मूळचा बिहारचा असलेला व नंतर जेएनयूतील विद्यार्थी नेता म्हणून समोर आलेला कन्हैया कुमार.. देशद्रोहाच्या आरोपावरून त्याला झालेली अटक व नंतर जामिनावर सुटका, या घटनेला आता वर्ष उलटले. बिहारमधील बालपण, जेएनयूतील शिक्षण, विद्यार्थी चळवळ, अन् पुढे तिहार तुरुंगापर्यंतच्या त्याच्या प्रवासाची खुद्द कन्हैयानेच सांगितलेली ही कहाणी..

दिल्लीचा विद्यार्थी-नेता कन्हैया कुमार याला देशद्रोहाच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी अटक केल्याच्या घटनेला वर्ष लोटले आहे. कन्हैया कुमारला सध्या जामिनावर मुक्त करण्यात आलेले आहे. अद्याप पोलिसांनी त्याच्यावरील आरोपपत्र न्यायालयाला सादर केलेले नाही. दरम्यान या तिशीतील युवकाच्या आत्मचरित्रात्मक िहदी पुस्तकाचा इंग्लिश अनुवाद नुकताच प्रकाशित झाला आहे. पुस्तकातील पहिले चार भाग त्याचे बालपण आणि पाटणा, दिल्ली शहर व जेएनयू येथील वास्तव्य आणि कार्य याबाबत आहेत. शेवटच्या पाचव्या भागाचे शीर्षकच ‘तिहार’ आहे. तो भाग आधीच वाचण्याचा मोह टाळून पुस्तक सुरुवातीपासून वाचावे अशी माझी शिफारस आहे. कन्हैया डाव्या विचारसरणीचा आहे, मोदी सरकारच्या विकासाच्या संकल्पनेला, फोफावत चाललेल्या ‘िहदुत्वा’ला, विकृत राष्ट्रवादाला आणि व्यक्ती व विचारस्वातंत्र्यावरील आक्रमणाला, तसेच वंचितांच्या पिळवणुकीला व ‘मनुवादा’ला त्याचा कडवा विरोध आहे. तो दलित, अल्पसंख्याक व उपेक्षित समाजाचा निर्भीड कैवारी आहे, अशा त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पलू पुस्तक वाचताना उलगडत जातात. उजव्या विचारसरणीच्या अभाविप (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी वारंवार त्याच्या संघटनेच्या न्याय्य कार्यात अडथळे आणले, असाही कन्हैयाचा दावा आहे. (२०१५-१६मध्ये तो जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील एका विद्यार्थी संघटनेचा निर्वाचित अध्यक्ष होता.)

बेगुसराई (बिहार) जवळील बिहात नामक एका खेडय़ात अतिशय गरीब घराण्यात कन्हैयाचा जन्म झाला. दहावीपर्यंतचे शिक्षण सरकारी शाळेत आणि काही काळ एका खासगी शाळेत झाले. या शालेय जीवनातच कन्हैयाच्या सामाजिक जाणिवा जागरूक होताना दिसतात. खासगी शाळेतील श्रीमंत मुले त्याच्या आईने त्याच्याकरिता खास बनवलेल्या टोपीची टर उडवतात, त्याला कुचेष्टेची वागणूक मिळते, तेव्हाच त्याला गरीब-श्रीमंत दरी दिसून येते. धर्मभेद व जातिभेद पाहायला मिळतात; पण अशा कटू अनुभवांसोबतच त्याच्या टापूतील साम्यवादी प्रभावामुळे खूपसे सकारात्मक अनुभवही त्याला येतात. मुलामुलींनी एकत्रपणे कबड्डी, फुटबॉल, व्हॉलीबॉल खेळणे, लायब्ररीत एकत्र वाचन करणे ही तशी एक-दोन उदाहरणे. साम्यवाद्यांच्या प्रभावामुळे सामाजिक क्षेत्रातही विधवा-पुनर्वविाह, आंतरजातीय विवाह, अंधश्रद्धा-विरोध, विवेकवादी विचारसरणी अशा गोष्टींना त्याच्या खेडय़ात प्रोत्साहन मिळत होते; तथापि समाजशास्त्रीय विषय व वक्तृत्व, अभिनय, गायन अशा गोष्टींची आवड असणाऱ्या कन्हैयाला यूपीएससीची परीक्षा देऊन जिल्हाधिकारी बनावे, असे वाटत होते. कन्हैयाची दुर्दम्य इच्छा पाहून वडिलांनी ऐपत नसूनही त्याला पुढील शिक्षणासाठी पाटण्याला जाऊ दिले. दर महिन्याला पाचशे रुपये खर्च येणार होता!

