News Flash

चिडचिडलेली हेरकथा

अमेरिकेच्या ‘सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी’ (सीआयए)मधून निवृत्त झाल्यानंतर लिहिल्या गेलेल्या पुस्तकांचं प्रमाण

अमेरिकेच्या ‘सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी’ (सीआयए)मधून निवृत्त झाल्यानंतर लिहिल्या गेलेल्या पुस्तकांचं प्रमाण ‘९/११’ नंतर वाढलं; त्याबरोबर ही माजी कर्मचारी वा अधिकाऱ्यांची पुस्तकं तपासून त्यात काटछाट सुचवण्याचं, फेरबदल करवून घेण्याचं सीआयएचं कामही वाढलं. बहुतेक पुस्तकं इराक किंवा अफगाणिस्तानात स्वतला आलेले अनुभव सांगता-सांगता ‘दहशतवादाचा खरा चेहरा मीच वाचकांपुढे आणतोय’ असा आव आणणारी होती हे खरं, पण यापैकी बहुतेक पुस्तकांचा सूर हा कृतार्थ आत्मवृत्तांसारखाच होता हे अधिक खरं. काही पत्रकारांच्याही पुस्तकांची ‘प्रकाशनपूर्व छाननी’ सीआयएनं केली आहे, म्हणे. पण याला कोणीही अभिव्यक्तिस्वातंत्र्यावरला दबाव वगैरे म्हणत नसे. यात फरक पडला तो २०१५ साली मोहम्मदू ऊल्द स्लाही या कैद्यानं लिहिलेल्या ‘हुआंतानामो डायरी’ या पुस्तकामुळे. सीआयएच या स्लाहीची ताबेदार. त्यामुळे सीआयएनं ‘पूर्वछाननी’ करताना पुस्तकात भरपूर काटछाट सुचवली. तर स्लाही आणि त्याचे सहलेखक लॅरी सीम्स यांनी या काटछाटींच्या जागी जाड काळ्या रेषा मारून या छाननीचा विद्रूप चेहराच उघड केला. आता सीआयएचा माजी कर्मचारी- अफगाणिस्तानात आणि सीरियातही हेर म्हणून प्रत्यक्ष काम केलेला- डग्लस लॅक्स यानं लिहिलेलं ‘लेफ्ट ऑफ बूम’ हे पुस्तक गेल्याच आठवडय़ात (५ एप्रिल) प्रकाशित झालं आहे; त्यातही काटछाट कुठे कुठे केली गेली हे उघड केलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ, ‘अफगाणिस्तानातील तालिबान्यांना प्रशिक्षण देणारी केंद्रं ०* या देशात होती,’ असं वाक्य या पुस्तकात आहे. यातलं ‘०*’ हे नाव कितीही कापलं असलं, तरी ते ‘पा कि स्ता न’ असंच असणार, हे सांगायला हवं का?
‘लेफ्ट ऑफ बूम’चा सूर कृतार्थ वगैरे अजिबात नाही. उलट सीआयएतल्या अनुभवानंतर लेखकाची जी चिडचिड झाली, ती मुखर करण्यासाठीच हे पुस्तक लिहिलं गेलं आहे. तरीही ते गाजतं आहे, याला कारणं अनेक आहेत. हाच डग्लस अगदी वयाच्या अठराव्या वर्षांपासून सीआयएत जाण्यास उत्सुक होता. त्याला तशी संधी मिळाली २२व्या वर्षी, आणि प्रत्यक्ष अफगाणिस्तान-पाकिस्तानात जाता आलं ते २००५ साली. तेही अगदी तालिबान्यांच्या गोटातच शिरायला मिळालं.. कारण डग्लसला पश्तू भाषा उत्तम यायची! यासाठीचं दहा महिन्यांचं प्रशिक्षण त्याला सीआयएकडून मिळालं, मग पश्तूच्या परीक्षेत चांगले मार्क मिळाले तरीही तुम्ही मला ‘तिथे’ का पाठवत नाही, असा लकडा लावून हा अफगाणिस्तानच्या ईशान्येकडे, म्हणजेच पाकिस्तानच्या वायव्येकडे अखेर रवाना झाला. त्यानं इथून पाठवलेल्या अनेक खबरींमुळे एकतर अमेरिकी सैन्याचे प्राण वाचले, किंवा तालिबानी म्होरक्यांना ठार करता आलं, असं सांगितलं जातं.
