|| अजिंक्य कुलकर्णी

केनियन कादंबरीकार एन्गुगी वा थिओंगो यांनी गीकुयु भाषेत लिहिलेले महाकाव्य त्यांनीच इंग्रजीत आणले. त्याविषयी…

जगातील प्रत्येक भाषेत महाकाव्यांची परंपरा आहे. भारतातही ही परंपरा पाहायला मिळते. रामायण (वाल्मीकी), महाभारत (व्यास), कुमारसंभवम्, रघुवंश (कालिदास), भट्टी काव्य (भट्टी) आदी झाले संस्कृतमधले. हिंदी भाषेत रामचरितमानस (तुलसीदास), उर्वशी (दिनकर), साकेत (मैथिलीशरण गुप्त); तमिळमध्ये सिलप्पादिकारम्, मणीमेकल्लै; मराठीतही महाकाव्याची मोठी परंपरा आहे : नरेंद्रकृत रुक्मिणीस्वयंवर, भास्कर बोरीकरांचे शिशुपालवध, वि. दा. सावरकरांचे कमला, गोमान्तक आदी. मात्र, ग्रीकमध्ये होमरने जे केले, तेच केनियामधल्या गीकुयु लोकांसाठी एन्गुगी वा थिओंगो या लेखकाने केले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. जपानी लेखक हारुकी मुराकामी आणि केनियन लेखक एन्गुगी वा थिओंगो यांचे साहित्य आज जगभरातील बहुतेक सर्व प्रमुख भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. थिओंगो हे केवळ केनियन किंवा आफ्रिकी साहित्य जगतातील एक महत्त्वाचे प्रस्थ नसून आंतरराष्ट्रीय स्तरावरील साहित्य विश्वातले एक महत्त्वाचे नाव आहे. मुराकामी आणि थिओंगो या दोघांची नावे गेल्या अनेक वर्षांपासून साहित्यातील नोबेल पारितोषिकासाठी चर्चिली जाताहेत. यंदा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठीची पुस्तकांची नामांकन यादी मार्चमध्ये जाहीर झाली होती. त्याच यादीत एन्गुगी वा थिओंगो यांच्या ‘द परफेक्ट नाइन’ या महाकाव्यालादेखील नामांकन मिळाले होते. थिओंगो यांच्या साहित्यावर केनियामध्ये एकेकाळी बंदी घातलेली होती. तसेच कोणताही खटला न चालवता त्यांची रवानगी सरळ तुरुंगात केली गेली होती. त्या तुरुंगवासातच त्यांनी आपली गीकुयु भाषेतली पहिली कादंबरी- ‘विप नॉट, चाइल्ड’ लिहून पूर्ण केली होती.

‘द परफेक्ट नाइन’ या महाकाव्याची मुख्य दोन पात्रे आहेत. गीकुयु आणि मुम्बी. खरे तर हे दोघे पती-पत्नी आहेत असे म्हणता येणार नाही. कारण या महाकाव्याचा जो कालखंड आहे तो केनियात संस्कृती वगैरे रुजण्याच्याही अगोदरचा, म्हणजे ‘प्री-हिस्टॉरिक’ आहे. या काळात शिक्षण, ज्ञानदान हे फक्त आणि फक्त मौखिक पद्धतीने दिले जात होते. गीकुयु आणि मुम्बी या दोघांच्या लग्नाचा प्रस्तुत महाकाव्यात कुठेही उल्लेख नाही. या महाकाव्याची नाळ केनियाच्या मूळ संस्कृतीशी जोडलेली जागोजागी दिसून येते. थोडक्यात, ही जोडी गीकुयु या वंशाची आद्य जोडी आहे. जसे बायबलात अ‍ॅडम आणि इव्ह आहेत तसे. या दोघांना नऊ मुली होतात. तशा दहा मुली असतात, पण दहावी ही पायाने अधू असते म्हणून तिची मोजदाद या नवांमध्ये केली जात नाही. म्हणून महाकाव्याचे नाव- ‘द परफेक्ट नाइन’!

या वंशाला गीकुयुचे नाव हे सुरुवातीस पुरुषप्रधान संस्कृतीच्या वर्चस्वाचे द्योतक वाटत असले, तरी महाकाव्याचे कथानक हे स्त्रीवादी असणाऱ्या या नऊ मुलींभोवती गुंफलेले आहे. या नऊ मुली पुढे स्वत:चे असे वेगवेगळे प्रभावी नऊ वंश सुरू करतात. या नऊ मुलींबरोबर ९९ माणसांना विवाह करायचा असतो, हे केनियात ‘मानवी संस्कृती’ रुजण्याच्या अगोदर काय परिस्थिती असेल याचे चित्रण करते. हे महाकाव्य म्हणजे केनियातील एका उंच शिखरावर पोहोचण्यासाठीचा या सर्वांच्या प्रवासाची कहाणी. ते शिखर या सर्वांसाठीचे एक पवित्र स्थळ आहे. महाकाव्यात म्हटल्याप्रमाणे, ‘द सिट ऑफ गिव्हर सुप्रीम’! या श्रेष्ठतेचा अर्थ वाचकांनी आपापल्या परीने लावायचा आहे.