शहरात पहिल्यांदाच राहणारा हा धडपडणारा विद्यार्थी एकीकडे शिकवण्या करून कॉलेज शिक्षण घेण्याचा खटाटोप करीत होता. पाटण्यालाच त्याच्या ‘कार्यकर्तेपणा’ची पेरणी झाली असे म्हणता येईल. तेथे कन्हैयाची ओळख उर्दू भाषेत बी. ए. करणारा एक राजकीय कार्यकर्ता मणी भूषण याच्याशी झाली आणि त्याच्या सूचनेनुसार पुस्तके व वृत्तपत्रे वाचायला कन्हैया त्याच्या लॉजनजीकच्या कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात जाऊ लागला, तेथील अभ्यास मंडळाच्या बठकींना हजर राहू लागला, खूप वाचन करू लागला. बारावी उत्तीर्ण झाला. वडिलांचे एक मित्र जलालुद्दीन यांनी सुचवले, की कन्हैयाने एसी-फ्रिज दुरुस्तीचा कोर्स केला तर त्याला दुबईला जाऊन चांगले पसे कमावता येतील; पण कन्हैयाला ती सूचना पटली नाही. त्याचा मार्ग वेगळा होता. त्याने महाविद्यालयात प्रवेश घेतला. शिवाय विश्वजित नामक मित्राच्या सूचनेनुसार त्याने ए.आय.एस.एफ. (ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन) या विद्यार्थी संघटनेत काम करणेही सुरू केले. तेथील चर्चामध्ये खुलेपणाने तो भाग घेऊ लागला. महाविद्यालयाच्या वक्तृत्व स्पर्धामध्ये चमकू लागला. बी.ए. प्रथम श्रेणीत पास झाल्यावर नालंदा मुक्त विद्यापीठात एम.ए.साठी प्रवेश घेतला; पण टय़ुशन्सचे उत्पन्न वाढवणे जरुरी होते. पाटण्याला ते शक्य नव्हते. दिल्ली शहर कन्हैयाला बोलावीत होते.

जयप्रकाश नारायण यांनी ‘संपूर्ण क्रांती’ची घोषणा दिली होती. तशी क्रांती तर कधीच झाली नाही; पण तेच नाव धारण केलेल्या गाडीने जुलमधील एका उष्ण दिवशी कन्हैया दिल्लीला येऊन पोहोचला आणि त्याच्या जीवनातील धगधगत्या कालखंडाची सुरुवात झाली. दिल्लीतील एक वर्षांच्या खर्चाची जबाबदारी त्याच्या आसाममध्ये नोकरी करणाऱ्या भावाने उचलली होती; पण काटकसरीने राहणे जरुरीचे होते. त्याबाबतचा बारीकसारीक तपशील पुस्तकात वारंवार वाचायला मिळतो. दिल्लीमध्ये बिहारी कन्हैयाने आपल्या दिसण्याच्या व बोलण्याच्या शैलींमध्ये शहरी माहोलशी सुसंगत अशा सुधारणा केल्या. आणखीही काही घटना घडल्या. त्याचे एम.ए. पार पडले. अभ्यासक्रम अचानक बदलले गेले म्हणून यूपीएससीच्या परीक्षेचा विचार त्याला सोडून द्यावा लागला. एकदा जनचेतना प्रकाशन या संस्थेच्या पुस्तकविक्री व्हॅनवर अभाविपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. त्या हल्ल्याविरुद्धच्या आंदोलनात त्याने प्रामुख्याने भाग घेतला. यथावकाश जेएनयूतील प्राध्यापक मालाकार यांच्या सूचनेनुसार एम.ए.नंतरच्या शिक्षणासाठी जेएनयूमध्ये प्रवेश घेण्याचे त्याने नक्की केले. विद्यार्थी चळवळीचा त्याला बऱ्यापकी अनुभव असला आणि दिल्लीतील कम्युनिस्ट जग त्याच्या ओळखीचे झाले असले तरी राजकीय कार्याव्यतिरिक्त अभ्यासावरही लक्ष केंद्रित करण्याचा त्याचा मनसुबा होता.