काहीशा भाबडय़ा, स्वप्नाळू कल्पना उराशी घेऊन आपण हेर बनलो, हे लेखकच कबूल करतो. ‘इथं येईपर्यंत माझी सीआयएविषयीची कल्पना ही हॉलीवूडच्या चित्रपटांतूनच आकाराला आली होती’ असं वाक्य पुस्तकात आहे. या भाबडेपणाला अर्थातच ‘९/११’नंतर तेव्हाचे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी तडतडून दिलेली देशप्रेमाची फोडणीसुद्धा आहे. पहिल्या प्रकरणातलं लांबण लावल्यासारखं वर्णन लेखकाची ही मन:स्थिती आरपार दाखवणारं, म्हणून उपयुक्त आहे. २००९ साली लेखक सुट्टीसाठी अमेरिकेत परत आलेला असताना आणि मैत्रिणीसह संध्याकाळ घालवण्याचे बेत आखत असतानासुद्धा, ‘कॅम्प चॅपमनवर हल्ला झाला’ असा मोबाइल-संदेश त्याच्या सहकारी-मित्राकडून त्याला येतो. हा मित्रही डग्लसप्रमाणेच सुट्टीवर आला आहे. मात्र त्याचा संदेश आल्यावर डग्लस अस्वस्थ होतो. त्या अस्वस्थतेतच त्याला मैत्रिणीची मित्रमंडळी भेटतात, त्यांना किती कमी माहिती आहे, याबद्दल तो मनोमन उबगतो..
..बाहेरच्या जगाला आपण काय करतो आहोत, कुठल्या परिस्थितीतून जातो आहोत, याची फारशी जाणीवच नाही; ही लेखकाची एक महत्त्वाची तक्रार. ती मनातच राहाते आणि चिघळत जाते. पण दुसरी ठसठस अशी की, सीआयएसुद्धा अखेर एक मोठी नोकरशाहीच आहे. शत्रू दिसत असताना, त्याला नामोहरम कसं करायचं याचे मार्ग समोर असताना आपण अनेकदा तसं करू शकत नाही. याचं मोठं उदाहरण म्हणजे सीरिया!
हा या पुस्तकातला गौप्यस्फोटाचा भाग आहे. त्याची चर्चा अमेरिकी प्रसारमाध्यमांनी आता सुरू केली आहेच आणि समाजमाध्यमांवरही ती पसरते आहे.
लेखक डग्लस याचा आरोप असा की, आम्ही- सीरियातील अमेरिकी हेरांनी- २०१२ सालीच पुरेसे उपाय सुचवले होते. ‘बशर असाद यांची राजवट उलथवणे हाच उपाय’ हे स्पष्टपणे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांना सांगितलं गेलं होतं आणि त्यासाठी आता फक्त ओबामांचा होकार हवा, इतकी परिस्थिती होती कारण त्या वेळच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन, तत्कालीन संरक्षणमंत्री लिऑन पानेटा (हे त्याआधी सीआयएचे प्रमुख होते) आणि तत्कालीन लष्करप्रमुख डेव्हिड पेत्रॉस हेदेखील लेखकाच्या मते, ‘सीरियात सत्तापालट घडवणे आवश्यक’ याच मताचे होते. यासाठी असादविरोधी नागरी गट तयार करायचा आणि त्यापैकी काहींना शस्त्रं द्यायची, हे लेखकाच्या मते- अमेरिकेचं कर्तव्य होतं! ते ओबामांनी पार पाडलं नाही, म्हणून आणि म्हणूनच आज अख्खं जग ‘आयसिस’च्या भीतीनं ग्रस्त झालं आहे, असा लेखकाचा निष्कर्ष आहे. या निष्कर्षांमागे, सीरियात वेळीच सत्ताबदल झाला असता तर इस्लामी मूलतत्त्ववादी गटांना असादविरोधी मोहिमेत जितकं महत्त्व मिळालं, तितकं मिळालंच नसतं आणि मग ‘आयसिस’चा उदयच झाला नसता, इतकं सोपं गणित लेखकानं मांडलं आहे.. अर्थात, स्वतला परिस्थितीची पूर्ण कल्पना आहे, हा आब कायम ठेवूनच पुस्तकात ही तर्करचना करण्यात आलेली आहे. पुढे ओबामा प्रशासनानंच सीरियन बंडखोरांना शस्त्रं पुरवण्याचा निर्णय घेतला, पण ती ‘आयसिस’चे पूर्वरूप असलेल्या इस्लामी मूलतत्त्ववाद्यांकडे गेली की निव्वळ बंडखोरांकडे, हे धूसरच आहे. अशा स्थितीत, लेखकाचं ‘शस्त्रपुरवठा वेळीच झाला असता तर असाद सरकार उलथवता आलं असतं’ हे म्हणणं झाकल्या मुठीसारखं राहातं.
या पुस्तकातला गौप्यस्फोटवजा दुसरा मुद्दा म्हणजे, पेशावरच्या पुढे, पाकिस्तानी पश्तून प्रदेशात चालणारे बॉम्ब बनवण्याचे कारखाने आणि दहशतवादी प्रशिक्षणांची केंद्रं उद्ध्वस्त करण्याचं काम अमेरिकेनं पुरेशा गांभीर्यानं हाती घेतलंच नाही, हा. या मुद्दय़ाला फार प्रसिद्धी न मिळण्याची कारणं दोन. एक तर, ‘पाकिस्तान’ऐवजी ‘०*’ किंवा पेशावर व अन्य गावांच्या नावांऐवजीही तशीच चिन्हं आहेत. दुसरं म्हणजे, पाकिस्तानचे हवाईतळ वापरण्यासाठी त्या देशाला पुंड न ठरू देणं हे अमेरिकेच्या हिताचं मानलं गेलं, हे जगभर माहीत असलेलं उघडं गुपित आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीतच भारतानं पाकिस्तानच्या या दहशतवादी तळांबद्दल अनेकानेक पुरावे दिले, व्हिडीओफिती दिल्या, तरीही काहीच झालं नाही, हाही इतिहास आहेच.
