विबुधप्रिया दास

पुस्तकाचं मुखपृष्ठ इंग्रजी, पण त्यावर सर्वात मोठय़ा अक्षरात असलेलं शीर्षक अंदाजानंच वाचावं लागतं आहे. ‘घाना’ की ‘घना’ अशाप्रकारचा अंदाज लावत. ‘नथिंग पर्सनल’ हे उपशीर्षक पुस्तकाला आहे आणि पुस्तकाचा एकंदर आकार एखाद्या ३०० हून अधिक पानांच्या इंग्रजी पुस्तकासारखा आहे. पण हे पुस्तक इंग्रजी आहे का? आहेही आणि नाहीसुद्धा. म्हणजे या पुस्तकाची सुमारे दीडशे पानं इंग्रजीच्या रोमन लिपीत छापली गेलेली आहेत. पण फक्त इंग्लिश माहीत असल्यामुळे या पुस्तकाचा अर्थ लागणार नाही. त्यासाठी हिंदी समजावं लागेल. कारण हे पुस्तक हिंदी कवितांचं आहे. दहाच कविता. रोमन लिपीत छापल्यामुळे बहुधा, ‘लँग्वेज अंडरस्टँड होते पण रीड करायला पॉब्लेम होतो’ वाल्या आंग्लशिक्षित पिढीलाही वाचता येतील अशा. त्या कविता कशा आहेत याचं एका शब्दातलं उत्तर- ‘आजच्या’ असं देता येईल. नवीन चौरेसुद्धा आजचाच. या कविता लिहिल्यावर आधी कुठं मासिकात वगैरे नाही आल्या. २००८ पासून (म्हणजे १५-१६ वर्षांचा असतानापासून) त्यानं कविता लिहिल्या होत्या, त्या २०१५ मध्ये त्यानं ‘हूबहू’ या ब्लॉगवर स्वत:च संग्रहित केल्या. नंतरच्या कविता त्याच्या ‘फेसबुक पेज’वर आल्या. मग त्याला भरपूर ‘लाइक’ मिळाले. यातूनच, एक कविता त्यानं यू-टय़ुबवर सादर केली..

Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
Loksatta kutuhal Application of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीचे उपयोजन
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…

गांभीर्य हरवलेलं वाटतंय का हे? मग नवीनच्या कविता मुद्दाम वाचा.

‘तुम्हारी सोच छोटी है

मैं इतना था नही छोटा

अगर तुम सच बता देते

मैं बेहतर आदमी होता’

या ओळींनी त्याची जी कविता संपते, तिचा विषय अतिशय गंभीर आहे.. मासिक पाळीबद्दल मुलग्यांना काहीही सांगितलं जात नाही, महिलांना घरकामापासून/ देवापासून दूर ठेवलं जातं, हा. नवीनला अचानक सर्व वृत्तवाहिन्यांवर किंवा काही इंग्रजी दैनिकांमधून गेल्या सप्टेंबरात प्रसिद्धी मिळाली होती, ती ‘झुंडबळी’ या विषयावर त्यानं लिहिलेल्या कवितेमुळे. ‘वास्तविक कानून’ ही ती कविता, या संग्रहातली पहिली कविता आहे. तिचा प्रकार ‘दृश्यकाव्य’ हा आहे, असंही पुस्तकात नमूद आहे. रस्त्यावर, रक्ताच्या थारोळय़ात पडलेलं एकच बोट. कुणाचं ते? इथं झुंडबळी गेलाय. कुणाचा?  ‘साधारण नागरिक’ या नात्यानं कवी विचारतो, तेव्हा कुणीच काही बोलत नाही. ‘काही लोक आले होते’ म्हणतात. एक गरीब मजूर थोडंफार सांगतो. कवी बोटाजवळ जातो, नखावरली शाई पाहातो, मतदानाची. ते बोट कवीला म्हणतं, ‘तुम सवालों से भरे हो, क्या तुम्हें मालूम हैं?

भीडम् से कुछ पूछना भी जानलेवा जुर्म है’ जमावाच्या षंढपणावर नेमकं बोट ठेवणाऱ्या या कवितेतला राग हा ‘जगाचे टक्केटोणपे न खाल्लेल्या’ किंवा अननुभवी म्हणून हिणवलं जाणाऱ्या तरुणाचाच असू शकतो. नवीन चौरे हा २७ वर्षांचा आणि आयआयटीतून रसायन अभियांत्रिकी शिकलेला असला, तरी ‘तरुण’ आहे. त्याच्या कवितांमध्ये हा ‘अननुभवी’(!) राग भरपूर आहे. स्वत:च्या मर्यादा ओळखून वागणारी ‘अनुभवी’ माणसं सतत दिसत राहतात. या मर्यादा कधी परंपरेच्या असतात, कधी काही गुंडांची दहशत त्यामागे असते. पण अखेर, स्वत:नंच स्वत:वर बंधनं घालून घेण्यातून आपण अनेक अन्यायांना जन्म देत असतो किंवा ते अन्याय तसेच सुरू राहू देत असतो. या वृत्तीवर नवीनचा राग आहे.

समाजभान असलेल्या कवींच्या कविता सामान्यांना आवडेल अशा तरलपणे लिहिलेल्या नसतात, त्या छंदोबद्ध नसतात आणि मुक्तछंदात असतात, या मराठी कल्पनांना हिंदीतल्या अनेक कवींनी यापूर्वीही धक्के दिलेले होते. नवीन चौरे हा त्यापैकी सर्वात आजचा. कारण त्याचे विषयही आजचेच. काश्मीरबद्दल तो थेट बोलत नाही. पण ‘किती दिवस मोजायचे?’ हा त्याचा सवाल कशाबद्दल आहे हे वाचकाला कळतं. किंवा

‘तुम्हें क्या सच में लगता है कोई अपना पराया है?

हुआ पैदा इधर है जो इस देश में बाहर से आया है?

सभी का खून शामिल है, लगी क़ुर्बानियाँ सबकी

के हमने हड्डियों को जोडम् के भारत बनाया है’

असं सुनावणारा नवीन स्वत:च्या बहिणीबद्दल हळुवारपणे लिहितो, मीरेच्या मधुराभक्तीबद्दल लिहितो, चौकोनी कुटुंबातल्या मोठय़ा भावाला ‘दोन लहानपणं असतात.. एक बहीण होण्याअगोदरचं एकटय़ा मुलग्याचं बालपण आणि बहीण झाल्यानंतरचं मोठा भाऊ म्हणून दुसरं बालपण’ असं तो सांगतो त्यात पुरुषीपणाचा वास कुठेही येत नाही, उलट कौटुंबिक पातळीवरही त्यानं स्वीकारलेला स्त्रीवाद दिसतो.

या आश्वासक कवीचं हे पुस्तक ‘पेंग्विन’सारख्या प्रतिष्ठित संस्थेनं काढलं असल्यामुळे कुतूहल वाढलेलं असतंच. मात्र ते इंग्रजी दिसतंय तरी इंग्रजी नाही, हा काहीशा नापसंतीचा विषय ठरू शकतो. अवघ्या १९९ रुपयांचं हे पुस्तक सुमारे ३०० पानी आहे, कारण एका बाजूनं रोमन लिपीत, तर दुसऱ्या बाजूनं देवनागरी लिपीत कविता छापलेल्या आहेत. प्रकाशकांचं हे धाडसच आहे.