाबद्दल..

लेखकाच्या प्रकाशित-अप्रकाशित साहित्याच्या मूळ संहिता, त्याच्या नोंदवह्य़ा, रोजनिश्या, पत्रव्यवहार आणि इतर कागदपत्रं अशी सामग्री म्हणजे एक मौलिक ठेवा असते, असं मानायची पद्धत आपल्याकडे नाहीय. मराठीतील अत्यंत नामवंत गणल्या गेलेल्या लेखकांचीही कागदपत्रं आपल्याकडे असावीत, यासाठी पाश्चात्त्य विद्यापीठांत लागते तशी स्पर्धा आपल्या विद्यापीठांत लागल्याची उदाहरणं पाहायला मिळत नाहीत. या पाश्र्वभूमीवर फ्रांत्झ काफ्काच्या कागदपत्रांचा ताबा कोणाकडे असावा, यासाठी न्यायालयांत दीर्घकाळ खटला चालावा व त्यातल्या वादी-प्रतिवादींमध्ये दोन देशांच्या ग्रंथालयांचा सहभाग असावा, हे आपल्याला अभिनव वाटेल. अगदी १९७३ पासून चाललेल्या या वादाचा अंतिम निकाल अलीकडे (ऑगस्ट २०१६) लागला. जेरुसलेममध्ये राहणारे एक साहित्यसंशोधक बेंजामिन बॅलिंट यांचं या साऱ्या प्रकरणाची सर्वागांनी माहिती देणारं एक अभ्यसनीय पुस्तक नुकतंच प्रकाशित झालंय. हा सर्व प्रकार हीसुद्धा एक प्रकारे काफ्काची परीक्षाच असल्याचं मानून बहुधा त्यांनी या पुस्तकाला शीर्षक दिलंय- ‘काफ्काज् लास्ट ट्रायल’!

काफ्काच्या मृत्यूनंतर (३ जून १९२४) त्याच्या कागदपत्रांत त्यानं त्याचा सर्वात जवळचा मित्र माक्स् ब्रोड याच्या नावे लिहून ठेवलेल्या दोन चिठ्ठय़ा आढळल्या. त्यांत त्यानं ब्रोडला आपलं मागे राहिलेलं सर्व साहित्य व कागदपत्रं जाळून नष्ट करायला सांगितलं होतं. मित्राची इच्छा की त्याचं लेखन, अशा पेचात सापडलेल्या ब्रोडनं काफ्काच्या लेखनाच्या बाजूनं उभं राहायचा निर्णय घेतला. त्यानं पुढच्या तीन वर्षांत काफ्काच्या ‘द ट्रायल’ (१९२४), ‘द कास्ल’ (१९२६) आणि ‘अमेरिका’ (१९२७) या तीन कादंबऱ्या प्रकाशित केल्या. मात्र, १९३९ मध्ये नाझी सत्तेनं प्रागचा ताबा घेतल्यावर त्याला देशातून पलायन करावं लागलं. झेकोस्लाव्हियाची सीमा नाझींकडून बंद होण्याआधी प्रागहून जी शेवटची गाडी सुटली, त्या गाडीतून काफ्काच्या कागदपत्रांनी भरलेली सुटकेस घेऊन ब्रोडनं त्याच्या पत्नीसमवेत पॅलेस्टाइनला प्रयाण केलं. पॅलेस्टाइनमध्ये असताना त्यानं या सामग्रीतला बराचसा भाग प्रकाशात आणला. तरीही, माक्स् ब्रोड १९६८ मध्ये मृत्यू पावला, तेव्हा त्यानं आणलेल्या कागदपत्रांतला जवळपास एकतृतीयांश भाग शिल्लक होता. ही कागदपत्रं त्यानं त्याची सेक्रेटरी आणि घनिष्ठ मैत्रीण एस्थर हॉफे हिच्याकडे ठेवली होती. दरम्यानच्या काळात ब्रोडच्या धडपडीला यश आलं होतं आणि काफ्काच्या लेखनाला जागतिक मान्यता मिळू लागली होती. ब्रोडच्या मृत्यूनंतर १९७३ साली इस्राएल शासनानं या कागदपत्रांचा ताबा मिळवण्यासाठी न्यायालयात खटला दाखल केला. ब्रोडच्या मित्रांच्या सांगण्यानुसार, ही सामग्री एखाद्या सार्वजनिक संस्थेत जावी अशी ब्रोडचीही इच्छा होती, पण याबाबत त्यानं कसल्याही स्पष्ट सूचना लिहून ठेवलेल्या नव्हत्या. एस्थरनं या वेळी न्यायालयात सादर केलेल्या ब्रोडच्या इच्छापत्रानुसार, त्यानं एस्थरला ती जिवंत असेपर्यंत या कागदपत्रांबाबत तिला हवा तो निर्णय घ्यायचे अधिकार दिले होते. यामुळे न्यायालयानं एस्थरच्या बाजूनं निकाल दिला.