‘हे पुस्तक सीआयएबद्दल नाही, माझ्याबद्दल आहे’ असं लेखक डग्लस लॅक्स यानं अलीकडल्या काही मुलाखतींमध्ये पुन:पुन्हा सांगितलं आहे. काहीशा वैफल्यातूनच त्यानं २०१३ साली सीआयए सोडली, अमेरिकेत परतला तेव्हाच त्याचं प्रेमप्रकरणही संपलं. मग तो व्यसनाधीन होतो की काय अशी परिस्थिती असताना त्यानं हे पुस्तक लिहायला घेतलं आणि अखेर सीआयएच्या ‘छाननी’तून सोडवून ते प्रकाशित झालं, या गेल्या तीन वर्षांतल्या हेरगिरीबाह्य़ कहाणीचा वापर तो केवळ प्रसिद्धीसाठी करत नसून, पुस्तकातही हे उल्लेख अधूनमधून आहेत. मात्र, एकंदर वैफल्याचं कारण म्हणून लेखक ‘नोकरशाहीसारखी कार्यसंस्कृती’ अधिक दोषी मानतो आहे. हे म्हणण्यामागे लेखकाची दृष्टी कलुषित किंवा एकांगी आहे का?
किमान शिस्त पाळण्याची तयारीही न ठेवता लेखकाला स्वतच्या देशप्रेमासाठी शत्रूच्या गोटात जाऊन हेरगिरी करायची होती, हे तर लेखक पुस्तकातही मान्यच करतो आहे. या अमेरिकाप्रेमी अमेरिकी (गोऱ्या) तरुणाला देशप्रेमाचे कढ वारंवार येतात, पण पश्तू भाषा येत असूनही ‘त्यांचे’- शत्रूचे विचार काय आहेत, हे जाणून लोकांना सांगावंसं वाटत नाही. ‘दहशतवादामागे सरळसरळ आयडिऑलॉजी (धार्मिक विचार, या अर्थानं) आहे, असं लेखकाला वाटतं. ‘व्यवस्थेला कितीही कंटाळलात, तरीही आयसिसला सामील होतो असं म्हणू नका. ते टपलेलेच आहेत’ असंही लेखकाचं ‘जगभरच्या तरुणांना सांगणं’ आहे. आयसिस हा सध्याचा मोठा धोका आहे, हे इतरांप्रमाणेच त्यालाही मान्य आहे. पण आयसिसचा उदयच झाला नसता, तो आमचं (सीआयएचं) न ऐकल्यामुळे झाला, हा दोषारोप करणं, हे पुस्तकाचं एक प्रमुख काम आहे. ‘सीआयएच्या दैनंदिन कार्यपद्धतीवर उत्तम प्रकाश’ अशी दाद (!) काही जाणकारांनी दिल्याचं या पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठी इंटरनेटवर उघडलेली काही वेब-पानं सांगतील.. पण तेवढय़ासाठी कोणी पुस्तक वाचणार नाही.
रिपब्लिकन पक्षातील अध्यक्षीय उमेदवारीचे एक दावेदार डोनाल्ड ट्रम्प यांचा नको इतका गाजावाजा होत असताना, ‘ओबामा यांच्यानंतरच्या अध्यक्षांपुढे आयसिस हेच मोठे आव्हान’ असा प्रचार आतापासूनच सुरू झालेला असताना हे पुस्तक आलं आहे, हेही महत्त्वाचंच. मात्र, अमेरिकी तरुणांचा भ्रमनिरास काही फक्त व्हिएतनाम युद्धामुळे झालेला नसून अफगाणिस्तानातली आणि लादेनला ठार करण्याइतपत ‘यश’ मिळालेली अमेरिकी कारवाईसुद्धा तितकीच भ्रमनिरास करणारी आहे, हे सिद्ध करण्यासाठीच्या पुराव्यांमध्ये या पुस्तकानं आयतीच भर पाडली आहे हेही लक्षात घ्यायला हवं. पुस्तकातून दिसणारा लेखक भ्रमनिरासानंतरही अमेरिकाप्रेमाच्या भ्रमात मात्र अद्यापही आहे. हे फाटलेपण लपवण्याचं श्रेय सहलेखक राल्फ पेझुलो यांना द्यावं लागेल, कारण पुस्तकातला चिडचिडेपणा वाचकाला बाधू नये आणि पुस्तक रंजक व्हावं, याची काळजी त्यांनी घेतली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2016 3:26 am

Web Title: left of boom
Next Stories
1 आदरांजली : संकल्पनावेधी अर्थवेत्ता
2 अध:पतनाचा भविष्यकाळ
3 परीकथांचं गारूड..
Just Now!
X