कन्हैयासारख्या मूलत: ग्रामीण, पण संवेदनशील व समाजवादी मूल्यांबाबत कळत-नकळत निष्ठावान असणाऱ्या युवकाला जेएनयूच्या समग्र वातावरणाने भारून टाकले. तेथील स्त्री-पुरुष समानता, विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीची जोपासना, पोशाखी डामडौलाचा अभाव, विद्यार्जनाचा आणि स्वतंत्र विचारांचा सन्मान आणि सामाजिक खुलेपणा हे सगळे कन्हैयाला भावले. ‘गंगा धाब्या’वर चालणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मोकळ्या चर्चामध्ये तो सामील झाला. हे धाबे बंद करण्याच्या अलीकडच्या (सरकारी) प्रयत्नांचाही कन्हैया विषादपूर्वक उल्लेख करतो. खुल्या चर्चा व वादविवाद हे संस्थेच्या संस्कृतीचे भाग आहेत. त्यांना दडपता कसे येईल? जेएनयूमध्ये कन्हैयाला तेथील तीन-चार विद्यार्थी संघटनांचे कार्य जवळून पाहता आले. तो स्वत: डाव्या विचारसरणीच्या संघटनेत कार्यरत झाला. अभाविपचे विद्यार्थी जेएनयूमध्येच राहतात, संस्थेचे सगळे फायदे उपभोगतात आणि तरीही जेएनयूला नावे ठेवतात हे त्याने पाहिले. आज जेएनयूमध्ये दलित, आदिवासी, मागासवर्गीय, वा अल्पसंख्याक मुले-मुली पीएच.डी. करू शकतात; पण अभाविपला शक्य झाले तर ते तसे होऊ देणार नाहीत, ते जेएनयू नष्टच करतील, असे कन्हैयाचे ठाम मत झाले. अर्थात जेएनयूमध्येही त्याला कोठे कोठे अस्वस्थ करणारा सुप्त जातीयवाद दिसून आला, हेही त्याने प्रांजळपणे सांगितले आहे. तसेच डावे पक्षही लोकशाहीचा जप करीत असले तरी निर्णय घेताना लोकशाही तत्त्वांकडे दुर्लक्ष करतात, असेही त्याचे निरीक्षण आहे.

