25 March 2019

News Flash

एका व्हायरल कथेची कथा!

या लेखिकेशी पाच लाख डॉलरहून अधिक रकमेचा करार तातडीने बडय़ा प्रकाशन संस्थेने केला.

ख्रिस्टिन रुपेनियन

महिनाभरापूर्वी ‘द न्यू यॉर्कर’च्या अंकात प्रसिद्ध झालेली ख्रिस्टिन रुपेनियन या नवोदित लेखिकेची कथा जगभरातील वाचनप्रेमींमध्ये वाचली-चर्चिली गेली; शिवाय सहसा कथात्म साहित्याच्या वाटय़ाला न जाणाऱ्यांनीही तिची दखल घेतली. कथालेखनातील रूढ अनुभव-अभिव्यक्तीचा प्रभाव दूर  ठेवून लिहिलेल्या या कथेच्या यशानिमित्ताने आपल्या साहित्यभवतालाचा वेध घेणारे हे टिपण..

जागतिक पटलावरील समांतर साहित्य जाणून घ्यायचा सर्वात चांगला आणि सोपा मार्ग दर सोमवारी ‘द न्यू यॉर्कर’ या अमेरिकी साप्ताहिकाच्या संकेतस्थळावर प्रकाशित होणारी कथा वाचण्याचा आहे. प्रथितयश आणि क्वचित भविष्य गाजविण्याची खुमखुमी असलेल्या एखाद्या नवोदिताची प्रचंड तळपणारी कथा तिथे प्रकाशित होते. २०१७ च्या बारमासात कैक वर्षे कथनसाम्राज्यात वावरणाऱ्या अनेक दिग्गजांच्या कथा प्रकाशित झाल्या. त्यातील बऱ्याचशा पुढील वर्षी प्रकाशित होणाऱ्या ‘बेस्ट अमेरिकन शॉर्ट स्टोरीज’ आणि ‘ओ हेन्री प्राइझ स्टोरीज’ या वर्षभरात प्रसिद्ध होणाऱ्या सर्वोत्तम कथन साहित्याच्या संकलन ग्रंथांत समाविष्ट होतील. त्यात समाविष्ट न होणाऱ्या कथा त्या त्या लेखकांच्या ग्रंथाचा भाग बनतील. साप्ताहिक आणि मासिकांमध्ये प्रकाशित होणाऱ्या कथन आणि अकथनात्मक मौलिक मजकुराचा गुणगौरव करणाऱ्या अमेरिकी परंपरेमध्ये डिसेंबरमध्ये अद्याप झाली नव्हती अशी घटना घडली.

डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात ‘द न्यू यॉर्कर’मध्ये ख्रिस्टिन रुपेनियन या तिशी-पस्तिशीच्या तरुणीची ‘कॅट पर्सन’ ही कथा प्रसिद्ध झाली. ‘द न्यू यॉर्कर’मध्ये विशी-पंचविशीच्या कथाकारांचीही पहिली कथा यापूर्वी आली होती. त्यामुळे वयाची बाब ही दुय्यम होती. मात्र ख्रिस्टिन रॉपेनियन हे नावच साहित्य जगतासाठी तोवर अपरिचित होते. मर्यादित वाचकवर्ग असलेल्या ‘रायटर्स डायजेस्ट’ मासिकात गेल्या वर्षी तिच्या एका कथेने पारितोषिक मिळविले होते. शिवाय दुसरी, एका दाम्पत्याची दुर्मुखलेल्या मित्रामुळे गमतशीर बनलेल्या सहजीवनाची कथा लोकप्रिय नसलेल्या एका ऑनलाइन मासिकात प्रकाशित झाली होती. इवलुशा प्रकाशनबळावर अशक्य असलेल्या ‘द न्यू यॉर्कर’च्या कथादालनामध्ये तिची वर्णी लागली.