पण एस्थरनं यातली काही कागदपत्रं हळूहळू विक्रीला काढायला सुरुवात केली होती. १९७४ मध्ये जर्मनीत एका खासगी संस्थेनं केलेल्या लिलावात काफ्कानं ब्रोडला लिहिलेली काही पत्रं विकली गेली होती. ती एस्थरकडूनच जर्मनीत गेल्याचा संशय व्यक्त झाला होता. त्याच्या पुढच्याच वर्षी तेल अविवच्या विमानतळावर एस्थरच्या सामानाची झडती घेण्यात आली, तेव्हा त्यात ब्रोडच्या डायरीची मूळ प्रत व काफ्काच्या पत्रांच्या छायाप्रती सापडल्या होत्या. इस्राएलमधल्या तत्कालीन नियमांनुसार तिनं ही कागदपत्रं देशाबाहेर नेताना त्यांच्या प्रती इस्राएलच्या राष्ट्रीय गं्रथालयात जमा करायला हव्या होत्या; तशा त्या न केल्यानं तिला त्या वेळी अटक झाली होती. यानंतर १९८८ मध्ये एस्थरनं ‘ट्रायल’च्या हस्तलिखिताचा लंडनमध्ये लिलाव केला, तेव्हा ते जर्मनीतल्या मारबाख येथील जर्मन साहित्याच्या संग्रहालयानं २० लक्ष डॉलर्सना विकत घेतलं होतं. एस्थरला या वेळी मोठय़ा टीकेचा भडिमार सहन करावा लागला होता.

२००७ मध्ये १०१ वर्षांच्या एस्थरचं निधन झालं आणि पुन्हा एकदा या कागदपत्रांच्या ताब्याचं प्रकरण जिवंत झालं. एस्थरच्या मुली इव्हा आणि रूथ यांनी आईच्या मृत्यूनंतर ही कागदपत्रं आपल्याला वारसाहक्कानं मिळावीत यासाठी अर्ज केला. याच सुमारास, पुढील काळात या संबंधातल्या खटल्यात ज्यांनी इस्राएलच्या राष्ट्रीय ग्रंथालयाची बाजू लढवली, त्या मेयर हेलर यांच्या हातात ब्रोडनं लिहून ठेवलेलं एक महत्त्वाचं पत्र आलं. त्यात त्यानं आपल्या मृत्यूनंतर ही कागदपत्रं एखाद्या सार्वजनिक संस्थेला द्यावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. मग जेरुसलेमच्या राष्ट्रीय ग्रंथालयानं इव्हाच्या अर्जाला आव्हान देत या कागदपत्रांवर आपला हक्क सांगितला. हा खटला तेल अविवमधल्या कौटुंबिक न्यायालयात पाच वर्ष चालला. जर्मनीतल्या मारबाख येथील संग्रहालयाची इव्हाबरोबर ही कागदपत्रं विकत घेण्याबाबत बोलणी चालू होती. निकाल इव्हाच्या बाजूनं लागला तर आपल्या देकाराचा स्वीकार व्हावा यासाठी हे संग्रहालयसुद्धा एक पक्षकार म्हणून खटल्यात उतरलं होतं. यातल्या अनेक गुंतागुंतीच्या बाबींचा विचार झाल्यावर न्यायालयानं हेलर यांचा हा मुद्दा मान्य केला, की ब्रोडनं ही सामग्री एस्थरला बक्षीस म्हणून दिली नव्हती, तर ती सांभाळण्यासाठी दिली होती आणि म्हणून ती वारसाहक्कानं एस्थरच्या मुलींकडे जाऊ शकत नाही. तेव्हा इव्हानं कुठलाही मोबदला न मागता ही कागदपत्रं राष्ट्रीय ग्रंथालयाकडे सुपूर्द करावी, असा निर्णय देण्यात आला. यावर इव्हानं प्रथम तेल अविवच्या जिल्हा न्यायालयात व नंतर इस्राएलच्या सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. पण सर्वोच्च न्यायालयानंही ऑगस्ट २०१६ मध्ये आधीच्या निर्णयावरच शिक्कामोर्तब केलं. यानंतर दोनच वर्षांनी इव्हाचं निधन झालं (रूथ याआधीच खटल्यादरम्यान मृत्यू पावली) आणि सर्व प्रकरणावर काळाचाही पडदा पडला.