अण्णा हजारेंच्या शक्तिशाली चळवळीस डाव्यांचा पािठबा असला तरी त्या आंदोलनामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ खोलवर सामील होता, असे कन्हैयाचे मत आहे. त्यानंतर ‘निर्भया’ बलात्कारविरोधी आंदोलनात जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी महत्त्वाचा सहभाग दिला. पोलिसांचे लाठीहल्ले आंदोलक-विद्यार्थ्यांनी झेलले. २०१४ मध्ये भाजप सरकार सत्तेत आले. काँग्रेसच्या कारकीर्दीत ‘निर्भया’ प्रकरणात चालवले तसे मोठे निषेध आंदोलन करणे शक्य होते, पण भाजपच्या राज्यात लहानशी निदर्शने करणेदेखील शक्य नाही, असे कन्हैया नमूद करतो. तरीही, जेएनयूची परंपराच अशी आहे, की देशात कोठेही अन्याय किंवा अत्याचार झाला तर त्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी जेएनयू विद्यार्थ्यांकडे आशेने पाहिले जाते. डाव्या आणि आंबेडकरवादी विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचे कन्हैयाने यशस्वी प्रयत्न केले. ‘जय भीम लाल सलाम’ ही घोषणा त्या प्रयत्नांचाच परिपाक. देशात इतर काही सरकारी शिक्षण संस्थांमध्येही असे घडले आहे. २०१५ सालच्या ‘ऑक्युपाय यू.जी.सी.’ या मोठय़ा देशव्यापी आंदोलनात जेएनयूचे विद्यार्थी आघाडीवर होते. गरीब विद्यार्थ्यांच्या सरकारी फेलोशिप्स अबाधित राखण्यासाठी आणि उच्च शिक्षणाच्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठी हे आंदोलन होते. विद्यार्थी-आंदोलक दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत रात्रंदिवस यूजीसीच्या (विद्यापीठ अनुदान आयोगाच्या) विरोधात धरणे देऊन बसले होते. भाजप सत्तेत आल्यावर पोलीस अधिक आक्रमक झाले असून महिला आंदोलकांना मारहाण करण्यासही ते मागेपुढे पाहत नाहीत, असे निरीक्षण कन्हैयाने मांडले आहे. ‘जेमतेम शंभर आंदोलक विद्यार्थ्यांभोवती पोलिसांनी भरभक्कम कडे उभारले, यावरून सत्ताधारी किती घाबरले आहेत हे आम्हाला दिसून आले; आणि एकीकडे मोदीजी रावण पुतळ्याच्या दहन कार्यक्रमात सामील झाले, तर दुसरीकडे आम्ही (आंदोलकांनी) केंद्र सरकारच्या प्रतीकाचे दहन केले,’ असे कन्हैया नमूद करतो. रोहित वेमुला आत्महत्येसंदर्भात हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सटिी व इतर संस्थांचे विद्यार्थीही अशीच आंदोलने वेगवेगळ्या, पण न्याय्य उद्दिष्टांकरिता चालवीत असल्याने जेएनयू आता एकाकी नाही- समान अन्यायांविरुद्ध विद्यार्थी एकत्रित होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, असा त्याचा निष्कर्ष आहे.

पुस्तकाचा बासष्ट पानांचा शेवटचा भाग (‘तिहार’) कन्हैयावरील देशद्रोहाच्या आरोपाबाबतचा घटनाक्रम कथित करतो. (अफझल गुरू या काश्मिरी दहशतवाद्याला दिल्लीच्या तिहार जेलमध्ये ९ फेब्रुवारी २०१३ रोजी गुप्तपणे फाशी देऊन त्याचे तुरुंगातच दफन करण्यात आले होते.) ९ फेब्रुवारी २०१६ रोजी जो कार्यक्रम जेएनयूत झाला व ज्यात देशविरोधी घोषणा दिल्या गेल्याचे अभाविपचे म्हणणे आहे, त्या वेळी कन्हैया हजरच नव्हता. त्या दिवशी तो जेव्हा उशिरा घटनास्थळी पोहोचला तेव्हा एका महिलेचे भाषण झाले व त्यानंतर अभाविपचे कार्यकत्रे व इतर विद्यार्थी आमनेसामने ठाकले होते. कन्हैयाच्या समक्ष दोन्ही पक्षांच्या ज्या घोषणा त्याच्या कानावर पडल्या, त्या पुस्तकात उद्धृत केल्या आहेत. त्यांच्यामध्ये देशद्रोहात्मक काहीही नाही. दोन विरोधी गटांना वेगळे करण्यात कन्हैया यशस्वी झाला. त्या दिवशीचा स्वत:चा सगळा दिनक्रम कन्हैयाने तपशीलवार दिला आहे. कार्यक्रमाच्या व्हिडीओमध्ये कन्हैया कोठेच दिसत नाही; तसेच त्याने वारंवार देश व संविधान-निष्ठेची ग्वाही दिली आहे. ११ फेब्रुवारीला देशविरोधी घोषणा कोणी दिल्या असल्यास त्या कृत्याचा धिक्कार करणारी पत्रके विद्यार्थी संघटनेने वाटली व अभाविपच्या ‘कृष्णकारस्थानां’विरुद्ध निदर्शने केली. शिवाय, कन्हैयाने विद्यार्थ्यांसमोर त्याची भूमिका स्पष्ट करणारे एक भाषण दिले- ते पुस्तकात पूर्णपणे देण्यात आले आहे. तेव्हा, कन्हैय्याच्या विचारांबाबत कोणाचे दुमत होऊ शकले तरी त्याच्यावर देशद्रोहाचा गंभीर आरोप कोणत्या पुराव्याच्या आधारे सरकारने ठेवला, हा प्रश्न हे पुस्तक वाचल्यावरही शिल्लक राहतो. अर्थात, या प्रश्नाचे उत्तर काळच देईल!