वीस वर्षीय तरुणीची तेहतीस वर्षांच्या तरुणासोबत मोबाइल चॅटिंगद्वारे फुलणारी मैत्री आणि कोमेजणारे नाते यांवर आधारलेली ही कथा प्रकाशित झाली आणि लगोलग समाजमाध्यमांवर कित्येक ‘सेलेब्रेटी’ महिलांनी सर्वप्रथम तिला व्हायरल केली. स्त्री-पुरुष समानतेच्या युगामध्ये या प्रगत राष्ट्रामधील मागास पुरुषी वृत्तीचे सूक्ष्मलक्ष्यी वर्णन करणारी ही बंडखोर कथा म्हणजे अमेरिकेत गतवर्षी अखेरी तयार झालेल्या ‘मी टू’ चळवळीचे पुढले पाऊल होते. एखादे गाणे, चित्रफीत किंवा सिनेमा व्हायरल व्हावा त्या गतीने तीन ते चार आठवडे या कथेचा उदोउदो झाला.

‘द न्यू यॉर्कर’मधीलच नाही तर जगभरातील सर्व मासिकांमधून वर्षभरात सर्वाधिक वाचला गेलेला मजकूर म्हणून या कथेची नोंद घेण्यात आली. गंमत म्हणजे अजूनही त्याची लोकप्रियता तिळमात्र उतरलेली नाही. कथा ही किती परिणामकारक ठरू शकते, याचा दाखला ‘कॅट पर्सन’ या कथेने दिला. सर्वच समाजमाध्यमांवर ‘माझीच कथा या लेखिकेने मांडली आहे’ हे जाहीरपणे सांगणाऱ्या महिला पुढे आल्या. गेल्या अनेक वर्षांमध्ये ‘द न्यू यॉर्कर’च्या कथेला इतका अजस्र प्रतिसाद लाभलेला नाही. म्हणजे तेथे छापून येणाऱ्या दर आठवडय़ाच्या कथेवर चर्चा करणारे, त्यांचे वाचन करणारे, अर्थ सांगणारे आणि ऑनलाइन चर्चासत्र घडविणारे अनेक गट जगभरात कार्यरत आहेत; पण वाचनबाह्य़ गट, कथनसाहित्य न वाचणारा गट आणि एकूणच ‘द न्यू यॉर्कर’ न वाचणारा गट या कथेच्या कक्षात जोडला गेला. रातोरात लेखिका ‘सेलेब्रेटी’ झाली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या लेखिकेशी पाच लाख डॉलरहून अधिक रकमेचा करार तातडीने बडय़ा प्रकाशन संस्थेने केला. प्रकाशित तिसऱ्या कथेच्या जादूई कमाईने ही लेखिकाही पूर्णपणे हरखून गेली.

‘द न्यू यॉर्कर’मधील या कथेची ही विजयगाथा सुरू असतानाच आपल्याकडे मराठीत कथेला (त्या काळामागच्या असल्या तरी) व्यासपीठ देणारे एक मासिक (त्याच्या कर्माने) बंद पडत होते. दुसऱ्या राहिलेल्या दोन तथाकथित पुरोगामी मासिकांमध्ये कथन साहित्याची दुर्दशा करण्याचे उद्योग अव्याहत सुरू आहेत. कुण्या एके काळी गाजणाऱ्या एका साप्ताहिकातील कथास्पर्धा आता लोक विसरून गेले आहेत. नव्या लेखकांच्या नव्या विचारांना आणि कालसमांतर आशयाला समजून घ्यायला जुन्या विचारांची मासिके तयार नाहीत. वर जुन्या विचारांच्या नियतकालिकांना ‘साठोत्तरी’तील बंडखोरी आज मागास बनली आहे, हे मान्य करताच येत नाही. परिणामी घुसळण व्हावे असे जगण्याचे वास्तवभान देणारे लेखन तुडवत नवलेखकांची ऊर्जा मारण्यात धन्य मानणाऱ्या साहित्यरूपी डबक्याचा विस्तार होऊ शकलेला नाही. जाहिरातींसाठी दिवाळी अंकांचा उद्योग नित्यनेमाने करणाऱ्या, अंकांतील चांगल्या, आशयघन, दर्जेदार साहित्याची शून्यचर्चा घडविणाऱ्या, रतिबाखातर लिहून निवडक बऱ्या म्हणविणाऱ्या अंकांमधील जागा अडविणाऱ्या लेखन-वाचन परंपरेकडून अलीकडे अधिक अपेक्षा करता येणेच शक्य नाही. त्यामुळे जागतिक पटलावर होणाऱ्या सुखावह गोष्टींचे समाधान आज ‘ग्लोकल’ झालेल्या वाचकाला घेता येऊ शकते.