बॅलिंट यांच्या या पुस्तकात या खटल्याव्यतिरिक्त काफ्का-चरित्रातल्या अनेक बाबींविषयी तपशीलवार माहिती आली आहे. मात्र न्यायालयात यातल्या तीन पक्षकारांकडून मांडल्या गेलेल्या भूमिका व न्यायालयात तसंच न्यायालयाबाहेरील काफ्काप्रेमींकडूनही त्यांचं झालेलं खंडनमंडन, हा या पुस्तकातला सर्वात आगळा आणि वाचनीय भाग आहे. उदाहरणार्थ, ‘राष्ट्रीय ग्रंथालय आपली खासगी मालमत्ता जबरदस्तीनं ताब्यात घेऊ पाहतेय’ असा दावा करणाऱ्या इव्हानं असंही प्रतिपादन केलं की, ‘ग्रंथालयाकडे या ठेव्याची नीट काळजी घेऊ शकेल असा कोणी जर्मन भाषातज्ज्ञ नाहीय.’ यावर ‘आमच्याकडे आइन्स्टाइनपासून जर्मन भाषेत लेखन करणाऱ्या अनेक ज्यू संशोधक-साहित्यिकांचं लिखाण सुरक्षित ठेवलं गेलंय’ असं सांगून गं्रथालयानं उलट इव्हानं या ठेव्याची केलेली हेळसांड निदर्शनास आणली. तिनं यातली काही सामग्री तेल अविव आणि झुरिक यांमधल्या दहा सेफ डिपॉझिट व्हॉल्ट्समध्ये ठेवली होती. उरलेली त्यांच्या स्पिनोझा स्ट्रीटवरल्या घरात होती. पण इव्हानं पाळलेल्या चाळीसहून अधिक मांजरांचा या कागदपत्रांवर मुक्त संचार असे. शिवाय इव्हा ती कोणालाही पाहायला देत नसे. या अनुषंगानं मारबाख संग्रहालयानं त्यांच्याकडे दुर्मीळ आणि जुन्या कागदपत्रांचं संरक्षण होण्यासाठी तापमान आणि आद्र्रता नियंत्रित करण्याचं अति उच्च दर्जाचं तंत्रज्ञान असल्याचा उल्लेख केला आणि त्यामुळे ‘आम्ही या कागदपत्रांचा जास्त चांगल्याप्रकारे सांभाळ करू शकू’ असा दावा केला. यावर काफ्कांच्या तिन्ही बहिणींचा नाझी छळछावण्यांत खून करण्यात आला होता, याची आठवण देऊन इस्राएलमध्ये ‘ज्यांना काफ्काच्या बहिणींचा सांभाळ करता आला नाही..’ अशी कडवट प्रतिक्रिया व्यक्त झाली.

सर्वात जास्त चर्चा झाली ती काफ्का हा ज्यू असल्यानं त्याचं साहित्य ज्यू राष्ट्रातच राहिलं पाहिजे या मुद्दय़ावर. बॅलिंट यांनी ब्रिटिश साहित्यिक किंग्जले अमिस यांच्या एका पूर्वीच्या लेखनातला उताराच दिलाय. त्यात अमिस यांनी म्हटलं होतं : ‘मी माझ्या संहिता त्यांच्यासाठी जो सर्वात जास्त पैसे देईल त्यालाच देईन. हा देकार कुठल्या देशातून येतोय, याच्याशी मला काही देणंघेणं नाहीय.’ त्यांनी खरोखरच ते हयात असताना आपली काही कागदपत्रं टेक्सासमधल्या एका संग्रहालयाला दिली. थोर इस्राएली कवी यहुदा अमिचाई यांनीही आपली साहित्यसंपदा त्यांच्या हयातीत येलमधल्या एका संस्थेला दिल्या होत्या, हे बॅलिट यांनी नमूद केलंय.

याशिवाय- मुळात काफ्काला ज्यू लेखक मानता येईल का, याबाबतही चर्चा झाली. काफ्का सुरुवातीला झायनिझमचा कट्टर विरोधक होता. त्याच्या संपूर्ण साहित्यात ‘ज्यू’ हा शब्द एकदाही येत नाही आणि आपली पत्रं व रोजनिशी यांत तो आपल्याला ज्यू म्हणता येईल का याविषयी शंका व्यक्त करत राहतो, या बाबींकडेही लक्ष वेधण्यात आलं. काफ्काचं सर्वात अलीकडचं आणि सर्वात मोठं, तीन खंडांतलं चरित्र जर्मन भाषेत लिहिणारे रायनर स्टाख यांनी तर वर्तमानपत्रात एक लेख लिहून इस्राएलला काफ्काबद्दल खरोखरच आस्था आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. त्यांनी लिहिलं की, इस्राएलमध्ये काफ्काचं नाव दिलेला एकही रस्ता नाहीय, तिथे त्याच्या समग्र साहित्याचीही एखादी आवृत्ती प्रकाशित झाल्याचं पाहायला मिळत नाही. या उदासीनतेचं आणखी एक उदाहरण म्हणून त्यांनी माक्स् ब्रोडचाही निर्देश केलाय. ब्रोडनं त्याच्या आयुष्याची शेवटची २९ वर्ष इस्राएलमध्ये काढली. त्यानं ऐंशीहून जास्त पुस्तकं लिहिली. पण स्टाख म्हणतात की, त्याचंही एखादं हिब्रू भाषेतलं पुस्तक हवं असल्यास ते इस्राएलमधल्या जुन्या पुस्तकांच्या दुकानातच शोधावं लागेल!