फेब्रुवारी २०१६ मध्ये वृत्तवाहिन्यांनी कन्हैयाविरुद्ध प्रचाराचे एकच रान उठवले होते. त्याला देशद्रोही ठरवून अनेक वृत्तवाहिन्या मोकळ्या झाल्या होत्या! १२ फेब्रुवारीला त्याला पोलिसांनी अटक केली, तेव्हापासून ३ मार्च २०१६ ला त्याची तिहार जेलमधून जामिनावर सुटका झाली त्या दिवसापर्यंतचा सगळा तपशील कन्हैयाने ओघवत्या शैलीत कथन केला आहे. १७ फेब्रुवारीला दिल्लीला कोर्टाच्या प्रांगणात वकिलांनी कन्हैयाला पोलिसांच्या देखत मारहाण केली, ही घटना अर्थातच त्यात समाविष्ट आहे. आपल्या जिवाला धोका आहे याची पहिल्यांदा त्याला त्या वेळी जाणीव झाली. त्याचे मनोधर्य खच्ची करण्यासाठी सगळे प्रयत्न होत होते, पण त्या दिव्यातून तो तावूनसुलाखून बाहेर पडला. जामिनाचा अर्ज करायलाही सुरुवातीला कन्हैयाचा नकार होता. त्याची मागणी होती, की तो आणि त्याचे सहकारी या सर्वावरचे आरोप मागे घेण्यात यावेत. अखेरीस अखिल भारतीय विद्यार्थी फेडरेशनने कन्हैयातर्फे कोर्टाला जामीन मागितल्यामुळे तो जामिनावर जेलच्या बाहेर आला.

पण बाहेरचे जगही एक प्रकारचा तुरुंगच नाही का? पिळवणूक, जातिवाद, असमानता, पुरुष-वर्चस्व अशा प्रकारच्या अनेक बेडय़ांमध्ये समाज अडकलेला नाही का? अशा प्रकारचे प्रश्न कन्हैया उपसंहारात उपस्थित करतो.

हे पुस्तक केवळ एका युवा कार्यकर्त्यांचे आत्मनिवेदन नसून हा एक राजकीय दस्तऐवजदेखील आहे. आजमितीस भारताचे राजकीय भविष्य अज्ञात व काहीसे संदिग्ध आहे. देशाच्या भविष्यात काहीही वाढून ठेवलेले असले तरी सदरहू पुस्तक राजकीय संदर्भास्तव दीर्घकाळ उपयुक्त ठरेल, असे वाटते.

  • फ्रॉम बिहार टू तिहार- माय पॉलिटिकल जर्नी
  • लेखक : कन्हैया कुमार
  • अनुवादक : वंदना आर. सिंग
  • प्रकाशक : जगरनॉट बुक्स
  • पृष्ठे : २५३, मूल्य : २५० रुपये

सुकुमार शिदोरे

sukumarshidore@gmail.com