परंतु या महाकाव्यात वर उल्लेख केलेली श्रेष्ठता ही भौतिक नसून ती आध्यात्मिक आहे. या महाकाव्यावर भारतीय तत्त्वज्ञानाचा प्रभाव आहे आणि ते लेखक नाकबूलही करत नाही. एका मुलाखतीत थिओंगो यांनी तसे म्हटलेदेखील आहे, ‘रामायण, महाभारत ही महाकाव्ये मी वाचलेली आहेत, आणि हे महाकाव्य लिहिते वेळी त्यांचा प्रभाव माझ्यावर असू शकतो.’ या महाकाव्यातील नऊ मुली या नवरस वाटतात; कारण त्या प्रत्येकीची वेगवेगळी अशी स्वभाववैशिष्ट्ये आहेत. हे असे वाटण्याचे कारण या मुली शिखराकडच्या प्रवासात असताना त्या एकमेकींबरोबर हास्यविनोद (हास्य) करतात. मगर, जंगली हत्ती या प्राण्यांबरोबर त्या शूरपणे लढतात (वीर), फुलांनी त्यांना नटावेसे वाटते (शृंगार), तर इतरांच्या दु:खाने त्या व्याकूळही (कारुण्य) होतात. गीकुयु यांच्या मुखातील काही वाक्ये त्यांचे त्या कळपातले शहाणपण अधोरेखीत करते. उदा. ‘आत्ता हा आत्ता आहे आणि तो आता नसणार आहे, कारण काळ कुणासाठी थांबत नाही. काल का काल होता आणि आज हा काल नाहीये, कारण काळ कुणासाठी थांबत नाही. उद्या हा उद्या असेल, पण उद्या उद्या नसेल; कारण काळ कुणासाठी थांबत नाही.’

महाकाव्याचा आधार घेत थिओंगो केनियातील मूळ स्त्रीवादाला स्पर्श करतात किंवा त्यांना केनियातील आपल्या मूळ मातृसत्ताक संस्कृतीची ओळख करून द्यायची असावी. या पुस्तकात एक प्रसंग आहे. या सर्व नऊ बहिणी एका जंगलातून जात असतात. ते जंगल इतके घनदाट असते की, भर दिवसा अंधारून यावे. त्या अंधारातून चालत जात असताना त्यांची भेट होते ती एका जादूई नरभक्षकाशी. हे एक रूपक असावे. कारण ज्या काळात संस्कृती नावाची गोष्टच अस्तित्वात नव्हती, त्या वेळी असेच नरभक्षक लोक जंगलात अस्तित्वात असणार. शेतीचा शोध लागायला अजून बराच अवकाश होता. माणसे हे शिकारीवर आणि फळांवर अवलंबून होते. जंगलातील तो अंधार हा असंस्कृतपणाचा आहे आणि या नऊ बहिणींच्या रूपाने त्या किर्र अंधाऱ्या जंगलात मानवी संस्कृती प्रवेशली आहे, असा भास होतो. जंगलाची गरज तर या नऊ बहिणींनाही आहे. या नऊ मुलींचा निसर्गाशी मोठा संघर्ष सुरू आहे. असा संघर्ष करण्याचे कारण या मुलींनाही जगायचे आहे, आपला वंश पुढे वाढवायचा आहे. जंगलवाटेत येणाऱ्या हिंस्रा प्राणी, नरभक्षकांवर त्यांना मात करावीच लागणार आहे. या महाकाव्यात नरभक्षकांबरोबर लढण्याचा प्रसंग फार रोमांचक आहे. एकतेचे बळ दर्शवणारा आहे.

या काव्यातल्या गोष्टी कदाचित आपल्याला जादूई वाटतील, थरारकही वाटतील. पण या काव्याला छानसा आध्यात्मिक पाया आहे. उदाहरणार्थ, काव्यात एका जादूई काळविटाचा केस मिळविण्यासाठी मुलींचा आटापिटा चाललेला आहे, असा उल्लेख आहे. हरीण जसे मृगजळाकडे वाट्टेल तसे धावते तसेच आपल्याला सतत कुठेतरी धावतच राहण्यापेक्षा, आपल्याला आपल्या आयुष्यात नक्की काय करायचे आहे हे निश्चित माहीत असले पाहिजे. गीकुयु आणि मुम्बी यांना आपल्या मुलींना हेच शिकवायचे असावे बहुतेक. माणूस समूह करून राहू लागला तेव्हा त्याला गरज भासू लागली ती कुटुंबव्यवस्थेची.

आपला वंश वाढला पाहिजे ही माणूस म्हणून आलेली सहज प्रेरणा आहे. कुटुंब ही एक व्यवस्था आहे. तिने आपले जगणे तीन पातळ्यांवर सुखकर होते. एक आर्थिक, दुसरे भावनिक आणि त्यापुढे जायचे ठरलेच तर आध्यात्मिक. या तीन पातळ्यांवरील मानवी वाटचालीचा वेध घेणाऱ्या या महाकाव्यात अनेक चढ-उतार आहेत, ते आपला वाचक म्हणून कुठेही रसभंग करत नाहीत. उलट ते जास्त मानवी वाटतात. जसजशी संस्कृती विस्तारत गेली तसतशी हिंसेकडून अहिंसेकडे यांची वाटचाल होताना दिसते. ग्रीक आणि आफ्रिकी पुराणात मानवाचे शत्रू हे अलौकिक (सुपरनॅचरल) दाखवले असतात, त्याची सावली या महाकाव्यावरही दिसून येते.

ajjukul007@gmail.com