असो. बॅलिंट यांचं हे पुस्तक वाचून संपल्यावर काही खंतावणारे विचार मनात येतात. पहिला हा की, काफ्कावर हक्क सांगण्याच्या या वादात- काफ्का जिथे जन्मला, जिथे त्याचं संपूर्ण आयुष्य गेलं, जिथे त्यानं आपलं लेखन केलं त्या प्राग शहराचा आणि झेक प्रजासत्ताकाचा पुसटसाही आवाज ऐकू येत नाही. झेक जनतेला काफ्का ‘आपला’ वाटत नाही, असे काही उल्लेख याआधी वाचायला मिळाले होते; त्याच्या या प्रत्ययानं वाईट वाटत राहिलं. दुसरी विषाद वाटायला लावणारी गोष्ट म्हणजे, या वैश्विक पातळीवरच्या लेखकाला खटलाभर सतत ज्यू लेखक म्हणून संकुचित केलं जाणं. हे खरं आहे की, शेवटच्या काळात काफ्काला आपल्या मुलांबद्दल प्रेम वाटू लागलं होतं, तो आस्थेने हिब्रू भाषा शिकू लागला होता, त्याला पॅलेस्टाइनला जायची आस लागली होती; पण हेही तितकंच खरंय की, आजच्या इस्राएलमधला द्वेष आणि सूडभावना यांनी भारलेला उन्मादी धर्म त्याला ‘आपला’ वाटला नसता.

आणखी एक विचार असा येतो की, ही कागदपत्रं खासगी मालकीतून सार्वजनिक ठिकाणी आली हे चांगलं झालं खरं; पण इस्राएलमध्ये भेदभाव न बाळगता सर्व अभ्यासकांना ती मुक्तपणे पाहायला उपलब्ध होतील? ही भीती अकारण नाहीय. जिज्ञासूंनी ‘न्यू यॉर्क रिव्ह्य़ू ऑफ बुक्स’च्या दैनिक ब्लॉगवर १२ डिसेंबर २०१८ रोजी प्रकाशित झालेला कॅथरीन फ्रँक यांचा इस्राएलमधील विचारस्वातंत्र्याबाबतचा लेख व तिथेच त्याविषयी ८ जानेवारी २०१९ रोजी झालेला पत्रव्यवहार वाचावा. कॅथरीन फ्रँक या कोलंबिया विद्यापीठात शाळांतील आणि महाविद्यालयांतील शिक्षकांसाठी ‘इस्राएल आणि पॅलेस्टाइनमधील नागरिकत्व आणि राष्ट्रीयत्व’ या शीर्षकाचं एक सत्र घेतात. त्या २०१७ मध्ये आपल्या इस्राएली आणि पॅलेस्टिनी विद्यार्थ्यांना भेटायला इस्राएलला गेलेल्या असताना त्यांना त्या इस्राएल-विरोधक आहेत म्हणून विमानतळावरूनच परत पाठवण्यात आलं. त्यांनी या लेखात पुढे म्हटलंय की, ‘कॅनरी मिशन’ नावाचं एक संकेतस्थळ अकादमिक क्षेत्रातले कोणते विद्यार्थी- प्राध्यापक- संशोधक इस्राएलमध्ये होणाऱ्या मानवाधिकाराच्या पायमल्लीविरोधात बोलतात, याकडे लक्ष ठेवून असतं. त्या आधारावर इस्राएलमध्ये देशात कोणाला आमंत्रित करायचं नाही किंवा प्रवेश द्यायचा नाही, याची एक ‘ब्लॅकलिस्ट’ तयार होत असते. आणि तरीही, आपल्याकडे नयनतारा सहगल यांच्या बाबतीत जसं घडलं, तसं नजरचुकीनं यातल्या एखाद्या व्यक्तीला आमंत्रण गेलंच, तर फ्रँकबाईंनी म्हटलंय : तिला ‘डिस-इन्व्हाइट’ केलं जातं!

एकूण काय, काफ्काची सत्त्वपरीक्षा संपलेली नाही अजून.

‘काफ्काज् लास्ट ट्रायल : द केस ऑफ अ लिटररी लीगसी’

लेखक : बेंजामिन बॅलिंट

प्रकाशक : पिकाडोर

पृष्ठे: ३०४, किंमत : ६९९ रुपये