ब्रिटन, अमेरिका, कॅनडा आणि युरोपातील अनेक वाचनप्रिय नागरिकांनी भरलेल्या राष्ट्रांमध्ये आज पूर्वीइतकी मासिके नाहीत. तरीही ‘प्लेबॉय’ (दोन महिन्यांतून दोन कथा), ‘हार्पर्स’ (महिन्याला एक कथा), ‘व्हॉइस’ (महिना कथा आणि वार्षिक कथा विशेषांक) आणि शेकडो ऑनलाइन-ऑफलाइन मासिकांतून कथा वर्षभरात येत राहतात. त्यांना उत्तम मानधन मिळते. त्यांचे संकलन ग्रंथ (ओळख-शिफारसींऐवजी गुणवत्तेआधारे) येतात. अगदी नवोदित आणि छोटय़ा वाचकवर्गाच्या मासिकांमधूनही पुशकार्ट, स्टोरी साऊथ पुरस्कार आणि कथासंकलनाचे प्रकाशन होते. अगदी भारतातील ‘हंस’, ‘कथादेश’, ‘नया ज्ञानोदय’, ‘पहल’, ‘वागर्थ’ या हिंदूी मासिकांनी त्यांच्याकडची कथा-परंपरेची कास सोडलेली नाही. त्यामुळे भारतभर स्वस्तात दर्जेदार साहित्य ही मासिके पसरवत आहेत.

कथा प्रकाराला अमेरिकेतील अनेक प्रकाशक पूर्वापार दुय्यम मानत असले, तरी त्यांच्या प्रकाशनाला प्रोत्साहन वाचक आणि मासिकांचे संपादक या दोन घटकांमुळे अव्याहत मिळत आहे. मराठीत आपल्याकडे दरवर्षी वाचक आणि संपादक या घटकांचेच मारक म्हणून वाढत चाललेले स्वरूप कथन साहित्याच्या परंपरेला मूठमाती देऊन स्वत:ला संपवत चालले आहेत. मग ‘आज दर्जेदार साहित्यच होत नाही’ ही त्यांची फुकाची ओरड गांभीर्याने दखलपात्र ठरूच शकत नाही.

तूर्त एका इंग्रजी व्हायरल कथेचे वाचन करून आजच्या अमेरिकी कथाप्रेमी निकोप दृष्टीचे कौतुक करावे. त्यामुळे आपल्या स्वभाषा-स्वदेशी कथाप्रेमाला बाधा येणार नाही अन् यातून साहित्याच्या तथाकथित धुरिणांना जाण वगैरे आलीच, तर धुगधुगी राहिलेल्या मराठी कथन परंपरेला त्यातील कुणी उजवून दाखवावे. त्याचेही मग स्वागत अटळ असेल.

(‘न्यूयॉर्कर’मधील कथा वाचण्यासाठी दुवा- https://www.newyorker.com/magazine/2017/12/11/cat-person)

पंकज भोसले pankaj.bhosale@expressindia.com

First Published on January 13, 2018 1:41 am

Web Title: kristen roupenian story in the new yorker edition